अध्यात्म्याची अभिव्यक्ती!

अर्चना श्रीवास्तव यांच्या चित्र कलाकृतींचे प्रदर्शन जहांगीरमध्ये सुरू आहे. त्या कलाकृती कृष्णभक्ती, मनाचा शोध, भगवान बुद्द्धांचा प्रवास या संकल्पनांनी भरलेल्या आणि भारलेल्या आहेत.
expression of spirituality
expression of spiritualitysakal

अर्चना श्रीवास्तव यांच्या चित्र कलाकृतींचे प्रदर्शन जहांगीरमध्ये सुरू आहे. त्या कलाकृती कृष्णभक्ती, मनाचा शोध, भगवान बुद्द्धांचा प्रवास या संकल्पनांनी भरलेल्या आणि भारलेल्या आहेत. यात आध्यात्मिक मोक्षाचीही चित्रे आहेत अन्‌ चिरंतनासमोर नतमस्तक होत मरण कवटाळत त्या चिद्‌घनात एकरूप होणे आहे.

चित्रकाराच्या प्रेरणा नेमक्या असतात तरी काय? या रखरखीत दुनियेला सूरलोकसाम्य देण्यासाठी झटणाऱ्या प्रेरणांमागे नेमके असते तरी काय? कसे सुचते? झपूर्झासारख्या अवस्थेचे कवी केशवसुतांनी केलेले वर्णन तर सुप्रसिद्ध; पण खरेच निर्मितीमागच्या प्रेरणा असतात तरी काय? चित्र का काढावेसे वाटते अन्‌ नेमके कशासाठी?

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पारितोषिके मिळवलेल्या अर्चना श्रीवास्तव यांच्या मते त्या जो विचार करत असतात, तो त्या चित्रात उतरवतात किंवा उतरतो. अर्चना यांनी रूढ अर्थाने चित्रकलेचे शिक्षण, प्रशिक्षण घेतलेले नाही. त्या प्रारंभापासून कलाशाखेच्या विद्यार्थिनी. इतिहासात पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यात संशोधन करून डॉक्टरेटही मिळवली. पती मनुकुमार श्रीवास्तव सनदी अधिकारी.

त्यांच्यासमवेत वेगवेगळ्या पोस्टींग्जच्या ठिकाणी जाऊन त्या आत्मशोध घेत राहिल्या. लहानपणापासून रंगपेटी, क्रेयॉन वापरायची ओढ असायचीच. घरातल्या भिंती रंगायच्या; पण आपण चित्रकार आहोत, किंबहुना ते आपले अभिव्यक्तीचे माध्यम आहे, हे मात्र समजायचे नाही. त्या चित्र काढत राहिल्या अन्‌ १९९९ मध्ये त्यांनी थेट मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीत पहिलेवहिले प्रदर्शन भरवले. सोलो.

म्हणजे एकटीने काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन. त्यावेळी बुद्धिझम, महिलांचे सबलीकरण अशा विषयांवर त्यांनी कॅन्व्हास रंगवले. ऑईल हे त्यांचे आवडते माध्यम. होता होता आणखी चार एकल चित्रप्रदर्शने झाली. दिल्लीच्या ललित कला अकादमीतही गौरव झाला. पुरस्कार दरवाजावर आवाज देत आले. प्रतिष्ठा मिळवून देते झाले. चर्चा सुरू झाली.

चित्र चितारली जात असतानाच अर्चना श्रीवास्तव यांचा आध्यात्मिक प्रवास सुरू होता. बुद्धिझमचा अभ्यास झाला होता. भारताचा इतिहास अभ्यासत असताना जैनीझमही समजले होते. प्रथा-परंपरा, संस्कृतीतले नवनीत आकळू लागले होते अन्‌ चित्रेही मानसिक प्रवासाचे प्रतिबिंब दाखवू लागली होती. त्या वृत्तीने धार्मिक अन्‌ विचारपंथाने वैष्णव. चित्र साकारताना हे आध्यात्मिक विचारच कुंचल्यातून झरू लागले.

सध्या त्यांच्या या आध्यात्मिक मनोवृत्तीचे प्रतिबिंब ‘स्पिरीच्युअल रिफ्लेक्शन्स’ या नावाने जहांगीर आर्ट गॅलरीत सुरू आहे. भारतीय तत्वज्ञानातले चिरंतन विचार कलेच्या माध्यमातून सोपे करून लोकांपर्यंत पोहोचवता येतात, ही त्यांची धारणा आहे. वैष्णवांना कृष्णभक्तीचा ध्यास. अर्चना म्हणतात, मी स्वत: कृष्णभक्त. भगवद्गीतेतील तत्त्वज्ञानाने प्रत्येक भारतीयाप्रमाणे माझ्याही मनावर गारुड केलेले. वेदांचाही मनावर जबरदस्त पगडा.

या वेळी जहांगीरमध्ये ज्या कलाकृती ठेवल्या आहेत त्या सगळ्याच कृष्णभक्ती, मनाचा शोध, भगवान बुद्धांचा प्रवास या संकल्पनांनी भरलेल्या आणि भारलेल्या आहेत. यात आध्यात्मिक मोक्षाचीही चित्रे आहेत अन्‌ चिरंतनासमोर नतमस्तक होत मरण कवटाळत त्या चिद्‌घनात एकरूप होणे आहे.

गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या या प्रदर्शनातले सर्वाधिक वाखाणले जाणारे चित्र राधा-कृष्णाचे. राधेचे कृष्णमय होणे हे भारतीय संस्कृतीचे स्त्री-पुरुषांच्या प्रीतीबाबतचे सगळ्यात आवडते प्रतीक. राधा पूर्णत: कृष्णमय झालेली. अर्चना यांच्या चित्रात पाण्यात राधा प्रतिबिंब पहाते आहे अन्‌ तिथे तिला स्वत:ऐवजी कृष्णच दिसतोय. मी-तूपण संपले आहे.

तू आणि मी, छे छे आपण दोघे वेगळे आहोतच कुठे? ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या ‘दर्पणी पहाता रूप न दिसे हो आपुले’चे मूर्तरूप आहे हे पाण्यातले प्रतिबिंब पाहाताना राधेला स्वत:ऐवजी कृष्ण दिसतो हे चित्र. जहांगीरमध्ये प्रदर्शन पाहायला येणारा प्रत्येक तिथे थबकतो आहे. दशावतारही चितारले आहेत छोट्याशा कॅन्व्हासवर.

कूर्मावतारापासून तर कालकीपर्यंत. मध्यबिंदूला विष्णू आणि मग त्या भोवती दशावतार. हेही या चित्र प्रदर्शनाचे आकर्षण आहे. भगवान बुद्धांची आत खोलवर रुजलेली इम्प्रेशन्स अर्चना यांनी जपान, तसेच ताश्कंद येथे झालेल्या प्रदर्शनात सादर केली होती. सिद्धार्थ गौतमाचा भगवान बुद्ध होण्यापर्यंतचा प्रवास, यशोधरेला टाकून जाणे, तपाचरणात असताना अन्नपाण्याविना प्राण जात असताना सुजाता या प्रौढेने दिलेली खीर खाऊन पुन्हा जीवात जीव येणे, मग आत्मसाक्षात्कार होणे अन्‌ सरतेशेवटी शिष्यांसह महापरिनिर्वाणरत होणे या बुद्धजीवनातल्या ठळक घटना अत्यंत कमी स्ट्रोक्समध्ये तीन-चार कॅन्व्हासवर चितारल्या गेल्या आहेत. आत्मज्ञानाने भारलेले साधू आहेत, कमलपात्राप्रमाणे साक्षीभावाने जीवनप्रवासाकडे बघणारे श्रमण आहेत. हे प्रदर्शन एक आध्यात्मिक प्रवास आहे.

या वेळी अर्चना श्रीवास्तव केवळ चित्रांवर थांबलेल्या नाहीत. आता काही इन्स्टॉलेशनही त्यांनी सादर केली आहेत. चित्रकलेतील वेगवेगळी स्कील्स बहुचर्चित आणि प्रसिद्ध... कधी चित्रकार पाश्चात्त्य मर्त्यजीवनातून मोक्षप्राप्तीकडचा प्रवास डायव्हर्स रिल्मस अॅण्ड मोक्ष यातून उलगडला जातो आहे. काचांचा वापर करून दर्शवलेले नश्वर जीवन आणि सरतेशेवटीचा सुवर्णमय झळाळीच्या वापरात दाखवलेला मोक्ष फार बोलून जाते हे इन्स्टॉलेशन.

८४ लाख प्रकारच्या जीवात झळाळून उठणारा मानवजन्म एका निर्मितीत दाखवला आहे, तर लाईफ्स परपिच्युअल सायकल या निर्मितीत विविध वयोमानात, त्या त्या अवस्थेत वापरल्या जाणाऱ्या पायताणांचा वापर करून भगवद्‌गीतेतल्या दुसऱ्या अध्यायातल्या १३ व्या श्लोकाला साकारले आहे.

देहिनोस्मिन यथा देहे

कौमारम् यौवानम् जरा

तथा देहांतरा प्राप्ती:

धीरस् तत्र न मुहायती

या श्लोकाचे इतके सुंदर अभिव्यक्त होणे हे वेगळेच आहे. इन्स्टॉलेशनची त्रिमिती अभिव्यक्त होण्याचे अवकाश मोठे करते असे त्या सांगतात. कधी धातू वापरतात, कधी काच, तर कधी अगदी कोळसाही.

माध्यम कुठलेही असले तरी आत खोल खोल सुरू असलेल्या आध्यात्मिक आकलनाचे प्रगटीकरण करतात त्या. आत्मशोधाचा हा प्रवास हेच त्यांचे कलाकार म्हणून वेगळेपण आहे. अस्सल भारतीय प्रेरणा कायम मोक्ष धुंडाळत असतात. त्या प्रवासाची प्रचिती देणारे हे प्रदर्शन फोर्ट परिसरातल्या जहांगीर कला दालनात २३ ऑक्टोबरपर्यंत खुले आहे.

भगवान रामपुरे या विश्वप्रसिद्ध मूर्तिकाराच्या दोन रचनाही समवेत आहेत. मुंबई-महाराष्ट्रातल्या बड्या हस्तींनी हजेरी लावलेल्या या प्रदर्शनात सामान्य नागरिकही डोकावतो आहे. चित्रालगत त्यामागच्या प्रवासाची कल्पना उलगडून दाखवणारे सुगम सोप्या इंग्रजीत लिहिलेले फलकही कमालीचे वाचनीय आहेत. चित्राला उद्दिष्ट असावे का नसावे हे सांगता येणार नाही; पण अर्चना श्रीवास्तव यांचे प्रदर्शन त्यांच्या आध्यात्मिक अनुभूतींचे दर्शन घडवतात. प्रदर्शन संपेल, पण आर्टसेज या संस्थेच्या माध्यमातून त्यांचा प्रवास सुरूच राहील.

mrinalini.naniwadekar@esakal.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com