सप्तसुरांचे झंकार!

थंडीच्या दिवसांत रंगणाऱ्या संगीत मैफली रसिकांना अलौकिक आनंद देतात. भारतीय शास्त्रीय संगीताला अभिमान बाळगावा असा इतिहास आहे.
indian classical music maifil
indian classical music maifilsakal

थंडीच्या दिवसांत रंगणाऱ्या संगीत मैफली रसिकांना अलौकिक आनंद देतात. भारतीय शास्त्रीय संगीताला अभिमान बाळगावा असा इतिहास आहे. भारतात संगीत काठोकाठ भरले आहे. कुठे ते दरबारात बहरते, कुठे मंदिरात रंगते, तर अलीकडच्या काळात विविध मैफलींत बरसते...

थंडीचे दिवस सुरू झाले की समजायचे भारतातल्या बड्या शहरांत संगीत मैफली सुरू होणार! भीमसेन जोशींनी पुणेकरांत रुजवलेला सवाई गंधर्व उत्सव असो, कलाप्रेमी कोलकातातील ‘डावर लेन फेस्टिव्हल’ असो, की मुंबईतले गुणीदास, हृदयेश गानप्रभा... मंद वाहणाऱ्या वाऱ्यावर सात सूर विहरू लागतात अन् जगण्याला एक लय येते. मानवी जीवन स्वर्गीय पातळीवर नेण्याचा प्रयत्न करतात मैफली.

त्या रंगतात... कालही त्या होत्या, आजही आहेत अन् उद्याही असतील. संगीताच्या सुगीचे दिवस असतात हे. या सृष्टीला ‘सूरलोकसाम्य’ आणणारे कलाकार महोत्सवात हजेरी लावतात. सतारी-सारंगी झंकारतात, तंबोरा साथ देऊ लागतो, तबल्यावर थाप पडते अन् रसिक अलौकिकाच्या आनंदात रमतात.

भारतीय शास्त्रीय संगीताला अभिमान बाळगावा, असा इतिहास आहे. तशीही भारतीय संस्कृती कलापूजक. १६ विद्यांना जसे महत्त्व तसेच १८ कलांनाही. उत्तर आणि दक्षिण भारताच्या दोन्ही भागांत संगीत काठोकाठ भरले आहे. कुठे ते दरबारात बहरते, तर कुठे मंदिरात. राजाश्रयाइतकाच संगीताला लोकाश्रय लाभला. मुंबई आजच्यासारखी अवाढव्य नव्हती.

भौगोलिक आवाक्यातली होती तेव्हा गिरगावहून सायनपर्यंत शास्त्रीय संगीत गायक कसे जलशाला जात अन् कानसेनांना तृप्त करत याच्या कहाण्या आजही जाणकार सांगतात. मुंबईच्या अन् रसिकांच्या स्मृतिकोषाचा तो ऐश्वर्यसंपन्न भाग आहे. काळ बदलला, ‘एलपी’वरचे संगीत रेकॉर्ड-कॅसेट असा प्रवास करत हातातल्या मोबाईलवर बोट दाबताच सुरू होणाऱ्या यू-ट्युबवर सहज उपलब्ध झाले; पण ‘कलाकार दिसतो कसा प्रत्यक्षी’ची ओढ संगीत रसिकांना गानमहोत्सवांकडे आजही खेचते.

कंठसंगीत, वाद्यसंगीत आणि कधी तरी नृत्यप्रकार अशी रेलचेल असलेले संगीत महोत्सव रंगतात. महाराष्ट्राचा पर्यटन विभाग एलिफंटा गुंफांच्या पार्श्वभूमीवर कुठल्याशा पौर्णिमांना संगीत सोहळा रंगवत असे. सध्या तसे होताना दिसत नाही; पण ‘एशियाटिक लायब्ररी’च्या पायऱ्यांसमोर अश्विनी भिडे देशपांडे जसरंगी मैफल पंडित संजीव अभ्यंकरांसह रंगवतात. यज्ञेश रायकर नावाचा तरुण एस. आकाश या बासरीवादकासह दैवी लहरी निर्माण करतो.

झाकीरभाई (हुसेन) ‘वाह’ म्हणावे, अशी थाप देतात. संगीत पसरते सर्वत्र. शशी व्यास मुंबईत स्पिरिच्युअल मॉर्निंग आयोजित करतात. एक मोठा गायक कला सादर करतो. ‘गेट वे’च्या पार्श्वभूमीवर होणारे ते गायन मुंबईच्या सांस्कृतिक डायरीत वर्षभर झंकारत राहते. चेंबूरची संगीत सभा हा मुंबईतल्या संगीतप्रेमींचा पूर्वापार प्रसिद्ध असलेला अड्डा. तिथे साधारण चालते ते कर्नाटकी संगीत.

अनेक बडे कलाकार तिथे हजेरी लावून गेले आहेत. विलेपार्ले येथे होणारे हृदयेश आर्टस् फेस्टिव्हलही असेच लोकप्रिय झाले आहे. नुकतीच ३३ वर्षे पूर्ण झाली या महोत्सवाला. अविनाश प्रभावळकर अत्यंत निष्ठेने हा महोत्सव साजरा करतात. कला क्युरेट करावी तसा. प्रभाताई अत्रे यांनी या महोत्सवाला भक्कम आधार दिला.

त्यांच्या शब्दाचा मान राखत बडे बडे कलाकार ‘हृदयेश’ला हजर झाले. या वर्षीच्या महोत्सवात ९२ वर्षांच्या प्रभाताई गायन सादर करणार होत्या; पण आदल्या दिवशीच त्यांचे झोपेत निधन झाले. प्रभाताईंचे गेल्या वर्षीचे गायन ऐकवून त्यांना या संगीत महोत्सवात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

अशा संगीत महोत्सवात रसिक घडतात का, हा आपोआप सुचणारा प्रश्न... की कानसेन तयार होण्याची प्रक्रिया वेगळीच असते? जाणकार म्हणतात, महोत्सवांचे चलनवलन संगीतप्रक्रियेतला एक छोटासा भाग आहे. कलेबद्दल उत्सुकता निर्माण करणारा. संगीताशी परिचय झाला, सुरांची मोहिनी पडली की काही मंडळी गानपंढरीचे वारकरी होतात. त्यांना त्या पंथाची गोडी लागेल, एवढे काम महोत्सव नक्कीच करतात.

अशा संगीत महोत्सवांवरचा खर्च काही कोटींत जाणारा असावा. तिकीटविक्रीतून त्यातला जेमतेम २० ते २५ टक्के उभा राहतो. टाटा फायनान्स, एलआयसी हाऊसिंग इत्यादींसारख्या बड्या कंपन्या त्यासाठी प्रायोजक म्हणून उभ्या राहतात, हे संगीतप्रेमींचे भाग्य. ‘ब्ल्यू क्रॉस’ या ‘मेफ्टाल स्पास’सारख्या औषधाची निर्मिती करणारी कंपनी बी. जी. बर्वे या संगीतप्रेमी अधिकाऱ्यामुळे अर्थभार उचलायला पुढे येते. संगीत प्रवाहित होत राहते...

मुंबईतील कार्यक्रमांत सर्वाधिक संगीत ऐकले जात असावे. वेगवेगळ्या प्रकारचे. बॉलीवूडमुळे सुगम गीतांचे मोहोळ इथे तयार झाले आहेच; पण मुंबई ही कलांना आश्रय देणारी महानगरी असल्याने इथल्या संगीत कार्यक्रमांना कलाकार मंडळी आवर्जून हजेरी लावतात. धारवाड हुबळीत पं. भीमसेन जोशी, गंगूबाई हनगल यांच्यामुळे संगीतात करिअर करणे रूढ झाले. या कानडी ‘जिनियस’लाही जवळचे महानगर मुंबईच.

कला इथे बहरते यावर सगळ्यांचाच विश्वास. सध्याचे सर्वात लोकप्रिय कलाकार झाकीर हुसेन हे मूळचे मुंबईकर. त्यांचा मुंबईतल्या महत्त्वाच्या संगीत सभांत, महोत्सवांत वावर असतो. वडील उस्ताद अल्लारखांच्या स्मरणार्थ ते त्यांच्या भावांसह सादर करतात तो बरसी हा कार्यक्रम तर संगीतप्रेमींचे आकर्षण. या वर्षी तो होणार का, याबद्दल उत्सुकता आहे.

पंडित उल्हास कशाळकर, व्यंकटेशकुमार, कौशिकी चक्रवर्ती असे गायक आणि नीलाद्रीकुमार, एल. बालसुब्रमण्यम हे वादक मुंबईतील संगीत महोत्सवातील लोकप्रिय कलाकार. हरिप्रसाद चौरसिया, शिवकुमार शर्मा यांनी मैफलींचाही एक काळ गाजवला. राकेश चौरसिया आता प्रथितयश कलाकार झाले आहेत. कुमारगंधर्वांच्या घरातील मुकुल शिवपुत्र, कलापिनी कोमकली या मुला-मुलींपाठोपाठ पुढच्या पिढीच्या भुवनेशचे गाणेही रसिकांना भावते आहे.

मुख्य गायक आणि मुख्य वादकासमवेतच सहकलाकारही रंग भरणारे. विश्वनाथ आणि सीमा शिरोडकर, सत्यजित तळवलकर, ओजस आढिया अशी साथसंगत करणाऱ्यांची मांदियाळी. ‘विरासत’सारखे महोत्सव असोत किंवा दक्षिण मुंबईतील ‘एनसीपीए’तला कार्यक्रम, गानसंस्कृतीला प्रोत्साहन देणाऱ्या या बाबी.

उत्सव लोकांना भावतोच. त्यात सहभागी होण्याची असोशीही असतेच. आवडणारा कलाकार प्रत्यक्षात कसा गातो ही ओढ, कायम कामात व्यग्र असलेल्या मुंबईकराला दोन-तीन दिवस लाईव्ह कार्यक्रमांना ओढून आणते. प्रत्येक उत्सवाचे हुकमी श्रोतेही तयार झाले आहेत. ते दरवर्षी या कार्यक्रमांना हजर होतातच. खरे तर हे कार्यक्रम हवशे-नवशे-गवशे सगळ्यांनाच सामावून घेत असतात. संगीताचे व्याकरण समजून घ्यायचे असते, शिकायचे असते ते चेंबर्समध्ये, खासगी मैफिलीत. उत्सवात साजरी करायची असते दिवाळी.

मुंबईतील काही उपनगरांत आजही संगीत आणि नृत्यशाळांत हजेरी लावणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या शेकड्याने आहे. शाळकरी मुला-मुलींना कित्येक पालक नाच शिकायचा, संगीत समजून घेण्याचा आग्रह करत असतात. या संगीत महोत्सवांचे अर्थशास्त्र हा आणखी महत्त्वाचा विषय. भीमसेन जोशींना प्रेमापोटी हवाई गंधर्व म्हणण्याचे दिवस केव्हाच मागे पडले. आज प्रसिद्ध कलाकारांना बऱ्यापैकी आर्थिक स्थैर्य लाभले आहे.

काही कलाकार लाखात मानधन आकारतात अन् कलेला मोल नसल्याने आयोजक ते आस्थेने देतात. त्यांच्या निवास-प्रवासाकडे निगुतीने लक्ष दिले जाते अन् लाडही पुरवले जातात. प्रतिसृष्टी निर्माण करणाऱ्यांचे हे देणे असते. सर्जक कलाकारांचे ऋण मानतात रसिक. नीलाद्रीकुमारांसारखे आज लोकप्रियतेच्या शिखरावर असलेले वादक ‘रसिकहो, तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत’ असे सांगत ‘मायबाप’ म्हणणाऱ्या बालगंधर्वांचे स्मरण करून देतात.

छोट्या-मोठ्या शहरांत आजकाल बेंजोवादन चालते. बीकेसीत पाश्चात्त्य संगीताचे महोत्सव होतात. तिथे तरुणाई थिरकते. ‘लिटील चॅम्प्स’ स्पर्धेत पोहोचलेल्या चिमुरड्यांना ऐकायलाही गर्दी होते. आधुनिकतेचा अर्थ शोधला जातो; पण त्या नवतेच्या ध्यासाबरोबरच परंपरांचा सन्मान करणे आजही कायम आहे. या महोत्सवांना होणारी गर्दी त्याचा पुरावा आहे. तो दिलासा आहे, बावनकशी रसिकांनी कलाकारांना दिलेला. मराठी मुलुखात शास्त्रीय गायनपटू महिलांची परंपरा आहे. मोगूबाई कुर्डीकर, धोंडूताई कुळकर्णी यांच्यापासून सुरू झालेली ही परंपरा मंजिरी असनारे, गौरी पाठारेंपर्यंत कायम आहे.

मैफलीत गायले जाणारे रागप्रकारही काहीसे ओळखीचे. बागेश्री ऐकायला मिळेल या इच्छेने जाणारे कमी नसतात. कधी छायानट, कधी अहीरभैरव ऐकायला मिळतो. काय ऐकवू असे श्रोत्यांना विचारणारे गायकही असतात. मग ठुमरी दादऱ्याची फर्माईश होते. ‘कौन गली गयो शाम’ची आठवण होते. तराणा झंकारू लागतो. रसिकमन तृप्त होते. संगीत महोत्सवांना जाणे हा तसा स्टेटस सिम्बॉल झालाय.

सुरांना लोकाश्रय मिळणार असेल, तर हरकत तरी काय आहे? मराठीत साहित्य संमेलनाची जशी संस्कृती आहे, गणेशोत्सवाची आहे तशीच बनारस-कोलकाता-दिल्ली-लखनौप्रमाणेच मुंबई-पुण्यातील संगीत महोत्सवांचीही चलती आहे. ऑक्टोबर ते फेब्रुवारीदरम्यान कलासंस्कृतीला बहर येतो अन् श्रुती धन्य होतात, कानसेन तृप्त होतात.

संगीताला चालना मिळावी, यासाठी रसिक अभ्यासक केशव परांजपे यांनी निवासी संगीत शिबिर ही अभिनव कल्पना रुजू केली. लोणावळा-खंडाळ्यात रसिकांनी मुक्कामी जायचे अन् दोन-तीन दिवस फक्त संगीत ऐकायचे. एका परिचिताच्या बंगलीवजा घरात हा सिलसिला सुरू झाला अन् मग मन:शक्तीच्या प्रांगणात काही वर्षे विहरून आता भटकंतीला लागला. वाराणशीच्या घाटावर गंगेच्या लहरींच्या साक्षीने हे निवासी शिबिर झाले.

सारी व्यवधाने दूर ठेवून कलाकार रसिकांना संगीतात आकंठ तृप्त होता यावे, एवढाच यामागचा उद्देश. ये हृदयीचे ते हृदयी टाकणारा. या वेळी हे शिबिर ऋषिकेशला होणार आहे. हजार हजार रुपये खर्च करून श्रोते तेथे जातात; कारण संगीत जीवनाला परीसस्पर्श देणारे आहे, अमर तर आहेच अन् संजीवकही! भारतीय संगीताचा हा प्रवाह आगामी पिढ्यांनाही तृप्त करत राहो अन् दैवी आनंद देवो!

mrinalinin@gmail.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com