जंगलातला जागल्या! (मुक्ता मनोहर)

mukta manohar's article
mukta manohar's article

सकाळ होताच टारझननं ‘ओय, ओय’ची मोठी आरोळी ठोकली. आपल्या आरोळीनं आता सगळे प्राणी आणि आदिवासी जमा होतील; मग ठरवू या पुढं काय करायचं ते, असा विचार त्यानं केला...पण समोर कुणीच येत नव्हतं. टारझन तरीही आरोळ्याच देत राहिला. कुणीच समोर येत नसल्याचं पाहून तो विचार करू लागला...‘खरंतर आपण या माणसांना किती गोष्टी शिकवल्या. प्राण्यांचे आवाज काढायला शिकवले. वेळूच्या बनातल्या बासरीचा आवाज दिला. जमिनीत लपलेली अमाप संपत्ती दाखवली. मग माझ्या आरोळीला कुणी प्रतिसाद का देत नसावं? जंगलात सगळं छान असताना हे असं का व्हावं? ’

पोलिसांनी लावलेल्या सापळ्यात टारझन एकदा सापडला. होय तोच तो टारझन. ‘ओय, ओय’, अशी आरोळी मारून सगळ्या प्राण्यांना गोळा करणारा टारझन. टारझनला पाहून ड्युटीवरच्या दोन्ही पोलिसांना तो नक्षलवादी आहे असंच वाटलं. त्यांना तसं वाटलं. कारण, तो सापळा त्यांनी एका कट्टर नक्षलवाद्याला पकडण्यासाठीच लावला होता. कुणाच्याच हातात टारझन असा कधी सापडला नसताच मुळी; पण उड्या मारताना टारझनच्या डोळ्याला एक फांदी लागली आणि तो खाली पडला. तेवढंच निमित्त. त्या अगडबंब टारझनला उचलायचं आणि जीपमध्ये घालायचं. ते दोन कॉन्स्टेबल अक्षरशः घामाघूम होऊन गेले. नक्षलवाद्यांचा म्होरक्‍या बहुतेक हाच, असा त्यांचा समज झाला. त्यामुळं त्याला पकडताना त्यांच्यावर जणू दडपणही आलं होतं. जेव्हा त्यांची जीप मुख्य ठाण्यावर आली, तेव्हा त्या दोघा कॉन्स्टेबलचा जीव भांड्यात पडला. ते पोलिस ठाणंही जंगलात होतं. त्या भागातले ‘ग्रामीण’चे पोलिस उपायुक्तही तिथं हजर झाले होते. मग टारझनला बोलतं करण्याच्या सगळ्या पोलिसी खेळांना सुरवात झाली. हिंदी सिनेमात दाखवतात तशाच किंवा त्यापेक्षाही जास्त क्रूर पद्धती! पण तो टारझन असल्यामुळं छळाला तो अजिबात बधला नाही.

खरंतर जेव्हा टारझनला जीपमध्ये टाकलं, तेव्हाच ‘काहीतरी घोटाळा आहे,’ याची जाणीव त्याला झाली होती. आपण पुन्हा कोणत्या तरी अतिदुष्ट माणसांच्या कचाट्यात सापडल्याची ती जाणीव होती. यापूर्वी असाच भटकत तो जेव्हा श्रीलंकेच्या जंगलात फिरत होता, तेव्हा तो ‘लिबरेशन टायगर्स’च्या हाती सापडला होता. तमिळींच्या स्वातंत्र्यासाठी सुरू असलेलं ते रक्ताळलेलं क्रौर्य बघून तो आश्‍चर्यचकित झाला. श्रीलंकेच्या सरकारनं जेव्हा त्या ‘टायगर्स’साठी मोठ्ठं युद्ध पुकारलं, तेव्हा टारझननं ते जंगल सोडायचाच निर्णय घेतला. त्याचा पुकारा कुणी ऐकणं शक्‍यच नव्हतं. नंतर तो पुढं आला तर वीरप्पनचं साम्राज्य लागलं. एकूण ‘जंगलाचं काही खरं नाही,’ असा विचार करत करत तो बराच पुढं आला. मग जे जंगल लागलं. तिथं नक्षलवाद्यांचा प्रभाव होता. अर्थात नक्षलवाद्यांबद्दलही त्याला फारसं काही माहीत नव्हतं. त्यानं त्याचा नेहमीचा पुकारा दिला ‘ओय, ओय’... पण तिथंही त्याला काही प्रतिसाद मिळाला नाही. मुख्य म्हणजे प्राणीही जमले नाहीत. त्यानं वाघाची डरकाळी मारली, त्यानं माकडांचे चीत्कार केले; पण सगळं जंगल ढीम्मच होतं. या जंगलात कुणीच कसं नाही? टारझन विचारात पडला होता... नेमकी त्याचवेळी त्याच्या डोळ्याला ती फांदी जोरात लागली आणि तो कोसळला व पोलिसांच्या हाती सापडला. त्याला पोलिस ठाण्यात आणलं गेलं. नक्षलवादी म्हणून पोलिस फारच मारहाण करायला लागले, तेव्हा शेवटी टारझन वैतागला. आपली सगळी ताकद एकवटून तो उठला व त्यानंही प्रतिकार करायला सुरवात केली.

टारझन बाहेर पडला तर बाहेर अंधारात पोलिस चौकीवर काही नक्षलवादी हल्ला करायला आलेले दिसले. टारझननं त्यांच्याशीही दोन होत केले. नंतर टारझननं एका पोलिस अधिकाऱ्याला आणि नक्षलवाद्यांच्या म्होरक्‍याला आपल्यासोबतच थांबवून ठेवलं आणि तो तांबडं फुटायची वाट पाहत बसला.

सकाळ होताच टारझननं ‘ओय, ओय’ची मोठी आरोळी ठोकली. आता तरी सगळे प्राणी आणि आदिवासी जमा होतील; मग ठरवू या पुढं काय करायचं ते, असा विचार त्यानं केला. तो आरोळ्या देत राहिला. खरं तर आपण या माणसांना किती गोष्टी शिकवल्या. प्राण्यांचे आवाज काढायला शिकवलं. वेळूच्या बनातला बासरीचा आवाज दिला. जमिनीत लपलेली अमाप संपत्ती दाखवली. जंगलात सगळं छान असताना हे असं का व्हावं? तो आरोळ्या मारत होता आणि विचार करत होता. ‘आता प्राणी येतील, आता जंगलातली माणसं येतील....’ ‘ओय... ओय...’ असं त्याचं बराच वेळ सुरू होतं आणि जंगल मात्र तसंच गप्प होतं. काय भानगड आहे? तो आता अधिकच विचारात पडला. तेव्हा सोबतचा पोलिस अधिकारी टारझनला म्हणाला ः ‘‘अरे, तू माणसांना हाका मारत असशील तर ती येणार नाहीत. कारण, आदिवासींना सरकारनं इथून हुसकून एका छावणीत पहाऱ्यात ठेवलं आहे. हे सगळं जंगल काही मल्टिनॅशनल कंपन्यांना सरकारनं विकलं आहे. कंपन्यांनी यच्च्यावत प्राण्यांची छाननी केली असून, हवे ते प्राणी प्राणिसंग्रहालयात पाठवले आहेत आणि नको ते प्राणी मारून टाकले आहेत. तू कुणासाठी ओरडतो आहेस?’’

त्यावर टारझन ठामपणे म्हणाला ः ‘‘मी इसापच्या अस्सल जंगलातला अस्सल टारझन आहे. प्राण्यांना आणि समस्त मानवसृष्टीला जाग येईपर्यंत मी ओरडत राहणार आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com