करबचतीबरोबरच करमुक्त उत्पन्नही! (मुकुंद लेले)

मुकुंद लेले mukundlelepune@gmail.com
रविवार, 21 जानेवारी 2018

सार्वजनिक भविष्य निर्वाहनिधी (पीपीएफ) ही योजना वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. ‘पीपीएफ’मधल्या गुंतवणुकीवर प्राप्तिकर कायदा कलम ८० सी अंतर्गत वजावटही मिळते; तसंच यातल्या गुंतवणुकीवर मिळणारं व्याज (सध्या ७.६ टक्के) अजून तरी करमुक्त आहे. या गोष्टींमुळं या योजनेची लोकप्रियता (व्याजदर कमी होऊनही) अजूनही टिकून आहे. या योजनेबाबत माहिती...

सार्वजनिक भविष्य निर्वाहनिधी (पीपीएफ) ही योजना वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. ‘पीपीएफ’मधल्या गुंतवणुकीवर प्राप्तिकर कायदा कलम ८० सी अंतर्गत वजावटही मिळते; तसंच यातल्या गुंतवणुकीवर मिळणारं व्याज (सध्या ७.६ टक्के) अजून तरी करमुक्त आहे. या गोष्टींमुळं या योजनेची लोकप्रियता (व्याजदर कमी होऊनही) अजूनही टिकून आहे. या योजनेबाबत माहिती...

सु  रक्षिततेच्या भक्कम कवचामुळे लोकप्रिय असलेल्या अल्पबचत योजनांचे व्याजदर एक जानेवारी २०१८ पासून सरकारनं आणखी कमी केल्यानं सर्वसामान्य गुंतवणूकदारांमध्ये काहीशी नाराजी पसरली आहे. मात्र, हे व्याजदर आता बाजारातल्या व्याजदरांशी सुसंगत ठेवण्याच्या सरकारच्या भूमिकेमुळं या गोष्टी घडणार, हे सर्वांनीच लक्षात घेतलं पाहिजे. कारण बॅंकांतल्या ठेवींचे व्याजदरही कमीच झालेले आहेत. थोडक्‍यात, समान स्पर्धात्मकता ठेवण्यासाठी अल्पबचत योजनांचे व्याजदर कमी कले जात आहेत.

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी), किसान विकास पत्र (केव्हीपी), मासिक प्राप्ती योजना (एमआयएस), मुदत ठेवी (टीडी) आदी योजनांच्या तुलनेत सार्वजनिक भविष्य निर्वाहनिधी (पीपीएफ) ही योजना वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. म्हणूनच तिची दखल स्वतंत्रपणे घेतली पाहिजे. ‘पीपीएफ’मधल्या गुंतवणुकीवर प्राप्तिकर कायदा कलम ८० सी अंतर्गत वजावटही मिळते; तसंच यातल्या गुंतवणुकीवर मिळणारं व्याज (सध्या ७.६ टक्के) अजून तरी करमुक्त आहे. या गोष्टींमुळे या योजनेची लोकप्रियता (व्याजदर कमी होऊनही) अजूनही टिकून आहे.

करमुक्त उत्पन्नाची जननी समजल्या जाणाऱ्या अशा या योजनेकडे आजच लक्ष का दिलं पाहिजे, ते आपण पाहू या. निश्‍चित उत्पन्नाच्या योजनांच्या गटात, आज करमुक्त उत्पन्न आणि प्राप्तिकर बचत असा दुहेरी फायदा करून देणाऱ्या योजना क्वचितच आढळतात. त्याचमुळे चाणाक्ष गुंतवणूकदार याचा पुरेपूर फायदा करून घेतात, तर ज्यांना या योजनेचं महत्त्व पुरेसं समजलेलं नाही, ते अशा लाभापासून वंचित राहतात. याच वर्गाला डोळ्यांसमोर ठेवून आज आर्थिक वर्षाच्या अखेरच्या टप्प्यात या विषयाची निवड केली आहे.  

नोकरदारवर्गाला पगारातून कपात होणाऱ्या ‘पीएफ’च्या रूपानं वेगळा निधी निवृत्तीच्या वेळी मिळतो. मात्र, व्यावसायिकांसाठी अशी योजना नसते. त्यांच्यासाठी तर ‘पीपीएफ’ हा सर्वांत उत्तम मार्ग म्हणावा लागेल. त्यामुळे या मंडळींसाठी पीपीएफ म्हणजे ‘पब्लिक प्रॉव्हिडंट फंड’ न म्हणता ‘पॅरलल प्रॉव्हिडंट फंड’ म्हणता येईल. पगारदारांनीही स्वेच्छेनं सुरू केलेला अतिरिक्त ‘पीएफ’ म्हणूनच त्याकडे पाहायला हवं. ‘पीपीएफ’चा व्याजदर चालू आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीसाठी ७.६ टक्के असून, या खात्यात एका आर्थिक वर्षात म्हणजे एक एप्रिल ते ३१ मार्च या काळात कमीत कमी ५०० रुपये व जास्तीत जास्त दीड लाख रुपये भरता येतात. दर वर्षी विशिष्ट रक्कम (हप्त्यासारखं) भरण्याचं बंधन नसल्यानं खातेदार आपल्या कुवतीप्रमाणं किंवा गरजेप्रमाणं वरील मर्यादेत कितीही रक्कम वर्षभरात कधीही भरू शकतो. ही रक्कम वर्षभरात किमान एकदा आणि जास्तीत जास्त बारा वेळा भरता येते. बारा वेळा याचा अर्थ दर महिन्यात एकदा असा अर्थ काही जण घेतात; मात्र तो चुकीचा आहे.

पैसे नेमके कधी भरावेत?
बरेच जण उत्साहानं ‘पीपीएफ’चं खातं उघडतात; पण त्यात दर वर्षी पैसे भरण्यात सातत्य ठेवत नाहीत. त्यामुळे या योजनेचा खऱ्या अर्थानं लाभ त्यांना मिळत नाही. एका आर्थिक वर्षात म्हणजे एक एप्रिल ते ३१ मार्च या काळात कधीही पैसे भरलेले चालतात, अशी मुभा असल्यानं या खात्यात थेट मार्चमध्येच पैसे भरण्याकडे काहींचा कल असल्याचं दिसून येतं. प्रत्यक्षात असं करणं शहाणपणाचं ठरत नाही. ‘पीपीएफ’च्या खात्यात आर्थिक वर्षाच्या प्रारंभी म्हणजे एप्रिलच्या सुरवातीलाच शक्‍य तेवढे (कमाल मर्यादेत) पैसे भरल्यास संपूर्ण वर्षाचं करमुक्त व्याज मिळवता येऊ शकतं. शिवाय मार्च महिन्यात बॅंकांमध्ये होणाऱ्या गर्दीच्या त्रासापासून आपली सुटका होऊ शकते आणि दंडाची टांगती तलवारही राहत नाही. त्यामुळे ‘पीपीएफ’च्या खात्यात एप्रिलमध्ये शक्‍य तेवढी जास्त रक्कम भरायला हवी. नंतर कमाल मर्यादेपर्यंतची रक्कम गरजेनुसार वर्षभरात पुन्हा भरण्याचा पर्याय उपलब्ध असतोच. जी मंडळी आतापर्यंत असं करत नव्हती, त्यांनी नव्या आर्थिक वर्षापासून याची काळजी घेतली तरी त्यांना त्याचा अधिक लाभ मिळू शकेल.

‘पीपीएफ’ची ठळक वैशिष्ट्यं
१) ही योजना १५ वर्षांची दीर्घकालीन गुंतवणूक योजना आहे. आपली इच्छा आणि गरज लक्षात घेऊन, या खात्याची मुदत आणखी पाच वर्षांसाठी वाढवता येते. दर पाच-पाच वर्षांनी या योजनेचं नूतनीकरण करता येतं. २) व्यक्तीला स्वतःच्या नावे, तसंच तो पालक असलेल्या अज्ञान मुला-मुलींच्या नावे पीपीएफ खातं उघडता येतं. मात्र, पालकांना स्वतःसह अज्ञानांच्या खात्यांत मिळून एका वर्षात दीड लाखाच्या मर्यादेतच रक्कम गुंतवता येते. ३) पीपीएफ खात्यातून पहिली सात वर्षं पैसे काढता येत नाहीत. त्यानंतर दर वर्षी एकदा याप्रमाणं अंशतः पैसे काढता येतात. ४) पीपीएफ योजनेत मिळणारं सर्व व्याज (अजून तरी) पूर्णतः करमुक्त आहे. सरकारच्या धोरणानुसार, ‘पीपीएफ’चा व्याजदर दर तिमाहीला बदलता राहू शकतो. ५) पीपीएफ ही करबचतीची गुंतवणूक म्हणून कलम ८० सीच्या पात्र गुंतवणुकीच्या दीड लाखांच्या मर्यादेत मोडते.
करबचतीबरोबरच करमुक्त उत्पन्न देणारी ‘पीपीएफ’ योजना एक प्रकारे कामधेनूच म्हणावी लागेल. अशाच प्रकारे करबचत आणि करमुक्त परतावा देणाऱ्या शेअर बाजाराशी निगडित (इक्विटी लिंक्‍ड सेव्हिंग्ज स्कीम) असलेल्या योजनांमधली जोखीम ज्यांना अजिबात स्वीकारायची नसेल, त्यांना ‘पीपीएफ’चा पर्याय निश्‍चितच दिलासा आणि आधार देणारा आहे. जितक्‍या कमी वयात त्याचं खातं उघडले जाईल, तितका त्याचा फायदा अधिक आहे.

Web Title: mukund lele write ppf article in saptarang