खेलो और खिलो (मुकुंद पोतदार)

मुकुंद पोतदार
रविवार, 13 जानेवारी 2019

शाळेतल्या मुलांवर दप्तराचं ओझं...होमवर्कचा ताण...अभ्यासक्रमात खेळांचा समावेश नसणं यापासून ते ऑलिंपिकमधल्या पदकांचा दुष्काळ इथपर्यंतची प्रत्येक समस्या केवळ पाच मिनिटांत सुटू शकते. भारतात "खेलो इंडिया'ची संकल्पना अमेरिकेतल्या स्पर्धेपेक्षाही एक पाऊल पुढं आहे, असा विश्वास बाळगणाऱ्या राजवर्धन राठोडमुळं खेळाडूंना "अच्छे दिन' आले आहेत.

शाळेतल्या मुलांवर दप्तराचं ओझं...होमवर्कचा ताण...अभ्यासक्रमात खेळांचा समावेश नसणं यापासून ते ऑलिंपिकमधल्या पदकांचा दुष्काळ इथपर्यंतची प्रत्येक समस्या केवळ पाच मिनिटांत सुटू शकते. भारतात "खेलो इंडिया'ची संकल्पना अमेरिकेतल्या स्पर्धेपेक्षाही एक पाऊल पुढं आहे, असा विश्वास बाळगणाऱ्या राजवर्धन राठोडमुळं खेळाडूंना "अच्छे दिन' आले आहेत.

बीजिंग (2008) आणि लंडन (2012) या दोन ऑलिंपिकमधल्या कामगिरीमुळं भारतीय क्रीडाप्रेमींच्या आशा पल्लवित झाल्या; पण सन 2016 च्या रिओ ऑलिंपिकमध्ये साक्षी मलिक आणि पी. व्ही. सिंधू यांचं ऐतिहासिक यश अन्‌ दीपा कर्माकरची भरारी वगळल्यास निराशाच झाली. ऑलिंपिक चळवळीचे Citius, Altius, Fortius (आणखी गतिमान, आणखी उत्तुंग, आणखी भक्कम) हे ब्रीदवाक्‍य अंगी बाणायचं असेल तक, क्रीडासंस्कृती निर्माण करायची असेल तर चर्चेची नव्हे तर ठोस कृतीची गरज असल्याचा मुद्दा पुन्हा अधोरेखित झाला. अशा वेळी शालेय अभ्यासक्रमात क्रीडा हा विषय अनिवार्य असावा असा सातत्यानं नुसताच चर्चिला जाणारा विषय निरुपयोगी ठरला होता. कृतीची किंवा किंबहुना खेळाच्या संदर्भात ऍक्‍शनची गरज होती. त्यासाठी एका ऑलिंपिक पदकविजेत्याचाच उदय व्हावा लागला.

सन 2004 मध्ये अथेन्स या ऑलिंपिकच्या जन्मभूमीत रौप्यपदक जिंकलेला नेमबाज राजवर्धनसिंह राठोड याच्या रूपानं तो झाला. पुढं तो क्रीडामंत्री बनण्याचा योग आला. त्याच्या पुढाकारानं सन 2018 मध्ये "खेलो इंडिया'ला प्रारंभ झाला. ऑलिंपिकच्या व्यासपीठावर शिस्तबद्ध सरावाच्या जोरावर रौप्यपदक जिंकलेल्या लष्करातल्या या जवान नेमबाजानं पद, प्रतिमा अन्‌ सत्तेचा सकारात्मक वापर केला. त्यामुळे केवळ एक स्पर्धा नव्हे तर महोत्सवाचा, इव्हेंटचा संकल्प तो तडीस नेऊ शकला. ऑलिंपिक पदकामुळं मिळालेली प्रसिद्धी आणि लष्करातली नोकरी असं समाधानकारक आयुष्य जगणाऱ्या राजवर्धननं राजकारणात प्रवेश केला, याचं कारण तो स्वतः काही तरी करून दाखवू इच्छित होता.

एरवी क्रिकेटच्या मैदानावर आस्किंग रेट (आवश्‍यक धावगती) कितीही वाढत गेली तरी - जितेगा भाई जितेगा, इंडिया जितेगा-असा जयघोष करत आसमंत दणाणून सोडणाऱ्या भारतीयांसाठी "खेलो इंडिया' वरदान ठरत आहे. स्पर्धेचा दुसराच अध्याय पुण्यात सुरू झाला असला तरी क्रिकेटप्रधान देशात राजवर्धनमुळं ऑलिंपिक खेळांना मूलभूत पातळीवर विलक्षण चालना मिळत आहे. पायाभूत सुविधांसह खेळाडूंना परिपूर्ण पाठिंबा त्यातून दिला जात आहे.

कॅच देम यंग
"खेलो इंडिया स्कूल गेम्स' (KISG) या नावानं 17 वर्षांच्या आतल्या गटाची स्पर्धा गेल्या वर्षाच्या प्रारंभी दिल्लीत पार पडली. यंदा 21 वर्षांच्या आतल्या गटाची भर घालत "खेलो इंडिया यूथ गेम्स'चं (KIYG) आयोजन होत आहे. नवा गट जास्त वयाच्या खेळाडूंसाठी असला तरी Catch them young हेच सूत्र असेल. पुढच्या स्पर्धेत 12 वर्षांच्या आतल्या गटापर्यंतचे खेळाडू भाग घेऊ शकतील. भारतीय खेळाडू सब-ज्युनिअर, ज्युनिअर अशा पातळ्यांवर चमकतात; पण त्यानंतर आणखी दर्जेदार सरावसुविधा, आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या सहभागाची संधी, खेळातल्या करिअरच्या यशाविषयीची अनिश्‍चितता आणि त्यातून अभ्यासाचं ओझं यामुळं पुढचं पाऊल अडखळतं. "खेलो इंडिया'तल्या विजेत्यांना चार ते आठ वर्षं शिष्यवृत्ती मिळणार आहे. त्यामुळं त्यांचा खेळ थांबणार नाही.

कुठली कमतरता होती?
भारतात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन लांबणीवर पडत पडत अखेर संयोजन पार पडण्याचा पायंडा निर्माण झाला होता. तसं पाहिलं तर सन 1982च्या "एशियाड'पूर्वी सन 1951 मध्ये पहिला अध्याय दिल्लीतच झाला होता. सन 2008 मध्ये पुण्यात राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धा, तर दोन वर्षांनी दिल्लीत राष्ट्रकुल क्रीडा अशा स्पर्धा पार पडल्या. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या संयोजनात मात्र नियमितता नसणं मारक ठरत होतं. "खेलो इंडिया' याच संदर्भात आणखी मोलाची ठरते.

अमेरिकी स्पर्धेपेक्षा सरस...!
अमेरिकेला क्रीडा महासत्ता बनवण्यात तिथल्या विद्यापीठांतल्या NCAA (National Collegiate Athletic Association) स्पर्धांचा वाटा मोठा आहे. त्या व्यासपाठीवर हजारो खेळाडू खेळत असतात. आता वयोगट वाढतील तसे खेळाडू वाढतील. दोन वर्षांत आपण NCAA इतकंच संख्यात्मक समीकरण साधलेलं असेल, असा विश्वास राजवर्धनला वाटतो. या स्पर्धा दरवर्षी चालतात. त्याचप्रमाणे "खेलो इंडिया'सुद्धा दर वर्षी होणार आहे आणि हा मुद्दा तितकाच महत्त्वाचा आहे.

टीव्ही प्रक्षेपण
एशियाड, ऑलिंपिकचं थेट प्रक्षेपण पाहणं प्रेरणादायी असते. तलवारबाजी, मुष्टियुद्ध, जिम्नॅस्टिक्‍स, अशा खेळांची गुणपद्धती कशी आहे याची तांत्रिक माहिती जरी नसली तरी सामने पाहणं हा थरारक अनुभव असतो. अंजली भागवत नेमबाज बनण्यापूर्वी कार्ल लुईसच्या ऑलिंपिकमधल्या पराक्रमानं आपण प्रभावित झालो होतो, असं नमूद करते. अपूर्वी चंडेला हिच्यासाठी अभिनव बिंद्राचं बीजिंगमधलं सुवर्णपदक प्रेरणास्थान ठरलं. "खेलो इंडिया'चं शंभर तासांचे थेट प्रक्षेपण "स्टार स्पोर्टस'सारख्या दर्जेदार चॅनेलवरून केलं जात असल्याचा मुद्दा राजवर्धन आवर्जून सांगतो.
""खेळांची जननी ऍथलेटिक्‍स, बॅडमिंटन, जलतरण, कुस्ती, मुष्टियुद्ध यांसह हॉकी, कबड्डी, खो खो, व्हॉलिबॉल अशा नऊ खेळांचं थेट प्रक्षेपण केलं जाईल. आपली मुलं खेळत आहेत आणि ते टीव्हीवर दाखवलं जात आहे याचा पालकांना किती अभिमान वाटतो याची कल्पना करून पाहा,'' असं तो म्हणतो.

पाच मिनिटांची आयडिया
"(पुढं व्हा...) आलोच पाच मिनिटांत' असं आपल्या कानावर अनेकदा पडतं आणि आपल्या तोंडूनही हे शब्द बाहेर पडतात. होमवर्कसाठी हाका मारणाऱ्या पालकांना मैदानावरची मुलं-मुलीं हेच ऐकवत असतात. "हीच जादाची पाच मिनिटं तुम्हाला चॅंपियन बनवतील,' असा संदेश राजवर्धन "खेलो इंडिया'च्या प्रोमोमध्ये देतो.
***
सार्वत्रिक निवडणुकांचे काउंटडाऊन लवकरच सुरू होणार आहे. "शायनिंग इंडिया'प्रमाणे "अच्छे दिन' हे घोषवाक्‍य सत्ताधारी भाजपवर बूमरॅंग होणार का याची खेळीमेळीनं नव्हे, तर तावातावानं चर्चा झडत आहे आणि इथून पुढं ती तीव्र होत जाणार आहे. क्रीडापटूंचा विचार केला तर मात्र "अच्छे दिन'विषयी दुमत असणार नाही. याचं कारण "खेलो इंडिया'नामक वार्षिक उपक्रमाद्वारे क्रीडासंस्कृतीचं बीज पेरून मोठी प्रक्रिया आणि तीद्वारे परंपरा या सरकारनं सुरू केली आहे.
क्रिकेटच्या खेळात सलामीवीर, वेगवान गोलंदाजांच्या जोड्या असतात. त्या धर्तीवर "स्वच्छ भारत'चा संदेश देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि "फिटनेस चॅलेंज' देणारे राजवर्धनसिंह राठोड अशी पंतप्रधान-क्रीडामंत्री ही जोडी भारतीय क्रीडाक्षेत्रासाठी स्वागतार्ह ठरली आहे. मोदी यांनी योगासनांचा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर राठोड यांनी "फिटनेस चॅलेंज'ची साद दिली. या हॅशटॅगला विराट कोहली, पी. व्ही. सिंधू, साक्षी मलिक यांच्यापासून विविध क्षेत्रांतल्या नामवंतांनी प्रतिसाद दिला.
राजवर्धन सोशल मीडियाचा कल्पक वापर करतो. त्यानं गेल्या वर्षी ऑन ड्यूटी पुश-अप्स काढत तंदुरुस्तीचा संदेश दिला. त्याला जोरदार प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेपूर्वी त्यानं आपल्या लहानपणीच्या खेळण्याच्या आठवणी सांगण्याविषयीची साद चॅंपियन देशबांधवांना घातली आहे. तिलाही भरघोस प्रतिसाद मिळत आहे.

एक कोटीचा संकल्प
* आठ वर्षांच्या आतल्या मुला-मुलींसाठी "टॅलेंट हंट' उपक्रम आखणार
* त्यातून एक कोटी मुलांपर्यंत पोचण्याचं लक्ष्य
* छाननीतून 20 हजार मुलांची नावं निश्‍चित
* आयक्‍यू, डीएनए अशा विविध चाचण्या घेऊन पाच हजार जणांची निवड
* आणखी पूरक चाचण्या घेत एक हजार जणांची नावं अंतिम
* या मुलांना आठ वर्षं सुविधा
* सोळाव्या वर्षापर्यंत त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर मजल मारणं अपेक्षित

एनडीए आणि मन की बात
राजवर्धनसिंह राठोड याचं एनडीएशी (राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी) खास नातं आहे. आपल्यातला केवळ लष्करी जवानच नव्हे तर चॅंपियनही इथंच घडला, अशी त्याची भावना आहे. अथेन्समधल्या यशानंतर त्यानं एनडीएला भेट दिली होती. त्या वेळी त्याची भेट घेण्याची संधी मिळाली होती.
"तुमच्या रौप्यपदकाचा संदेश काय?' या प्रश्नावर त्यानं म्हटलं होतं ः ""गल्ली-बोळात राहणाऱ्या प्रत्येकाला खेळण्यासाठी प्रेरित करा. त्याची कामगिरी कशीही झाली तरी त्याला प्रोत्साहन द्या. खेळाडू घडवला तरच विजेता घडेल.''
राजवर्धननं "खेलो इंडिया'द्वारे हेच व्यासपीठ निर्माण केलं आहे. त्यामुळे ही स्पर्धा माईलस्टोन ठरेल.

महाराष्ट्रासाठी मान
दुसऱ्या "खेलो इंडिया'चं यजमानपद मिळणं हा महाराष्ट्रासाठी मोठा मान आहे. छत्तीसगढ आणि झारखंड अशी इतर दोन राज्यंही यजमानपदाच्या शर्यतीत होती. म्हाळुंगे-बालेवाडीतल्या श्रीशिवछत्रती क्रीडासंकुलात राज्याचं क्रीडा खातं "क्रीडा प्रबोधिनी'सह विविध उपक्रम राबवत आहे. व्यावसायिक लीगच्या संयोजनामुळे "स्पोर्टस सिटी' अशी पुण्याची प्रतिमा झाली आहे. यजमान या नात्यानं महाराष्ट्रातल्या खेळांना चालना मिळेल. पहिल्या स्पर्धेत अखेरच्या दिवशी महाराष्ट्राला मागं टाकत हरियानानं पदकतक्‍त्यात अव्वल स्थान मिळवलं होतं. जास्त पदकं मात्र महाराष्ट्राला होती. आता घरच्या मैदानावर महाराष्ट्र नंबर वन ठरू शकतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mukund potdar write kelo india rajwardhan rathod article in saptarang