सागर कुशीतील निरंतर मुग्धता | Gate Way Of India | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gharapuri caves
सागर कुशीतील निरंतर मुग्धता

सागर कुशीतील निरंतर मुग्धता

sakal_logo
By
प्रशांत ननावरे

मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियापासून ऐन अरबी समुद्राच्या कुशीत केवळ दहा किलोमीटर अंतरावर सर्वसाक्षी स्वरूपातील, शब्दांच्याही पलीकडचं, भरभरून सांगणारं, पण नि:शब्द असलेलं मूर्तिमंत मौनाचं साम्राज्य मोठ्या धीरगंभीरपणे शतकानुशतकं उभं आहे. या निरंतन मुग्धतेचं नाव आहे घारापुरी!

जागतिक वारसास्थळांच्या यादीत समाविष्ट असलेल्या घारापुरी बेटावरील लेण्या आणि शिल्पं पाहून अचंबित होण्यासाठी तेथे पोहोचण्याच्या प्रवासाचीसुद्धा एक वेगळी मजा आहे. मुंबईकरांनी डबलडेकर बसचा प्रवास अनुभवलाय; पण यानिमित्ताने डबलडेकर बोटीतून प्रवासाचा आनंद लुटता येतो. गेट वे ऑफ इंडिया येथून सुटणाऱ्या लाकडी बांधणी असलेल्या बोटीतून केलेला प्रवास विशाल अरबी समुद्राचं दर्शन घडवतो. भारतीय नौदल आणि इतर आस्थापनांच्या समुद्रात डॉक केलेल्या बोटीसुद्धा यानिमित्ताने पाहायला मिळतात. घारापुरी बेटावर पोहोचल्यावर पर्यटकांच्या सुविधेसाठी लेण्यांपर्यंतच्या प्रवासासाठी असलेली छोटी ट्रेन आपल्यातील मूल जागं करते.

घारापुरी हे सुमारे आठ चौ. किमी क्षेत्र असलेलं एक नितांतसुंदर रमणीय बेट आहे. वनसृष्टीच्या चैतन्याने बहरलेल्या या बेटावर सुमारे पंधराशे वर्षांपूर्वी म्हणजे सहाव्या-सातव्या शतकात कोरण्यात आलेल्या अतिशय नेत्रदीपक गुंफा असून, त्यातील असंख्य शिल्पाकृतींचं रेखीवपण, बांधेसूदपणा आणि लावण्य इतकं मनोहारी आहे की ते पाहताना माणूस खिळून राहतो. या गुंफा म्हणजे जगातील अजोड शिल्पकलेचा आविष्कार आहेत. घारापुरीच्या विस्तीर्ण परिसरात मुख्यत: नऊ लेण्या आहेत. त्यात योगमुद्रेतील शिवप्रतिमेचे शिल्प, शिवतांडवाचं शिल्प, दैत्य संहारक शिव, गंगावतरण, शिवपार्वती विवाह, अर्धनारी नटेश्वर, त्रिमूर्ती ही पाषाण शिल्पं म्हणजे प्राचीन शिल्पकलेचे सर्वोत्तम नमुने म्हणून त्यांची ख्याती आहे.

प्राचीन काळात मुंबईतील साष्टी आणि घारापुरी ही बेटं सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न सत्ताकेंद्र होती. अशी संपन्नता असल्याशिवाय कला-संस्कृतीचा इतका उत्कर्ष साध्य होऊच शकत नाही. पंधराशे वर्षांपूर्वी खोदण्यात आलेल्या लेण्या पाहून त्या काळात देशातील कला व संस्कृती किती उच्चतम पातळीवर होती याची प्रचीती येते.

मूळचं घारापुरी नाव असलेल्या या बेटाचं ‘एलिफंटा’ असं नामकरण पोर्तुगीजांनी केलं. त्याचीही कथा खूप मनोरंजक आहे. इ. स. १५३४ च्या सुमारास व्यापारासाठी भारतात आलेले पोर्तुगीज या बेटावरील राजबंदर येथे उतरले. त्यांनी या बेटाची पाहणी केल्यानंतर लेण्यांच्या परिसरात भव्य असं हत्तीचं पाषाण शिल्प पाहिलं आणि ‘एलिफंटा, एलिफंटा’ असे उद््गार काढले. तेव्हापासून पोर्तुगीज या बेटाचा उल्लेख ‘एलिफंटा’ असा करू लागले व नंतर तेच नाव रूढ झालं. घारापुरी बेटावरील हे पुरातन हत्ती शिल्प अलीकडच्या काळात मुंबईच्या जिजामाता उद्यानात स्थलांतरित करण्यात आलं आहे. ज्या राजबंदर परिसरात हा हत्ती होता तेथे पूर्वीपासून लोकवस्ती होती. या राजबंदरापासून दोन कि. मी. अंतरावर असलेल्या डोंगरात घारापुरीच्या लेण्यांचं विस्तीर्ण संकुल आहे.

एलिफंटाची मुख्य गुंफा सुमारे १३० चौरस फूट इतक्या विस्तारित क्षेत्रफळावर मजबूत स्तंभाच्या आधारावर कोरलेली आहे. खांबाचा पाया चौकोनी व मजबूत असून माथा म्हणजे वरील भागाच्या दरम्यानचा कोपरा फुगलेला आहे. या गुंफेतील मंदिर उत्तराभिमुख आहे व त्याचा एक प्रवेश द््वारमंडपातून आहे, तर पूर्व आणि पश्चिमेला द््वार मंडपातून इतर दोन प्रवेशद््वार आहेत. हे दोन्ही प्रवेशद््वार उपशिल्पाच्या प्रांगणाकडे जाण्याचा इशारा करतात. हे कोरीव स्तंभ तसेच एलिफंटाचे मुख्य शिल्प हे आधारस्तंभाभोवती असून त्यामुळेच एलिफंटा गुंफेच्या प्रतिष्ठेत भर पडली आहे.

याशिवाय, ही कलाकृती द््वारमंडपाच्या दक्षिण भिंतीवर कोरलेल्या महेशमूर्ती प्रतिमेच्या दोन्ही बाजूंस आहे. या समोरच अर्धमंडप आहे. यातील दोन स्तंभ दोन्ही टोकांना द््वारमंडपासारखे उभे आहेत. पश्चिम द््वारमंडपाच्या बाजूला मंदिराच्या गाभाऱ्यात शिवलिंगाची स्थापना असून त्यांच्या भिंतीवर द््वारपालांच्या भव्य अशा छब्या कोरलेल्या आहेत. येथील प्रत्येक लेणी आणि त्यातील शिल्पांचे बारकावे नजरेत भरणारे आहेत. प्रत्येक शिल्पाचं वर्णन येथे करायचं झालं तर शब्द आणि पानं कमी पडतील.

मुख्य लेण्यांव्यतिरिक्त काही लघुलेण्या आणि बौद्धकालीन स्तूपदेखील आहेत. लेण्या पाहून थोडं पुढे चालत गेल्यावर उजव्या बाजूला कॅनॉन हिल पॉईंटवर ब्रिटिशकालीन तोफा पाहायला मिळतात. तेथून मुंबई, न्हावाशेवा बंदर आणि अथांग पसरलेल्या अरबी समुद्राचे दर्शन होते. पूर्वी या बेटावर अनेक शिल्पं भग्न अवस्थेत विखुरलेली होती. पुरातत्त्व विभागातर्फे आता ती चांगल्या पद्धतीने ठेवण्यात आली आहेत. त्यापैकी चारमुखी ब्रह्मदेवाची शांत आणि स्थितप्रज्ञ अशी मूर्ती, शिव, महिषासुर मर्दिनीची अर्थवट तुटलेली मूर्ती आणि शिव-पार्वती व गण (सेवक) ही शिल्पं आता छत्रपती शिवाजी महाराज वस्तुग्रंहालयात पाहायला मिळतात.

लेण्यांच्या भेटीसाठी सोयीचा ऋतू म्हणजे हिवाळ्यात नोव्हेंबर महिन्यापासून ते मार्च महिन्यापर्यंत. साधारण फेब्रुवारी-मार्च महिन्यात दरवर्षी महाशिवरात्रीच्या दिवशी येथे मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जातो. एलिफंटा महोत्सव या नावाने प्रसिद्ध असलेला हा महोत्सव शास्त्रीय संगीत आणि नृत्यांच्या कलाविष्कारांनी सजलेला असतो. त्यामुळे घारापुरी बेटांसाठी एकदा लेणी आणि दुसऱ्यांदा महोत्सव अशा दोन भेटी मनात पक्क्या करून ठेवाव्यात. इवल्याशा बोटावरील कला आणि संस्कृतीचा अनोखा आविष्कार आपल्याला अचंबित करून सोडतो. सकाळी घारापुरीला पर्यटक म्हणून जाणारे आपण परतीच्या प्रवासात अंतर्मुख होऊन जातो. सायंकाळी तळपणाऱ्या सूर्याची प्रखरता कमी झालेली असते. अस्ताला जाणारा सूर्य थेट समुद्रातून समुद्राच्याच पोटात शिरताना पाहण्याचा अनुभव घेऊन ट्रिपची सांगता होते. अजून काय हवं!

nanawareprashant@gmail.com

loading image
go to top