
शैलेश नागवेकर - shailesh.nagvekar@esakal.com
मुंबई क्रिकेटमधील लढवय्या खेळाडू म्हणून मिलिंद रेगे यांची ओळख होती. वयाच्या पंचवीशीत त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला होता; परंतु त्यानंतर पुन्हा उभे राहत मुंबई क्रिकेटचे मैदान गाजवले, लौकिक कायम ठेवत कर्णधार म्हणून दोनदा रणजी करंडक जिंकून दिला होता. १९ फेब्रुवारी रोजी या लढवय्या खेळाडूची प्राणज्योत मालवली. याच दिवसांत मुंबईचा बलाढ्य संघ विदर्भविरुद्ध रणजी उपांत्य सामन्यात खेळत होता. आदल्या दिवशी म्हणजेच १८ तारखेच्या खेळात कर्णधार अजिंक्य रहाणे, सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे हे आंतरराष्ट्रीय आणि नावाजलेले खेळाडू काही फरकांच्या अंतराने बाद झाले. सूर्यकुमार आणि दुबेला तर भोपळाही फोडता आला नव्हता.