
संगीतकार शिकून होत नसतो
गाण्याला चाल लावताना त्या गाण्याचं सरगम, सूर, ताल यांची माहिती असावी लागते. एखादं गाणं तुमच्याकडे आलं की त्याचा ताल कोणता आहे, हे गाणं कोणत्या मात्रेमध्ये गुंफलेलं आहे, हे पटकन कळलं पाहिजे. भावगीत असेल तर त्याचा मूड काय, लव्हगीत असेल तर त्याचा टेम्पो काय, त्याची सुरावट काय असावी, याची जाण असावी लागते. गाण्यातील ऱ्हस्व आणि दीर्घ शब्दांचा अभ्यास असावा लागतो. नवीन कंपोझिशन्स हे नवीन वाटावे, असं असावं लागतं. नाही तर जुन्या एखाद्या गाण्याचा आधार घेऊन ही चाल बांधली आहे
काय, असा एखाद्याचा समज होतो. एक गाणे दुसऱ्या गाण्यासारखे वाटू नये, याची काळजी घ्यावी लागते. तबल्याच्या ठेक्याची माहिती असावी लागते. दादरा, केहेरवा, रूपक, त्रिताल, एकताल, एवढ्यांची नावं आणि त्याचं चलन कळलं तर खूप मदत झाली, असं समजूया. तसंच रागांचंही आहे. सुरुवातीला भूप, यमन, मालकंस, भिमपलास, वसंत बहार, भैरवी, बागेश्री वगैरे रागांची ओळख असावी लागते आणि तेव्हाच गाण्यामध्ये व्हरायटी येऊ शकते.
कधी कधी संगीतकाराला वाटते की, येथे भारतीय ठेका वापरण्यापेक्षा मॉडर्न ठेका वापरावा म्हणजे तबला-ढोलकी यांच्याऐवजी कोंगो, बोंगो, ड्रम वगैरे वापरायचा तर तोच सहा मात्रेचा दादरा किंवा चार मात्रेचा केहेरवा कसा वापरावा, याची जाण असावी लागते. चांगली चांगली जुनी गाणी ऐकावित म्हणजे आपल्या पदरात नवनवीन ठेक्याची, नवनवीन सुरांची माहिती मिळते. मग आपल्याला कोणत्या ठेक्यात गाणं बनवावं किंवा बसवावं हे समजतं. तसंच रागांची माहिती लक्षात ठेवावी, त्याचं चलनही लक्षात ठेवावं. दुःखदायक गीत असेल तर त्याला कोणती चाल लागू शकते, हे कळलं पाहिजे. आनंदाचं गाणं असेल तर कोणता राग किंवा कोणते सूर आपण वापरावेत म्हणजे गाण्याला प्रसन्नता मिळेल, याचा अभ्यास केला पाहिजे. मुळात स्वतःला हार्मोनियम वाजविता आली पाहिजे.
हार्मोनियम वाजविता आली की मग सिंथेसायझर, पियानो, आर्गन ही वाद्ये आपोआप वाजविता येतात. थोडाफार तबलाही वाजविता यावा लागतो. गाण्याला चाल लागली की ते पुढे सजविण्याचं काम संगीतकाराचंच असतं. मग त्यासाठी नोटेशन्स, कॉर्डस् याची माहिती असावी लागते. काही काही संगीतकार अॅरेंजरला धरतात आणि त्यांच्याकडून कामे करून घेतात. तेही काही वाईट नाही. हल्ली प्रोग्रॅमर ही नवीन जमात तयार झाली आहे म्हणजे तुमचं गाणं ते तयार करून देतात. त्याच्यामध्ये सगळं काही असतं. ते तुमच्या पुढ्यात ट्रॅक करून ठेवतात. तुम्ही केवळ गाण्याचं डबिंग करायचं असतं.
आजकाल आधी चाल आणि नंतर शब्द अशी गाणी बनतात तेव्हा येथे दोन अक्षरी शब्द हवा, येथे तीन अक्षरी शब्द हवा हे आपल्याला कळलं पाहिजे. ते सांगण्याची क्षमता संगीतकाराकडे असायला हवी. गाणं कुठं थांबवावं आणि परत कुठं पिकअप करून घ्यावं याची जाण संगीतकाराला असावी लागते. म्हणजे तो अॅरेंजर किंवा प्रोग्रॅमरला सांगू शकतो.
आमच्या काळात म्हणजे साठ-सत्तरच्या दशकादरम्यान साठ-सत्तर म्युझिशियन्स असो, शंभर म्युझिशियन्स असो वा सात ते आठ जण असो एकत्र सगळे काम करायचे. गाणारे-गाणारी-कोरस ही सगळी मंडळी एकत्र यायची आणि रेकॉर्डिंग व्हायचं. कारण तेव्हा केवळ दोन ट्रॅक होते. आता संगणकामुळे तुम्हाला अनेक ट्रॅक मिळतात.
तबलेवाला येणार आणि त्याच्या वेळेनुसार वाजवून जाणार. फ्ल्यूटवाला येणार आणि तो त्याच्या वेळेनुसार वाजवून जाणार. असे प्रत्येकाचे वेगवेगळे ट्रॅक बनतात आणि मग ते रेकॉर्डिस्ट सगळं मिक्स करतात. आम्ही त्या काळी चार तासांमध्ये गाणं उरकायचो. त्याच्यानंतर मिक्सिंग; पण आता एक गाणं करायला चार-चार दिवस लागतात. संगीतकारालाही कळत नाही की आपलं गाणं शेवटी कसं ऐकू येणार आहे... थोडक्यात सांगायचं तर आजकालच्या संगीताची ही गंमत आहे.
सिंथेसायझर्सवरची इंग्लिश फ्ल्यूट म्हणजे पिकेलो, ड्रमप्लेट, गिटार, इंग्लिश ऱ्हिदम ही वाद्ये ऐकायला बरी वाटतात; पण अॅकॉस्टिक फ्ल्यूट म्हणजे बासरी, सितार, सरोद, तबला, ढोलकी, सारंगी वगैरे या गोष्टी त्यांना लाईव्ह बोलवावे लागते. त्यामुळे कोणतं गाणं सिंथेसायझरचं वापरायचं. कोणती लाईव्ह वाद्यं बोलावायची याची संगीतकाराला तसेच अॅरेंजरला जाण असावी लागते. संगीत हे आनंदासाठी असतं. कमी वाद्यांमध्ये जास्त इफेटिव्ह संगीत देता आलं पाहिजे. म्हणून मला शंकर-जयकिशन यांचं संगीत आवडतं.
आपण त्यांची गाणी म्युझिकसकट पाठ करतो. आपोआपच ती पाठ होतात. त्यांच्या संगीतातील साधेपणा-सोपेपणा अन्य कोणत्याही संगीतकाराकडे पाहायला मिळत नाही. या क्षेत्रात काम मिळविण्यासाठी येत असतात. नाव मिळविण्यासाठी त्यांची धावपळ सुरू असते. यश मिळविण्यासाठी कोणाच्या तरी हाताची गरज असते. त्यातच दिशा दाखविणारा एखादा गुरू भेटला तरी ते आपली वाटचाल करू शकतात; पण मुळात काही तरी असावं लागतं.
एक दिवस मला जितेंद्र अभिषेकी यांचा फोन आला. ते म्हणाले, ‘‘माझा एक सुनील मुंगी नावाचा शिष्य आहे, आठेक वर्षं तो माझ्याकडे क्लासिकल शिकत आहे. त्याचं म्हणणं असं आहे की त्याला कुणी ओळखत नाही. मागे बसून तंबोरा वाजविणं, अधूनमधून आलापी करणं याच्यापलीकडे काहीच होत नाही. लाईट म्युझिकसाठी तुझ्याकडे शिफारस करीत आहे. पाठवू का?’’ मी म्हटलं पाठवून द्या. तो माझ्याकडे चारेक दिवसांनी आला. मी त्याला विचारलं, ‘‘तुला म्युझिक इंडस्ट्रीमध्ये नेमके काय करायचं आहे?’’ तो मला म्हणाला, ‘‘गेली आठेक वर्षं तंबोरा वाजवत आहे; पण मला कुणी ओळखत नाही. लाईट म्युझिकचं असं आहे की एखादं गाणं हिट झालं की लोक ओळखतात. त्यामुळे मला लाईट म्युझिक शिकायचं आहे. तुम्ही चाल कशी लावता, नोटेशन्स कसं काढता हे शिकायचं आहे.
मला जमल्यास प्लेबॅक सिंगरही बनायचं आहे.’’ मी म्हटलं, ‘‘तुझी महत्त्वाकांक्षा चांगली आहे. माझ्याबरोबर काम कर.’’ तेव्हा माझं काम सकाळपासूनच सुरू व्हायचं आणि रात्रीपर्यंत चालायचं. तो दररोज सकाळी सात वाजता खाली येऊन उभा राहायचा. माझ्याबरोबर स्टुडिओला यायचा. माझ्या कामाची पद्धत बघायचा. सगळ्या गोष्टी आत्मीयतेनं बघायचा. साधारण दोन महिन्यांनी मी त्याला विचारलं, ‘‘काही कळलं का?’’ तो म्हणाला, ‘‘तुम्ही स्टुडिओत आल्यानंतर तुमच्या हातात गाणं किंवा जिंगल्स असते. त्याला तुम्ही दहा ते पंधरा मिनिटात चाल लावता. सगळ्यांनी ओके केलं की राजेशला तुम्ही नोटेशन्स आणि कॉड काढायला सांगता. ठेका काय असावा, ते सांगता आणि तीन ते चार तासांत सगळे जण घरी जातात; पण मला चाल कशी लावता, नोटेशन्स कसे काढता हे काही कळलेलं नाही.’’
त्यानंतर तो चारेक महिने माझ्याकडे होता. तो क्लासिकल शिकण्यासाठी अमेरिकला गेला. आज तो तेथे आनंदी आहे आणि आता तो मेहंदी हसन, गुलाम अली वगैरेंची गाणी गातो. तात्पर्य काय तर संगीतकार हा काही शिकून होत नसतो, तर तो गुण उपजत असावा लागतो. ते वरूनच घेऊन यावं लागतं.
संगीतकार बनता येतं का, असं विचारणारे मला अनेक फोन येतात. ती कला उपजत असावी लागते. जसं गाणं शिकता येतं. नोटेशन शिकता येतं. वाद्यही शिकता येतं. डान्सही शिकता येतो; पण एखाद्या गाण्याला चाल लावणं अर्थात गाणं कंपोझ करणं खूप कठीण आहे. संगीतकार हा काही शिकून होत नसतो, तर तो गुण उपजत असावा लागतो.
(लेखक ज्येष्ठ संगीतकार आहेत.)