समजूनच घेत नाही..! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

my behaviour thoughts feelings Does not understand

‘मला कोणी समजून घेत नाही’ या तक्रारीमागे खरं तर आपली छुपी तक्रार ही असते, की ‘माझ्या वर्तनाचं, माझ्या विचारांचं, माझ्या भावनांचं किंवा माझ्या शब्दांचं समर्थन करणारं कोणी नाही.’

समजूनच घेत नाही..!

- सोनाली लोहार

‘मला कोणी समजून घेत नाही’ या तक्रारीमागे खरं तर आपली छुपी तक्रार ही असते, की ‘माझ्या वर्तनाचं, माझ्या विचारांचं, माझ्या भावनांचं किंवा माझ्या शब्दांचं समर्थन करणारं कोणी नाही.’ यावर उद्‌भवणारा पहिला प्रश्न म्हणजे आपलं एखाद्यावर इतकं अवलंबित्व असणं योग्य का?

आणि दुसरा प्रश्न म्हणजे खरोखरच आपले विचार अथवा आपलं वर्तन हे समर्थनीय आहे अथवा नाही? ‘मला कोणी समजूनच घेत नाही’ या स्वनिर्मित दुःखाला सतत कुरवाळत राहण्यापेक्षा हे दोनच प्रश्न जरी स्वतःला विचारले तरी बराच निचरा होईल.

दहा माणसांमागे एकाला तरी ‘मला कोणी समजूनच घेत नाही’ असं वाटतंच वाटतं. बायकोला वाटतं नवरा आपल्याला समजून घेत नाही, नवऱ्याला वाटतं ऑफिसमध्ये बॉस समजून घेत नाही, मुलांना वाटतं पालक समजून घेत नाही, जनतेला वाटतं राजकारणी समजून घेत नाही, राजकारण्यांना वाटतं ‘मीडिया’ समजून घेत नाही, मीडियाला वाटतं सरकार समजून घेत नाही, एखाद्या देशाला वाटतं की दुसरा देश समजून घेत नाही... या समस्येचं आता करावं काय!

सुताचा जरी असला तरी ‘समजणं’ आणि ‘समजावून घेणं’ या दोहोंमध्ये फरक आहे. काही दिवसांपूर्वी एका मैत्रिणीच्या आईचं निधन झालं. तिला भेटले तेव्हा साहजिकच तिला भरून आलं. मी जवळ घेऊन म्हटलं, ‘‘मला समजतंय गं.’’

नंतर विचार करताना या वाक्याचा फोलपणा प्रकर्षाने जाणवला. तिचं दुःख, तिची वेदना ही केवळ आणि केवळ तिची होती. ती मी जोवर अनुभवत नाही, तोवर मला समजणार कशी? ‘मला समजतंय’ हे वाक्य म्हणजे केवळ एखाद्या जखमेवर घातलेली फुंकर असते. स्वतःच्या वैयक्तिक अनुभवांच्या आधारावर फार तर अशा भावना आपण ‘समजावून’ घेऊ शकतो, पण ती समजण्यासाठी मात्र आपण त्या वेदनेचा भाग होणं किंवा असणं हे गरजेचं असतं.

कदाचित म्हणूनच म्हटलं जातं, की प्रत्येक मनुष्य ख्रिस्तासारखा स्वतःचा एक क्रूस घेऊनच जन्माला येतो, जो त्याला स्वतःलाच पेलत पुढे जायचं असतं. तुमचा सोबती किंवा एखादा बघ्या ते पाहून कळवळेल, सहानुभूती-आपुलकीने आणि काळजीने त्याचं हृदय जरूर पिळवटेल, पण तरीही सत्य हेच राहील की त्या क्रुसावर ठोकलेले रक्तबंबाळ हात हे तुमचेच असतात, त्याचे नव्हेत. ते ओझं तुमचं असतं, त्याचं नव्हे.

मग राहतो भाग तो ‘समजावून’ घेण्याचा, जो विश्वास, सहवास, आदर, आकलनक्षमता अशा बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असतो. माझ्या परिचयाचं एक फार गोड सत्तरीतले जोडपं होतं. आजींना काय हवंय, काय खुपतंय, काय आवडतंय हे आजोबांना न बोलता कळायचं आणि आजोबांच्या डोळ्यातली मिश्कील चमक,

कपाळावरची पुसटशी आठी, ती मुडपलेली जिवणी, काही म्हणजे काहीच आजींच्या नजरेतूनही सुटायचं नाही. त्यांची एकमेकांकडे पाहतानाची ती स्निग्ध नजर म्हणजे अगदी सायीसारखी. एकदा आजोबांना विचारलं, तुम्हाला कसं समजतं इतकं एकमेकांच्या मनातलं हो? ते म्हणाले, ‘‘अगं माणूस हा पुस्तकासारखा असतो. त्याला सारखं वाचत राहिलं की शब्दांपलीकडचेही अर्थ कळत जातात. इतक्या वर्षांत तुझी आजी तर मला आता तोंडपाठच झालीय आणि तिलाही मी. एकदा हे ‘वाचणं’ जमलं नं की ‘जपणं’ आपसूकच येतं.’’

आजोबा गेले, त्यांच्यापाठी आजीही मग फार दिवस राहिल्या नाहीत. अजून एक असंच विलक्षण जोडपं. पत्नीला कॅन्सर झाला. उपचारांत तिच्या डोक्यावरचे सगळे केस गेले. मग पतीनेही डोक्यावरचे सगळे केस काढून टाकले. त्यांचं म्हणणं इतकंच होतं, की ‘‘तिचा शारिरिक त्रास मी वाटून घेऊ शकत नाहीय, पण तिची मानसिक वेदना काहीअंशी तरी ‘समजावून’ घेण्याचा मी प्रयत्न तर नक्कीच करू शकतो.’’

माझा एक मित्र या सगळ्या पलीकडे जाऊन व्यक्त होतो. त्याच्या मते ‘मुळात आपल्याला कोणी तरी समजून घेतलंच पाहिजे’ हा अट्टहास किंवा ही अगतिकता हवीच कशाला! माझ्या भावना, माझे विचार हे संपूर्णतः स्वतंत्र आहेत, त्यावर मला कोणाच्या मान्यतेची मोहोर उठवण्याची गरजच काय!’ हा मुद्दा विचार करण्याजोगा आहे.

‘मला कोणी समजून घेत नाही’ या तक्रारीमागे खरं तर आपली छुपी तक्रार ही असते, की ‘माझ्या वर्तनाचं, माझ्या विचारांचं, माझ्या भावनांचं किंवा माझ्या शब्दांचं समर्थन करणारं कोणी नाही.’ यावर उद्भवणारा पहिला प्रश्न म्हणजे आपलं एखाद्यावर इतकं अवलंबित्व असणं योग्य का? आणि दुसरा प्रश्न म्हणजे खरोखरच आपले विचार अथवा आपलं वर्तन हे समर्थनीय आहे अथवा नाही? ‘मला कोणी समजूनच घेत नाही’ या स्वनिर्मित दुःखाला सतत कुरवाळत राहण्यापेक्षा हे दोनच प्रश्न जरी स्वतःला विचारले तरी बराच निचरा होईल.