Rahul Gandhi
Rahul GandhiSakal

माणसं जोडणारी पदयात्रा

‘भारत जोडो’ यात्रेतून उभा देश चालत असतानाच त्याचा परिणाम होणार नाही, असे जर कोणी समजत असेल तर ते संभ्रमात आहेत.
Summary

‘भारत जोडो’ यात्रेतून उभा देश चालत असतानाच त्याचा परिणाम होणार नाही, असे जर कोणी समजत असेल तर ते संभ्रमात आहेत.

- नाना पटोले

‘भारत जोडो’ यात्रेतून उभा देश चालत असतानाच त्याचा परिणाम होणार नाही, असे जर कोणी समजत असेल तर ते संभ्रमात आहेत. कारण या यात्रेच्या माध्यमातून देशातील जनमत ढवळून काढण्याचे काम राहुल गांधी करत आहेत. देशातील विविधतेचा, समतेचा, लोकांच्या जगण्याचा विचार ते या यात्रेतून घेऊन चालले आहेत. एकाधिकारशाहीने सत्ता राबवत देशात हुकूमशाही प्रस्थापित करण्याचे, एका धर्माला दुसऱ्या धर्माच्या, जातीच्या आणि समुदायाच्या विरोधात उभे करून देशात विषमता निर्माण करणाऱ्यांची स्वप्ने कधीच यशस्वी होणार नाहीत, हा विश्वास या ‘भारत जोडो’ यात्रेने दिला आहे.

‘भारत जोडो’ यात्रा ही ७ सप्टेंबरपासून कन्याकुमारीपासून सुरू झाली. ती काश्मीरपर्यंत तीन हजार ५७० किलोमीटरचा पल्ला गाठणार आहे. ही यात्रा पायी काढण्याचा संकल्प राहुल गांधी यांनी केला. आता या यात्रेने अर्ध्यापेक्षा जास्त प्रवास पूर्ण केला आहे. हा प्रवास करताना राहुल गांधी यांच्या मनावर कधीही थकवा आणि निराशेचा लवलेशही दिसत नाही. सर्वसामान्यांसोबत राहुल गांधी सहजतेने संवाद साधत होते, त्यांचे म्हणणे समजून घेत होते. त्यामुळे ही यात्रा लोकांच्या जिव्हाळ्याची ठरली आहे. प्रश्न असा आहे की, राहुल गांधी यांना कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंतची ही पायी यात्रा का करावी लागली? देशाची लोकशाही ही ७० वर्षांत मजबूत होती.

लोकतांत्रिक व्यवस्था, न्यायपालिका, आयकर खाते, सीबीआय, ईडी, निवडणूक आयोग, प्रसार माध्यमे आणि इतर तत्सम संस्था अतिशय तटस्थपणे काम करत असताना देशात अशी परिस्थिती का निर्माण झाली? देशात धर्माच्या नावाने विष पेरले जाते. एक समुदाय दुसऱ्या समुदायाच्या विरोधात उभा केला जातोय. जात, धर्म, भाषा, प्रांत यांच्या नावाने मतभेद निर्माण केले जात असताना दुसरीकडे राज्याचे सर्व अधिकार हळूहळू केंद्राकडे घेतले जात आहेत. बेरोजगारी आणि महागाई वाढलेली असताना सामान्य माणसांचे जीवन अतिशय कष्टप्राय आणि कठीण झालेले असताना लोकतांत्रिक संस्थांना या लोकांच्या प्रश्नांकडे, त्यांच्या अडचणींकडे लक्ष द्यायला अधिकारच नाहीत.

विरोधाचा स्वर निर्माण करून या संस्थांचा वापर विरोधकांवर केला जातोय. देशातील प्रश्नावर बोलणाऱ्या लोकांच्या विरोधात केला जातोय. त्यामुळे या संस्था केंद्र सरकारच्या बटिक झाल्या आहेत. समाज माध्यमे फेसबुक, ट्विटर आदींच्या माध्यमातून सातत्याने दबाव आणून त्यासाठी प्रचार केला जातो. त्यामुळे सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा पर्यायच उरला नव्हता. त्यामुळे सरळ जनतेत जायचे, त्यांच्यासोबत चर्चा करायची. महिला, अबालवृद्ध, शेतकरी, तरुण आदींचे प्रश्न समजून घ्यायचे, त्यांच्याशी संवाद साधायचा, यासाठी ‘भारत जोडो’ यात्रा सुरू झाली.

या यात्रेचा उद्देश अथांग आणि अनंत आहे. यामागे ओतप्रोत भरलेले देशप्रेम आहे. या प्रवासात महाराष्ट्राचा काँग्रेस प्रमुख म्हणून राहुल गांधी यांच्या खांद्याला खांदा लावून १४ दिवस सोबत चालण्याची संधी मला मिळाली. हे मी माझे भाग्य समजतो. नवा इतिहास लिहिला जात असताना त्यांच्याकडे मुखदर्शक म्हणून पाहणे, कौतुकाने पाहणे, त्याबद्दल विचार करणे हा वेगळा भाग आहे. मात्र प्रत्यक्षदर्शी होऊन सहभाग नोंदवणे, देश समजून घेणे, लोकांसोबत भेटणे-बोलणे, त्यांचे प्रश्न समजून घेणे ही बाब वेगळी असून, ती मला यात्रेदरम्यान अनुभवता आली.

यात्रेदरम्यान राहुल गांधींबद्दल एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे या दरम्यान लहानात लहान, ज्येष्ठ नागरिक, महिला, कामगार, शेतकरी यांचे ते म्हणणे सहजपणे ऐकत होते. त्यांना भेटून त्यांच्या व्यथा, प्रश्न समजून घेत होते. त्यामुळे ही यात्रा लोकांच्या जिव्हाळ्याची ठरली हे या यात्रेचे यश आहे.

राहुल गांधी यांची प्रतिमा मलीन करण्यासाठी कोट्यवधी रुपये ज्यांनी खर्च केले, तो यादरम्यान पुसून निघाला. लोकांना राहुल गांधी आता आपले वाटताहेत. त्यांच्यावर लोकांचा विश्वास निर्माण झाला आहे. भाजपच्या आयटी सेलने पहिल्या दिवसापासून या यात्रेला बदनाम करण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, या यात्रेतून लोकांना खरे काय ते कळू लागले. त्यामुळे भाजपचा खोटा प्रचार उघडा पडला. आपण जनतेपासून दूर जातो की काय, ही भीती वाटल्याने भाजपच्या पायाखालची वाळू सरकत चालली आहे.

ग्रामीण भागातील लोक सत्य समजून घेताना दिसत आहेत. देशाची एकूणच परिस्थिती बदलली पाहिजे, जे सुरू आहे, त्यावर गांभीर्याने विचारमंथन लोक करत आहेत. राहुल गांधी यांना या यात्रेदरम्यान शेतकरी भेटून आपल्या पीकविम्याचा प्रश्न मांडतात. आपल्याला नुकसानभरपाई भेटत नाही, हे राहुल गांधी यांना सांगत असतात. आम्ही जी पिके घेतली, त्यामध्ये वातावरणाचा काय परिणाम होतो, असे अनेक प्रश्न उपस्थित करून त्यावरील पर्यायावर चर्चा करतात. दुसरीकडे देशातील मोठ्या उद्योगपतींचे हजारो, लाखो कोटींचे कर्ज केंद्र सरकारकडून माफ केले जातात, मग आमचे छोटे कर्ज माफ का केले जात नाही, असा प्रश्न विचारून शेतकरी त्यासाठीचे वास्तव सांगत असतात.

देशात एकीकडे बेरोजगारी आणि महागाईने कहर केलेला असताना दुसरीकडे खत-अवजारांच्या किमती, मजुरीचे भाव वाढलेले असताना सरकार मात्र त्याकडे लक्ष देत नाही. अशा अनेक व्यथा या यात्रेदरम्यान शेतकरी मांडत असतात. असंख्य महिला राहुल गांधी यांना येऊन भेटतात. वाढलेल्या महागाईमध्ये आम्ही घर कसे चालवायचे, असा प्रश्न विचारतात. चारशे रुपयांचा गॅस सिलिंडर आज बाराशे रुपयांवर गेला. खाण्याचे तेल महागले, उत्पन्न घटले. दुसरीकडे हाताला काम मिळत नाही, असे अनेक प्रश्न आणि व्यथा राहुल गांधींसमोर महिला मांडत असतात.

असंख्य तरुण या यात्रेत सहभागी होऊन, निर्माण झालेली बेरोजगारी, महागाई यावरील मार्गही सांगतात. देशाची संपत्ती विकण्याचे काम भाजप सरकार कसे करत आहे, यावर देशातील तरुण बोलायला लागले आहेत. महाराष्ट्रात सत्तांतर झाले, सामान्य जनतेच्या हाती काय आले, असे प्रश्नही या यात्रेतून लोक उपस्थित करत आहेत.

या यात्रेत महिला-मुली येतात, राहुल गांधी यांच्या हातात हात घेऊन चालतात. त्यांची गळाभेट घेतात. आपली व्यथा मांडतात. हे सर्व कशासाठी? तर यातून राहुल गांधी यांनी एक विश्वास निर्माण केला आहे. आपली संस्कृती ही विश्वास असल्याशिवाय दुसऱ्या पुरुषांसोबत मोकळेपणाने बोलतही नाही. वृद्ध महिला आपला मुलगा समजून राहुल गांधी यांना आशीर्वाद देतात. त्यांच्या डोक्यावरून हात फिरवतात. त्यांच्याबद्दल विश्वास व्यक्त करतात. त्यामुळे महिला, मुली, वृद्ध यामध्ये राहुल गांधी यांच्या संदर्भात एक मोठा विश्वास निर्माण झाला आहे.

राहुल गांधी हे रस्त्यावरून चालत असताना अनेक गावांतील शेतकरी, महिला आपल्या घरासमोर रांगोळी काढून त्यांना पाहण्यासाठी, भेटण्यासाठी धावत यायचे. राहुल गांधीही त्यांना सहजपणे, मायेने जवळ घेऊन गळाभेट घेत. त्यामुळे या यात्रेत लोक प्रचंड भारावून गेले. एक राष्ट्रीय स्तरावरचा नेता आपली गळाभेट घेतो, आपले प्रश्न ऐकून घेतो, आपल्याशी बोलतो, हातात हात घेतो, सगळ्यांना जवळ करतो यामध्येच या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व दिसून येते.

मराठवाड्यातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा आशीर्वाद घेऊन ही यात्रा देगलूर येथून सुरू झाली आणि जिजाऊमातेच्या जिल्ह्यातून ही यात्रा पुढे मध्य प्रदेशात गेली. या यात्रेत असंख्य ठिकाणी गुरुद्वारा, मंदिरे, मशिदी, चर्च आले. संत, धर्मगुरू, कीर्तनकार आले. त्यांनीही या यात्रेत आपला सहभाग नोंदवला. ही यात्रा शेगावमध्ये आल्यानंतर राहुल गांधी यांनी संतांचे दर्शन घेतले आणि त्यानंतर ते म्हणाले, ‘मला महाराष्ट्राने खूप काही शिकवले, फुले-शाहू-आंबेडकरांची विचारसरणी, वारकरी संप्रदायाने दिलेला प्रगल्भ विचार शिकण्याची संधी मिळाली. छत्रपती शिवाजी महाराज समजून घेता आले, संत गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज यांची विचारधारा समजून घेता आली.’

‘भारत जोडो’ यात्रेतून उभा देश चालत असतानाच त्याचा परिणाम होणार नाही, असे जर कोणी समजत असेल तर ते संभ्रमात असतील. कारण या यात्रेने देशातील जनमत ढवळून काढण्याचे काम राहुल गांधी करत आहेत. देशातील विविधतेचा, समतेचा, लोकांच्या जगण्याचा विचार ते या यात्रेतून उत्तरेकडे घेऊन चालले आहेत. या देशात एकहाती सत्ता राबवून, या देशात हुकूमशाही आणून, एका धर्माला दुसऱ्या धर्माच्या विरोधात, जातीला, समुदायाला एकमेकांच्या विरोधात उभे करून त्यासाठी देशात विषमता निर्माण करणाऱ्यांची स्वप्न यशस्वी होणार नाहीत, असा विश्वास या यात्रेने दिला आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारावर आधारित ही यात्रा आहे. ते म्हणाले होते,

या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, दे वरचि असा दे

हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे

याच विचारांचा पाईक होऊन ‘भारत जोडो’ ही यात्रा माणसांची मने जोडणारी ठरते आहे.

(लेखक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com