सागरातल्या संघर्षाची चित्रमय कथा

नयना निर्गुण
रविवार, 8 एप्रिल 2018

पुढं जाण्याची, वर्चस्व गाजवण्याची ईर्षा तर प्रत्येकातच असते, मग तो मनुष्य असो वा प्राणी. ईर्षेतूनच निर्माण होतो संघर्ष... माणसा-माणसांमधला, गटा-गटांमधला, जमाती-जमातींमधला. या संघर्षात जो जिंकतो, त्याचं वर्चस्व निर्माण होतं. हे पूर्वापार चालत आलं आहे.

पुढं जाण्याची, वर्चस्व गाजवण्याची ईर्षा तर प्रत्येकातच असते, मग तो मनुष्य असो वा प्राणी. ईर्षेतूनच निर्माण होतो संघर्ष... माणसा-माणसांमधला, गटा-गटांमधला, जमाती-जमातींमधला. या संघर्षात जो जिंकतो, त्याचं वर्चस्व निर्माण होतं. हे पूर्वापार चालत आलं आहे.

अशीच एक हजार वर्षांपूर्वीची, एका बेटावर राहणाऱ्या दोन जमातींमधल्या संघर्षाची कथा विक्रम पटवर्धन यांनी "दर्या' या ग्राफिक नॉव्हेलमध्ये मांडली आहे.
दर्या हे समुद्रकिनाऱ्यापासून दोन कोस आत असलेलं बेट. या बेटावर मच्छिमारांच्या दोन जातींचं वास्तव्य... मल्लार आणि मन्वार. बेटाच्या मध्यावर समुद्र दोन रंगांत विभागलेला. एका बाजूला निळा, तर दुसऱ्या बाजूला तिथं येऊन मिळणाऱ्या नद्यांमुळं हिरवा. निळ्यात प्रामुख्यानं मल्लार मासा मिळायचा, तर हिरव्यात मन्वार. त्यावरून या दोन जातींची नावं पडलेली. मल्लार निळ्यात, तर मन्वार हिरव्यात मासेमारी करायचे. त्याच जातीचे मासे पकडून ठराविक दिवशी समुद्रकिनाऱ्यावर येऊन विकायचे. या बेटावर हुकमत असते ती "दर्याच्या राजा'ची. नारळी पौर्णिमेला दोन्ही जातींच्या तरुणांमध्ये होड्यांची शर्यत व्हायची. त्यात ज्या जातीचे तरुण जिंकायचे, त्या जातीतल्या एकाला दर्याच्या राजाचा बहुमान वर्षभरासाठी मिळायचा. या बहुमानासाठी दोन जातींतल्या तरुणांमध्ये ईर्षा असायची. त्यासाठी वाट्टेल ते करण्याची त्यांची तयारी असायची. मल्लार, मन्वार या माशांखेरीज एखादा मासा सापडला, तर ज्याला सापडला त्याच्या नावानं तो ओळखला जायचा. वेगळ्या माशाला किंमत जास्त असल्यानं त्यातूनही परस्परांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न व्हायचा. त्यात त्या मच्छिमाराचा जीवही घेतला जायचा. दुसऱ्या जातीतल्या मच्छिमारांवर वर्चस्व मिळवण्यासाठी, त्यांना नामोहरम करण्यासाठी वेगवेगळ्या क्‍लृप्त्या लढवल्या जायच्या. त्या जातीतल्या मच्छिमारांचे एकापाठोपाठ एक खून करून दहशत निर्माण केली जायची. त्यांना मदत करतोय, असं दाखवून त्यांचा विश्वास संपादन करायचा आणि मग अचानकपणे घाला घातला जायचा.

मन्वार मच्छिमारांचा म्होरक्‍या असलेला दशहिशा अशाच प्रकारे मल्लार मच्छिमारांना संपवण्यासाठी त्यांच्यात दहशत निर्माण करतो. मदत करतोय, असं भासवत त्यांचा विश्वासघात करतो. "दर्याचा राजा' किताबही मिळवतो; पण तो त्याला टिकवता येतो का, मल्लार मच्छिमारांचा गमावलेला आत्मविश्वास त्यांना परत मिळतो का, ते दशहिशाचा प्रतिकार कशा प्रकारे करतात, कोण करतं मल्लार कोळ्यांचे नेतृत्व.... कादंबरी वाचत असताना प्रत्येक प्रसंगात उत्कंठा वाढत जाते. एका दिशेनं आपण विचार करत असताना अचानकपणे वेगळाच शेवट समोर येतो.

दर्या ही "ग्राफिक नॉव्हेल' आहे. प्रत्येक पानावर आमीरखान पठाण यांनी काढलेली प्रसंगानुरुप चित्रं आहेत. चित्रांच्या माध्यमातून ती कथा डोळ्यांसमोर उलगडत जाते. कादंबरीची एकूण मांडणी आणि कथा पाहता ती किशोरवयीन मुलांसाठी आहे, मात्र दोन जातींमधल्या संघर्षातल्या हिंसेचं वर्णन कमी करायला हवं होतं, असं वाटतं.

पुस्तकाचं नाव : दर्या
लेखक, प्रकाशक : विक्रम पटवर्धन
चित्रं : अमीरखान पठाण
पृष्ठं : 130/ मूल्य : 400 रुपये

Web Title: nayana nirgun write book review in saptarang