
परिस्थितीशी झगडणाऱ्या स्त्रियांची घुसमट (नयना निर्गुण)
सरळमार्गी चाललेल्या जीवनात अचानक एखादी घटना घडते आणि सारं आयुष्यच गुंतागुतीचं बनून जातं. अशावेळी परिस्थितीला शरण न जाता विशेषत: स्त्रिया त्यातूनही मार्ग काढत जीवनातील आनंद शोधतात. वरकरणी त्या आनंदी, समाधानी दिसत असल्या, तरी आत कुठंतरी धुमसत असतात. असं का घडलं, हा प्रश्न त्यांना सतावत असतानाच त्याचं उत्तर गवसतं; पण तोपर्यंत आयुष्यात बरीच उलथापालथ झालेली असते. ज्योत्स्ना देवधर यांच्या ‘धुम्मस’ या कथासंग्रहातल्या कथांमध्ये अशाच काही स्त्रिया भेटतात.
या पुस्तकात एकोणीस कथा आहेत. प्रत्येक कथेतली स्त्री वेगळ्या वयोगटातली, वेगळ्या परिस्थितीतली, वेगळ्या सामाजिक स्तरातली आहे. एकच धागा त्यांच्यात समान आहे, तो म्हणजे त्यांची होत असलेली घुमसट, जी त्या व्यक्त करू शकत नाहीत.
‘धुम्मस’ कथेत आई मित्राबरोबर पळून गेल्यानंतर मानसिक अपंग असलेल्या बहिणीला सांभाळणाऱ्या, तिच्यासाठी सारे त्याग केलेल्या तरुणीच्या आयुष्यात आईच्याच रूपानं पुन्हा वादळ येते. ‘चूप’ कथेची नायिका व्यभिचारी नवऱ्याला सोडून स्वाभिमानानं आयुष्य जगते; पण स्त्री म्हणून तिला मन मारावं लागतं. आपल्या बेफिकीर; पण मनानं कमकुवत असलेल्या पतीला सांभाळणं अशक्य आहे, म्हणून दुसऱ्या स्त्रीच्या स्वाधीन करत एखादी वानप्रस्थाश्रम स्वीकारते, तर एखादी आपल्या वडिलांप्रमाणं पतीनं किमान एकदा तरी परिस्थितीविरोधात बंड पुकारावं, म्हणून तडफडत राहते.
मागच्या काळातल्या नोकरदार स्त्रिया नोकरी आणि संसार-मुलांचं संगोपन अशी कसरत करत स्वत:च्या पायावर उभ्या राहिल्या. नव्या पिढीतल्या सुनांना हा वेडगळपणा वाटतो; पण त्याच सुना सासूला निवृत्तीनंतर नातवंडं सांभाळण्याची गळ घालतात, किंवा तिच्याकडे असलेल्या संपत्तीसाठी तिची वाटणी करू पाहतात. पुस्तकात अशा दोन नायिका भेटतात. दोघीही सुनांचे पर्याय नाकारत स्वत:चा मार्ग शोधतात.
दोन पिढ्यांमधल्या स्त्रियांचे विचार भिन्न असतात. विवाहित मुलगी माहेरी परतली, म्हणजे आपले संस्कार कमी पडले, असं ‘माती’ कथेतल्या आईला वाटतं. स्वतंत्र विचारांची कमावती मुलगी मात्र सारी बंधनं झुगारायला तयार असते. बंधनं झुगारली, तरी आयुष्यात सोबत हवी असतेच, हे ओळखणारी आई ‘सोबत’ कथेत दिसते. कारण तिच्या सासूनं तशी सोबत घड्याळ्याच्या टिकटिकमध्ये शोधल्याचं तिच्या लक्षात येतं.
अत्याचारानंतर आपल्या मुलीनं आत्महत्या केली, तशी वेळ दुसरीवर नको म्हणून ‘असहाय’ कथेतली सामाजिक कार्यकर्ती बलात्कारपीडित मुलीच्या पुनर्वसनाचा प्रयत्न करते; पण परिस्थितीचं भान असलेली ती मुलगी स्वत:च्या सुरक्षिततेसाठी वेगळाच मार्ग स्वीकारते. ‘तान्ही’ कथेत बलात्काराचा खोटा आरोप झाल्यानं मनोरुग्ण झालेल्या डॉक्टरच्या पत्नीची व्यथा मांडली आहे. बलात्काराचा आरोप करणाऱ्या स्त्रीचा ती कायम दुस्वास करते; पण ती स्त्री मात्र स्वत:ला दोष देत, आहे ती परिस्थिती सहजपणे स्वीकारते. नवऱ्याच्या चुकीच्या निर्णयामुळे संसाराची वाताहत होते, तो स्वत:ला दारूच्या पेल्यात बुडवून घेतो, तेव्हा आतल्या आत धुमसत संसार रेटणारी नायिका ‘वाताहात’ कथेत भेटते. ‘मुंबई- पुणे’ कथेची नायिका आजारी प्रियकराला भेटण्यासाठी नोकरी सांभाळत रोज मुंबई- पुणे- मुंबई प्रवास करते, मात्र त्याच्या मृत्यूनंतर त्याच्याच एका निरोपामुळे तिला वेगळ्याच सत्याला सामोरं जावं लागतं. ‘जिद्दी’ कथेच्या नायिकेचे वडील प्रसिद्ध गायक. आपली आई त्यांच्या गायनाचा तिरस्कार करायची आणि त्यातूनच ती वेडी झाली, हे समजल्यानंतर ती वडिलांचं आव्हान स्वीकारत जगाला सामोरी जाते. परदेशातून अचानक भारतात परतलेल्या मैत्रिणीला ती सर्वतोपरी मदत करते खरी; पण जेव्हा तीच आपल्या संसाराला सुरुंग लावू शकते, हे लक्षात आल्यावर ‘आळीमिळी गुपचिळी’ कथेची नायिका पुरती ढासळते. एका कथेत पतीच्या कर्तृत्वाच्या दबावाखाली बोन्साय झालेली नायिका मुलांचं तसं होऊ नये, म्हणून त्यांना खंबीरपणे साथ देते, तर ‘ऑक्टोपस’ची नायिका पती परांगदा झाल्यानंतर धैर्यानं परिस्थितीला सामोरी जात स्वत:चं विश्व निर्माण करते. परत आलेल्या पतीला ते पाहवत नाही, तेव्हा त्याचं बंधनही ती नाकारते.
स्त्रीची परिस्थितीमुळे होणारी घुमसट या पुस्तकातल्या कथांमध्ये मांडली आहे. कधी ही परिस्थिती निर्माण झाली आहे, कधी लादली गेली आहे, तर कधी त्या स्त्रीनं ती स्वत:हून स्वीकारली आहे; पण प्रत्येकीनं त्यावर मात करत जीवनाचा आनंद शोधला आहे.
पुस्तकाचं नाव : धुम्मस
लेखिका : ज्योत्स्ना देवधर
प्रकाशन : जयविराज प्रकाशन, पुणे (9822330426)
पाने : 192 किंमत : 300 रुपये