क्रिकेटच्या अस्त्रानं तालिबान्यांशी लढणाऱ्या तरुणीची कथा

क्रिकेटच्या अस्त्रानं तालिबान्यांशी लढणाऱ्या तरुणीची कथा

त्यांचं लहानपण खूपच तणावात गेलं. आधी आजूबाजूला रशियन सैनिक असायचे, नंतर धर्मरक्षक...यादवी युद्धाच्या धुम:श्‍चक्रीत त्यांचं आयुष्य होरपळून निघालं, शिक्षण थांबलं, बेरोजगार, नैराश्‍य वाट्याला आलं, त्यातच दैनंदिन आयुष्यात तालिबान्यांचे निर्बंध...मुली, महिलांना डोक्‍यापासून पायांपर्यंत बुरखा, एकटीनं घराबाहेर पडण्यास बंदी, मोठ्यानं हसायचं, बोलायचं नाही, तर पुरुषांनाही दाढी ठेवण्यासारखी अनेक बंधनं...अशातच एक दिवस त्यांना या साऱ्यांतून बाहेर पडण्यासाठी आशेचा किरण दिसला आणि मग त्यांनी जीवतोड मेहनत करत, आलेल्या प्रत्येक संकटाला सामोरे जात या संधीचं सोनं करण्याचा निर्णय घेतला आणि या साऱ्यासाठी त्यांना बळ, प्रेरणा आणि साथ दिली एका तरुणीनं...
स्त्रियांच्या जागा फक्त दोनच- एक घर आणि दुसरी कबर, अशी मानसिकता असलेल्या तालिबान्यांशी क्रिकेटचं अस्त्र वापरून लढणाऱ्या रुख्सानाची कथा तिमिरी एन. मुरारी यांनी ‘द तालिबान क्रिकेट क्‍लब’ या पुस्तकात चितारली आहे. त्याचा अनुवाद अमृता दुर्वे यांनी केला आहे.

रुख्साना ही अफगाणिस्तानातील ‘काबूल डेली’मध्ये काम करणारी पत्रकार. आजारी आई आणि धाकट्या भावाबरोबर ती काबूलमध्ये राहते. तालिबान्यांनी अफगाणिस्तानच्या माजी अध्यक्षांना भर चौकात मृत्युदंड दिल्यानंतर, त्याची बातमी लिहिण्याच्या तयारीत असताना, तालिबान राजवटीतले एक मंत्री आणि धर्मरक्षक तिला कार्यालयातून मारहाण करून बाहेर काढतात. नोकरी गेली तरी ती टोपणनावानं परदेशी वृत्तपत्रांना बातम्या पाठवत असते. नेलपेंट लावलं म्हणून तरुणीची नखं उखडली, केवळ तालिबान्यांच्या नियमानुसार विवाह केला नाही म्हणून दांपत्याला गोळ्या घालून मृत्युदंड...यांसारख्या तालिबानी अत्याचाराच्या बातम्या ती पाठवत असते.

निर्बंध, अत्याचारांमुळं तालिबान्यांची आणि अफगाणिस्तानची जगभरात जी प्रतिमा निर्माण झालेली असते, ती बदलण्यासाठी देशात क्रिकेट सामने भरवण्याची घोषणा तालिबानी करतात. जिंकणाऱ्या टीमला पाकिस्तानात जाऊन प्रशिक्षण घेण्याची संधी मिळणार असते. कोणालाही टीम करण्याची मुभा असते; पण तालिबान्यांकडून कला, क्रीडा यांसह मनोरंजनाच्या सर्वच गोष्टींवर बंधनं असल्यानं क्रिकेट कोणालाच खेळता येत नसतं. वडिलांच्या नोकरीमुळं काही वर्षं दिल्लीत राहिलेली रुख्साना मात्र तिथं कॉलेजच्या टीममधून क्रिकेट खेळलेली असते. तिचा नियोजित वर अमेरिकेत असल्यानं तिला देशाबाहेर पडणं शक्‍य होणार असतं; पण आपल्या भावंडांना या जुलमी राजवटीतून बाहेर पडण्याची हीच मोठी संधी आहे, असा विचार करून ती त्यांची क्रिकेट टीम तयार करते. जिथं छोट्या बाळाला दवाखान्यात घेऊन जाणाऱ्या महिलेला ती महरमशिवाय (रक्ताच्या नात्यातील पुरुष सोबती) घराबाहेर पडली म्हणून भर रस्त्यात गोळ्या घातल्या जातात, अशा वातावरणात रुख्सानानं भावंडांना क्रिकेट शिकवणं म्हणजे तिच्यासकट भावंडांच्याही मृत्यूला आमंत्रण होतं; पण त्यातूनही ती शक्कल लढवते. साऱ्यांना प्रशिक्षण देते. मैदानावर क्रिकेटचा सराव करणंही सोपं नसतं. कारण जागोजागी सुरुंग पेरलेले असतात. कोणत्याही क्षणी पाय पडून तो फुटण्याची भीती असते. एकदा सरावादरम्यान उंचावरून बॉल पडून सुरुंगाचा स्फोट होतोही; पण तरीही या तरुणांचं मनोबल कमी होत नाही. त्यातच रुख्सानाचा नियोजित पती तिला दगा देतो. एक तालिबानी मंत्री तिच्या प्रेमात पडून लग्नासाठी मागं लागल्यामुळं स्वत:चा आणि तिचा ‘महरम’ असलेल्या लहान भावाचा जीव वावण्यासाठी स्वत:च्याच घरात अज्ञातवासात राहण्याची वेळ तिच्यावर येते.

सारे धोके पत्करून रुख्साना टीम तयार करते. त्यासाठी तिला तिचा भारतातला प्रियकरही अफगाणिस्तानात येऊन मदत करतो. अखेरच्या टप्प्यात काही कारणानं तिलाही टीममध्ये (अर्थातच तालिबान्यांची नजर चुकवून पुरुष वेशात) खेळणं भाग पडतं. त्यांची टिम जिंकते; पण ऐनवेळी तालिबानी मंत्री शब्द फिरवतो, तरीही ती क्‍लृप्ती लढवून टीमसह देशाबाहेर पडते. रुख्सानाची कथा वाचत असताना क्षणाक्षणाला उत्कंठा वाढत जाते, त्याचबरोबर तालिबान्यांचे अत्याचार थरकाप उडतात.

लेखकानं अफगाण नागरिकांचं दैनंदिन जीवन बारकाव्यांसह टिपलं आहे. जुलमी राजवटीपासून दूर जाण्यासाठी काबूलमधला प्रत्येक जण आसूसलेला असतो, त्यासाठी वाटेल त्या संकटाला तोंड देण्यास तयार असतो, अर्थात त्यांना देशाबाहेर नेण्यासाठी काही जण त्यांची लुबाडणूकही करतात. प्रत्येकाच्याच आयुष्यात पावलापावलावर असलेले धोके आणि तरीही त्यांची जगण्याची आणि आपली स्वप्नं पूर्ण करण्याची असलेली उमेद या कथेतून दिसते.

पुस्तकाचं नाव : द तालिबान क्रिकेट क्‍लब
लेखक : तिमिरी एन. मुरारी
अनुवाद : अमृता दुर्वे
प्रकाशन :  मेहता पब्लिशिंग हाऊस
(०२०-२४४७६९२४)
पृष्ठं : २९६/ मूल्य : ३२० रुपये

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com