'नेम'स्त पांगा-याशी दोस्तीचा नेम

pangara
pangara

अमेरिकेत गेलं की, वेगवेगळ्या देशांच्या क्विसिन्सचा (cuisines) चा आस्वाद घ्यायची वेगळीच मजा असते... कॅलिफोर्निया प्रांतात तर विविध देशांची, लोकांची, वंशांची एवढी सरमिसळ झालीय की, तिथं तुम्ही नाव घ्याल त्या देशाची खाद्यसंस्कृती चाखता येऊ शकते... नेहमीची इटालियन, चिनी, पंजाबी, दक्षिण भारतीय उपाहारगृहे तर आहेतच; पण Lebanese, Ethiopian(Erthytean), Japanese, Burmese, Vietnamese, Greek... आपण ज्यांच्या फारसे वाटेला जाणार नाही असेही भरपूर खाद्यपदार्थ असलेली ठिकाणंही सहज खुणावत असतात. त्यात सूनबाई खास खवय्यी असेल, तर पर्वणीच! प्रत्येक रविवारचा mood पाहून, मोसमी, हंगामी उपयुक्तता जोखून ती Google, Yelp वरून माहिती काढणार, reviews बघणार आणि आपल्याला विचारणार, "काय खाणार, आई आज?' माझं आपलं स्टॅण्डर्ड उत्तर... "तू आजमावून दाद दिलेली असेल, असं काही किंवा मला खायला मदत करशील share करशील असं काहीही!!' तर आज निवड झाली एका व्हिएटनामी हॉटेलची!

स्वागतापासूनच जागेचं वेगळंपण जाणवलं. मेनू कार्डवर गंभीरपणे नजर फिरवत कधीच न ऐकलेल्या पदार्थांची नावं वाचून बघायची, हा मी आपला उगाच जपलेला छंद! यात मांसाहारी पदार्थही बघायचे, त्यांच्या रसास्वादाला कधीच जीभ धजावणार नसली, तरीही त्यांचं वर्णन वाचायचंच... लोकांच्या सुपीक डोक्‍यातून पदार्थ तयार करण्यासाठी काय एकेक कल्पना निघतात ते जाणून घेण्यासाठी! खूप विचार करत डोळ्यांसमोर पदार्थ कसा दिसेल, लागेल, आवडेल याचे आडाखे बांधत बसायचं! असंच ते मेनू कार्ड वाचत असताना माझी नजर एका ठिकाणी अडखळली...
Lamb grilled tender while wrapped in Nem (Erythrina indica) leaves with a dash of lemon & herbs... Nem की Neem leaves? ही काय भानगड आहे बुवा? Japanese Sushi खाल्ली होती कुठल्याशा अळवासारख्या पानात भरलेली... पण Nem म्हणजे काय? कंसात लिहिलेलं नांव Erythrina indica हे ओळखीचं होतं... नुकतंच कुठेतरी वाचलं होतं; पण काही केल्या ट्यूब पेटत नव्हती. घरी परतताना शोध सुरू झाला त्या Nem Erythrina indica पानाचा! नावात Indica आहे म्हणजे भारताशी संबंध असणार. Search मध्ये नाव टाकल्याबरोबर मी उडालेच... अरे, हा तर पांगारा दिसतोय... आपला मंदार वृक्ष. तरीच हे नाव ओळखीचं वाटलं होतं... पांगाऱ्याला व्हिएटनामी लोक Nem म्हणतात तर! त्याची मोठाली पानं घेऊन त्यात मांस शिजवायचं...

या "नेम' पानांचा मंद वास पदार्थांत झिरपवत त्याची स्वाद खुमारी वाढवायची... आपण नाही का हळदीच्या पानांवर पातोळे किंवा उकडीचे मोदक करत? केवढी लज्जत असते त्या पानांमध्ये..! अन्‌ काय घमघमाट पदार्थांचा! तशीच ही पांगाऱ्याची पानं असणार! कशी सुचली असेल ही पाककृती?
कितीदा बघितलं खरं तर आपण या पांगाऱ्याला... दुरून आणि जवळून! फाल्गुनात माळात, रानांत, रस्त्यावर, पायवाटांवर सर्वत्र पळसाच्या केशरी ज्वालाफुलांनी आसमंत भरून गेलेला असताना मध्येच एखादं झाड त्याच्या वेगळेपणाने उठून दिसतं... पळसापेक्षाही गर्द लाल फुलं फांद्यांच्या टोकांना डवरतात... झाड पूर्ण निष्पर्ण झालेलं... अंगोपांगी केवळ फुलंच फुलं! तीही जरा वेगळीच पळसापेक्षा. लांब, पतंगरूप, गर्दलाल पोवळ्यासारखी! (त्यावरूनच Erythrina हे वंशनाव आणि Indian coral tree हे इंग्रजी नाव), मोठी पण बिनवासाची ही फुलं! फुलात भरपूर मधाची रसवंती असल्याने अनेक पक्षी, भुंगे त्याभोवती सदैव गर्दी करून असतात आणि सहज परागण (पराग एका फुलातून दुसऱ्यात नेणे)
घडवून आणतात. पळस, गोकर्ण, पांगारा झालंच तर सगळ्या beans (दाणे भरल्या शेंगा) या सर्व Leguminoceae (legume म्हणजे शेंग) कलातील! पळस आणि पांगारा तर चुलतभाऊच! म्हटलं तर जवळचे; पण तसे आपापली आब राखून वागणारे! वर्षभर या वृक्षाच्या पानाच्या हिरवाईने आणि वसंतात फुलांच्या लाल लालित्याने आसमंत रसरसून उठतो. उघडे बोडखे अंग घेऊन कपाळभर लाल मळवट भरून पोतराज यायचा बघा आपल्या लहानपणी... तसा काहीसा भासतो यावेळी पांगारा! केळीचा लाल घड उलटा धरावा, अशी पांगाऱ्याची फुले बघायला किवा शोधायला जराशी वाट वाकडी करून जायला हवं!

फुलांची संरचना अगस्त्याच्या किंवा गोकर्णाच्या फुलांप्रमाणे असते. फुलांच्या देठाकडची बाजू (calyx) टोकाशी पंचदंती, काळपट लालसर आणि पाकळ्या तळापर्यंत चिरलेल्या... फुलांच्या पाकळ्या एकत्र जोडलेल्या... एक जराशी मोठी, बाकदार आणि मोजून दहा लाल केसरदले! अहाहा! फुलांनी वाऱ्यावर झळझळणाऱ्या फांद्यांना अनिमिष बघत राहावं असं अप्रतिम दृश्‍य असतं हे! त्यात जर मध चाखताना पाचूपक्षी(पोपट) किंवा इतर छोटे पक्षी दिसले, तर "सोने पे सुहागा!' एक अनोखी रंगसंगती डोळ्यांचं पारणं तर फेडतेच; पण असंख्य गाण्यांचे थवे कानसेनासही तृप्त करतात!
या झाडाची फळं ऊर्फ शिबा (शेंगा) लांब गोलसर, गाठाळ आणि काळ्या! मे-जुलैमध्ये पिकतात; त्यात पिंगट किंवा गर्द लाल, गळगळीत बिया असतात. नवीन लागवड या बिया वापरून अगदी सहज करता येते... कुठंही फेका... रुजतात, उगवतात आणि वसंत-विलोभनीय दृश्‍यांची मुहूर्तमेढ रोवतात. सुरुवातीस लहान वाटणारं हे झाड झपाझप वाढतं. सुरवातीला खोडावर, झाड लहान असताना अणकुचीदार काटे असतात. जसजसं झाड मोठं होत जातं तसतसे हे काटे नाहीसे होत जातात. बाल्यावस्थेतल्या झाडाचं पशूंपासून संरक्षण होण्यासाठी निसर्गाने केलेली ही खास सोय असते. हे काटे काळ्या वाघनखांसारखे असतात म्हणूनच याला Tiger claw tree असंही म्हणत असावेत.

आपल्याकडे पांगारा जंगलात तर दिसतोच; पण शहरातील बागांमध्ये, शेताच्या कुंपणालाही लावतात. दार्जिलिंगला चहाच्या मळ्याला सावलीसाठी तो लावलेला मी बघितलाय. पाण्याच्या जवळच्या जंगलात तर पांगारा हमखास सापडतो. कोकणात प्रामुख्याने आढळणाऱ्या या संपूर्ण झाडाचा उपयोग सुशोभीकरणासाठी आणि त्याचे लाकूड तर माणसाने फार पूर्वीपासून विविध उपयोगात आणले आहे. पांगाऱ्याच्या सालीचे पटकन ढलपे निघून येतात. याचं लाकूड ठिसूळ आणि सहज मोडणारं असल्याने मोठ्या लाकूड कामासाठी वापरलं जात नाही. गावाकडे या लाकडाचा मुख्य वापर वेलांना आधार देण्यासाठी, जळणासाठी करतात.

दोन गोष्टींची "सांगड घालणे' हा वाक्‍प्रचार आपण कितीदा वापरतो. पण, त्याच्या भाषिक जन्माची कथा या झाडाशी जुळली आहे. गोष्टही मोठी मजेशीर! पूर्वीच्या काळी खोल विहिरी खणल्या जात. त्यावेळी तळात जिथे झरे असत तिथे या पांगाऱ्याच्या गोलाकार फळ्या लावल्या जात आणि वर दगडाचे बांधकाम. यामुळे दगडाचा डोलारा पक्का उभा राहत असे आणि पांगाऱ्याचे लाकूड सछिद्र असल्याने झरे पण जिवंत राहून त्या लाकडातून पाणी विहिरीत येत असे. विहिरीत तळाला घालण्याच्या या प्रक्रियेला "सांगड घालणे' असं म्हणत! पुढे हा शब्द "जोडणे' या अर्थाने रूढ झाला. पळस नि पांगाऱ्याची ही जोडी असल्याने त्यांच्या पानांमध्येही साम्य आहे. पांगाऱ्याची पानंही तीन पर्णिकांची असतात. पळसाप्रमाणेच मधली पर्णिका मोठी; बाकीच्या दोन लहान असतात. ही पानं तजेलदार हिरवट रंगाची आणि घप्प विणीची असतात. त्यामुळेच त्यांत गुंडाळून मांस शिजवत असावेत. मी कधी त्यांचा वास घेऊन बघितला नाही... पण, तो विशिष्ट असू शकेल..! पुढच्या खेपेला पांगाऱ्याशी आणखी जवळची दोस्ती करावी लागणार, असा "नेम' करावा असं दिसतंय आणि तशी संधीही नुकतीच चालून आलीय... आजच घराजवळच्या बोरी-पळस बनात लालचटक ठसका पांगारा दिसलाय... तो भरभरून पानायची आणि फुलायची वाट बघतेय!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com