दर दिवशी नवा प्रयोग

विषय चालला होता; मुंबईमध्ये नोकरी करणाऱ्या सर्वांच्या दिनक्रमाचा. समोर बसलेले सारे, एका प्रसिद्ध महाविद्यालयातील ‘सपोर्ट स्टाफ’
work stress
work stresssakal

विषय चालला होता; मुंबईमध्ये नोकरी करणाऱ्या सर्वांच्या दिनक्रमाचा. समोर बसलेले सारे, एका प्रसिद्ध महाविद्यालयातील ‘सपोर्ट स्टाफ’ म्हणजेच, लायब्ररी ते लॅबोरेटरी आणि जिमखाना ते ऑफिस अशा विविध विभागांत काम करणारे साठ-सत्तर मित्रमैत्रिणी.

‘डॉक्टर, कामाचं प्रेशर, घरातल्या जबाबदाऱ्या, त्यात रोजचा त्रासदायक प्रवास हा सारा, ‘वर्क लाइफ बॅलन्स’ ही तारेवरची कसरत आम्ही सांभाळायची कशी?’’ त्या टीमचे, प्रमुख कार्यकारी अधिकारी म्हणाले.

‘जगण्यातल्या वेगवेगळ्या कप्प्यांमध्ये समतोल म्हणून आपण या प्रश्नाकडं पाहू या. इंग्रजी शब्दांतून असं वाटतं की ‘वर्क’ म्हणजे नोकरी-व्यवसाय आणि ‘लाइफ’ म्हणजे आयुष्य जणू वेगवेगळे आहेत आणि तारेवरची कसरत म्हणजे, एकतर पैलतीर गाठणं आणि न पडता तिथं पोहोचणं. म्हणजे सततची अस्थिरता या उदाहरणामध्येच आहे. चला, आपण एक वेगळं दृश्य डोळ्यासमोर आणू या.’’ मी म्हणालो आणि मांडणीला सुरुवात केली.

सकाळी आपण झोपेतून उठलो, डोळे उघडले की डोळ्यासमोर आणायचा, नाटकाचा रंगमंच. त्या वेळी जे गाणं आठवेल ते मनात गुणगुणायचं. पडदा वर जातो. रंगमंचावर कुणी नाही. अंधार आहे. रंगमंच हळूहळू उजळतो. तुमच्या मनात येणारा पहिला विचार, कोणत्या भूमिकेचा डायलॉग आहे ते पाहा.

कधी ऑफिसातली तरी भूमिका पहिली एंट्री करेल. कधी पती किंवा पत्नीची भूमिका. जे विचार येतील त्या भूमिका स्टेजवर पाहायला लागायच्या. त्यामध्ये लक्षात ठेवायचं, की या सगळ्या भूमिका पाहणारे ‘तुम्ही’ कोण आहात तर दिग्दर्शक आणि प्रकाशयोजनाकार. म्हणजे आता ज्या भूमिकेला महत्त्व द्यायचं त्यावरचा प्रकाश तुम्ही वाढवा.

ते विचार तुम्हाला प्राधान्यानं करायचे आहेत आत्ता. मग पुढच्या भूमिकेला प्रकाशात आणायचं आहे. अचानक तुमच्या आईचा फोन येतो. तुम्ही बोलताना, स्टेजवर एंट्री होते, ‘मुलगा’ किंवा ‘मुलगी’ या तुमच्या भूमिकेची. रंगमंचावरच्या भूमिकांना वाव कसा आणि किती द्यायचा तुम्ही ठरवता आहात. पण मधूनच...

‘येताना बँकेत जाऊन या हं,’ लगेच नोंद करा, पती/पत्नी भूमिका.

‘उद्या मला बर्थ डे पार्टीला जायचंय.’ कोणावर प्रकाश? पालक भूमिकेवर!

तुमच्या लक्षात येईल की काही भूमिका दिग्दर्शकाच्या सूचनेप्रमाणं वागत नाही आहेत. प्रकाशात येण्याची धडपड करत आहेत.

उपाय? आहे की, त्यांना बाजूच्या विंगेत उभं करायचं.

तरीसुद्धा घुसताहेत स्टेजवर? लाइट नाही टाकायचा त्यांच्यावर.

म्हणजे एकाच वेळी तीनचार जणांचा कोलाहल सुरू झाला, तरी आपल्याकडं युक्ती आहे. लक्षात ठेवायचं, तुम्ही डायरेक्टर आहात, तुम्ही स्टेजवर आलात तर तुम्ही फक्त एकच भूमिका बनाल, मग इतरांना न्याय नाही मिळणार.

स्टेजवर उतरलो तर ‘नट’ होऊ. एकच रोल करावा लागेल. दिग्दर्शक राहिलो तर सर्व भूमिकांचा मेळ घालता येईल. सतत काय डोळ्यासमोर आणायचं की जगण्याच्या रंगमंचावर दिवसाचा प्रयोग आहे. आपण दिग्दर्शक आणि फोकसिंग आपल्या हातात. आता अडचणी काय येतील या प्रयोगात ते पाहू या. समोरची मंडळी लगेच बोलायला लागली .

‘योग्य वेळी लाइट लागणार नाही.’

‘विंगेत जायला नाहीच म्हणेल ती भूमिका.’

‘सगळे कालवा करतील.’

‘कुठली तरी एक भूमिका दिग्दर्शकालाच हलवून टाकेल.’

आता समोरचे सगळे, आमच्या या प्रयोगाच्या तालमीमध्ये घुसले होते. हे त्यांच्या प्रतिक्रियांवरून जाणवत होतं. ‘दिग्दर्शकाची’ नेमकी जबाबदारी काय यावर आमची चर्चा झाली. तो जहाजाचा कप्तान आहे. वेगवेगळ्या भूमिका म्हणजे इतर अधिकारी आणि नौसैनिक आहेत.

सगळ्या भूमिका प्रत्येक प्रयोगात उत्तम वठतीलच असे नाही. सरावाच्या भूमिका असतील, तर दिग्दर्शकाचा भरंवसा वाढेल. जसा दिवस सरकेल तसे, अंक बदलतील... घर, प्रवास, ऑफिस, प्रवास, घर... प्रत्येक अंकामध्ये वेगवेगळे प्रवेश असतील.

आणि त्या प्रवेशांमध्ये, समोरच्या प्रेक्षागृहातून काही कलाकार उठतील, बोलतील. हे जरा प्रायोगिक नाटकासारखं होईल. समोरची व्यक्ती नेमकी कोणती भूमिका करत आहे हे दिग्दर्शकाला कळायला हवं. कारण त्यावर ठरणार स्टेजवरच्या कोणत्या भूमिकेला प्रकाशात आणायचे आहे.

लक्षात असं ठेवायचं, की प्रेक्षागृहातून येणारे सगळे ‘पाहुणे’ कलाकार आहेत. ते समोर असतील तेव्हा आपल्या स्टेजवरच्या योग्य भूमिकेवर प्रकाशझोत हवा. पण ‘पाहुणा’ कलाकार एक्झिट करता झाला, की स्टेजवरच्या भूमिकेवरचा लाइट कमी तरी व्हायला हवा. नाहीतर समतोल बिनसेल.

एवढी तयारी झाल्यावर आम्ही या, रंगमंचाची ‘तालीम’ केली. एका प्रतिनिधीनं येऊन खुर्चीवर बसायचं आणि समोरून मी वेगवेगळे प्रसंग आणि व्यक्ती यांचं चित्रण सांगत होतो. संवाद बोलत होतो. समोरच्या सहभागी मित्राला भूमिकेतले संवाद आणि डायरेक्टरच्या सूचना हळूहळू जमायला लागल्या. पण कधी कधी डायरेक्टर अचानक ‘प्यारेलाइज’ व्हायचा आणि फक्त भूमिकाच ‘बोलत’ राहायची. असं झालं की आम्ही ‘तालीम’ थांबवायचो आणि चर्चा करायचो.

आम्हा सर्वांचा तास - दीड तास अशाप्रकारे हसत-खेळत शिकवणारा झाला. एक मजेदार पैलू समोर आला. कधीकधी सर्व भूमिकांचे ‘समायोजन’ त्या दिग्दर्शकाला अगदी प्रात्यक्षिकाच्या दरम्यानही चांगलं जमलं.

‘ही आहे लय, आपल्या सगळ्या भूमिका अशा प्रकारे चालतात त्यालाच म्हणायचे संतुलन, बॅलन्स!’ मी म्हणालो. ‘‘पण हे नेमके क्षण असतात. कायमची स्थिती नव्हे.’

‘म्हणजे इम्बॅलन्ससुद्धा कायमचा नसणार ना सर!’ एक सहभागी मित्र म्हणाले.

‘करेक्ट! एक प्रवेश दुसऱ्यासारखा नसणार. आजचा अंक उद्यासारखा नसणार. कधीकधी प्रयोग चालू असताना दिवे जाणार. पण रोजचा प्रयोग सुरू राहणार. आता मला सांगा, आपल्या प्रयोगात हीरो किंवा हीरॉइन कोण?’

सगळे विचारात पडले. काही जणांनी ऑफिसच्या भूमिकेला पहिला क्रमांक दिला तर काहींनी गृहिणी या भूमिकेला. पण एक जण म्हणाली, ‘खरं तर दिग्दर्शक सगळ्यात महत्त्वाचा. इतर सगळे येतात-जातात तो नेहमीच असतो.’

‘अगदी बरोबर, दिग्दर्शक म्हणजे आपल्या विचार-भावनांची जाण, Thinking awareness.

‘आपण विचार करतो’ आणि त्याचं भानही आहे अशी परिस्थिती असते, तेव्हा दिग्दर्शक जागा असतो पण आपण कोणत्याही एका भूमिकेत जरुरीपेक्षा जास्त गुरफटत गेलो तर मग काय होणार?’

‘इम्बॅलन्स!’ आता कोरससारखा प्रतिसाद मिळाला. ‘प्रत्येक भूमिका त्या त्या प्रवेशासाठी कमी किंवा जास्त महत्त्वाची असते. कधी ती भूमिका वाहवत जाईल, चुका करेल, दिग्दर्शकानं सांगितलेल्या सूचना पाळणारच नाही. अशा वेळी उपाय एकच! रोज रात्री दिवसाचा प्रयोग संपला की त्याचा आढावा घ्यायचा. समीक्षण करायचं. त्याच्या काही सोप्या पायऱ्या आहेत.' मी म्हणालो. तुम्ही-आम्ही सर्वांनीच, ‘दर दिवशी नवा प्रयोग’ ही मानसिक युक्ती रोज करायला हरकत नाही. रात्रीच्या परीक्षणामध्ये काय काय पारखायचे?’’

आजच्या प्रयोगातले रंगलेले तसेच भंगलेले प्रवेश, आज जरुरीपेक्षा ‘भारी’ झालेल्या भूमिका, दिग्दर्शकाकडून झालेल्या चुका ! हा लेखाजोखा घेतल्यावर आजच्या दिवसातले तीन महत्त्वाचे संदेश तयार करायचे. त्या स्वतःसाठीच्या टिप्स असतील. त्यानंतर आठवायची आजची सर्वांत समाधानकारक भूमिका.

आजच्या दिवसात ज्यांची ज्यांची मदत झाली, त्यांचे चेहरे मनात आणायचे आणि कृतज्ञता व्यक्त करायची. तुम्ही ज्यांना मानता त्या व्यक्ती, विभूती यांना मनःपूर्वक वंदन करायचं. चेहरा आपोआप हसरा होईल. हातपाय सैल करायचे. आरामात श्वास घेत राहायचे. असं झालं तर झोपेची आराधना करण्यासाठी दुसऱ्या कोणत्याच औषधांची गरज पडणार नाही तुम्हाला! बघाल करून?

(लेखक हे विख्यात मनोविकारतज्ज्ञ, विचारवंत, नाटककार, संगीतकार, कवी, चित्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com