esakal | एकत्र कुटुंबाचे न्यु व्हर्जन
sakal

बोलून बातमी शोधा

FAMILY

काही अपवाद वगळता एकत्र कुटुंब व्यवस्था जवळपास मोडत चालली आहे. छोटी, स्वतंत्र कुटुंबे जन्माला आली आहेत. पूर्वी म्हटलं जात होतं की, एकत्र कुटुंबात काही वेळा व्यक्तींचा कोंडमारा होत असे. स्वातंत्र्यावरही गदा येत होती. स्वतंत्र म्हणजेच विभक्त कुटुंब मात्र त्यांचा त्यांचा निर्णय घेऊन आपल्या भविष्याला सामोरे जातील, असे म्हटले जात. आज माणूस कितीही स्वतंत्र झाला असला, तरी तो मानसिकदृष्ट्या परावलंबीच आहे.

एकत्र कुटुंबाचे न्यु व्हर्जन

sakal_logo
By
अॅड. अभय आपटे

सकाळी लवकर फिरायला बाहेर पडलात तर कोपऱ्या कोपऱ्यावर मोठ्या इमारतीतले वॉचमन जवळपास सर्वांना ऐकू जाईल अशा आवाजात मोबाईलवर, "बीटियाको बोलना की ये हमें बिलकूल नहीं चलेगा,' असे सुनावताना दिसतात. त्याचबरोबर एखादी मध्यमवर्गीय प्रौढ महिला मुलाची-मुलीची अमेरिकेतून फोन यायची वेळ झाली म्हणून लगबगीनं घरी जाऊन स्काईपसमोर बसताना दिसते. विमानतळापासून ते बसपर्यंत आणि घरापासून ते ऑफिसपर्यंत सर्व तरुण-तरुणी मोकळ्या वेळेत आपले आई-वडील, भाऊ-बहीण यांच्या दररोज संपर्कात असतात. हा संपर्क नुसता खुशाली कळविण्याचा नसतो, तर यामध्ये अनेक सूचना सातत्याने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला केल्या जातात. तर, दुसरीकडून गाऱ्हाणी ऐकविली जातात. 

काही अपवाद वगळता एकत्र कुटुंब व्यवस्था जवळपास मोडत चालली आहे. छोटी, स्वतंत्र कुटुंबे जन्माला आली आहेत. पूर्वी म्हटलं जात होतं की, एकत्र कुटुंबात काही वेळा व्यक्तींचा कोंडमारा होत असे. स्वातंत्र्यावरही गदा येत होती. स्वतंत्र म्हणजेच विभक्त कुटुंब मात्र त्यांचा त्यांचा निर्णय घेऊन आपल्या भविष्याला सामोरे जातील, असे म्हटले जात. आज माणूस कितीही स्वतंत्र झाला असला, तरी तो मानसिकदृष्ट्या परावलंबीच आहे. कोणत्या कोणत्या माध्यमातून तो कुणाचा ना कुणाचा मानसिक आधार घेत असतो. मुळात एकमेकांच्या संपर्कात असणे, यात गैर काहीच नाही. पण, एकमेकांच्या वैयक्तिक आयुष्यात आक्रमण करणे ही निश्‍चितच चिंतेची बाब असू शकते.

रोज नव्याने समोर येणाऱ्या कायदेशीर वादात अशा दूर पल्ल्याचा फोन, व्हिडिओ यावरून केलेला हस्तक्षेप किंवा ढवळाढवळ हा एक महत्त्वाचा विषय आहे. "एरवी आमचं सगळं ठीक असतं. पण, एकदा का घरून फोन येऊन गेला की पुढचे दोन दिवस नुसती भांडणं,' असे तिच्या/त्याच्या आई-वडिलांबाबत सातत्यानं म्हटलं जातं. असा हस्तक्षेप करत राहणं, ही एक आपली एक मोठी जबाबदारी असल्याचा समज अनेकांना असतो. अनेकदा त्या कर्तव्याचे हस्तक्षेपात कधी रूपांतर होते, हे कळत नाही. कदाचित या मागे नियंत्रण ठेवण्याची हौस किंवा मानसिकताही असू शकते. त्यातूनच अतिसंपर्कात असलेली नवी एकत्र कुटुंबं जन्माला आली आहेत. 

पूर्वी मोठ्या एकत्र कुटुंबात अनेक सदस्य रोजच्या रोज फारसे संभाषणही करत नव्हते. मात्र, ती टीम एक होती आणि कप्तानच्या आदेशाने पुढे जात होती. त्यामुळे रोजच्या रोज संपर्क हा मर्यादित आणि औपचारिक होता. अर्थात, त्याहीवेळी अनेक गुणी खेळाडूंना कप्तानांकडून आपल्यावर सतत अन्याय होत असल्याची भावना होतीच. मात्र, आता या अशा संपर्कात वरकरणी छोटे दिसणारे कुटुंब हे दूरवरच्या एकत्र कुटुंबाच्या इशाऱ्यावर चालताना दिसून येते. अर्थात, तो एकत्र कुटुंबाचाच प्रकार आहे. वेगळे राहण्याचे स्वातंत्र्य आणि पुन्हा कुटुंबीयांचा आधार, या दोन्ही गोष्टींचा त्यात फायदा घेता येतो. काळानुरूप प्रगतीची क्षेत्र पादाक्रांत करताना लांब राहण्याला पर्याय नाही. म्हणूनच ठराविक मात्रेतला हा संपर्क असल्यास अमृताहून गोड होऊ शकतो. 
 

loading image
go to top