कात टाकणारा व्हिएतनाम (निरंजन आगाशे)

निरंजन आगाशे
सोमवार, 20 मे 2019

भारत-व्हिएतनाम द्विपक्षीय संबंधांविषयी चर्चा करण्यासाठी उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांचा व्हिएतनाम-दौरा नुकताच झाला. त्या दौऱ्यात सहभागी होऊन तिथल्या लोकजीवनाची, तसंच तिथल्या विकासाविषयीची, प्रगतीविषयीची टिपलेली ही निरीक्षणं...

भारत-व्हिएतनाम द्विपक्षीय संबंधांविषयी चर्चा करण्यासाठी उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांचा व्हिएतनाम-दौरा नुकताच झाला. त्या दौऱ्यात सहभागी होऊन तिथल्या लोकजीवनाची, तसंच तिथल्या विकासाविषयीची, प्रगतीविषयीची टिपलेली ही निरीक्षणं...

सिंचाओ... म्हणजे नमस्ते. गोबरे गाल, बसकं नाक आणि बोलक्‍या डोळ्यांची व्हिएतनामी माणसं "सिंचाओ' म्हणत आपलं दिलखुलास स्वागत करतात तेव्हा आपण भारावून गेलो नाही तरच नवल. त्या क्षणी "पीपल टू पीपल कॉन्टॅक्‍ट' या राजनैतिक वर्तुळातल्या नमुनेदार परिभाषेतला औपचारिकपणा कुठल्या कुठं गळून पडतो आणि दर्शन घडतं ते इथल्या आनंदी स्वभावाच्या माणसांचं.

भारत-व्हिएतनाम द्विपक्षीय संबंधांविषयी चर्चा करण्यासाठी उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्या चार दिवसांच्या व्हिएतनाम दौऱ्यात सहभागी होताना हनोई शहरात जे लोकजीवन पाहायला मिळालं ते या देशाविषयीचं औत्सुक्‍य कमालीचं वाढवणारं होतं.

भल्या पहाटे "हाओन किएम' नावाच्या सरोवराच्या काठी धावण्याचा व्यायाम करणारी सर्व वयोगटांतली मंडळी, योगप्रकारांपासून ते "ताई-चि'पर्यंत आपापल्या आवडत्या व्यायामप्रकारांमध्ये अक्षरशः दंग झालेली माणसं, आठ-साडेआठला कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी हेल्मेट आणि तोंडावर मास्क बांधून सुसाट वेगानं जाणारे स्कूटरस्वार, चिनी वस्तूंनी भरभरून वाहणाऱ्या बाजारपेठेत घासाघीस करणारे ग्राहक व विक्रेते आणि सहा वाजण्याचा अवकाश; आपापली कामं संपवून सगळं आवरून "संध्याकाळ'च्या स्वागतासाठी रस्त्यावर उतरणारे आबालवृद्ध. व्हिएतनामी नगरवासियांच्या प्रत्येक मूडमधले चेहरे लक्षात राहतात. मनात घर करतात. शहरातले रस्ते संध्याकाळी अशा माणसांनी फुलून गेले की आपण फक्त निरखायचं किंवा त्या आनंदोत्सवात सहभागी तरी व्हायचं. या मोकळ्या रस्त्यांवर चिंता, शंका-कुशंका, नैराश्‍य या गोष्टींना मात्र जणू अघोषित प्रवेशबंदीच. तिथलं हे असं उत्साही वातावरण पाहून, आज 31 डिसेंबर तर नाही ना, अशी शंका नवख्या माणसाला आली तर नवल नाही. पाश्‍चात्य संगीताच्या तालावर बिनधास्त सामूहिक नृत्य करणाऱ्या युवती, खेळातल्या मोटारींमधून मोकळ्या रस्त्यावर खुशाल सैर करणारी गोंडस बाळं, त्यांच्या मागं "रिमोट कंट्रोल' घेऊन फिरणारी पालकमंडळी असा सगळा माहौल होता. अशा वातावरणात व्हिएतनामविषयी काही माहिती मिळवण्याचा प्रयत्न करणं म्हणजे या आनंदसोहळ्याच्या सूर-लयीत व्यत्यय आणण्यासारखंच. तसंही प्रत्येक जण फक्त व्हिएतनामी भाषेतच बोलत असल्यानं दुभाषी सहाय्यक नसेल तर संवाद साधणंच कठीणच. ज्या काही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना इंग्लिश येत होतं, त्यांना बोलतं करण्याचा प्रयत्न केला तरी व्हिएतनाममधल्या राजकीय सिस्टिमविषयी ते चकार शब्द बोलत नाहीत; किंबहुना तशी चर्चा करण्याचा त्यांचा अनुभवच नसतो. भारतीय समुदायाच्या वतीनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपराष्ट्रपतींनी "सध्या भारतात निवडणुकीचा महोत्सव सुरू आहे,' असे उद्गार काढले तेव्हा तिथं उपस्थित असलेल्या स्थानिक व्हिएतनामी श्रोत्यांच्या चेहऱ्यावर उमटलेली प्रश्‍नचिन्हं बोलकी होती. इंग्लिश वाङ्‌मय घेऊन पदवीचं शिक्षण घेत असलेली झोंक हिला याविषयी विचारलं तेव्हा ती म्हणाली ः ""निवडणुकीची आम्हाला नीटशी कल्पना नाही. आम्हाला भारताविषयी जी थोडीफार माहिती आहे ती आहे हिंदी चित्रपटांमुळे. "थ्री इडियट्‌स' हा अलीकडं सर्वात आवडलेला चित्रपट.''

व्हिएतनाममध्ये कम्युनिस्ट पक्ष हाच एकमेव पक्ष. अंतर्गत निवडणुका होत असल्या तरी निवडणुकीची रणधुमाळी म्हणजे काय हे या तरुणांना माहीत असण्याचं कारण नव्हतं हे खरंच; पण राष्ट्रनायक हो-चि-मिन्ह यांच्याविषयी कमालीचा आदर प्रत्येकाच्या बोलण्यातून व्यक्त होतो. त्यांचं नाव निघताच त्यांच्याविषयी किती सांगू, असं इथल्या नागरिकांना वाटतं आणि ते साहजिकच आहे.

हनोईतल्या अध्यक्षीय प्रासादाच्या संकुलात हो-चि-मिन्ह यांचा खुर्चीवर बसून लिहितानाच्या अवस्थेतला पुतळा आहे. तो पाहताना प्रमाणबद्धता आणि रेखीवपणा ही त्या पुतळ्याची वैशिष्ट्यं तर भावतातच; पण हो-चि-मिन्ह यांच्या नजरेतले निश्‍चयात्मक भाव शिल्पकारानं ज्या पद्धतीनं जिवंत केले आहेत ते केवळ अप्रतिम. व्हिएतनामी समाजातली परिस्थितीशी झुंजण्याची वृत्ती, सत्त्व टिकवून धरण्याची जिद्द यांचं हे प्रेरणादायी प्रतीक. त्या बळावरच फ्रेंचांच्या वसाहतवादाला या देशानं टक्कर दिली. सन 1950 मध्ये दिएन बिएन फूच्या लढाईत विजय मिळवून फ्रान्सच्या पकडीतून व्हिएतनामनं सुटका करून घेतली. या यशस्वी प्रतिकारामागं हो-चि-मिन्ह यांनी केलेली वैचारिक मशागत कारणीभूत होती. आपल्या समाजाचं भवितव्य घडवण्याचं सुकाणू आपल्या हाती हवं, असा विचार त्यांनी मांडला. साम्यवादी विचारांचं आकर्षण हे त्यांच्या स्वातंत्र्यलढ्याचं एक मुख्य वैशिष्ट्य; पण त्या यशस्वी स्वातंत्र्यलढ्याला देशाच्या विभाजनाच्या दुःखाची किनारही होती. उत्तर व्हिएतनामचे अध्यक्ष झालेल्या हो-चि-मिन्ह यांना देशाचं एकीकरण अत्यंत महत्त्वाचं वाटत होतं. त्यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. अमेरिकेनं दक्षिण व्हिएतनामच्या बाजूनं सैन्य उतरवल्यानं पुन्हा एकदा उत्तर व्हिएतनामला संघर्ष करावा लागला. त्या वेळी "...परि उरातील अभंग आवेश' याचा प्रत्यय या अभूतपूर्व लढाईनं दिला. उत्तर व्हिएतनामी जनतेच्या जिद्दीपुढं बलाढ्य अमेरिकी सैन्याला माघार घ्यावी लागली. पुढं सन 1975 मध्ये हो-चि-मिन्ह यांचं देशाच्या एकत्रीकरणाचं स्वप्न पूर्ण झालं; पण ते साकार झालेलं पाहायला ते हयात नव्हते. एकत्रित व्हिएतनाममध्ये इतिहासकाळापासून चालत असलेली जिद्द आजही दिसते. आजच्या व्हिएतनामविषयी माहिती सांगताना शोवा नावाची तरुणी व्हिएतनामच्या समुद्राचं वर्णन कटाक्षानं "ईस्ट सी' असं करते आणि गप्पांमध्ये चुकून जरी त्या भागाचा उल्लेख "साऊथ चायना सी' असा केला गेला तरी आपल्याला ती तिथल्या तिथं करेक्‍ट करते. कुठलंच लादलेलं आधिपत्य न स्वीकारण्याच्या बंडखोरीची ठिणगी या समाजातून विझलेली नाही, याचा प्रत्यय आपल्याला येतो. चीनच्या विस्तारवादानं दूरवर आपलं जाळं पसरायला सुरवात केल्यानं व्हिएतनाम अस्वस्थ आहे. सागरी हद्दीवरच्या सार्वभौमत्वाचा, नाविक-हालचालींच्या स्वातंत्र्याचा हा प्रश्‍न आहे. व्हिएतनाम त्याविषयी कमालीचा जागरूक आहे आणि सांस्कृतिक, राजकीय आणि भौगोलिक दृष्टीनं चीनच्या जवळ असूनही आपलं सत्त्व राखून आहे.

भारत आणि व्हिएतनाम यांच्यातल्या मैत्रीत हा एक महत्त्वाचा घटक आहे, हे उघडच आहे. त्यामुळंच गेल्या दोन वर्षांत भारताचे पंतप्रधान, राष्ट्रपती, संरक्षणमंत्री आणि आता उपराष्ट्रपती यांचे त्या देशात दौरे झाले आणि भारत हा व्हिएतनामला देत असलेलं महत्त्व अधोरेखित झालं. भारतानं समुद्रावरील टेहळणी-जहाजांसाठी त्या देशाला 50 कोटी डॉलरचं कर्ज दिलं आहे. "दक्षिण चीन समुद्रातले तंटे सामोपचारानं सोडवण्याबाबत संबंधित राष्ट्राचं मतैक्‍य होईल,' या उपराष्ट्रपतींच्या सावध विधानातही भारताची चीनच्या वर्चस्ववादाविषयीची नापसंती लपून राहणारी नव्हतीच. दोन्ही देशांतल्या वाढत्या सहकार्याचा केवळ हाच एक पैलू आहे असं मात्र नाही. आर्थिक-व्यापारी सहकार्य हाही दोघांना जोडणारा महत्त्वाचा धागा आहे. उगवता, उभरता व्हिएतनाम आता आर्थिकदृष्ट्या सबळ होण्याच्या प्रयत्नात गुंतला आहे. आताचं "रणांगण' वेगळं आहे हे ओळखून त्या दिशेनं व्हिएतनाम प्रयत्नशील आहे, याचा प्रत्यय व्हिएतनामच्या दौऱ्यातल्या जवळजवळ सर्वच कार्यक्रमांतून येत होता. त्या देशाच्या उपाध्यक्षा श्रीमती डांग थी गॉक थिन यांच्या निवेदनातूनही प्रामुख्यानं दिसल्या त्या आर्थिक प्रगतीच्या आकांक्षा. व्हिएतनामी विद्यार्थ्यांच्या विद्यावृत्ती-शिष्यवृत्तींच्या संख्येत वाढ, ऊर्जाक्षेत्रातलं सहकार्य, शेतीतल्या प्रयोगांची देवाण-घेवाण, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातला भारताच्या तज्ज्ञतेचा लाभ मिळावा ही अपेक्षा हे सगळे त्या आकांक्षेचेच प्रतिध्वनी होते. भारतही त्याला प्रतिसाद देत असून
" सन 2020 पर्यंत दोन्ही देशांतला व्यापार 15 अब्ज डॉलरचा टप्पा गाठेल,' हा संकल्प बरंच काही सांगून जातो.

मूळचे आंध्रातले आणि आता गेली 22 वर्षं व्हिएतनाममध्ये राहत असलेले हरी हे पत्रकार भेटले. भारतीय समुदायानं इथं आयोजित केलेल्या कार्यक्रमाला ते उपस्थित होते. "रायझिंग व्हिएतनाम'ची ओळख ठळक होण्यामागं या देशाच्या तत्कालीन पंतप्रधानांनी सन 1986 मध्ये ज्या आर्थिक सुधारणा हाती घेतल्या, त्यांचा वाटा महत्त्वाचा असल्याचं त्यांनी सांगितलं. या सुधारणा "डोई-मोई' या नावानं ओळखल्या जातात. राजकीयदृष्ट्या वैविध्य आणि मोकळेपणा नसला तरी आर्थिक आणि व्यापारी-क्षेत्रात मोकळे वारे वाहिले पाहिजेत आणि भूमिपुत्रांच्या श्रमाला, कौशल्याला आणि बुद्धिमत्तेला वाव देणाऱ्या संधी निर्माण केल्या पाहिजेत, असं या देशानं ठरवलं. तीव्र गरिबीकडून मध्यम आर्थिक स्थितीकडं या देशानं केलेला प्रवास हे त्या धोरणाचं फलित. त्याच्या खुणा या देशाला भेट देणाऱ्या प्रत्येकाला जागोजागी दिसतात. तांदूळ, मका, बटाटा ही पिकं, वस्त्रोद्योगासारखा उद्योग या पारंपरिक व्यवसायांच्या बरोबरीनंच उद्योग-व्यवसायाची नवी क्षितिजं या देशाला खुणावू लागली आहेत. अमेरिकेनं सन 1994 मध्ये आर्थिक निर्बंध हटवल्यानंतर या वाटचालीला गती मिळाली असं दिसतं. आर्थिक विकासदर 7.1 टक्‍क्‍यांवर पोचला. साडेनऊ कोटी लोकसंख्येच्या या छोट्या देशातला मध्यमवर्ग विस्तारतो आहे.
या बदलांइतकंच इथल्या भारतीयांना भावतं ते व्हिएतनामी समाजाचं बऱ्याच अंशी एकसंध असलेलं स्वरूप.

अजय गर्ग आणि अभय शुक्‍ला या इथंच स्थायिक झालेल्या भारतीयांच्या बोलण्यात या वैशिष्ट्यांचा उल्लेख वारंवार येत होता. रंग, वंश, धर्म अशा गोष्टींची उठाठेव इथं कुणी करत नाही. समोरच्याचं आडनाव कळलं नाही म्हणून कुणी कासावीस होत नाही. इथं कर्मकांडाचं स्तोम नाही. झोंक ही व्हिएतनामी तरुणी म्हणाली ः ""आठवड्यातून एकदा आम्ही प्रार्थना करतो, तेवढंच. स्त्री-पुरुष संबंधातली समानता आणि मोकळेपणा हेही या देशाचं चटकन लक्षात येणारं वेगळेपण. माध्यमिक शिक्षणात मुलांपेक्षा मुलीच पुढं आहेत.''

हे सगळं खरं असलं तरी या देशाला अजून बरीच मजल मारायची आहे, अनेक आव्हानांना सामोरं जायचं आहे याची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. शहरी झगमगाटातही एखादा अंधारा कोपरा डोळ्यांना खुपतो. सायकलरिक्षा ओढणाऱ्या व्यक्ती इतरांइतक्‍याच आनंदी दिसतात; पण त्यांच्या पुढ्यातलं आर्थिक वास्तव लपत नाही. "डॉंग-श्‍वॉन' या हनोईतल्या मार्केटच्या विस्तृत आवाराला भेट दिली. सरकारनं बांधून दिलेल्या मोठ्या इमारतींमध्ये शेकडो विक्रेत्यांनी आपापले गाळे उभारले आहेत. त्यात छोट्या-मध्यम विक्रेत्यांची संख्या प्रचंड म्हणावी इतकी आहे. चिनी वस्तूंनी गजबजलेली ही बाजारपेठ न्याहाळताना चटकन लक्ष गेलं ते चहा-कॉफीपावडरच्या दरांकडं. कॉफीच्या पाकिटाची किंमत होती 29 हजार डॉंग. एक रुपयाला 330 डॉंग असं प्रमाण आहे. अगदी गरिबातल्या गरीब व्यक्तींना इथल्या वस्तू-सेवा परवडत असतील का, हा प्रश्‍न त्यामुळेच उपस्थित झाला. या धावत्या भेटीत ग्रामीण भागातल्या एखाद्या ठिकाणाचा समावेश असता तर याचं उत्तर मिळू शकलं असतं; पण एक मात्र नक्की की आर्थिक विकास हे या देशानं आपलं लक्ष्य ठरवलं आहे. आणि या वाटचालीत उद्योजक, विविध संस्था सहभागी आहेत. सर्वसामान्यांच्या मनोधारणाही याच वाटचालीशी सुसंवादी आहेत. या देशानं त्या मार्गावर काही पावलं टाकलीही आहेत. आर्थिक शक्ती वाढली की राजकीय आकांक्षा फुलारू लागतात, हा तर जगभरचा अनुभव. त्यामुळंच आपलं आशियातलं स्थान बळकट करण्यासाठीही व्हिएतनामचे राज्यकर्ते उत्सुक आहेत. भारताबरोबरचं वाढतं सहकार्य हे जसं त्याचं एक उदाहरण, तसंच "वैशाख' महोत्सवाचं यजमानपद स्वीकारण्यासाठी पुढाकार घेणं हेही. मुत्सद्देगिरीला केवळ राजकीय-प्रशासकीयच नव्हे, तर सांस्कृतिक अंगही असतं याची व्हिएतनामच्या सत्ताधाऱ्यांना पक्की जाणीव आहे. जपान, तिबेट, भारत, श्रीलंका, थायलंड, म्यानमार, नेपाळ आदी आशियाई देशांतूनच नव्हे तर युरोपातूनही व्हिएतनामच्या "हा नाम' प्रांतात एकत्र आलेले हजारो बौद्ध साधक एकीकडं बौद्ध संस्कृतीच्या प्रभावाची जाणीव करून देत होते अन्‌ त्याच वेळी कात टाकणाऱ्या व्हिएतनामचंही दर्शन घडवत होते. ताम चूक पॅगोडा इथल्या विशाल सभागृहात व्यासपीठावर भगवान गौतम बुद्धांची शांतस्थित प्रतिमा आणि तिच्यापुढं विविध राष्ट्रनेत्यांनी चालवलेला जागतिक शांततेचा मंत्रजागर मुळातच रमणीय असलेल्या या परिसराला आणखी सुंदर करत होता. सत्त्व कायम ठेवून सर्व प्रकारच्या वर्चस्ववादाशी दोन हात करणं, ही त्याच शांततेच्या उद्दिष्टाकडची वाटचाल आहे, हे व्हिएतनामी सूत्रही त्यामुळं मनात तरंग उमटवत होतं...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: niaranjan aagashe write vietnam article in saptarang