मन लागतंय कामात..!

नितीन पवार koripati.production@gmail.com
Sunday, 10 January 2021

गावाकडच्या गोष्टी 
गोष्टी गावाकडच्या...वड्या वगळीतल्या... माळामुरडाणातल्या. गोष्टी गावकुसातल्या... अर्थात हे सारं येईल त्याच भागातल्या भाषेत, तिथल्या मातीशी नातं सांगणाऱ्या शब्दांमध्ये दर आठवड्याला...

चार महिनं झालं जित्या मी आन गण्या गावाला घरी बसूनच हुतो...आत्ता सगळी मुंबईच बंद म्हटल्यावर मुंबईत राहून तरी खायाचं काय..? 
सुरवातीला गावालाबी मज्जा वाटली... सकाळी निवांत उठणं, पारावर न्हायतर देवळाखाली जाऊन बसणं, नंतर घरात येऊन जेवणं, मग पुन्हा देवळात येऊन बसणं, न्हायतर देवळाच्या माडीवर निवांत ताणून देणं...
ह्यो दिनक्रम ठरल्याला हुता... 

पावसाच्या आधी क्रिकेट खेळलो, आंबं-फणास  खाल्लं..पण पावूस सुरु झाला आणि घरच्यांनी औताला जुंपलं... दोन वावर पडून हुती यंदा फादरनं तीबी पिरली..यंदा मुंबईवालं घावंल हुत कामाला कनाय...! न्हाय म्हंजी शेतातली कामं बी करायलाच पायजे आयतं बसून तरी कोण घालील, पण आत्ता सगळी काम झाली...!
कालच जित्या, मी आन गण्यानं कोळपायला केल्याला पैरा संपला..म्हटलं पुन्हा दिनक्रम चालू करावा... पण आता कायचं करूं वाटना, कससंच झालं...चार महिनं आपुन कवाच बसून नव्हतो...मी आन गण्या रंगात आन जित्या डायवरच काम करायचा...!

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आमच्या शेटनं हित गावालाबी कलरच काम घेतल्यालं कळलं...मग काय म्हटलं जावं तिथं कामाला, फोन लावला आन आमचा नंबर  लागला...दुसऱ्या दिवसापासनं काम चालू केलं... मुंबईत हजरी तीनशं ते पाचशं मिळती हितं अडीचशे मधी काय भागायचं म्हटलं.. पण काम नसण्यापेक्षा तेवढं तर तेवढं...जित्याला बी घेतला जुडीला...बाकी काय न्हाय, तर प्लेन तरी मारील..
गावात पोहचलो तर ह्यो भला मोठा बंगला.. तसलं गावात चार दोन बंगलं...आयला म्हटलं गावातली लयच सुधारल्यात...आपलं महिन्याभराच काम कुठं गेलं न्हाय..!
काम करायला सुरवात केली..मस्त निवांत काम.. गावाच्या कुशीत.. मनासारखं..गाडीवरनं यताना पैशाचा हिशेब करत निघालो...मी म्हटलं...
जित्या हित लका २५० रुपय हजरी म्हजी साडेसात हजार पगार पडला त्यात त्याल गेलं हाजाराच... जित्या म्हणला " यड्या मुंबईत धा -बारा हजार मिळायचं पण त्यात रहायचं हजार प्रत्येकी आन खानावळ अडीच हजार,  नाश्त्या-पिष्ट्याला हजार एक जायाच... म्हजी हातात राहयचं किस्त..हिशोब तिथंच आला कनाय... "

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तेवढ्यात गण्या म्हणला, "हित आईच्या हातच खावणं, आपल्या माणसात राव्हनं , शेताभातात जाऊन, सुखासुखी चार पैसे कमी आलंतरी कुठं जावं वाटायचं न्हाय बघ...! आर तिथं सकाळी उठलो की पळायचो..कोण इचारणार न्हाय... का जवळच...! कामातनं मन गावला पळायचं...जगत हुतो का मेलो हुतो आपल्यालाच म्हायत..पण हितं मन लागतंय लका कामात..!

हे आयकून सगळ्यांस्नी बरं वाटलं हुत..गाडीच्या चाकागत मन पळायला लागलं हुत..पण मोटरीच्या आवाजातली हुरहूर आत हुती.." ह्ये कुठवर..गाडीत त्याल हाय तवरच" पण एक मन म्हणत हुत 
‘तवर तरी... ’!

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nitin Pawar Writes about work