घरची लक्षुमी

आयनं लोकाच्या वावरात भांगलून अन बापानं दुसऱ्याची घर रंगवून कवडी कवडी गोळा केली व्हती.. पोरगं तीनदा दहावीत नापास झालं तरी धीर सोडला न्हाय.
army soldier
army soldiersakal

आयनं लोकाच्या वावरात भांगलून अन बापानं दुसऱ्याची घर रंगवून कवडी कवडी गोळा केली व्हती.. पोरगं तीनदा दहावीत नापास झालं तरी धीर सोडला न्हाय. आयुष्य गेलं गरिबीत. पोरगच ह्यातन भायरं काढील आन आपलं सगळे कष्ट संपतील, आसं आयला, इळ्यानं कापल्याला बोटाकडं अन् बापाला पुट्टी मारताना चुन्यानं झोंबणाऱ्या हाताकडं बघून वाटायचं. पगार झाला की आय पयला नवलाईला नारळ दिवून याची. मार्च - आक्टोबर करत पोरानं कशी बशी दहावी पास केली. त्या दिशी बापानं घरचा कोंबडा कापला, आयनं समद्या गावाला पेढा वाटला, आता पोरग भरतीच्या मागं लागलं. सकाळचं पाच वाजता उठायचं, डोंगुरं पालथा घालायचा, पुन्हा व्यायाम अन् आभ्यास. पोरानंबी चांगलंच मनावर घेतलं हुतं.

आपल्या आय आणि बापाचं कष्ट त्येला दिसत हुतं. आयन एक येळचा च्या बंद केला आणि पोराला आंडी लावली. बापानं उसन पैसे आणून भरतीला जायला वाटखर्ची दिली. पोरग गेलं ते भरती हूनच आलं. गावात त्येची मिरवणूक झाली. आयबापाला भरून आलं. पोरानं लागलीच घराच्या बाजूला आजून दोन खण जागा घितली. गवंडी आणून मापं टाकली नव्या घराची आखनी केली. सुट्टी संपली, पोराला निरोप दिला. पोरगं रोज आईबापाला दिवसातनं एकतरी फोन करायचं. आईशी तास तास बोलायचं. आईवर लै जीव हुता त्येजा. भावाला शाळंला पैसा धाडायचं. बापाच्या फोनच्या बॅलन्स टाकायचं...

समदं कसं एकदम बेस झालं हुतं, आय आता भांगलायला जायची न्हाय. घरात अन् आपल्याच रानातलं जमलं तसं करायची. बाप गावातून कॉलर उडवीत फिरायचा. आधी कुणी च्या पाजतं का बघणारा, आता माणसांसनी च्या पाजायचा. बापानं पुन्हा कवा याचा म्हणून लग्नासाठी पोरगी बघून ठिवली हुती. पोरगा पुन्हा सुट्टीवर आला. आन लग्नाचा बार उडाला. बायकुला लागलीच बरोबर घिवून गेला...

तिकडं एका चकमकीत त्यो गेला... मोकळं कपाळ आन नवऱ्याचं धड घिवून पोरगी गावात यील आस कुणालाच वाटलं नव्हतं. झालं आयं बापाची शेवटची आस संपली. सगळीकडं नुसता कल्लोळ उठला सगळा गाव बघत हुता... प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी हुतं. पण आय रडली न्हाय. तिनं आन पाणी टाकलं. दिवसभर पोरग्याबद्दल बोलायला लागली.आन एक दिवस पोराकडं गिली. सून माह्यारला गिली ती पुन्हा आलीच न्हाय. हिकडं बाप आन धाकलं पोरग राह्यलं. पोराचं आल्यालं पैसे त्येज्या बायकूच्या नावावर आलं. तिनं ह्यास्नी कायबी दिलं न्हाय. नव्या घरासाठी आखल्याली जागा इकली. आज ह्या घरातनं, उद्या त्या घरातन बाप लेकासाठी भाकरी याला लागली. बारकं पोरग शाळेत हुतं.

बापाकडं वयामुळं काम जमन्यासारखं नव्हतं. मग तिज्या माह्यारी जाऊन भांडण, हाणामाऱ्या झाल्या पण काय उपेंग झाला न्हाय. केसी आजुनबी चालूच हायत. तिनं दुसरं लगीन केल. ममयला असती म्हण आता. कव्हातरीच गावाला येती. ह्ये घर, ह्यो दीर आन सासरा आता तिज कुणीच नव्हतं. घरात पोरगा आन आयचा फोटो लागल्याला हाय, त्याज्याकडं बघित बाप रोज एक एक घोट घेतो. पोरग शाळा सोडून घरीच आसंत. घरात बापाला चार घास करून घालंत.

घरबी आता पडत आलंय. ती गल्ली आता शांतच असती. दारू पिऊन त्येजा बाप तेवढा रोज राती बडबड करतो.आन नशेतच डोळ मिटतो. त्या घराकडं आता बघवत न्हाय, जिथं कवातरी लक्ष्मी नांदायची. घरातन बाय गेली की घर बसतं अन् कवा - कवा घरं सावरणारी सुदा बायचं असती..! शाळा सोडल्याल पोरग मातुर आस लावून, हाय कवातरी सगळं नीट व्हईल...! कवा त्ये कुणालाच म्हायती न्ह्याय..!

(सदराचे लेखक ‘गावाकडच्या गोष्टी’ या ‘यू ट्यूब’ वरील वेबमालिकेचे लेखक - दिग्दर्शक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com