प्रवास अस्थिर वातावरणातला...

निकाराग्वा हा मध्य अमेरिकेतील सर्वांत मोठा देश आहे. उत्तरेला होंडुरास, जिथं खूप जास्त हिंसा आणि दक्षिणेस कोस्टारिका, ज्याने १९४९ मध्ये आपलं सैन्य काढून टाकलं आणि एक खूप शांतीप्रिय देश बनला.
प्रवास अस्थिर वातावरणातला...
Summary

निकाराग्वा हा मध्य अमेरिकेतील सर्वांत मोठा देश आहे. उत्तरेला होंडुरास, जिथं खूप जास्त हिंसा आणि दक्षिणेस कोस्टारिका, ज्याने १९४९ मध्ये आपलं सैन्य काढून टाकलं आणि एक खूप शांतीप्रिय देश बनला.

- नितीन सोनवणे nonviolenceplanet@gmail.com

होंडुरास देश सोडून मी निकाराग्वा या देशात प्रवेश केला. मागील काही महिने मी जगातील धोकादायक देशातून प्रवास करत होतो. निकाराग्वामध्ये जाण्यापूर्वी आता कोणी भीती दाखवली नाही. अमेरिकेत असताना काही लोकांनी विचारलं की, ‘जर कोणी तुझी सायकल आणि सामान लुटलं तर तू काय करशील?’ मी त्यांना सांगायचो, ‘मी पुढे चालत प्रवास करेन.’ तशी मनाची पूर्ण तयारी मी केली होती. फक्त प्रश्न होता, जर पासपोर्टपण त्यात गेला तर?... पुढे दक्षिण आफ्रिकेतून पदयात्रा सुरू केली होती व सायकल मित्राकडे सोडली, अजून ती सायकल जोहान्सबर्गमध्येच आहे. निकाराग्वामध्ये प्रवेश करून वाटलं, आता यात्रा सहजतेने होईल; पण पुढे प्रवास करताच समजलं की, सध्या इथे सरकारविरोधात खूप मोठं जनआंदोलन सुरू आहे.

निकाराग्वा हा मध्य अमेरिकेतील सर्वांत मोठा देश आहे. उत्तरेला होंडुरास, जिथं खूप जास्त हिंसा आणि दक्षिणेस कोस्टारिका, ज्याने १९४९ मध्ये आपलं सैन्य काढून टाकलं आणि एक खूप शांतीप्रिय देश बनला. पश्चिमेला प्रशांत महासागर जो की जगातील सर्वांत मोठा समुद्र आहे, ज्याने पृथ्वीचा ३२ टक्के भाग व्यापला आहे, म्हणजे पृथ्वीवरील सर्व जमिनीच्या क्षेत्रफळापेक्षासुद्धा जास्त. मी बराच काळ प्रशांत महासागराच्या किनाऱ्याहून प्रवास केला. याच्या थंड पाण्यामुळे एक थंडावा हवेत पसरतो, यामुळे मला सायकलवर जास्त घाम गाळावा लागला नाही. महासागराच्या थंड पाण्यामुळे मी त्यात पोहण्याचं टाळलं. पूर्वेला कॅरिबिना समुद्र आहे, ज्याच्या पाण्याचे दिवाणे जगभरात आहेत. मी त्याचं दर्शन पहिल्यांदा निकाराग्वामध्ये केलं. एका बाजूला अशांती, दुसऱ्या बाजूला शांती; एका बाजूला थंड आणि दुसऱ्या बाजूला उबदार अशा विशेष देशात मी प्रवेश केला होता.

निकाराग्वा देश हा आपल्या तमिळनाडूएवढा आहे, निकाराग्वा हा शब्द निकाराव आणि याग्वा या दोन शब्दांपासून बनला आहे. निकाराव हे एका नेटिव्ह अमेरिकन सरदाराचं नाव होतं आणि याग्वा म्हणजे पाणी. निकाराग्वा सरोवर हे मध्य अमेरिकेतील सर्वांत मोठं गोड्या पाण्याचं सरोवर आहे (जगातील विसावं मोठं) आणि जगातील काही दुर्मीळ गोड्या पाण्यातील शार्कचं घर आहे. भूकंप आणि ज्वालामुखीसाठी हा देश प्रसिद्ध आहे, इथं १९ सक्रिय ज्वालामुखी आहेत आणि सोबत सुंदर समुद्रकिनारा, ज्यामुळे हे पर्यटकांना आकर्षित करतात. येथील लोकसंख्या ही ६७ लाखएवढी आहे आणि स्पॅनिश भाषा बोलली जाते.

शीतयुद्धाच्या काळात निकाराग्वा या देशात १९७९ ते १९९० पर्यंत नागरी युद्ध चाललं. यात कम्युनिस्ट सरकारविरोधात त्याच्या पाठीशी अमेरिका उभी होती. या युद्धाच्या शेवटी १९९० मध्ये इथं निवडणुका झाल्या आणि व्हीओलेता चामोरो या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष बनल्या.

मी निकाराग्वा देशात सायकल यात्रा सुरू केली, तेथे खूप मोठे आणि सुंदर रस्ते होते आणि आजूबाजूला हिरवीगार झाडी. काही अंतर पुढे गेलो असता मला रोडवर काही गाडीचे टायर जाळलेले दिसले... तसंच एका ठिकाणी आंदोलकांनी रोड बंद केला होता. गाड्यांची ये-जा बंद होती; पण माझी सायकल पाहून त्या आंदोलकांनी मला जाऊ दिलं. असं पुढे बऱ्याच ठिकाणी घडलं. पायी किंवा सायकलवरून आपण कुठेही जाऊ शकतो, रस्ता नसेल तरी काही समस्या नाही, गाडी बंद पडण्याचा प्रश्न नाही, वेगळा गाडीचा व्हिसा घेण्याची आवश्यकता नाही; ना ट्राफिकमध्ये अडकण्याची शक्यता, ना पेट्रोल ना डिझेल व त्यामुळे प्रदूषण नाही व सोबत खूप सारा आदर लोकांकडून मिळाला. त्यामुळे सायकल किंवा पायी प्रवास सोपा असतो.

पुढे जात असताना आता मला रोडवर काही मानवी चित्रं दिसली. मृत शरीर व त्याभोवती काढलेल्या रेषा, त्यामुळे तिथे चाललेल्या आंदोलनाची दाहकता दिसत होती. प्रत्येक शहरात आंदोलक आपल्या देशाचा मोठा झेंडा घेऊन नारे देत रस्त्यावर उतरले होते. पुढे जाऊन मला समजलं की, १८ एप्रिल २०१८ रोजी जेव्हा निकाराग्वाच्या अनेक शहरांतील निदर्शकांनी राष्ट्राध्यक्ष डॅनियल ओर्टेगा यांनी जाहीर केलेल्या सामाजिक सुरक्षा सुधारणांच्या विरोधात निषेध सुरू केला आहे, ज्यामुळे कर वाढले आणि फायदे कमी झाले. पाच दिवसांच्या अशांततेनंतर ज्यामध्ये सुमारे तीस लोक मारले गेले, ऑर्टेगाने सुधारणा रद्द करण्याची घोषणा केली. लोकांनी त्यांना अध्यक्षपदावरून हद्दपार करण्यासाठी हे आंदोलन पुढे सुरू ठेवलं आणि आजही २०२२ मध्येही ते सुरू आहे.

खूप लोक त्यावेळेस आपल्या लहान मुलांना घेऊन शहराच्या मध्यभागी जाऊन विरोध नोंदवत होते. ओर्टेगा यांनी देशात काही ठिकाणी झाडासारखी कलाकृती, ज्या लोखंडापासून बनवल्या होत्या, त्यांची उंची १७ मीटर आणि अशी १४० झाडं, त्यांना ते ‘ट्रीज ऑफ लाइफ’ असं सांगत. एका झाडाची किंमत २० लाख, सोबत त्यावर रात्री रोषणाई, यामुळे लोक त्यांच्यावर खूप संतापले होते. हा देश गरीब होता, तो पैसा इतर सुविधांवर न लावता त्यांनी त्या लोखंडी झाडांवर लावला. लोकांनी आपला राग या झाडांवर दाखवला आणि रोज एक-एक झाड ते पडत असत. या आंदोलनात ७६ लोकांना आपला जीव गमवावा लागला. अशा या अस्थिर देशातून मी प्रवास करत, मनागुआ या राजधानीच्या शहरात पोहचलो आणि काही दिवस तिथे हॉस्टेलवर राहिलो आणि काही मित्र बनवले. आपल्या अधिकारांसाठी नागरिकांनी उभं राहिलं पाहिजे, हे मला इथे शिकता आलं. पुढे अशा काही देशांमधून प्रवास झाला, जिथे लोक झोपी गेलेले आणि त्यामुळे देशाची दयनीय अवस्था झाली होती. भेटूयात पुढे गजब देश कोस्टा रिकामध्ये...

(सदराचे लेखक जगभर सायकलीनं भ्रमंती करत असतात, तसेच ते महात्मा गांधी यांच्या विचाराचे प्रचारक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com