अमेरिकेतही गांधींजीचे पुतळे!

अखेर अमेरिकेतल्या सॅन फ्रान्सिस्को इथल्या विमानतळावर आलो, व्हिसा आधीच मिळालेला...
Nitin Sonawane writes Statues of Gandhiji in America
Nitin Sonawane writes Statues of Gandhiji in America sakal
Summary

अखेर अमेरिकेतल्या सॅन फ्रान्सिस्को इथल्या विमानतळावर आलो, व्हिसा आधीच मिळालेला

- नितीन सोनवणे

अखेर अमेरिकेतल्या सॅन फ्रान्सिस्को इथल्या विमानतळावर आलो, व्हिसा आधीच मिळालेला होता. तिकीट आणि जास्तीच्या सामानासाठी लागलेल्या कार्डपे ची अचानक आलेली अडचण आणि त्यातून निघालेला मार्ग या कठीण परीक्षा संपवून मी अमेरिकेमध्ये पोहोचलो खरा; परंतु अजून एक परीक्षा देणं बाकी होतं, ती म्हणजे इमिग्रेशन अधिकाऱ्यांच्या प्रश्नांची सरबत्ती. विमानातील सहप्रवासी आणि मी एका रांगेत उभे राहिलो, तिथले अधिकारी सर्वांचे पासपोर्ट आणि व्हिसा यांची पडताळणी करत आणि नंतर काही प्रश्न विचारत. माझा नंबर आला त्या वेळी मनात प्रश्न आला की, हे मला माझ्या ओकाइनावामधील अमेरिकी सैन्याविरोधातील आंदोलनातील सहभागाविषयी विचारतील? मला वाटलं की, त्यांच्या सूत्रांनी ही माहिती गोळा केली असेल.

अमेरिकेतील सरकारकडे माझी माहिती आधी व्हिसाच्या वेळेस घेतली गेली, त्यात अंगठ्याचे ठसे व फोटोही होते. मला वाटलं, जर मला त्यांनी या आंदोलनाबद्दल विचारलं, तर अमेरिकेत येऊ देणार नाहीत; पण अधिकाऱ्यांनी मला दुसरेच प्रश्न विचारले आणि त्यांचा सामना करण्यासाठी माझ्यात खूप आत्मविश्वास होता.

त्यातील काही प्रश्न पुढीलप्रमाणे - तुम्ही अमेरिकेत किती दिवस राहणार आहात? अमेरिकेत येण्याचं कारण काय? कोणाकडे राहणार आहात? उदरनिर्वाहाचं साधन काय? परतीचं तिकीट आहे का? आणि शेवटी त्यांनी विचारलं, तुमच्याकडे किती डॉलर आहेत ? मी उत्तर दिलं, ‘‘३०० डॉलर.’’ तेव्हा अधिकारी माझ्याकडे बघून आश्चर्यचकित झाले आणि बोलले, ‘‘या ३०० डॉलरमध्ये तर तू फक्त ३ दिवस राहू शकतोस. त्यापुढे अमेरिकेमध्ये तू कसा राहणार?’’ या प्रश्नावर मी सांगितलं की, ‘‘माझे भरपूर मित्र इथं आहेत. तसंच, न्यूयॉर्कमधील ‘शांती फंड’ या संस्थेने माझी जबाबदारी घेतली आहे.’’ त्याचबरोबर मी माझ्या यात्रेबद्दलही सांगितलं. हे एवढं सांगून न थांबता पुरावा म्हणून मी माझी कागदपत्रं दाखवली. ती पाहूनही त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला नाही आणि माझी रवानगी हद्दपारी कार्यालयामध्ये केली. ज्या कार्यालयाचं काम माहितीची पुनर्तपासणी करून सत्यता पडताळणं आणि काही गडबड आढळल्यास पुन्हा त्यांच्या त्यांच्या देशात पाठवणं असतं. मला यात एवढं समजलं की, अमेरिकेमध्ये माणसाच्या कामापेक्षा पैशाला जास्त किंमत आहे. मी करत असलेल्या कामाबद्दल त्यांना काही सहानुभूती नव्हती. हद्दपारी कार्यालयात माझ्यासोबत ३ लोक होते, त्यांत एक व्हिएतनामी तरुण, जो कामासाठी आला असावा आणि एक चिनी महिला आपल्या वृद्ध आईला घेऊन आली होती. अमेरिकेत खूप लोक प्रवासी व्हिसावर येऊन काही महिने काम करतात व परत जातात किंवा स्थायिक होतात, त्यामुळे इमिग्रेशन अधिकाऱ्यांवर मोठी जबाबदारी असते.

एक आफ्रिकन-अमेरिकन ( आफ्रिकन वंशाचे अमेरिकन लोक) अधिकारी आला व त्याने माझी मुलाखत सुरू केली आणि आधी विचारलेले प्रश्न पुन्हा सुरू केले. मी जर एकही चुकीची माहिती दिली असती, तर त्यांनी मला भारत देशात पाठवलं असतं; पण माझ्याकडे काही लपवण्यासारखं नव्हतं, त्यामुळे मी आरामात होतो. या अधिकाऱ्याची शेवटी एक शंका होती की, मी तीनशे डॉलरमध्ये अमेरिकेमध्ये प्रवास कसा करू शकतो? त्यांना महात्मा गांधी यांचं कमीत कमी गरजांमध्ये राहणारं आयुष्य सांगण्यासाठी माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता. अशावेळी मला जपानची आठवण आली आणि मी त्या अधिकाऱ्याला म्हणालो, ‘‘मी मागील तीन महिने जपानमध्ये राहिलो आहे आणि जपान हा अमेरिकेपेक्षा महाग देश आहे.’’ हे ऐकताच त्यांनी माझा पासपोर्टमधील जपानचा व्हिसा पहिला आणि दुसऱ्याक्षणी माझ्या अमेरिकेच्या व्हिसा प्रवेशाचा ठसा मारला आणि त्याने माझं अमेरिकेत स्वागत केलं.

या प्रसंगातून पुन्हा मला एक शिकता आलं की, तुम्ही सत्य असाल तर विजय नक्की होतो. तसंच, अमेरिका हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याला खूप महत्त्व देतो, त्यामुळे मी अमेरिकेविरोधात आंदोलन करतो यासाठी त्यांना अडचण नव्हती आणि त्यांनी त्या गोष्टीला महत्त्व दिलं नाही. नंतर अमेरिकेच्या प्रवासात अभिव्यक्ती स्वातंत्र्य मी खूप अनुभवलं.

मी विमानतळाबाहेर आलो तेव्हा रात्रीचे ११ वाजले होते. मला विमानतळावरून घेण्यासाठी नियती पारेख ही माझी मैत्रीण आली होती. नियती पारेख हिची ओळख मी गुजरातला असताना झाली होती आणि ती अमेरिकेत असते हे तिने सांगितलेलं आणि अमेरिकेत आल्यावर माझ्याकडे ये असंही बोलणं झालेलं. पुढील ३-४ दिवस मी सॅन फ्रान्सिस्को शहरात तिच्या घरी राहिलो. तिने माझा चांगला पाहुणचार केला. सॅन फ्रान्सिस्को हे शहर कॅलिफोर्निया या राज्यात येतं. कॅलिफोर्निया हे एक सुंदर असं राज्य आहे. आर्थिक दृष्टिकोनातून खूप श्रीमंत राज्य आहे. जर हा देश म्हणून अस्तित्वात असता, तर जगातील पाचवा श्रीमंत देश म्हणून याची ओळख निर्माण झाली असती.

२०२१ मध्ये त्यांची इकॉनॉमी ३.४ ट्रिलियन एवढी होती. कॅलिफोर्नियातील दक्षिण सॅन फ्रान्सिस्को खाडी क्षेत्र भागाला सिलिकॉन व्हॅली असं संबोधलं जातं. ‘सिलिकॉन व्हॅली’ हे नाव आपण खूप वेळा ऐकलेलं आहे. हा भाग अनेक स्टार्ट-अप आणि जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांचं घर आहे. आपण जे कॉम्प्युटर आणि मोबाईल वापरतो, त्यातील महत्त्वाचा भाग हा ट्रान्सिस्टरपासून बनवला जातो व तो सिलिकॉनपासून बनवला जातो. या ‘सिलिकॉन व्हॅली’मध्ये ॲपल, फेसबुक, सिस्को अशा एक ना अनेक कंपन्या आहेत, ज्या जगाला एक वेगळा आकार देत आहेत. स्टॅनफोर्डसारखं विद्यापीठ इथं आहे, जे जगातील उत्तम विद्यार्थी घडवतं. १९३७ मध्ये गोल्डन गेट ब्रिज हा जगातील सर्वांत उंच (२२७ मीटर) आणि सर्वांत लांब (१२८० मीटर) असा झुलता पूल बांधला गेला, जो इथं आहे. हा जगातील सर्वाधिक छायाचित्रित पूल आहे. खूप साऱ्या चित्रपटांत आपण पाहत असतो.

त्याच्यावर चालण्याची आणि प्रशांत महासागरावरून येणाऱ्या जोरदार हवेची झुळूक याची एक वेगळीच मजा इथं अनुभवायला मिळते. मी दुसऱ्या दिवशी सॅनफ्रॅन्सिस्को शहर पाहण्यासाठी सुरुवात केली. शहरातील महत्त्वाच्या जागी असलेल्या महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचं दर्शन मी घेतलं. अमेरिकेत महात्मा गांधींना खूप महत्त्व आहे. महात्मा गांधीजींना खूप निमंत्रणं अमेरिकेतून आली; पण ते आपल्या जीवनकाळात अमेरिकेत गेले नाहीत, परंतु तरीही त्यांचे विचार इथं जीवित आहेत. मार्टिन ल्यूथर किंग ज्युनिअर यांनी महात्मा गांधीजींचा अहिंसेचा वारसा अमेरिकेत चालवला व आफ्रिकन-अमेरिकन नागरी हक्कांसाठी खूप मोठा लढा त्यांनी प्रेमाने चालवला. गांधींजींचे खूप सारे पुतळे अमेरिकाभर आपल्याला पाहायला मिळतील. हे पुतळे आजही लोकांना प्रेरणा देत आहेत. गांधीदर्शनानंतर मी पुढे उंच उंच चकचकीत इमारतींच्या मधून चालू लागलो. वाटेत सुटाबुटातील कर्मचारी आपापल्या कामाच्या ठिकाणी जात होते. त्यांत जगभरातील लोक होते जसं - भारत, चीन, आफ्रिका, युरोप; सोबत सुंदर अशा कार. हवेत ८-९ विमानं एकाच वेळेस दिसत होती. म्हणजे लोक इथं खूप येत-जात आहेत, तसंच हेलिकॉप्टरमधून पोलिस शहरातील सुरक्षेसाठी गिरक्या मारत होते. मला वाटलं, मी टाइम ट्रॅव्हल केलं आहे. नंतर मी पुढे चालत गेलो आणि मला सुंदर अशा विद्यापीठांच्या इमारती दिसल्या. पुढं मी एक वळण घेतलं, तेव्हा मी तिथं खूप लोक हे रस्त्यावर आपलं सामान घेऊन बसलेले पहिले. त्यांचे कपडे फाटके, मळके आणि जाड होते; आणि सोबत गोठवणारी थंडी. त्यांतील काही लोक व्हीलचेअरवर होते. लोकांना पैसे मागून ते आपलं जीवन रस्त्यावर जगतात. या लोकांना इथं होमलेस पीपल म्हणजे बेघर लोक असं संबोधलं जातं. ते सर्व पाहून माझा या उंच इमारती आणि इथल्या श्रीमंतीबद्दल भ्रमनिरास झाला. एका बाजूला श्रीमंती, तंत्रज्ञान, अत्याधुनिक मशिन आणि ज्ञान व दुसऱ्या बाजूला ही गरिबी; ही खूपच मोठी तफावत होती. जपानही खूप श्रीमंत आणि विकसित आहे; पण मी कधीच असे गरीब लोक तिथं पाहिले नाहीत.

या गरीब लोकांना त्यातून बाहेर काढणं अमेरिकेसारख्या श्रीमंत देशाला खूप काठीण नाही. खूप सारे माजी सैनिक या बेघर लोकांत असतात, सोबत काही लोकांना महाग घरामध्ये राहणं परवडत नाही असेही लोक आहेत. ही पाहिलेली गरिबी आणि जपानमधील अमेरिकेचं सैन्य, व्हिएतनाम युद्ध हे सगळं पाहिल्यामुळं अमेरिकेची किंमत माझ्या नजरेत कमी झाली.

पुढील काही दिवसांत मी तिथं एका आयटी कंपनीला भेट दिली, त्यासाठी मला असीम सप्तर्षी दादाने मदत केली. तिथं मला खूप भारतीय मिळाले, जे इथं स्थायिक झाले आहेत. शांघाय इथं विमानतळावर सायकल अमेरिकेमध्ये नेण्यासाठी ज्याने मला मदत केली, तो माझा मित्र जॉन लोहमान याच्या घरी मी गेलो. जॉन आणि त्याची पत्नी मला एका शाकाहारी हॉटेलमध्ये घेऊन गेले. तिथं आमच्या खूप गप्पा रंगल्या. जॉन हा ॲपल कंपनीमध्ये चीनमध्ये उत्पादन होणाऱ्या ॲपल फोन आणि लॅपटॉप यांची गुणवत्ता नियंत्रणाचं काम करतो आणि त्याची पत्नीसुद्धा काम करते. ते मला त्यांच्या आलिशान घरी घेऊन गेले आणि जॉनने त्याच्या खूप साऱ्या सुंदर अशा सायकल आणि कार दाखवल्या. माझ्या यात्रेसाठी त्याने मला एक आयफोन भेट दिला, त्यामुळे मी चांगल्या प्रतीचे फोटो पुढे काढू शकलो. कॉलेजचा एक मित्र, जो आता इथं काम करतो, तो सुधांशू देशपांडे याने मला टेन्टमध्ये झोपण्यासाठी लागणारी चटई भेट दिली. या सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त करून मी पुढे सायकलने लॉसएंजल्स या शहराकडे निघालो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com