सोनेरी स्वप्नं : गरीब लेकरांचा श्रीमंत बाप!

‘अकराशे रुपये डझनवाले देवगड घेण्यापेक्षा तेराशेवाले रत्नागिरी हापूस घ्यायचे का?’ बायको असं म्हणाली आणि मी होकार दिला.
hapus mango
hapus mango sakal
Summary

‘अकराशे रुपये डझनवाले देवगड घेण्यापेक्षा तेराशेवाले रत्नागिरी हापूस घ्यायचे का?’ बायको असं म्हणाली आणि मी होकार दिला.

‘अकराशे रुपये डझनवाले देवगड घेण्यापेक्षा तेराशेवाले रत्नागिरी हापूस घ्यायचे का?’ बायको असं म्हणाली आणि मी होकार दिला. सोबत मुलगा होता. तो म्हणाला, ‘पण पप्पा, हेच आंबे छान दिसताहेत की.’ त्याला म्हणालो, ‘अरे बाबा महाग आंबे गोड असतात. अकराशेवाल्या आंब्यापेक्षा तेराशेवाले आंबे जास्त गोड असणार.’

त्यानंपण होकारार्थी मान डुलवली आणि बायको तेराशेवाले आंबे निवडू लागली.

‘मॅडम सगळे आंबे सारखेच आहेत कोणतेही घ्या,’ दुकानदार असं म्हणत होता तरीही बायको त्याच्यासोबत हुज्जत घालत आंबे निवडत होती. मी इकडं तिकडं बघत होतो.

शेजारच्या भाजीपाल्याच्या स्टॉलवर एकदम सुरकुतलेले जुनाट आणि किडके वाटावेत अशा आंब्यांचं टोपलं होतं. मी तिथं गेलो आणि भाजीवाल्याला म्हणलं, ‘एवढे घाण आंबे कशाला ठेवले रे? उद्या अक्षयतृतीया आहे, जरा चांगले ठेव की.’ तसा तो माझ्याकडं दुर्लक्ष करत समोर उभ्या असलेल्या लोकांना भाजीपाला देऊ लागला. तोच एक चाळीशीच्या एका माणसाची सायकल तिथं येऊन थांबली. त्यावरून चार-पाच वर्षांची दोन चिमणी लेकरं उतरली. त्या फाटक्या माणसानं किडक्या आंब्यांमधले आंबे निवडायला सुरुवात केली.

मी आवंढा गिळत त्याच्याकडं पाहिलं. त्यानं भाजीवाल्याला भाव विचारला. तो म्हणाला, ‘सव्वाशे रुपये डझन.’ त्या माणसानं दोन्ही लेकरांच्या हातात एकएक आंबा दिला आणि दोन्ही पोरांचा चेहरा एकदम लखलखीत खुलला. प्रसन्न हसू त्यांच्या चेहऱ्यावर रेंगाळू लागलं. आंब्याचा रसाळ गोडवा त्यांच्या चेहऱ्यावरुन टपकू लागला. मी माझ्या लेकाकडं पाहिलं. त्याचा चेहरा अजूनही कोरडाच होता. त्याच्या बापाने तेराशे रुपयेवाले आंबे घेऊनही त्याला त्याचा आनंद झाला नाही का, असा विचार करत स्वत:ची समजून घालत मी त्याला म्हणालो, ‘आपण मस्त आंबे घेतलेत ना. एकदम गोड गोड आहेत.’ तसा कोरड्या चेहऱ्यानंच लेक म्हणाला, ‘हो, पण मम्मी म्हणते उद्या पूजा झाल्याशिवाय आंबे खायला नाय मिळणार. त्यापेक्षा तुम्ही हे किडके आंबे घेतले असते तर मला खायला तरी मिळाले असते.’

माझा लेक असं म्हणाला आणि समोरच्या लेकरांकडं पाहू लागला. तेराशे रुपयांचे आंबे घेणाऱ्या बापापेक्षा सव्वाशे रुपयांचे आंबे घेतलेला त्यांचा बाप जास्त श्रीमंत होता...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com