सोनेरी स्वप्नं : मी चप्पलचोर!

‘अय, पालखीला खांदा द्यायचा असेल तर पायातली चप्पल काढ आधी.’
Foot
FootSakal
Summary

‘अय, पालखीला खांदा द्यायचा असेल तर पायातली चप्पल काढ आधी.’

‘अय, पालखीला खांदा द्यायचा असेल तर पायातली चप्पल काढ आधी.’

एक खांदेकरी असं म्हणाला आणि पटकन बाजूला आलो. आयुष्यात पहिल्यांदा सोमवती अमावस्येनिमित्त जेजुरीला गेलो होतो. खंडोबाभक्तांचा अफाट जनसागर पाहून शॉकच झालो.

भर दुपारच्या रखरखीत उन्हात खंडोबाची पालखी कऱ्हानदीच्या स्नानाला निघाली. पालखीला सत्तरेक खांदेकऱ्यांनी खांदा दिलेला. आपणही खांदा दिला पाहिजे, म्हणून मीही गर्दीत घुसलो. पण, त्या गर्दीत कुणी पुढं जाऊ देईना. अंगात जेवढं बळ आहे, तेवढं लावत लोकांना बाजूला सारत पालखीपशी गेलो. पालखीला हात लावणार तोच एकाने माझ्या पायातली चप्पल पाहिली आणि रागानी म्हणाला, ‘अय, पालखीला खांदा द्यायचा असल्यास पायातली चप्पल काढ आधी.’ तसाच माघारी फिरलो.

एका दुकानाजवळ चप्पल काढली अन् पुन्हा गर्दीत घुसलो. अर्ध्या तासाच्या कसरतीनंतर पालखीला खांदा द्यायचं पुण्य वाट्याला आलं. पण तोवर तव्यावानी तापलेल्या डांबरी रस्त्यानं तळपायाला फोड आले होते. उन्हातान्हात अनवाणी पायानी चालताना रस्त्यावरचे गटारही सुखद वाटते, याची त्यादिवशी जाणीव झाली. अजून चार किलोमीटरचा पल्ला गाठायचा होता आणि मागं एक किलोमीटरवर माझी चप्पल राहिली होती. काय करावं समजेना.

रस्त्याच्या बाजूला अनेकांनी चपला काढल्या होत्या. पाय तर भाजत होते. पालखीसोबत तर जायचं होतं. अखेर एका भाविकानं चप्पल काढली अन् तो दर्शनासाठी पालखीकडं गेला. मी पटकन त्याची चप्पल घातली अन् गर्दीत शिरलो. माझ्या चपलीपेक्षा ही चप्पल भंगार होती. पण, या क्षणाला फायद्याची होती. पायाची आग शमली होती. पण, चोरी केल्याचा विचार मनाला चटका देत होता. मनातल्या विचारांना गप्प केलं आणि चालू लागलो. कऱ्हानदीवर देवाला अंघोळ घातली अन् पुन्हा माघारी आलो. जिथं चप्पल ठेवली होती तिथं आलो. माझी चप्पलही गायब होती. आता वाईट वाटू लागलं. आपण ज्याची चप्पल चोरली होती, त्याची खरीखुरी वेदना समजू लागली होती. लांबूनच खंडोबाच्या गडाकडं पाहत स्मित केलं. थोड्या वेळात खंडोबानी अद्दल घडवली होती. पायातली चप्पल तिथंच सोडली आणि अनवाणी पायानं घराकडं निघालो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com