निर्णयाचं अवघड वळण... (स्नेहल क्षत्रिय)

स्नेहल क्षत्रिय
रविवार, 17 जून 2018

‘नीतिशास्त्र’ हा लघुपट एका मुलीच्या महत्त्वपूर्ण निर्णयावर नेमकं भाष्य करतो. एकीकडं बलात्कारासारख्या घटनेतली दाहकता दाखवताना महिला सशक्तीकरणाचाही विषय हा लघुपट मांडतो आणि गुन्हा आणि नाती यांच्यातल्या फरकाविषयीही सांगतो. एक अवघड विषय नेमकेपणानं सांगणाऱ्या या लघुपटाविषयी...

तापसी पन्नू अभिनित ‘नीतिशास्त्र’ हा एक मिनिटांचा अगदी तर्कशुद्ध असा लघुपट आहे. बलात्कारासारख्या कृत्यावर चीड येऊन बदला घेण्याची तीव्र भावना उत्पन्न झालेल्या मुलीच्या एका महत्त्वपूर्ण निर्णयावर हा लघुपट सकस आणि नेमकं भाष्य करतो. दोन महत्त्वाचे संदेश पोचवण्याचं काम ही उत्तम कलाकृती करते. एक म्हणजे मुलींनी कोणत्याही परिस्थितीत स्वतःला वाचवण्यासाठी सशक्त होणं आणि दुसरं म्हणजे निकटवर्तीयांच्या नात्यात न अडकता चुकीच्या कृत्यांसाठी त्यांना खतपाणी न घालणं. 

एकीकडं देशात बलात्काराच्या घटना वाढत असताना, त्यावर गुन्हेगारांना शिक्षा व्हावी यासाठी तळमळत असलेला सर्वसामान्य नागरिक आणि त्याच वेळी गुन्हेगार केवळ आपला जवळचे असल्यानं त्यांना पाठीशी घालणारे काही लोक यांच्यातल्या संघर्षाचं नेमकं स्वरूप हा लघुपट स्पष्ट करतो. स्वतःच्या फायद्यासाठी एखादं कृत्य करताना गुन्ह्यात अडकल्यावर शिक्षा होऊ नये, यासाठी पैशांचा मोह दाखवण्यापासून ते ब्लॅकमेल करणं आणि न्यायव्यवस्था आपल्या हाती घेऊन स्वतःची सुटका करणारे विकृत लोक समाजात असंख्य प्रमाणात आहेत. थोडक्‍यात हे मोहाचं जाळं ज्यात एकमेकांवर एकमेकांच्या फायद्यासाठी अडकलेली प्रवृत्ती दिसून येते. या चुकीच्या प्रवृत्तीची वेल घराघरातूनही वाढत असते. ज्यानं अंतिमतः देशाचं नुकसान निश्‍चित असतं. योग्य आणि अयोग्य यांतला फरक न दिसण्याइतपत माणूस आंधळा होत जातो. माणुसकीचा संदेश देणारा धर्म बाजूला राहत समाजात अशांती माजते. नीतिशास्त्र इतकं धोक्‍यात आलेलं आहे का, हे स्वतःला जागरूक नागरिक म्हणून विचारणं प्रत्येकाचं प्रथम कर्तव्य आहे आणि ते का आहे याचं उत्तर हा लघुपट उत्तमरीत्या देतो.

दिल्लीस्थित रोशनी (तापसी पन्नू) ही एक व्यावसायिक ट्रेनर असून, ती मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देते. रोशनीचं कुटुंब म्हणजे ती, आई आणि तिचा लहान भाऊ रवी असे तिघे. जिथं आजही आपल्या सुशिक्षित समाजात मुलींनी सातच्या आत घरात येणं, तिला हवी तशी वस्त्रं परिधान करण्याचा हक्क नाकारणं, ओळखीच्या पुरुषांवर मदतीसाठी अवलंबून राहणं असले धडे दिले जातात, तिथं रोशनी मात्र अपवाद ठरत महिला सशक्तीकरणाच्या दिशेनं महत्त्वपूर्ण वाटचाल करताना दिसते. 

कपिल वर्मा दिग्दर्शित या लघुपटाची सुरवात अगदी नकारात्मक दृश्‍यानं होते आणि ही कथा आपल्याला फ्लॅशबॅकमध्ये घेऊन जाते. खरं तर कथानक हे बऱ्यापैकी अंदाज येण्याइतकं साधं असलं, तरीही यात एक वेगळेपण आहे, ते म्हणजे योग्य संदेश पोचवण्याच्या दृष्टीनं विविध प्रसंगांचा आधार घेत केलेली तर्कपूर्ण मांडणी. एका प्रसंगात रोशनी मुलींना विविध टेक्‍निक्‍स शिकवताना  दिसते- ज्यात ती अतिशय धीट भासते. तिच्या क्‍लासला येणाऱ्या मुलींच्या चेहऱ्यावर रोशनीविषयी विशेष आदरभाव असतो. तापसी पन्नूनं रोशनीची व्यक्तिरेखा अफलातून साकारली आहे. अनेक दर्जेदार चित्रपटातून कसदार अभिनय साकारल्यानंतर ‘पिंक’सारख्या चित्रपटांतून अन्यायाविरुद्ध लढण्याचं घेतलेलं बाळकडू आणि तिथून सुरू झालेला हा प्रवास या लघुपटातही कायम आणि विशेष प्रभावी असल्याचं जाणवतं. एकदा रात्रीच्या जेवणाच्या प्रसंगात रोशनी आणि तिची आई (सुकन्या धांडा) गप्पा मारताना दिसतात. त्यात रोशनीची आई तिच्या लग्नाविषयीची चिंता व्यक्त करते. ‘हे क्‍लासेस घेऊन काय करणार आहेस विशेष,’ असा सवालही करते. रोशनी थंड डोक्‍यानं न चिडता तिचं स्वप्न आईला बोलून दाखवते. तितक्‍यात तिचा भाऊ रवी (विकी अरोरा) येतो. हक्कानं रोशनीच्या वाटेची खीर तो मागतो, अन्‌ ती प्रेमानं त्याला देते तेव्हा त्या दोघांतल्या बहीणभावाचं गोड नातं अधोरेखित होतं. ती एक कडक शिस्तीची तरुणी असली, तरी वेळप्रसंगी भावाचे लाड करते अन्‌ गरज असल्यास त्याला समज देतानाही दिसते. 

एक प्रसंग रवी आणि त्याच्या मित्रांमध्ये असलेली मैत्री अधोरेखित करतो. मित्रांचे विचित्र हावभाव आणि वागणं पाहून तिला लक्षात येतं, की ही संगत तिच्या भावासाठी योग्य नाही. या प्रसंगातून एक गोष्ट काळजीपूर्वक ध्यानात घेण्यासारखी आहे- ती म्हणजे घरात एखाद्या व्यक्तीचं वागणं आणि बाहेरचं वागणं यांत फरक असूही शकतो. आपल्या नकळत एखाद्या जवळच्या व्यक्तीमध्ये चुकीच्या संगतीमुळं विकृती जन्माला येऊ शकते. विकी अरोरानं साकारलेली व्यक्तिरेखा बऱ्यापैकी सशक्त आहे. तारुण्यात पदार्पण करत असलेला रवी थोडा बालिश असल्याचं त्याच्या वागण्याबोलण्यातून जाणवत राहते. रोशनीला भगवद्‌गीता वाचण्याची विशेष आवड असून, कृष्णानं अर्जुनाला दिलेले संदेश आणि त्याबद्दल निर्माण झालेले काही प्रश्न ती आईला विचारते. तेव्हा आई तिला जे उत्तर देते त्यावरून तिच्या मनाचं समाधान झालेलं दिसत नाही. इतर बॉलिवूडच्या कथांचा एक विशिष्ट पॅटर्न हे कथानक फॉलो करत असलं, तरी त्याचा पाय मात्र रचला गेला आहे तो कृष्णानं अर्जुनाला दिलेल्या एका विशेष संदेशावर. त्यामुळंच हा सरळ-साधा वाटणारा लघुपट एका उंचीवर जातो.

कथानक अशाच लहानसहान प्रसंगाच्या आधारे पुढं सरकत असताना एकदा अचानक रोशनच्या गौरी (ऐश्वर्या सोनार) नावाच्या विद्यार्थिनीवर बलात्कार होतो. बलात्कार रवीनं केला असल्याचं समजल्यावर रोशनीच्या पायाखालची जमीन सरकते आणि इथून कथानक एका भयानक आणि हादरा देणाऱ्या वळणावर जाऊन पोचतं. रोशनीच्या मनात चीड निर्माण होते; पण इथं सगळ्यात महत्वाचा गुंता असतो. या सगळ्यात रोशनी अर्जुनाप्रमाणेच गुन्हेगार केवळ भाऊ आहे म्हणून मोहग्रस्त होत शस्त्र खाली ठेवते, की कृष्णानं अर्जुनाला दिलेला तो एक विशेष संदेश अंमलात आणते?...या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मिळवण्यासाठी ‘नीतिशास्त्र’ या व्याख्येभोवती गुंफलेला हा लघुपट आवर्जून बघावा. लघुपटातले संवाद अतिशय ताकदीचे असून, प्रत्येक कलाकाराचं अभिनयकौशल्य छान पद्धतीनं दिसतं. या सगळ्यात तापसी पन्नूचा अभिनय कौतुकापसाद आहे. व्यक्तिरेखा निवडण्याची आणि ती साकार करण्याची तिची जिद्द वाखाणण्याजोगी आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध होतं. प्रसंगानुरूप दिलेलं पार्श्वसंगीत एक खास वातावरण तयार करणारं असून, या लघुपटाला जोड मिळाली आहे ती एका जबरदस्त गीताची. हे गाणे ऐकताना अंगावर काटा आला नाही तर नवलच. 

'सप्तरंग'मधील लेख वापरण्यासाठी क्लिक करा

Web Title: nitishastra short film starring Taapsee Pannu