
अक्षय शेलार - shelar.abs@gmail.com
‘नोवोकेन’ हा चित्रपट वरकरणी परिचित सूत्रांवर आधारलेला वाटतो. एक साधी, फारशी लक्ष वेधून न घेणारी व्यक्ती अचानक हिंसेच्या वादळात फेकली जाते आणि तिथून पुढे अख्खा चित्रपट एक ‘वन मॅन शो’ म्हणून उभा राहतो. ‘नोबडी’ आणि ‘जॉन विक’ यांसारख्या चित्रपटांच्या धाटणीची, म्हणजेच एका व्यक्तीला केंद्रस्थानी ठेवून हिंसेचा अखंड महापूर उभा करणारी ही पद्धत गेल्या दशकापासून ठळकपणे दिसू लागली आहे. एकट्या व्यक्तीने अख्ख्या गँग्स, माफिया किंवा यंत्रणेविरुद्ध उभं राहणं हे आजच्या पॉप संस्कृतीत विशेष लोकप्रिय झालं आहे; पण ‘नोवोकेन’ या प्रकाराला एक वेगळा आयाम देतो. हिंसेच्या तमाशाला रोमांचकतेऐवजी काळ्या विनोदात रूपांतरित केले जाते.