ओडिशातील ‘बाली जात्रा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उत्सव

ओडिशातील ‘बाली जात्रा’

आग्नेय आशियातील भारतीय संस्कृतीबद्दल गेल्या काही लेखांतून आपण जाणून घेतलं. भारताच्या आग्नेय आशियातील देशांशी असलेल्या संपर्काशी संबंधित एक परंपरा ओडिशामध्ये निर्माण झाली. ही परंपरा म्हणजे कार्तिक पौर्णिमेला साजरी केली जाणारी ओडिशातील बाली जात्रा. येत्या आठ नोव्हेंबरला असलेल्या कार्तिक पौर्णिमेनिमित्त या बाली जात्रेबद्दल जाणून घेऊ या.

बाली जात्रा म्हणजे इंडोनेशियातील बाली बेटाकडे जाण्यासाठी प्राचीन काळी केली जाणारी समुद्रयात्रा. प्राचीन काळी इंडोनेशियातील जावा, सुमात्रा, बाली इत्यादी बेटांवर व्यापारानिमित्त जाणाऱ्या ओडिशातील व्यापाऱ्यांची आणि खलाश्यांची आठवण या बाली जात्रेच्या उत्सवाच्या रूपानं ओडिशामध्ये जपली गेली आहे. इंडोनेशियाकडे जहाजानं जाण्यासाठी व्यापारी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी प्रस्थान करत असत. हे व्यापारी सुखरूप घरी परत यावेत यासाठी त्यांच्या पत्नी, घरातील स्त्रिया त्या वेळी नदीत नावांच्या प्रतिकृती सोडत असत, असं ओडिशातील परंपरा सांगते.

बाली जात्रा हा ओडिशातील मोठा उत्सव आहे. हा उत्सव कार्तिक पौर्णिमेला कटक शहरातील महानदीच्या तीरावर साजरा केला जातो. कटक येथे दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवात पहिल्या दिवशी, म्हणजे कार्तिक पौर्णिमेला, ‘बोईता बंदना’ (म्हणजे ‘नाव-वंदन’) असते. ‘बोईता’ म्हणजे नाव. एक छोटी नाव तयार करून तीत फुलं आणि दिवा ठेवून ती कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी नदीत किंवा तलावात सोडली जाते.

पारंपरिकरीत्या केळीच्या झाडाच्या खोडापासून ही छोटी नाव तयार केली जात असे. आता कागद, कार्डबोर्ड वापरूनही या नावा तयार केल्या जातात आणि शंखांच्या, घंटांच्या निनादात त्या नदीत सोडल्या जातात. ‘आमचे कुटुंबीय समुद्रयात्रा करून सुखरूप घरी परत यावेत यासाठी आम्ही समुद्राला पान आणि सुपारी वाहत आहोत...’ अशी प्रार्थना या नावांच्या प्रतिकृती नदीत सोडताना केली जाते. ही ‘बोईता-बंदना’ आता केवळ एक परंपरा म्हणून केली जात असली तरी तीतून ओडिशातील प्राचीन काळात केल्या जाणाऱ्या समुद्री यात्रांची स्मृती जपली गेली आहे.

ओडिशाची राजधानी कटक येथून भुवनेश्वर येथे आल्यावर भुवनेश्वरमध्येदेखील बाली जात्रा साजरी केली जाऊ लागली. हा उत्सव साजरा केल्या जाणाऱ्या रस्त्यांवर किंवा नदीकाठच्या भागात उभारलेल्या कमानींवर नावेची प्रतिकृती केलेली असते. या उत्सवासाठी अनेक खाद्यपदार्थ, विविध वस्तू यांचे स्टॉल लागलेले असतात. या उत्सवादरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजिले जातात. कटक आणि भुवनेश्वर येथील या उत्सवाला आपल्याकडील गणेशोत्सवासारखी किंवा नवरात्रासारखी गर्दी होते.

या लेखमालेतील इंडोनेशियावरील लेखांतून आपण भारत आणि इंडोनेशियातील सांस्कृतिक आणि राजकीय संबंध यांबद्दल विस्तारानं बघितलं आहेच. त्यात आपण तेथील बाली बेटावरील हिंदू संस्कृतीच्या खुणा आजही कशा दिसून येतात हे पाहिलेलं आहे. याशिवाय, इंडोनेशियात काही ठिकाणी केल्या गेलेल्या उत्खननात प्राचीन काळातील भारतीय बनावटीच्या भांड्यांचे तुकडे सापडले आहेत. यावरूनही भारत आणि इंडोनेशियातील व्यापारीसंपर्क लक्षात येतो. अर्थात्, परंपरेनं ओडिशातील हा उत्सव केवळ बाली बेटाचं नाव टिकवून असला तरी भारताच्या पूर्व किनाऱ्यावरून इंडोनेशिया, व्हिएतनाम, कंबोडिया, थायलंड, चीन इत्यादी देशांमध्येही व्यापारानिमित्त भारतीय प्रवास करत होते.

पूर्व किनाऱ्यावरील बंदरं

ओडिशात प्राचीन काळी कलिंग नावाचं राज्य होतं. या राज्याच्या किनारी प्रदेशात तामलुक, बारूआ बंदर, कलिंगपटण इत्यादी महत्त्वाची बंदरं होती. ओडिशातील प्रसिद्ध चिल्का सरोवराच्या परिसरातदेखील नैसर्गिक बंदरं होती. काही मध्ययुगीन ग्रंथांतून उल्लेख केल्यानुसार, चिल्का सरोवराच्या परिसरातील बंदरांत इंडोनेशिया, मलेशिया, श्रीलंका, चीन इत्यादी देशांत जाणारी जहाजं उभी असत. चिल्का सरोवराच्या परिसरात केलेल्या पुरातत्त्वीय सर्वेक्षणात काही प्राचीन बंदरांचे अवशेष आढळून आले आहेत. या सरोवराच्या जवळ असलेल्या माणिकपटण या ठिकाणी एक महत्त्वाचं बंदर होतं.

ओडिशातील मध्ययुगात वापरल्या गेलेल्या काही बंदरांच्या ठिकाणी पुरातत्त्वीय सर्वेक्षण केल्यावर चिनी बनावटीच्या भांड्यांचे तुकडेदेखील सापडले आहेत. यावरून मध्ययुगातील भारत आणि चीन यांच्यादरम्यान असलेल्या व्यापाराची कल्पना येते. ओडिशातील विविध पुरातत्त्वीय स्थळांतून आणि प्राचीन, मध्ययुगीन बंदरांच्या ठिकाणी मिळालेल्या पुराव्यांवरून ओडिशातील किनाऱ्यावरून आशियातील विविध देशांशी व्यापार सुरू होता हे समजतं.

समुद्राची पातळी बदलणं, बंदरात गाळ भरणं, किनारपट्टीची झीज इत्यादी भौगोलिक बदलांमुळे ओडिशातील अनेक बंदरं लयाला गेली. ओडिशातील प्रसिद्ध अशा कोणार्क या ठिकाणीही बंदर होतं. समुद्रपातळी बदलल्यानं कोणार्क हे ठिकाण आता समुद्रकिनाऱ्यापासून काही किलोमीटर दूर आहे. चिल्का सरोवराच्या परिसरातील बंदरं गाळ भरल्यानं कालांतरानं वापरयोग्य राहिली नाहीत.

जलप्रवासाशी संबंधित काही जहाजांची शिल्पं भुवनेश्वरमधील मंदिरांच्या परिसरात आढळली होती. ती आता भुवनेश्वर येथील संग्रहालयात ठेवण्यात आली आहेत.

याशिवाय ओडिशातील रत्नगिरी येथे असलेल्या बौद्ध विहाराच्या परिसरात एक महत्त्वाचा पुरावा आढळतो. बौद्ध धर्मातील अवलोकितेश्वर आणि तारा या देवता व्यापाऱ्यांसाठी रक्षणकर्त्या देवता म्हणून महत्त्वाच्या होत्या. सिंह, हत्ती, चोर इत्यादींच्या हल्ल्यात किंवा इतर संकटांत व्यापारी सापडले तर या दोन देवता त्यांना संकटातून सोडवतील अशी व्यापाऱ्यांची धारणा होती. ओडिशातील रत्नगिरी येथे असलेल्या बौद्ध विहारातील परिसरात अशा आठ भयांपासून रक्षण करणाऱ्या तारा या बौद्ध स्त्रीदेवतेचं शिल्प आढळून आलं आहे.

या शिल्पात मध्यभागी हातात कमळ घेऊन उभी असलेली तारा ही देवता दाखवण्यात आली आहे. तिच्या डाव्या आणि उजव्या बाजूला छोटी शिल्पं आहेत. या शिल्पांतून ही तारा देवता कोणत्या प्रसंगी भक्तांचं रक्षण करते हे दाखवलेलं आहे. या शिल्पात देवतेच्या उजव्या बाजूला सगळ्यात खालच्या चौकोनात एक शिडाचं जहाजदेखील आहे. या जहाजाच्या शिल्पाचा अर्थ बुडणाऱ्या जहाजाला आणि त्यावरील प्रवाशांना तारा ही देवता वाचवते असा होतो.

विविध पुरातत्त्वीय आणि कलास्थापत्यातील पुरावे यांवरून भारत आणि आग्नेय आशियातील देशांतील संपर्क आणि सांस्कृतिक संबंध आपल्याला दिसून येतातच; मात्र, प्राचीन काळी बाली बेटाकडे जाणाऱ्या व्यापाऱ्यांच्या समुद्रयात्रेची स्मृती ‘बाली जात्रा’ या उत्सवाच्या रूपानं ओडिशामध्ये अजूनही जपली गेली आहे हे विशेष.

(सदराचे लेखक हे सांस्कृतिकवारसा-अभ्यासक आहेत.)