अपमानाचे हलाहल पचवणे शिका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अपमानाचे हलाहल पचवणे शिका

अपमानाचे हलाहल पचवणे शिका

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमिताभ बच्चन यांना त्यांच्या आवाजासाठी आकाशवाणीकडून चक्क नाकारण्यात आले होते. त्यांच्या उंचीचा उपहास केला होता. पण अमिताभने त्यावर कुठल्याच प्रकारे रिॲक्ट न होता स्वतःत बदल केले. नंतर तीच उंची अन् तोच आवाज घेऊन अमिताभ बॉलिवूडचे बादशाह झाले. त्यावेळी अपमान पचवून त्यांनी आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल केली नसती तर आजचा दिवस दिसणे कदापि शक्य नव्हते.

जगाने आपल्याला मान द्यावा, ही सुप्त इच्छा प्रत्येकाच्याच मनात असते. असा मानसन्मान मिळाला की, मन आनंदित होते. पण, खरेच प्रत्येक वेळी ही इच्छा पूर्ण होते का? तर नाही. कारण जग आपल्या इच्छेनुसार चालत नाही. आयुष्य जगत असताना मान-अपमानाचे प्रसंग सतत येतच असतात. यातून कुणीही सुटलेला नाही. ना राजा ना रंक. मानाची लालसा जर ठेवत असू तर अपमानालाही सामोरे जाण्याची आपली तयारी असायलाच पाहिजे. मान मिळाला, तर किती सांगू मी सांगू कुणाला अशी आनंदवस्था निर्माण होते. तर अपमान झाल्यास मन खट्टू होतं. निराश होतं. त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर आणि कार्यक्षमतेवर होतो. असे असले तरीही अपमान मनात ठेवून मिळालेल्या आयुष्याला न्याय द्यावाच लागतो. अपमानाचे विष पचवून आनंदरूपी अमृताची बरसात करणाऱ्याचीच वाटचाल नराचा नारायण होण्याच्या दिशेने होत असते.

हेही वाचा: कोल्हापूर-मुंबई विमानसेवा नव्या वर्षापासून दररोज

सामान्य माणसाजवळ ती प्रतिभा नसते जी असामान्य माणसाजवळ असते. सामान्य माणूस अपमान झाल्यास पटकन रिॲक्ट होतो. एकावर एक स्पष्टीकरण देत असतो. पण असामान्य माणूस? असामान्य माणूस मात्र स्थिर राहतो. त्याला राग येत नाही असे नाही, पण तो सारे मनात ठेवतो. परिस्थितीवर मात करीत, स्वतःत बदल करून एक दिवस यशस्वी होऊन दाखवतो. हे मिळालेले यश त्या अपमानाचे उत्तर असते. कधी काळी अपमान करणारे हे लोकंच, मग यशस्वी माणसासोबत आपले घनिष्ठ संबंध आहेत, हे जगाला दाखवीत असतात.

याबाबत दोन उदाहरणे नेहमी दिली जातात. अमिताभ बच्चन यांना त्यांच्या आवाजासाठी आकाशवाणीकडून चक्क नाकारण्यात आले होते. त्यांच्या उंचीचा उपहास केला होता. पण अमिताभने कुठलीही टीका न करता स्वतःत बदल केले. आज तीच उंची अन् तोच आवाज घेऊन अमिताभ बॉलिवूडचे बादशाह झाले आहेत. दुसरे उदाहरण म्हणजे रतन टाटांचे. टाटांनी जेव्हा इंडिका कार लॉन्च केली होती, त्यावेळेस या प्रोजेक्टमध्ये त्यांना खूप नुकसान सहन करावे लागले होते. नुकसान भरून निघावे म्हणून टाटांना कंपनी विकण्याचा सल्ला शेअर होल्डरने दिला. त्यानुसार टाटा अमेरिकेत फोर्ड मोटर कंपनीकडे जेव्हा हा प्रस्ताव घेऊन गेले तेव्हा मीटिंगमध्ये त्यांचा अपमान करण्यात आला. व्यवसायाचे कुठलेही ज्ञान नसताना एवढा पैसा इंडिकासाठी कसा काय गुंतवला? आम्ही तुझी ही कंपनी विकत घेऊन तुझ्यावर फार मोठे उपकार करीत आहोत, असा उपहास केला.

हेही वाचा: एसटी कामगारांचा कुटुंबीयांसह गेवराई तहसीलवर मोर्चा

या अपमानाने टाटा मनातून हादरले. मीटिंग अर्धवट सोडून भारतात परत आले. कार्यपद्धतीत बदल करून पुन्हा शून्यातून सगळे उभे केले. प्रोजेक्ट पुन्हा नफ्यात आणला. उत्तरोतर टाटांची मोटर कंपनी सतत नफ्यात यायला लागली. तिकडे अमेरिकेत फोर्डचे दिवाळे निघाले. आता आमची कंपनी विकत घ्या, असे प्रपोजल घेऊन विल फोर्ट भारतात आले. ज्या टाटांना व्यवसायाचे काहीही ज्ञान नाही असे म्हणून अपमानित करण्यात आले होते, त्याच टाटांनी आता फोर्ड कंपनी विकत घेतली होती. पण, विल फोर्ड अन् त्यांच्या सहकाऱ्यांचा अपमान न करता असामान्य माणसे अशी असतात. सारा अपमान पचवून आपल्यात बदल करतात. कार्यपद्धती बदलवतात. स्वतः वर विश्वास ठेवतात अन यशस्वी होऊन दाखवतात.

- नंदिनी वाकडे, नागपूर

loading image
go to top