

P. R. Daroz and Ceramic Art
esakal
हर्ष भटकळ
तुम्हाला मातीला समजून घ्यायचे असेल, तर तुम्हाला तिच्याशी एकरूप व्हायला हवं. तुम्हाला लवचीक व्हायला हवं, अन्यथा माती तुमचे गर्वहरण करील. असे सांगणारे पी. आर. दरोज बडोद्याच्या संस्थेत शिकण्यासाठी रुजू झाले, तिथे त्यांनी सिरॅमिकमध्ये विविध प्रयोग केले. त्यांनी भारतीय समकालीन कलेमध्ये सिरॅमिक्सचे स्थान बदलण्यास मदत केली.
पी. आर. दरोज यांनी जेव्हा मातीत हात घातला, तेव्हा भारतात फारच थोडे कलावंत सिरॅमिक्सचे कलात्मक रूप शोधत होते. आज त्यांच्या कलाकृती जगभर कौतुकास पात्र ठरल्या आहेत. त्यांचे सर्वांत महत्त्वाचे योगदान हे मातीतल्या माध्यमाला कलाविश्वात जे स्थान मिळवून दिले त्यात आहे.
आपण बहुतेक रोज मातीशी खेळतो. आपण चहा पितो तो चिनी मातीच्या कपमधून, आपण फुलदाणीत फुले मांडतो, आपण फरशीवर चालत असतो पण आपण त्यांच्याकडे कलाकृती म्हणून फारसे पाहत नाही. परंतु दरोज यांनी मात्र चिकण मातीकडे फक्त एक वस्तू म्हणून पाहिले नाही.
‘मातीत प्राण असतो,’ ते सहज म्हणतात. त्यानंतर ते जे सांगतात ते त्याहून बुचकळ्यात टाकणारे आहे. ‘तुम्हाला मातीला समजून घ्यायचे असेल तर तुम्हाला तिच्याशी एकरूप व्हायला हवं. तुम्हाला लवचीक व्हायला हवं, अन्यथा माती तुमचे गर्वहरण करील.’ आपल्या कलाकृतींच्या माध्यमाचे हे वर्णन अपूर्व आहे. बहुधा पेंटर आपल्या रंगांबद्दल चर्चा करतो, शिल्पकार आकाराबद्दल, दरोज नम्रतेविषयी. दरोज यांचा जन्म तेलंगणातील खेड्यात सोनाराच्या घरातला. त्यांच्या अवतीभोवती कलाकुसरीचे काम चालायचे. त्यांना कुमार वयातच त्यांची चित्रे रेखांकित करायला आणि रंगवायला आवडायचे. तेव्हाच्या तरुण कलाकारांप्रमाणे त्यांनाही आपण पेंटर किंवा शिल्पकार व्हावे असे वाटायचे. त्यांना जेव्हा शिष्यवृत्ती मिळाली, तेव्हा ते बडोद्याच्या फॅकल्टी ऑफ फाइन आर्ट्समध्ये गेले. तिथे ते सगळ्यात कमी लोकप्रिय अशा सिरॅमिक्स विभागात रुजू झाले. या निर्णयाने त्यांचे आयुष्य बदलले.