तबलजी ते संगीत मार्तंड; कुमार गंधर्वांच्या एका वाक्याने बदललं आयुष्य

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 18 August 2020

पंडित जसराज यांच्या आयुष्याला वयाच्या चौदाव्या वर्षी कलाटणी मिळाली. जसराज यांना १९४५ मध्ये लाहोरमध्ये आयोजित कार्यक्रमात कुमार गंधर्व यांना तबल्यावर साथ देत होते. 

मेवाती घराण्यातील संगीत मार्तंड पंडित जसराज यांचे न्यू जर्सीमध्ये अमेरिकेत निधन झाले. हरियाणातील हिसार जिल्ह्यातील पिली मांडोरी खेड्यामध्ये जन्मलेल्या पंडितजींनी बालवयातच संगीताचे धडे गिरवायला सुरुवात केली होती. जसराज यांचे वडील पंडित मोतीराम हेही शास्त्रीय गायक होते. वडिलांचे निधन झाले तेव्हा जसराज केवळ चार वर्षांचे होते. पुढे जसराज यांनी त्यांचे बंधू पंडित प्रताप नारायण यांच्यासोबत सूरसाधना केली. तरुणपणी हैदराबादेत वास्तव्यास असलेल्या पंडितजींनी गुजरातमधील साणंद येथे मेवाती घराण्याच्या तालमीमध्ये संगीत आराधना केली. तबल्यापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास हा पुढे सुरांपर्यंत पोचला. अनेकदा साणंदच्या राजदरबारामध्ये देखील पंडितजींच्या गायकीच्या मैफली रंगल्या.

कुमार गंधर्व संतापतात तेव्हा..
प्रारंभी पंडितजी शिकले ते तबला. पं. मणिरामजींना ते साथही करीत; परंतु तो काळ असा होता की, तेव्हा तबलजींना दुय्यम दर्जाची वागणूक दिली जात असे. वारंवार होणारी ती मानहानी सहन न होऊन वयाच्या चौदाव्या वर्षीच पंडितजींनी तबला त्यागला आणि शास्त्रीय गायनाची खडतर वाट अंगिकारली. जसराज यांना १९४५ मध्ये लाहोरमध्ये आयोजित कार्यक्रमात कुमार गंधर्व यांना तबल्यावर साथ देत होते. कार्यक्रमानंतर दुसऱ्या दिवशी कुमार गंधर्व यांनी जसराज यांची कानउघाडणी केली.‘जसराज तू फक्त मेलेले चामडे वाजवीत असतो. तुला रागदारी समजत नाही,’ असा टोमणा त्यांनी मारला. त्यानंतर जसराज यांनी तबला वादन कायमचे सोडले व ते गायकीकडे वळले.

पहाटे तीन वाजता रियाज
जसराज यांचे मोठे बंधू त्यांना शिकवायचे. आई पहाटे तीन वाजता रियाजसाठी हाक मारायची. डोळ्यावर प्रचंड झोप असतानाही रियाज करावा लागत असे. यातून सुटकेसाठी त्यांनी एक युक्ती लढवली. एकदा आईने हाक मारली तेव्हा घसा दुखत असल्याचे सांगितले. असे दुखणे रोजच होऊ लागले. ही युक्ती आईच्या लक्षात आली. तेव्हा आईने लहानग्या जसराजला तंबी दिली. आवाज कसाही असला तरी चालेल, पण रियाज करायचा. आता आपली डाळ शिजणार नाही, हे जसराज यांना कळून चुकले आणि पहाटे साडेतीन वाजता नियमित रियाज सुरू झाला.

हे वाचा - `तेवढा जसराजजींचा अहिर भैरव लाव रे`

अन हरिण धावत आले....
पंडित जसराज यांनी सांगितलेला एक किस्सा. एकदा ते ॲडमेंटन येथे गायन करत होते. तेव्हा अचानक पाठिमागून एक आवाज आला. पंडित जी अल्ला मेहरबान, गात राहा. त्यांनी गाणे म्हणण्यास सुरू केले. गायन सुरू करताच, ते तल्लिन होऊन गाऊ लागले. ते कोठे हरखून गेले समजले नाही. काही वेळाने ते शुद्धीवर आले. त्यानंतर त्यांनी पुन्हा गायनास सुरवात केली. तेव्हा त्यांनी पूर्ण गाणे गायले. एकदा ते बनारस येथील संकटमोचन मंदिरात राग तोडी म्हणत होते. अचानक तेथे हरिण आले. राग तोडी आणि हरिण यांचे नाते असल्याचे सांगितले जाते.

Edited By - Suraj Yadav


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pandit jasraj turning point with kumar gandharva