`तेवढा जसराजजींचा अहिर भैरव लाव रे`

Monday, 17 August 2020

शास्त्रीय संगीत, गायन कळत नाही, असे अनेकजण म्हणतात. पण अशा दिग्गज कलाकरांच्या मुखातून आलेले स्वर अजाणत्यांही रोखून धरतात. जसराज यांच्या जाण्याने हे स्वरांचे नाते निखळले. 

भीमसेन जोशी, किशोर आमोणकर, पंडित जसराज यांच्याशी आपले थेट नाते नसते. पण नात्यांहून अधिक काहीतरी अशा कलाकारांशी आपले बंध जोडलेले असतात. शास्त्रीय संगीत, गायन कळत नाही, असे अनेकजण म्हणतात. पण अशा दिग्गज कलाकरांच्या मुखातून आलेले स्वर अजाणत्यांही रोखून धरतात. जसराज यांच्या जाण्याने हे स्वरांचे नाते निखळले. 

आता चाळीशीत-पंचेशाळीत असलेल्यांना शास्त्रीय संगिताची गोडी ज्या नावांमुळे लागली असेल त्यात तिघांचा वाटा मोठा. याशिवाय कुमार गंधर्वांच्या वेगळ्या शैलीचे अप्रुप. जसराज यांचे गाणे नावाप्रमाणेच राजस होते. तेजःपुंज चेहरा, त्यात पांढऱ्या शुभ्र केसांचा झुपका मानेच्याही खाली आल्याने या  चेहऱ्याला त्याचे कोंदण लाभलेले. रेशमी धोतर, तसाच भडक कुर्ता, सोनसाखळी, हस्तीदंताचे लाॅकेट अशा ऐटबाज रुबाबत जसराज व्यासपीठावर येत.

`मंगलम् भगवान विष्णु मंगलम् गरुड़ ध्वज 
मंगलम् पुंडरीकाक्ष मंगलाय तनो हरी.. 

या श्लोकाने त्यांच्या प्रत्येक मैफिलीची सुरवात होई. पहिल्या श्लोकातच वातावरण एकदम बदलून जाई. जो राग गायचा आहे त्या रागात हा श्लोक सादर होई. त्यानंतर मग त्या रागाची चीज. अतिशय स्वच्छ व मधुर स्वर, तीनही सप्तकांत फिरणारा आवाज,  पल्लेदार आणि अवखळ अशा तानांनी तो राग श्रोत्यासमोर उभा राही. प्रसन्नता हा शब्द त्यांच्या गायनाला समर्पक शोभणारा.

हे वाचा - ख्यातनाम शास्त्रीय गायक पंडित जसराज यांचे निधन

मेवाती घराण्याचे असलेले जसराज सुरवातीला तबलावादक होते. ज्येष्ठ बंधू मणीराम यांना ते साथसंगत करत. एका मैफीलीत तबलावादक म्हणून त्यांचा अपमान झाला. त्यामुळे आता आपण गायकच व्हायचे, अशा जिद्दीने तबला सोडला आणि गायक झाले. त्यांच्याइतका मधुर आवाज असणारा शास्त्रीय संगीत गायक नव्हता. त्यांनी गायलेली भजने तर अलौकीक आनंद देऊन जाणारी. अहिरभैरव रागातील, मेरो अल्ला मेहेरबान, ही चीज ऐकावी तर जसराज यांच्याच आवाजात. जसराजांचे गाणे ऐकूण आपणच या मेहेरबानीत न्हाऊन निघालो आहोत, याचा प्रत्यत प्रत्येक सूरात यावा. म्हणूनच जसराज यांची प्रत्येक मैफल ही आनंदसोहळा असायची. हा सोहळा यापुढे व्यासपीठांवरून रंगणार नाही. पण त्यांच्या गाण्यांमधून  आपण केव्हाही या सोहळ्यात सहभागी होऊ शकतो.   

ओम नमो भगवते वासुदेवाय, मधुराकष्टकम, शिवतांडव स्तोत्र, शंकराचार्य़ांचे चिदानंद रुपम हे स्तोत्र ऐकले म्हणजे मंत्रमुग्ध होणे काय असते, हे समजून येते. आपल्या जीवनात आनंदाचे क्षण देणाऱ्या कलाकाराचे जाणे चटका लावणारे असते. पण लगेच लक्षात येते ही माणसे तर अमर आहेत. सध्याच्या जमान्यात त्यांचे गाणे आपण केव्हाही ऐकू शकतो, यासारखे दुसरे समाधान नाही. पंडित जसराज शरीराने आज आपल्यातून निघून गेले. गेली 60-65 वर्षे रसिक त्यांच्या स्वरांत चिंब न्हाऊन निघाले. तसेच यापुढेही न्हाऊन निघतील. मन सैरभैर झालयं, बरेच दिवस चांगल वाचलं नाही, चांगलं गाणं ऐकलं नाही तेव्हा सहज ओठांवर शब्द येतील `तेवढा जसराजजींचा अहिर भैरव लाव रे....`


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: blog on indian vocalist pandit jasraj by yogesh kute