औषध (डॉ. श्रुती पानसे)

औषध (डॉ. श्रुती पानसे)

वयात येणाऱ्या मुलांच्या आयुष्यात आव्हानंच आव्हानं असतात. कधी अपेक्षेपेक्षा कमी मार्क मिळतात, एखाद्या स्पर्धेमध्ये नंबर येत नाही. मित्राशी/ मैत्रिणींशी भांडण झालेलं असतं. डबा खाताना इतरांनी एकटं पाडलेलं असतं... अशा अनेक गोष्टी! मोठ्यांच्या दृष्टीनं या गोष्टी बिनमहत्त्वाच्या असल्या, तरी मुलांच्या विश्वात त्या महत्त्वाच्याच असतात. मुलांचा आत्मविश्वास, आत्मसन्मान कोणाकडून तुडवला गेला असेल आणि त्यामुळं मूल दु:खी असेल, तर इथं पालकांच्या आरडाओरडीची गरज नसते. आत्मविश्वास, आत्मसन्मान पुन्हा कसा मिळवायचा, या सल्ल्याची गरज असते. जखम भरून काढणाऱ्या हळुवार औषधाची गरज असते.

मुलं धड लहान नसतात आणि धड मोठीही झालेली नसतात, असंही एक वय असतं. मुलांनाही हे नक्की माहीत नसतं आणि आईबाबांनाही कळत नसतं; पण एक मात्र नक्की खरं, की मुलं मोठं होण्याच्या प्रयत्नात असतात. आपण मोठे झालो आहोत, असंच मुलं समजत असतं. मुलांच्या दृष्टीनं विचार केला तर वयाचं हे वळण अतिशय नैसर्गिक आणि तितकंच आवश्‍यक आहे. मुलांनी या वयात स्वतःला मोठं समजलं नाही, तर मोठं होण्यातली आवश्‍यक कौशल्यं कधी शिकणार? अचानक अठराव्या वर्षीच्या वाढदिवशी कोणी सज्ञान होत नसतं, ती प्रक्रिया आधीपासूनच चालू असते. आई-बाबांच्या दृष्टीनं मात्र मूल अजूनही लहानच असतं...त्यामुळे एकमेकांशी वागताना एकमेकांच्या चुका होतात. सहज साधं नेहमीसारखं वातावरण असतं. अचानक आवाज वाढतात आणि मूळ विषय हरवून बसतो. या हरवलेल्या विषयावर वेळच्या वेळी इलाज न झाल्यामुळे तो विषय तसाच दबला जातो. 

उदाहरण एक ः
‘‘अरे वा! आलास का शाळेतून? आत्ताच आलायंस ना? काय झालंय तोंड पाडून बसायला? दप्तर फेकलंय कोपऱ्यात, चपला टाकल्या आहेत..... आणि आल्याआल्या टीव्ही? सारखा टीव्ही लागतो का तुम्हाला?... ’’ अशाच प्रकारे आई त्याला काही ना काही बोलतच सुटते. तिच्या तोंडाचा पट्टा सहन न होऊन तो अक्षरश: किंचाळतो ः ‘‘आई... दोन मिनिटं, प्लीज.’’ 

घरात एकदम शांतता पसरते. आईला हे अजिबातच अपेक्षित नसतं. ती थक्क होते. दुखावली जाते. पण दुसऱ्या क्षणाला आईपण जागं होतं. आपलं मूल आपल्याच अंगावर उर्मटासारखं ओरडतंय हे तिला सहनच होत नाही. ‘‘हे काय? तू असं का बोललास? ही बोलण्याची कुठली पद्धत झाली? काय हा तुझा आवाज? मी असं काय बोलले तुला?....’’ आईचं बोलणं सुरूच होतं. ‘‘तुमच्यासाठी काहीही करा....मरा...’’, ‘‘आता बाबा आल्यावर...’’, ‘‘कोण ते तुझे मित्र....’’ इत्यादी विषयांकडे गाडी जाते.

एकदा.. फक्त एकदा मुलाच्या चेहऱ्याकडं थोडं थांबून पाहिलं असतं, तर ‘काहीतरी जबरदस्त बिनसलंय’  हे कोणत्याही आईला सहज कळलं असतं. 

आपण एकमेकांकडे पाहतच नाही. मनात काय चाललंय, इकडं लक्ष द्यावंसं आपल्याला वाटत नाही आणि कित्येकांना तर त्यासाठी वेळही नसतो. मात्र, निदान एखाद्या वागण्यामागं काय कारण आहे, हे एकदा तरी डोकावून पाहिलं पाहिजे. आपण हे करत नाही. आपल्या मनाचे निष्कर्ष काढून मोकळे होतो. हे एकदा नाही, अनेकदा घडतं. केवळ आई-बाबा आणि लहान मुलांच्या बाबतीत नाही. मोठ्या माणसांच्या परस्परांच्याही बाबतीत घडतं. 

खरं तर झालं होतं असं, की आठवीत आल्यापासून त्याचे वर्गशिक्षक बदलले होते. गेली दोन वर्षं गणितही तेच शिकवायचे. त्यांनी गणितसुद्धा इतकं खुलवून शिकवलं होतं, की गणिताची आवड निर्माण झाली होती. मार्क मिळायला लागले होते. पण आज पहिल्या परीक्षेचे मार्क कळले होते, ते पासापुरतेही नव्हते. तो आठवीतला मुलगा होता. मार्क मिळवायला हवेत, हे त्याचं त्याला कळत होतं; पण ते  मिळाले नाहीत. आपण गणितं सोडवली; पण ती साफ चुकली आहेत, हे त्याला पेपर हातात आला तेव्हा समजलं. मार्क न मिळणं ही गोष्ट त्याला भयंकर अपमानास्पद वाटत होती. मनाच्या आतून रडू फुटत होतं; पण रडणार कसं? रडणाऱ्या मुलाला सगळे हसतात, हे त्याला कळलेलं होतं. त्याचा अपमान, त्याचं अपयश सगळं तो पचवत होता. व्हॅनमध्येसुद्धा कोणाशी बोलला नाही. घरी आल्याआल्या आईला सगळं सांगावं. आईपाशी रडावं, असं त्याला वाटत होतं.

... पण रडणार कसं? आता तो ‘मोठा’ मुलगा झालाय ना!!!

शिवाय नापास झाला म्हणून आईला वाईट वाटणार. बाबा रागावणार. बहीण हसणार. क्‍लासचे सर चिडणार. मित्र आश्‍चर्य व्यक्त करणार... या सगळ्या प्रतिक्रिया त्याला दिसत होत्या. हे सगळं अटळच होतं, आलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्याचा तो प्रयत्न करत होता. त्यासाठी त्याला स्वत:चा वेळ हवा होता. 

हताश होऊन त्यानं चपला टाकल्या होत्या. दप्तर फेकलं होतं. टीव्ही चालू होता; पण त्याचं लक्ष टीव्हीकडं नव्हतं. आईला तोंड दाखवायची इच्छा नव्हती; पण आईच्या एकतर्फी शब्दांचा मारा सहन झाला नाही आणि अखेर या प्रसंगाची परिणती ही अशी झाली होती.

दुसरीकडं आईला त्याची ही प्रतिक्रिया अपेक्षितच नव्हती. ती त्याच्यावर जास्तच चिडली. रागावली. विषय भलतीकडंच गेला. बेशिस्त आणि उर्मट अशी दोन विशेषणं त्याला लावली गेली. शिवाय नापास झाला आहे, यावरून झालं ते वेगळंच!

एकमेकांना भेटल्यावर एकमेकांकडं बघा. बाहेरून आलेल्या किंवा घरात असलेल्या माणसाची मनस्थिती नॉर्मल आहे ना, हे एकदा बघितलं आणि त्याप्रमाणं वागलं तर बरेचसे प्रश्न निर्माणच होणार नाहीत. 

काहीतरी बिनसलंय हे लक्षात येईल तेव्हा आपलंच म्हणणं पुढं दामटवणं योग्य नाही. जरा थांबून अंदाज घ्यायला हवा. आपलं मूल उलटं बोलतं आहे. जोरजोरात ओरडतं आहे, उद्धट झालं आहे... हे प्रश्न हाताळायला तितकेसे सोपे नाहीत. आई-बाबांचं मन खूप दुखावतं; पण दुखावणाऱ्याला/ दुखावणारीला त्याची कित्येकदा कल्पनाही असते. अशा वागण्याला मेंदूतली नैसर्गिक प्रतिक्रिया ही रागच असते; पण आत्ता राग दाखवला तर गोष्टी हाताबाहेर जाण्याचीही सुरवात असू शकते. म्हणून त्या क्षणी आपल्या विचारप्रक्रियेला तात्काळ वळवण्याची गरज असते. राग वाटण्याऐवजी तिथं कमालीचा म्हणजे अतिशय कमालीचा थंडपणा यायला हवा. ‘आपणही रागाच्या वेगवान प्रवाहात वाहत जायचं नाहीये, तर पटकन काठावर येऊन थांबायचं आहे आणि जमलंच तर परिस्थिती सावरायची आहे,’ एवढंच ठरवलं तरी पुरेसं आहे.

वयात येऊ पाहणाऱ्या मुलांना सांभाळण्यासाठी आई-बाबा पुरेसे सक्षम असतात. याचं एकमेव कारण म्हणजे त्यांचं मुला-मुलींवर निरतिशय प्रेम असतं. मात्र, अशा स्फोटक वातावरणात हेच प्रेम, त्याच्या जोडीला बराचसा पेशन्स आणि पुरेपूर आत्मविश्वास दाखवायचा आहे हे मनापासून ठरवावं लागतं.

वयात येणाऱ्या मुलांचं आयुष्य तसं काही सोपं नसतं. तिथंही आव्हानंच आव्हानं असतात. या आव्हानांशी मुलामुलींचा रोजचा सामना असतो. कधी मुलांना अपेक्षेपेक्षा कमी मार्क मिळतात, त्यांचा एखाद्या स्पर्धेमध्ये नंबर येत नाही. मित्राशी/ मैत्रिणींशी भांडण झालेलं असतं. आपली सख्खी मैत्रीण दुसऱ्या मैत्रिणींना जाऊन मिळालेली असते. डबा खाताना इतरांनी एकटं पाडलेलं असतं. व्हॅनमध्ये बाचाबाची झालेली असते. आपलं कौतुक होण्याऐवजी दुसऱ्याचं खूपच कौतुक झालेलं असतं. शाळा सुटल्यावर मैदानात सहज लावलेल्या शर्यतीत हार पत्करावी लागून, ‘ठीक आहे’ असं म्हणून सोडून द्यावं, तर त्या मित्राची किंवा मैत्रिणीची खवचट, उद्दाम शेरेबाजी ऐकून घ्यावी लागते. 

मोठ्यांच्या दृष्टीनं या सगळ्या गोष्टी बिनमहत्त्वाच्या असल्या, तरी त्यांच्या विश्वात त्या मोठ्याच असतात. या वरकरणी छोट्या वाटणाऱ्या गोष्टींत त्यांचा आत्मविश्वास, मैत्री, मैत्रीचा पाया, आत्मसन्मान अशा कित्येक गोष्टी लपलेल्या असतात. आपल्या मुलांचा आत्मविश्वास, आत्मसन्मान कोणाकडून तुडवला गेला असेल आणि त्यामुळं मूल दु:खी असेल, तर इथं आपल्या आरडाओरडीची मुळीच गरज नसते. मनाची जखम अजून वाढवणारं एक धारदार शस्त्र आत्ता नकोच आहे! गेलेला आत्मविश्वास, आत्मसन्मान पुन्हा कसा मिळवायचा, या सल्ल्याची गरज असते. जखम भरून काढणाऱ्या हळुवार औषधाची गरज आहे. हे औषध झोंबणारं असलं तरी चालेल; पण मनाला शांत करण्याची जबरदस्त ताकद यात पाहिजे आणि आई-बाबांच्या शब्दात ती असतेच!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com