परीक्षेच्या दिवसांमध्ये पालकांची जबाबदारी

Exam
Exam

परवा ‘दै. सकाळ‘, अकोला र्फे आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहण्याचा योग आला. सुप्रसिद्ध आहार व डायबिटीज तज्ज्ञ डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी मुलांना निरोगी आरोग्यासाठी खूप चांगल्या टिप्स दिल्यात. याच वेळी परीक्षांच्या नियोजनात पालकांची नेमकी जबाबदारी कशी असावी याबाबतचा विचार मनात आला.

सध्या आणि आगामी काळ हा मुलांच्या परीक्षांचा काळ आहे. पाल्याच्या शिक्षणातील पालकांची जबाबदारी व परीक्षेच्या कालावधीतील पालकांची जबाबदारी ही टाळता येणारी बाब नाही. याचा अर्थ असा नव्हे की, हा तणावाचा काळ ठरावा. हा एक उत्साहाचा, सकारात्मक आणि आनंदाचं पासबुक यासोबतच यश मिळविण्यासाठी एक सुवर्णसंधी मिळवून देण्याचा कालावधी पाल्याला लाभला की पाल्याच्या उन्नतीचा मार्ग सोपा होतो.

आपण पालक म्हणून ज्यावेळी शेजारच्या मुलांशी स्पर्धा करायला लागतो तेव्हा कुठेतरी - काहीतरी गल्लत व्हायला सुरुवात होते. दहावी-बारावीतील मुलांचे पालक सध्या परीक्षेच्या काळात चेहर्‍यावरुन ओळखता येतात. पाल्याची परीक्षा हा काही तणाव घेण्याचा किंवा देण्याचा कालावधी नाहीच मुळी ! मानवाच्या मूलभूत गरजा अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, आत्मसन्मान याही गरजा आहेत. या सर्व मुलांच्या गरजा पालकच पूर्ण करतात. महत्त्वाचे प्रेम, आपुलकी या भावनिक गरजा सहजपणे पूर्ण करतात, परंतु कधी-कधी व्यावहारिक जीवनातील परिस्थितीची चीड, अपयश, वेळेचा अभाव, राग मुलावर काढतात, हे या परीेक्षेच्या दिवसांमध्ये टाळणे पाल्यासाठी आणि पालकांसाठी अतिउत्तम ! यातूनच मुलांच्या भावी आयुष्याला सुरेख कलाटणी मिळते हे नक्की.

परीक्षा म्हणजे भीती आणि यशासाठी सारखा ‘परीक्षा आहे, अभ्यास कर‘ हा तगादा लावणे व यामुळे मुले नीट वागतील ही पद्धत थोड्या काळासाठी पाल्यावर परिणाम करील पण लवकरच त्याचा परिणाम कमी होईल. भीती जर जास्त वेळ उपयोगात आणली तर तणाव निर्माण होईल, स्वास्थात बिघाड होईल, याला भीतीयुक्त प्रेरणा जरी आपण म्हणत असलो तरी परीक्षेच्या कालावधीत सर्वप्रथम पाल्यामध्ये आत्मविश्वास विकसित करून, प्रोत्साहन देऊन प्रेरणा देणे कधीही चांगले. यामुळे पाल्यामध्ये मानसिक सुरक्षिततेचे बळ वाढीस लागल्यास निश्चितच मदत होईल.

परीक्षेच्या कालावधीत येणारा पेपर कठीण राहील का? वेळ पुरेल का ? माझे परीक्षेच्या कलावधीत वाचायचे मुद्दे पूर्ण होतील का? आणि ते परीक्षेत पूर्ण आठवतील का ? असे अनेक प्रश्न पाल्यांच्या मनात निर्माण होत असतात. शेवटी ते मन आहे आणि मन ज्या विचारांना घट्ट धरुन ठेवतं, त्यांना अजिबात सोडत नाही, त्यासाठी योग-प्राणायाम किंवा अल्पकाळाचा ध्यानविधी महत्त्वाचा असतो. नकारात्मक विचारांतून मुक्त होण्यासाठीही ध्यान-धारणा उपयुक्त ठरते.

ध्यानविधीचा एखादा लहानसा प्रयोगही उपयुक्त ठरतो, त्यामुळे मनाचा चिडचिडेपणा तात्पुरता का होईना दूर होतो. ही बाब पालक व मुलांना पोषक वातावरण देते. घरातही मोकळे, पोषक व तणावविरहीत वातावरण राहाते. कारण मुलांना वाढवणे नव्हे तर मुलासोबत स्वतः वाढणे महत्त्वाचे आहे, ही बाब पालकांनी लक्षात घ्यायला हवी. सर्वसाधारणपणे पालक आपल्या अपेक्षांचे ओझे मुलांवर लादत असतात. तुला एवढेच मार्कस् मिळालेच पाहिजेत असे वारंवार पालूपद पाल्यासमोर वाजविले जाते. त्याचे नकळतपणे टेन्शन मुलांना येत असते. सर्वच मुलांना 90% गुण मिळतील असे होत नाही. त्यामुळे आपल्या शेजारच्या मुलाला किंवा एखाद्या नातेवाईकाला मागील वर्षी एवढे गुण मिळालेत म्हणजे तुलाही तेवढेच किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळालेच पाहिजेत असा अट्टाहास नको... कारण यामुळे नकळतपणे मुलांच्या मनावर दडपण येऊन त्याचा नकारात्मक परिणाम मुलांचा अभ्यास तडीस नेण्याच्या कृतीवर होत असतो. त्यामुळे सुसंवाद ठेवून त्याच्या मनावर दडपण कमी करणं खूप आवश्यक असतं.

परीक्षेच्या दिवसांमध्ये पालकांची सकारात्मकता आणि संवेदनशीलता ह्या दोन मोलाच्या गोष्टी ठरतात. पालक म्हणून आपण मुलांना प्रेमाने समजून घेणे आणि त्यांच्याशी समजून वागणे ही भावना खूप हृदयस्पर्शी व प्रेरणादायी ठरते. आताचे युग स्पर्धात्मक आहे, त्यासाठी काय सोयी-सुविधा पाहिजेत जेणे करुन स्पर्धेतील यशाचा मार्ग सोपा होईल, यासाठी आम्ही आई-वडिल म्हणून तुझ्या सोबतच आहोत असे उद्गार एक नवीन सकारात्मक उर्जा निर्माण करते. हे सांगत असतांना सध्याची स्पर्धा ही कृत्रिम स्पर्धा आहे, या स्पर्धेतील अपयश म्हणजे सगळं संपलं असे नव्हे हा एक आधाराचा भाव किंवा आधाराचा टेकू या कालावधीत महत्त्वाचा असतो. त्या हाडामासाच्या व्यक्तीचे राग, लोभ, प्रेम त्यांच्या व्यक्तिमत्वातून पाल्यांना मिळणारी प्रेरणा, पाठीवर पडणारी कौतुकाची थाप ह्या सार्‍या गोष्टी कालबाह्य झाल्या आहेत असे मानणारी एक पालकांची पिढी अनेक ठिकाणी वावरत आहे. मात्र आजच्या स्पर्धात्मक आणि वेगवान युगात मुलांच्या पालन पोषणाबरोबरच त्यांचा शारीरिक, मानसिक, भावनिक, बौध्दिक विकास घडवून त्यासाठी अनुकूल वातावरण व संधी निर्माण करणे आणि त्यासाठी सतत उत्तेजन देत राहणे, ही सुजाण पालकत्वाची देणं आपण निश्चितच पाल्यांना देऊ शकतो.

 यासाठी परीक्षेच्या कालावधीत आपल्या पाल्याची झोप योग्य प्रमाणात झालेली आहे का किंवा त्याने पुरेशा प्रमाणात झोप घेतली तर शारीरिक व मानसिक दृष्ट्या तो परीक्षेला सक्षमपणे, ताकदीने सामोरा जाऊ शकेल ह्या गोष्टींकडे पालकाने लक्ष देणे तेव्हढेच आवश्यक ठरते. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे परीक्षेच्या काळातील मुलांचा संतुलित आहार हा योग्य भूमिका निभावतो. जड नाश्ता वा जेवण हे झोपेला निमंत्रण देतं, त्यामुळे या पाल्याच्या वयानुसार आवश्यक, आवडता आणि उर्जा निर्माण करणारा आहार प्राधान्याने देणे योग्य ठरते. परीक्षेच्या कालावधीत ‘जंक फूड‘ पासून पाल्य दूर राहाणे हे त्याच्यासाठी लाभदायक ठरणारे असते.

परीक्षेच्या कालावधीत घरातील वातावरण शक्य तेवढे प्रसन्न राहाणे, मोकळे राहाणे, घरात वाद-विवाद होऊ नये याची काळजी घेणे, घरातली असणारी वर्दळ या कालावधीत कमी असणे हे घटक पाल्यासाठी यशाकडे नेण्यासाठी सहाय्यभूत ठरतात. याचा अर्थ असा नव्हे की घरात ‘कर्फ्यू‘ सारखे वातावरण असणे, याचाही पाल्याला ताण येऊ शकतो. घरात ‘ब्रिदींग स्पेस‘ राहाणं हे या काळातलं छोटसं आव्हान पालकांनी पेललं की सर्व काही सुरळीत व्हायला चालना मिळते. आई-वडिलांचा, भावंडाचा आपसात सुसंवाद हा परीक्षा कालावधीतील महत्त्वाचा श्वास ठरणारा एक अजून महत्त्वाचा घटक आहे.

परीक्षेच्या काळात ‘घाई‘ हा शब्द थोडासा दूर सारायला हवा. कारण घाई-घाईत परीक्षेसाठी निघायला पाल्याची सवय एखादी महत्त्वाची गोष्ट उदा. परीक्षेचे हॉलतिकीट, पेन-पेन्सिल विसरायला कारणीभूत तर ठरतेच यासोबतच परीक्षा केन्द्रावर जातांना अपघाताला निमंत्रणही देऊ शकते. जेवढ्या आत्मविश्वासाने आणि प्रसन्नतेने आपला पाल्य पेपर सोडवायला जाईल तेवढाच तो उत्तम यशाचा मानकरी व्हायला मदत होईल. पाल्य पेपर सोडवून बाहेर आल्यावर जर त्याच्या काही गोष्टी राहिल्या असतील वा चुकल्या असतील तर त्यावर त्याला जास्त विचार करु नये, पुढच्या पेपरसाठी ताकदीनं तयार करणे ही फार मोठी भूमिका आपली पालक या नात्यानं राहाते. कारण त्या गोष्टीचा पुढील पेपरवर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

     ‘I Fly in the sky, not to create record of it,
     I fly in the sky because I like to fly !’

गरुड पक्ष्याची ही विचारधारा आहे. मनुष्यानेही यासोबतच आपल्या पाल्याने परीक्षा हा आपल्यातील उत्तमता सिध्द करण्याची संधी आहे असे मानून आणि त्याला मी आवडीने सामोरे जाईल ही खूणगाठ बांधली तर ‘नो टेन्शन!‘

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com