पालकांनो, सावध ऐका पुढल्या हाका... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Parents

पालकांनो, सावध ऐका पुढल्या हाका...

स्वरा (नाव बदललेले आहे) ही महानगरात राहणारी नव्हती. तिच्या पालकांनी माझ्याशी संपर्क केला तेव्हा ती नववीत होती. तिच्या विचित्र वर्तनाचा पालकांना संशय येऊ लागला, तेव्हा त्यांनी सावधपणे पावलं टाकली. तिच्या दिनक्रमावर बारकाईने नजर ठेवली. तिला जाणीव करू न देता ते तिच्या प्रत्येक हालचालींचे निरीक्षण करू लागले. पालक सुस्थितीत असल्यामुळे त्यांनी स्वराला मोबाईल दिलेला होता. स्वरा सतत मोबाईलवर चॅटिंग करत असे.

हटकलं तर तेवढ्यापुरता मोबाईल बाजूला ठेवी. आई-बाबांचं लक्ष नाही असं पाहून ती पुन्हा मोबाईलमध्ये डोकावू लागे. तिच्या अभ्यासावरही एकूण विपरीत परिणाम होऊ लागला होता. पालकांशी ती अत्यंत तुटकपणे बोले. राही (नाव बदललेले आहे) ही तिची खास मैत्रीण. ती अचानक कधीही घरी येई. मग स्वरा आणि राही तासनतास स्वराच्या बंद खोलीत गप्पा मारत बसत. स्वराची आई नेहमी विचारायची, ‘‘का गं? तुमचा अभ्यास सुरू होता का? दरवाजा कशासाठी लावून घेता? उघडा ठेवा की दरवाजा... म्हणजे मलाही तुम्हाला काही हवं नको विचारता येईल...’’

त्यावर स्वराचं उत्तर असे, ‘‘आम्हाला थोडी तरी प्रायव्हसी दे की. मला माझी स्पेस मिळायला नको का? आम्ही आता लहान कुक्कुल बाळ आहोत का? आम्हाला आमच्या गप्पा मारू देत की! आम्हालाही आमचं लाईफ आहे... आणि तू माझी काळजी करू नकोस. मी माझी काळजी घ्यायला समर्थ आहे!’’

यावर स्वराची आई निरुत्तर होई. स्वराच्या आईचं म्हणणं असं की अगदी कोरोनाच्या आसपासपर्यंत स्वरा शाळेतलं, क्लासमधलं सगळं मोकळेपणाने घरी येऊन आईला सांगायची. बाबांपाशी ती मोजके बोलायची; पण आईपाशी ती छान खुलायची. आई आणि मुलीमध्ये खूप सुंदर संवाद होता, पण कोरोनाच्या काळात स्वराचं विश्व हळूहळू बदललं. ती मोबाईलच्या माध्यमातून मैत्रिणींच्या संपर्कात जास्त येऊ लागली. साहजिकच तिच्या घरातल्या वागणुकीत एक प्रकारचा तुटकपणा आला.

एके दिवशी राही अचानक दरवाजात उभी राहिली, तेव्हा तिचे डोळे रडून रडून सुजलेले होते. स्वराच्या आईने दार उघडलं, पण तिच्याकडे न बघता ती तडक स्वराच्या रूममध्ये गेली. स्वरा जणू तिची वाटच पाहत होती. स्वराने दरवाजा लावून घेतला आणि मग बराच वेळ आतमध्ये दोघींचं मोठमोठ्या आवाजात भांडण सुरू होतं. स्वराने तिला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण राही ऐकायला तयार नव्हती. ती स्वराला वाटेल ते बोलत होती. धमक्या देत होती. आई-बाबांना मी सगळं सांगेन असं म्हणू लागली. स्वराच्या आईला कळेना की, या क्षणी दरवाजा ठोठवून सोक्षमोक्ष लावावा की थोडा वेळ अजून थांबावं? स्वराच्या आईने बाबांना या घटनेची कल्पना दिली. दोघांनी थोडा वेळ थांबण्याचा निर्णय घेतला. ते लगेच रिॲक्ट झाले नाहीत. साधारण अर्ध्या तासाने सर्व शांत झालं.

राही स्वराच्या रूममधून बाहेर पडली आणि बाहेर हॉलमध्ये बसलेल्या स्वराच्या पालकांना हाय हॅलो न करताच निघूनही गेली! त्यानंतर स्वराने दरवाजा लावून घेतला. हे सगळं नेमकं काय घडलं? दोघींमध्ये बाचाबाची का झाली? राही स्वराला का धमकावत होती? हे पालकांना प्रश्न पडले. रात्री पाणी प्यायला म्हणून स्वरा बाहेर आली, तेव्हा आई-बाबा दोघेही जागेच होते. त्यांनी स्वराला प्रश्न विचारायला सुरुवात केली. स्वरा सुरुवातीला प्रश्न टाळू लागली. मग ती तिच्या रूममध्ये जाऊ लागली, तेव्हा बाबांनी सांगितलं, ‘‘स्वरा! प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते. तुमच्या दोघींचं जे काही भांडण झालं किंवा बोलणं झालं ते आम्हाला इत्थंभूत कळलं पाहिजे. आत्ताच्या आत्ता! त्याशिवाय तू झोपणार नाहीयेस आणि मी झोपणार नाही. तू काही सांगितलं नाहीस तर मी उद्या सकाळी राहीच्या पालकांकडे जाऊन त्यांनाच सर्व काही विचारेन...’’

राहीच्या पालकांचे नाव निघताच स्वरा भयंकर अवघडली. ‘‘तुम्ही असं काही करू नका,’’ असं तिनं बाबांना निक्षून सांगितलं आणि हळूहळू तिनं सर्व माहिती द्यायला सुरुवात केली. मध्यरात्रीपर्यंत स्वरा खूप काही बोलत होती. बोलताना रडत होती. तिच्या आईलाही अश्रू अनावर होत होते. दोघांनाही तो आश्चर्याचा धक्का होता. पालक म्हणून आपण चुकलो की काय, असा प्रश्न दोघांनाही पडला. त्यांना स्वराचा रागही येत होता आणि दयाही येत होती... स्वराने कबूल केलेली पार्श्वभूमी अशी होती...

राहीला एक बॉयफ्रेंड होता, जो दहावीचा विद्यार्थी होता. राहीची आई एक गृहिणी होती, त्यामुळे ती घरीच असे. त्यामुळे राही बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी गुपचूप बाहेर जाई. आणि घरी मात्र सांगे की, ती स्वराकडे अभ्यासाला जातेय.

स्वराच्या शाळेत आणि क्लासमध्ये बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड असणं हे खूपच सर्रास होतं. बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड नसणारेही विद्यार्थी-विद्यार्थिनी अनेक होते; पण एखाद्याला किंवा एखादीला बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड असण्यात कोणालाच काही वावगं वाटत नव्हतं. राहीचं आणि तिच्या बॉयफ्रेंडचं ब्रेकअप झालं. ब्रेकअप होणं, हेही खूप कॉमन होतं. राहीशी झालेल्या ब्रेकअपनंतर तो बॉयफ्रेंड मुद्दाम स्वराशी बोलू लागला. शाळेत किंवा क्लासमध्ये स्वराला भेटण्याचा प्रयत्न करू लागला. स्वरा त्याला सुरुवातीला टाळायची. राहीच्या समोर तिला अवघडायला व्हायचं. पण राहीच्या अपरोक्ष ती दोन-तीनदा त्याच्याबरोबर कॉफी प्यायला गेली, जे राहीला समजलं. स्वरा आणि आपल्या एक्समध्ये रिलेशन तयार होतं आहे, असं वाटल्यामुळे राही चिडली आणि घरी येऊन भांडली...

स्वराचे आई-बाबा त्या मध्यरात्री समूळ हादरले होते. पालक म्हणून, कुटुंब म्हणून आपण कुठे कमी पडलो का? याचा ते विचार करत होते. स्वराची आई नोकरी करायची. त्यामुळे आपल्या दुर्लक्षामुळे तर हे सर्व झालं नाही ना, असं तिला वाटू लागलं. मग बाबा तिची समजूत काढत म्हणाले, ‘‘अगं, राहीची आई गृहिणी आहे... राहीच्या बाबतीत हे घडलं, म्हणजे ते कुठेही घडू शकतं. राही ही हुशार आणि गुणी विद्यार्थिनी आहे म्हणून आपण स्वराला तिच्याबरोबर मैत्री करू दिली, जोपासू दिली.

राहीबद्दल आपल्याला जराही संशय आला नाही... या वयात मुलं आपल्यापासून खूप लपवालपवी करतात... तू एक लक्षात ठेव! आता स्वरा जे सांगते आहे, ते संपूर्ण सत्य नसूही शकेल. कारण ती आपल्या प्रतिसादाचा आता अंदाज घेते आहे. अनेक गोष्टी तिने सांगितलेल्या नसतीलही; पण आपण हळूहळू त्या गोष्टी तिच्याकडून काढून घेऊ. मात्र तिला धीर द्यावा लागेल. तू या क्षणी तिला ओरडू किंवा रागावू नकोस. तिला धीर दे. मग ती मोकळी होईल.’’

स्वराच्या आईला हा सल्ला पचवणं खूपच जड गेलं. पोटची मुलगी जेव्हा विचित्र वागू लागते, वाह्यात वागू लागते, तेव्हा शिस्तीचा बडगा उगारावाच लागतो, असं तिचं मत होतं. पण बाबा सांगत होते, की संयमाने घे! मग स्वराच्या आईने संयमाने घेण्याचा निर्णय घेतला.

स्वराच्या आणि तिच्या पालकांच्या आयुष्यात घडलेल्या उलथापालथींची ही गोष्ट आहे. स्वराच्या पालकांनी वेळीच सावध होऊन पावलं उचलली. त्यामुळे पुढचा अनर्थ टळला; पण पालक बेसावध असतील तर मुलांचं पुढे काय होईल, हे सांगता येत नाही. म्हणून ही व्यथा कुण्या एका पालकाची नाही. मला भेटलेल्या, माझ्याशी संपर्कात आलेल्या अनेक पालकांच्या आयुष्यात या समस्येने उलथापालथ घडवून आणली आहे. अनेक रात्री त्यांना झोप लागलेली नाही, इतकं या समस्येचं स्वरूप गंभीर आहे... (पूर्वार्ध)