- दिलीप कुंभोजकर, kumbhojkar.dilip@gmail.com
कवी नामदेव धोंडो महानोर ऊर्फ ना. धों. म्हटले की असे म्हणतात, शेतीत शब्द पेरून कवितांचे पीक घेणारा 'रानकवी' ! अजंठा लेणी शेजारील ‘पळसखेड’ हे दीड दोन हजार वस्तीचे छोटे खेडेगाव, कशीबशी, मोडकी तोडकी उभी असलेली एक प्राथमिक शाळा (हा काळ १९४८ च्या सुमाराचा आहे.) त्यांचे चौथीपर्यंतचे शिक्षण तिथे झाले, नंतर जवळच असलेल्या शेंदुर्णी गावात माध्यमिक शिक्षण घेत मॅट्रिक झाले आणि जळगावच्या मूळजी जेठा महाविद्यालयात कला शाखेत प्रवेश घेतला.
परंतु आर्थिक विवंचनेमुळे एका वर्षात त्यांनी शिक्षण सोडले आणि शेती करायला ते आपल्या गावी हजर झाले. जन्मजात प्रतिभा हे बीज आहे हे कुठल्याही शेतात पेरले, तरी ते वर येऊन बहरणारच ! ना. धों. महानोर यांचे असेच झाले. दैवी काव्य शक्तीचा हा कवी सभोवतालच्या परिस्थितीच्या संस्कारात असा तावून सुलाखून (आत्ताच्या भाषेत Adversity Quotient) वर आला, की पुण्या-मुंबईच्या नामवंत साहित्यिकांना यांची नोंद घेत पळसखेडला भेट द्यावी लागली.
प्रा. विजया राजाध्यक्ष, रामदास भटकळ, जब्बार पटेल, विंदा करंदीकर इत्यादी अनेकांनी रान तुडवत ना. धों. यांच्या ‘झोपडी’चा अनुभव घेतला आहे. ना. धो. ह्यांच्या कवितेत ‘निसर्ग’ आहे पण तो बालकवी, गोविंदाग्रज, केशवसुत वगैरेंच्या पेक्षा वेगळा आहे. त्यांच्या कवितेतील निसर्गाशी ते खेळले आहेत, ते अनुभवलेले आहेत.
व्यवसायच शेती असल्याने पावसाचा लहरीपणा, वादळ-वाऱ्याचा उन्माद आणि त्याचा शेतीवर झालेला परिणाम चाखलेला आहे. यातून वर आलेल्या ज्वारीच्या कणसाचा आनंद उपभोगला आहे. म्हणून त्यांची निसर्ग कविता वेगळी आहे. ती ‘रानकवी ना. धों. यांची आहे.’ सर्वसाधारण रसिकाला ‘मी रात टाकली’; ‘जांभूळ पिकल्या झाडाखाली’; ‘नभ उतरू आलं ’ अशीच गाणी लिहिणारा रानकवी, ही महानोरांची ओळख अधिक जवळची आहे.
कवितेसाठी ना. धों. यांचेकडे कष्टाचे आणि खडतर आयुष्याचे संचित होते. त्यामुळे त्यांची कविता भावते. लतादीदी , आशाताई आणि उषाजी मंगेशकर भगिनींचा स्वर त्यांच्या गाण्याला मिळाला. शान्ता शेळके, सुरेश भटांनंतर मंगेशकर कुटुंबात मुक्त प्रवेश असलेले दोनच कवी - एक ग्रेस आणि दुसरे महानोर. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
उदाहरणार्थ, १९९१ मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्कार, १९८५ मध्ये महाराष्ट्र सरकारचा ‘कृषिभूषण’ पुरस्कार, २००९ मध्ये कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा मानाचा ‘जनस्थान’ पुरस्कार, ‘पानझड’ काव्यसंग्रहास २००९ मध्ये ‘साहित्य अकादमी’ पुरस्कार, २०१२ मध्ये महाराष्ट्र सरकारचा ‘विंदा करंदीकर जीवनगौरव’ पुरस्कार !
त्यांची साहित्यिक, कलावंत म्हणून दोन वेळा विधान परिषदेत नियुक्ती झाली होती. जलसंधारण, ठिबक सिंचन, पाणी व्यवस्थापन वगैरे अनेक विषयांवर त्यांनी अभ्यासपूर्वक ठराव मांडले व ते संमतही झाले. विधान परिषदेतील त्यांची भाषणे काळजाचा ठाव घेणारी असत कारण ती त्यांच्या अंतःकरणातून आलेली असत, वास्तवातून तावूनसुलाखून बाहेर पडलेली असत.
शेतकऱ्यांना नक्की काय हवे आहे ते त्यांना पक्के ठाऊक होते. नांगरणी, पेरणी, लावणी हा कर्मयोग झाला तर कोणते बियाणे कोठून घ्यायचे, कसे लावायचे, कुठे लावायचे हा झाला ज्ञानयोग ! तर आलेले धान्य हे माझ्या कुटुंबाचे वर्षभराचे जीवन आहे, परमेश्वरास आळवणी आहे, की तुझे माझ्यावर उपकार होऊ द्या, पीक भरपूर येऊ द्या... हा झाला भक्तियोग ! हे गीतारहस्य ना. धों. यांना जन्मजात माहीत असावे... म्हणून ते लिहितात -
ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे,
आणि ह्या मातीतुनी चैतन्य गावे
कोणती पुण्ये अशी येती फळाला,
जोन्धाल्याला चांदणे
लखडून जावे ॥१॥
शेतकऱ्यांना काय पाहिजे ? बी-बियाणे, खत-खतें, शेतीची अवजारे, बैल-जोडी; हे विकत घेण्यासाठी पाहिजेत पैसे... कर्ज ! पण हे सर्व पाऊस पाण्याशिवाय व्यर्थ आहे. गावाकडच्या शाळेत मास्तरांनी प्रश्न केला : २७ - ९ = ० कसे ? ना. धो. सारखा हुशार मुलगा उत्तरला, ‘२७ नक्षत्रांतून पावसाची नऊ नक्षत्र कोरडी गेली तर शून्यच उरते.’ म्हणून ना. धों. आपले मागणे देवाकडे मागतात... ! त्यांना माहीत आहे, की हे केवळ निसर्गदेवच देऊ शकतो. या ठिकाणी कवीची निसर्ग देवावरील श्रद्धा दिसते.
शेतात सापडलेल्या ‘जानकी’चे स्वयंवर साक्षात ‘प्रभु रामचंद्र’ यांचे बरोबर झाल्यावर आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगूळकर लिहीतात, ‘आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे - स्वयंवर झाले सीतेचे.’ दोन श्रेष्ठ कवींची श्रद्धा आणि भावना एकच आहे. आकाश आणि जमीन यांच्या मधला दुवा मानव आहे. या मानवाने पूर्वांपार सूर्य-चंद्राशी नाते जोडलेले आहे, देव मानले आहे, चंदामामा मानले आहे.
या नभाने या ग्रीष्म ॠतूने करपलेल्या भुईला काय द्यावे तर पाऊस द्यावा, पाणी देऊन शांत करावे ! मग या मातीपासून मृद्गंध पसरेल, चैतन्य उगवेल. या पुण्य कर्मातून जोंधळा, ज्वारीचे पीक येईल, जणू आकाशातल्या ग्रह, तारे, चांदण्यांनी ते कणीस भरून आले आहे. लखडून आले आहे. लखपती, लखलखणे, लखलखाट, लखलखीत हे परिचयाचे शब्द आठवले की ‘लखडून’ शब्दाचा अर्थ उलगडतो.
ही कवीची निर्मिती आहे. कोवळ्या ज्वारीचे कणीस ज्यांनी हुरडा म्हणून लिंबू-मीठ लावून, चोळून, दाणे मोकळे करीत गुळाच्या खड्या बरोबर खाल्ले असेल, त्यांना कवीचे भाव सहज समजतील. मातीतून नुसती ज्वारी नाहीतर बाजरी, केळी, कपाशीचे पीक पण खान्देशी महानोर घेतात. हे पीक म्हणजे नवनिर्मिती आहे. हे नवजीवन आहे. सत्कृत्य केले की पुण्य होते. प्रामाणिकपणे काम केले की फळ मिळतेच. हा कर्माचा सिद्धांत आहे.
ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे
आणि माझ्या पापणीला पूर यावे
पाहता ऋतुगंध कांती सांडलेली
पाखरांशी खेळ मी मांडून गावे ॥२॥
शेतकरी जेव्हा वैशाख वणव्यात जमिनीला लागलेली तहान अनुभवतो, दुभंगलेली जमीन पाहतो, तेव्हा त्या जमिनीला पडलेल्या भेगा त्याचे अंतःकरण कापत असतात, चिरत असतात, वेदनामय असतात. फक्त नदी, नाले, विहिरींचे पाणी आटलेले नसते, तर डोळ्यातील पाणीही संपलेले असते. दु:खाश्रू गाळायलाही डोळ्यात पाणी नसते म्हणून - ‘ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे आणि माझ्या पापणीला पूर यावे.’
शेतकरी जीवनाच्या पराकोटीच्या भावनांचा हा अत्युच्च आविष्कार आहे. पावसाने ओढ दिल्यानंतर काळा ढगही दिलासा देतो. पाऊस पडल्यानंतरची भावना कवीने एका ओळीत शब्दबद्ध केली आहे. त्याच्या चेहऱ्यावरील समाधान हे या शब्दचित्राने रेखाटले आहे. पावसाच्या शिडकाव्याने सुटलेल्या मृद्गंधाला, मातीच्या वासाला 'ऋतुगंध' म्हणत किती समर्पक शब्दरचना गुंफली आहे बघा.
ग्रीष्माचा पुष्पभार सुकला आहे, तोच वादळवारा सुटला, नभ मेघांनी आक्रमिले, जणू वारा आणि ढग यांनी हातमिळवणी केली आहे. वसंतातला बहर, कावळ्या-चिमण्यांचा किलबिलाट, बुलबुलाचा आर्तव स्वर, पोपटांचा कर्कश आवाज, कोकिळाचा पंचम ही प्रणय गीते तर नाहीत? हे सर्व अनुभवत असताना काळे ढग आले. पक्षी निवारा शोधू लागतात. पक्षिणी गर्भवती झाल्या. घरे बांधून अंडी घालण्याच्या तयारीला लागल्या. शेतकरी तर आनंदला आहेच पण ह्या निसर्ग चक्रासोबत खेळताना सहज आनंदाचे गीत गात आहे, गुणगुणत आहे...
गुंतलेले प्राण ह्या रानात माझे
फाटकी ही झोपडी काळीज माझे
मी असा आनंदुनी बेहोष होता
शब्दगंधे, तू मला बाहुत घ्यावे!
शेतकऱ्यांची शेतीच्या कामातील समरसता येथे अनुभवास येते. येथे नुसते पीकपाणी घेणे व वर्षभराची तजवीज करणे हा व्यवहार नसून या रानात, शेतीत त्याचे प्राण गुंतला आहे, जीव अडकला आहे. तो शेत जमिनीला काळी आई मानतो आहे. ती त्याची माउली आहे.
वयाच्या सतराव्या वर्षापासून दिवसभर उन्हातान्हात शेतीची कामे करून रात्री शेतीतील छोट्या झोपडीत पुस्तकांचे वाचन करणे, लिखाण करणे हा कवी ना. धों. यांचा दिनक्रम होता. आनंदी माणसाला जगात सर्वत्र आनंदच दिसतो आणि आपले कवी तर आनंदाचे पीक घेणारे शेतकरी होत. आपल्या मातीवर, शेतीवर, शेतीतल्या झोपडीवर काय प्रेम आहे पाहा... रानात ''प्राण'' आहे आणि झोपडीत 'काळीज' आहे.
या वेळी कवी म्हणतो, या आनंदात मी स्वतःला विसरलो आहे, मी 'बेहोश' आहे. माझ्यावर एक काव्य धुंदी चढली आहे. या वेळी, शब्दगंधे, बुद्धीच्या देवतेने मला बाहूत घ्यावे. आपल्या हाताने मला मिठीत घ्यावे म्हणजेच समरस होणे, विरघळणे. दुधात साखर विरघळ्यानंतर ती वेगळी करता येत नाही. तापलेल्या जमिनीवर पडलेला पावसाचा थेंब वेचता येत नाही. तो मृद्गंध अडवता येत नाही. तशीच प्रिय कवी, रानकवी महानोर यांची ही कविता विसरता येत नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.