#DecodingElections : हिंदी 'हार्टलँड'चा भाजपला हादरा

शैलेश पांडे
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

मध्य प्रदेश आणि छत्तीसगड मिळून पूर्वी एकच राज्य होते. पण, त्या दोन प्रदेशांचा स्वभाव वेगवेगळा असल्याचे यावेळी दिसले. गेली पंधरा वर्षे दोन्हीकडे भाजपची सत्ता. छत्तीसगडमध्ये निर्णायक परिवर्तन दिसते आहे आणि ते राज्य काँग्रेसच्या वाट्याला जाणार हे स्पष्ट आहे. तसे मध्य प्रदेशात झालेले दिसत नाही. अगदी सुरवातीपासून मध्य प्रदेशात भाजप आणि काँग्रेस यांच्यात चुरशीची लढत होती. जोगी आणि मायावतींच्या युतीने छत्तीसगडमध्ये तिसरा पर्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यात या युतीला यश आले नाही. मात्र, मध्य प्रदेशात मायावती किंगमेकर ठरतील, असे दिसते आहे. तशी तयारीही त्यांनी सुरू केली आहे.

गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांचा जो करिष्मा होता, त्या खालोखाल "जादूगार' अशी प्रतिमा मध्य प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी निर्माण केली होती. लाडली लक्ष्मी, कन्या दान, जननी सुरक्षा अशा अनेक योजना चौहानांनी महिला व गरिबांना केंद्रस्थानी ठेवून सुरू केल्या. गेल्या निवडणुकीत त्यांचा भाजपला लाभही झाला. एक्‍झिट पोलमध्ये काँग्रेसची सरशी होताना दिसली तेव्हा "मीच मध्य प्रदेशचा सर्वांत मोठा सर्वेक्षक आहे आणि मलाच या राज्याची नाडी कळते', असे वक्तव्य चौहानांनी केले होते.

काँग्रेसने निर्माण केलेल्या तुल्यबळ आव्हानाने गेल्या पंधरा वर्षांच्या चौहानांच्या राजवटीवर लोक खूप असमाधानी नसले तरी पूर्णतः भाजपच्या बाजूने नव्हते हे दाखवून दिले आहे. याशिवाय, कॉंग्रेसने भाजपच्या बरोबरीने वाढवलेली मतांची टक्केवारी (सुमारे 41 टक्के) भाजपला चिंतेत टाकणारी आहे. प्रदेशाध्यक्ष असलेले काँग्रेसचे मातब्बर नेते कमलनाथ आणि ज्योतिरादित्य शिंदे यांनी अंतर्गत मतभेद बाजूला ठेवून भाजपपुढे आव्हान उभे केले, हेही या निवडणुकीने दाखवले.

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे एका बाजूला राजस्थान, दुसऱ्या बाजूला छत्तीसगड आणि मध्यभागी मध्य प्रदेश अशा तीन राज्यांचा कॅनव्हॉस "हिंदी हार्टलँड' म्हणून समोर ठेवला तर भाजप मोठ्या प्रमाणात माघारल्याचे दिसते. हिंदीभाषक पट्ट्यातील भाजपच्या पारंपरिक मतदारांनी काही प्रमाणात यावेळी कॉंग्रेसला हात दिला हे भाजपसाठी धोक्‍याचे चिन्ह आहे. मात्र, छत्तीसगडमध्ये प्रस्थापितविरोधी लाट जशी निर्णायक स्वरुपात कॉंग्रेसला फायद्याची ठरली, तशी ती मध्य प्रदेशात ठरलेली दिसत नाही, हेही यासंदर्भात लक्षात घेतले पाहिजे. त्याचे श्रेय द्यायचेच असेल तर ते शिवराजसिंह चौहान यांनाच द्यावे लागेल. कॉंग्रेसच्या खिळखिळ्या झालेल्या संघटनेत मध्य प्रदेशातील निकालांनी प्राण फुंकले आहेत.

उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांच्या मध्यभागी हा प्रदेश आहे. इथल्या राजकीय हालचालींचा परिणाम उत्तरेत जाणवतो आणि तसा तो महाराष्ट्रातही काही प्रमाणात जाणवतो. विशेषतः मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या दोन्ही राज्यांचे विदर्भाशी असलेले शेजाराचे नाते लक्षात घेतले तर 2014 सालच्या निवडणुकीत भाजपला भरघोस साथ देणाऱ्या विदर्भातही कॉंग्रेसला उर्जितावस्था देऊ शकण्याची ताकद असलेला हा निकाल आहे. 

Web Title: Political Article Hindi Hart Land BJP