स्त्रीत्वाचा शत्रू- पॉलिसिस्टक ओव्हरीयन सिंड्रोम

policystic.
policystic.

ऋतुरंगांना विळखा घालून
स्त्रीत्वाचा आनंद हिरावून
पी.सी.ओ.एस. बसलाय ठाण मांडून!

प्रिय,
चला समजून घेऊया पी.सी.ओ.एस. आहे काय?
स्त्री आयुष्याचं पहिलं वळण- पौगंडावस्था
वजन वाढतंय
मासिकपाळी अनियमित होतेय
तारुण्यपीटिकांचा त्रास होतोय
शरीरावरच्या केसांचं प्रमाण वाढतंय
कांही ठिकाणी त्वचा काळवंडतेय
चिडचिड होतेय! नैराश्‍य येतेय!
दुसरं वळण- प्रजननशील अवस्था
त्रास तेच! विकार तेच!
त्यात भर पडली वंध्यत्वाची
हॉर्मोन्सच्या असंतुलनाची
जोखमीच्या गर्भारपणाची
ताण-तणावानं गोंधळायला झालंय!
तिसरं वळण- प्रौढावस्था
त्रास तेच! तीच लक्षणं
वेगवेगळ्या आजारांना आमंत्रण
मधुमेह, रक्तदाब, हृदयाचे विकार
तसेच गर्भाशयाचा कॅन्सर
जोखीम वरचेवर वाढतेय!
असा हा त्रास! असा हा आजार!
अनया फेरतपासणीस आली होती. तिच्यासोबत तिची मैत्रीण सौम्या होती. अनया म्हणाली, डॉक्‍टर ही माझी मैत्रीण सौम्या. तिला PCOS आहे. मला हसू आले. आजकाल ही इंटरनेटची पिढी, निदान स्वत:च करून मग डॉक्‍टरांकडे येतात. सौम्या म्हणाली, "डॉक्‍टर, मी तेवीस वर्षांची आहे. माझं वजन 85 किलो आहे. पाळीपण अनियमित आहे. हनुवटीवर केस येत आहेत. मी काय करू? मी नेटवर बघितले, तर PCOS निघाले आहे.' मी तिला समजावत म्हटलं, "हे बघ सौम्या, असं घाबरून जाण्याचं काही कारण नाही. हा आजार समजून घेतला पाहिजे. कारण PCOS स्त्रियांच्या किशोरावस्था, प्रजननशील अवस्था, प्रौढावस्था या महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये आपला प्रभाव टाकतो व स्त्रीचे आरोग्य धोक्‍यात येते.' सौम्या म्हणाली, "डॉक्‍टर, आम्हाला नीट समजावून सांगाल काय?'
आज जगामध्ये सर्वत्र चर्चा केला जाणारा विकार म्हणजे PCOS आणि दिवसेंदिवस PCOS चा विळखा वाढतच आहे. त्यामुळे या आजाराबद्धल जनजागृती होणे खूप गरजेचे आहे.
PCOS म्हणजे पॉलीसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम. PCOS ध्ये अंडकोषातील पुटकांचे प्रमाण जास्त प्रमाणात आढळते. म्हणून याला पॉलीसिस्टिक म्हणतात. यामुळे हॉर्मोन्समध्ये अनियमितता येते. त्याचबरोबर शरीरातील बऱ्याच सिस्टिमवर त्याचा प्रभाव पडतो व स्त्रियांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते.
या आजाराचे ठोस कारण आपण सांगू शकत नाही; पण थोडसं अनुवंशिक, थोडं हार्मोन्समधील असंतुलन व आधुनिक जीवनपद्धती यामध्ये आपण हा आजार बसवू शकतो. अनियमित मासिकपाळी, वजन वाढणे, अंगावर तसेच हनुवटी, ओठांवर केस येणे, मानेवर काळपटपणा येणे, वंध्यत्व आणि इतर अनेक सिस्टिममध्ये बिघाड होणे. यामुळे या आजाराला Thief of Womanhood असेही म्हणतात.
PCOS चे ढोबळमानाने दोन प्रकार आहेत.
1) लट्ठ (Obese) 2) बारीक (Thin)
ऐंशी टक्के मुली व स्त्रिया लट्ठ PCOS या प्रकारात मोडतात. दहा ते वीस टक्के बारीक PCOS या मध्ये असतात. पण PCOS चे उपप्रकारही बरेच आहेत.

पौगंडावस्था : पौगंडावस्थेत मुलीची मासिकपाळी अनियमित होणे, वजन वाढणे, अंगावर केस जास्त येणे, तारुण्यपीटिका जास्त येणे, तसेच हनुवटीवर, ओठांच्या वर केस येतात. यामुळे मुली अगदी विद्रुप दिसायला लागतात. कारण हार्मोन्सच्या अनियमिततेमुळे स्त्री हार्मोन्सपेक्षा पुरुष हार्मोन्सचे प्रमाण जास्त वाढते. सोनोग्राफीमध्ये अंडाशयात छोटी पुटके खूप दिसतात. कधी-कधी रक्ताच्या तपासणीत पुरुष हार्मोन्सचे प्रमाण जास्त वाढलेले दिसते. म्हणूनच PCOS या आजाराला Thief of Womanhood असेही म्हणतात.

प्रजननशील अवस्था : हाच आजार पुढे प्रजननशील अवस्थेत प्रवेश करतो तेव्हा "वंध्यत्वा'च्या रूपाने आम्हा डॉक्‍टरांपुढे एक आव्हान म्हणून उभा राहतो. कारण वरच्या सर्व त्रासांबरोबरच त्या स्त्रीमध्ये स्त्रीबीजे जास्त प्रमाणात असूनसुद्धा वाढत नाहीत की, परिपक्व होत नाहीत. त्यामुळे दर महिन्याला एक परिपक्व स्त्रीबीज अंडाशयातून तयार होऊन बाहेर येण्याची प्रक्रिया पूर्ण बंद होते व अंडाशयातील अशी अनेक स्त्रीबीजे सुप्तावस्थेतच राहतात. त्यामुळे हार्मोन्सचे असंतुलन होते. मासिकपाळीमध्ये अनियमितता येते व वजन वाढते, असे वेगवेगळ्या त्रासांचे एकमेकांना पूरक चक्रच चालू होते. अशावेळी हे चक्र कुठेतरी थांबवावं लागतं. कारण स्त्रीबीज तयार झाल्याशिवाय गर्भधारणेची प्रक्रियाच होणे अशक्‍य आहे. तसेच कांही पेशंटमध्ये याबरोबरच इन्शुलिन नावाने हार्मोन्स पण जास्त प्रमाणात वाढते व या चक्रात सामील होते. यामुळे स्त्रीचे स्त्रीत्व तर धोक्‍यात येतेच; तसेच "वंध्यत्व' पण येते.
समजा या पेशंटना गर्भधारणा झाली, तर गर्भपात, रक्तदाब, मधुमेह अशा अनेक दिव्यातून त्यांना जावे लागते. ही प्रेग्नन्सी जोखमीची होते.

प्रौढावस्था : हेच पेशंट्‌स जेव्हा चाळिशीला पोचतात तेव्हा रक्तदाब, मधुमेह, Abnormal lipid profile तसेच अतिस्त्रावी अनियमित मासिकपाळी/ गर्भाशयाचा कॅन्सर अशा सर्व व्याधींचा त्यांना सामना करावा लागतो.
PCOS ला गांभीर्याने घेणे आवश्‍यक आहे.
PCOS प्रमाण आज भारतात 3.7 ते 22 टक्‍क्‍यांपर्यंत आहे. आणि वाढतच आहे. यामुळे स्त्रियांची प्रजननशीलता धोक्‍यात येत आहे. तसेच स्त्रियांमध्ये निराशा, मानसिक तणाव वाढत आहेत.

PCOS ला आटोक्‍यात कसे आणायचे?
1) निरोगी जीवनपद्धती- वजनावर नियंत्रण, समुपदेशन, योग्य आहार, व्यायाम
2) वैद्यकीय उपचार
पाळीमध्ये नियमितता, हार्मोन्समध्ये संतुलन आणणे
त्वचेवर झालेल्या परिणामांवर उपचार
वंध्यत्वाचे उपचार
3) प्रौढावस्थेतील आजारांवर नियंत्रण
स्त्रीरोगतज्ज्ञांकडून नियमित तपासणी केली पाहिजे.
प्रिय भगिनिंनो, करा विचार!
फास्ट फूड/लाइफ जीवनशैली बदला तत्पर
नियमित व्यायाम, माफक आहार
डॉक्‍टरांचा सल्ला निरंतर
नियमित औषधोपचार
मग नक्कीच पी.सी.ओ.एस. ताब्यात ठेवू शकाल!
पुढच्या लेखात बघू शुभमंगल, करिअर व प्रेग्नन्सी प्लॅनिंग.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com