Special Blog : तिचे जाणे, त्यांचे हरवणे !

Special Blog : तिचे जाणे, त्यांचे हरवणे !

मुंबई : तब्बल १५ दिवस नॉट रिचेबल असलेले वनमंत्री संजय राठोड  प्रकटले आहेत. प्रकटल्यावर ते लगेचच  पोहरादेवीच्या पवित्र स्थानी जाणार आहेत. कोविडकाळाची आचारसंहिता त्यांच्या पक्षाचे प्रमुख मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आखून दिली असतानाही ते शक्तीप्रर्दशन करणार का ते कळेल.

पूजा चव्हाण नावाच्या तरूणीच्या आत्महत्येशी त्यांचा संबंध आहे काय याबद्दल गेले पंधरा दिवस मिडीया ट्रायल सुरु आहे. राठोड स्वत:च्या ताकदीवर निवडून येणारे विदर्भातले शिवसेनेचे एकमेव आमदार. संपर्क दांडगा,कामाचा उरक प्रचंड. तरीही या आरोपांमुळे, टेपमुळे गेले पंधरा दिवस ते दिवाभीताचे आयुष्य जगताहेत. प्यार किया तो डरना क्या, असे ते ज्या पक्षाचा झेंडा वागवतात, त्यांचे सुप्रीमो बाळासाहेब ठाकरे यांनी एकदा म्हंटलेले. तरीही राठोड डरले असावेत असे त्यांच्या लपून बसण्यामुळे वाटू लागले होते. ते कुठे आहेत हे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांना माहित होते म्हणे. खरे तर त्या गूढ असलेल्या अपमृत्यूशी संबंध नसेलच तर अनरीचेबल होत फक्त दादांना ठावठिकाणा सांगून लपण्याचे कारण नव्हते. खाई त्याला खवखवे म्हणतात त्यामुळे ते गायब का होते अशी शंका तयार झाली आहे खरी.

मंत्रिमंडळातल्या त्यांच्या एका सहकार्याने, धनंजय मुंडे यांनी प्रतिज्ञापूर्वक आपण दुसरे लग्न केले आहे हे जाहीर केले. द्वितीय पत्नीच्या बहिणीने तक्रार केल्याने अगोदरच दुसऱ्या विवाहप्रकरणाबाबत न्यायालयाची मध्यस्थी मागण्याची हुशारी दाखवणाऱ्या मुंडेंनी ती माहिती समोर येवू दिली. प्यार किया तो या न्यायाने ते डरले नव्हते. आता या दुसऱ्या लग्नाच्या पत्नीच्या बहिणीने तक्रार मागे घेतली असली तरी पत्नीने आपल्या मुलांना डांबण्यात आल्याचा आरोप केला आहेच.

एकूण महाविकास आघाडीतल्या दोन मंत्र्यांवर  सध्या वैषयिकसंबंधावरून टीका  होते आहे. हे वाईट आहे. संजय राठोड दोषी आहेत का, मुख्यमंत्री होण्याची क्षमता असणारे धनंजय मुंडे असा जीव गुंतवून का बसले हे प्रश्न आहेत. नेत्यांची व्यक्तीगत आयुष्ये सार्वजनिक आयुष्याशी जोडावीत का हा विषय आणखी वेगळा. नैतिकतेचे निकष राजकारणातून दूर फेकले गेले आहेत. सर्वच पक्षातले नेते अंगवस्त्र ठेवणे, महिलांना वापरणे यात भूषण मानतात हे कटू असले तरी वास्तव आहे. जो नेता रगेलपणात आघाडीवर तो कर्तृत्ववान असे मानणारा कार्यकर्ता वर्गही तयार झाला आहे. या बाबींचे सोयरसुतक वाटेनासे झाले. मानवीय स्खलनशीलता राजकारणाने फार पूर्वीच स्वीकारली असावी. 

नेत्यांच्या व्यक्तीगत आयुष्यात डोकावून पाहिले तर बरेच नको ते दिसेल यातून काही अनुषंगिक प्रश्नही तयार होतात. वादात अडकलेल्या या दोन नेत्यांच्या पत्नीला, मुलाबाळांना काय वाटत असेल ?वास्तव अद्याप तपासाधीन. खरे काय ते राठोडांबाबत ज्ञात नाही. सत्य काय ते यथावकाश पुढे येईल, पण या चर्चा घरच्यांना किती अस्वस्थ करत असतील ? राजश्री धनंजय मुंडे आणि शीतल संजय राठोड या महिलांना कसल्या आवर्तातून जावे लागत असेल? कित्येकदा राजकीय सोयरीकी फायद्यासाठी केल्या जातात. त्यात सत्ताकारण हे प्रमुख असते. या दोघींची लग्ने सामान्य घरात झाली असती तर त्या अधिक सुखी झाल्या असत्या का ? या दोघींच्या नशीबाची चर्चा करण्याशिवाय हाती काहीही नाही. चारचौघींसारख्या नसलेल्या सत्तेच्या प्रांगणात वावरणाऱ्या या पत्नीवर्गाचे दु:ख त्यांचे त्यांनाच माहित!

या पुढचा प्रश्न अधिक व्यापक स्तरावरचा आहे. हा  प्रश्न आहे राजकारणात येवू बघणाऱ्या महिलांचा. स्थानिक स्वराज्य संस्थातील संशोधनामुळे राज्यात किमान दहा हजार महिला निवडून येतात. ही फार मोठी  संधी आहे. तिचा लाभ घेत अनेक महिला राजकारणात नशीब अजमावू बघताहेत. करूणा शर्मा यांनी पैसा सत्ता या लाभांसाठी धनंजय मुंडेंशी संबंध जोडला किंवा कसे ते माहित नाही. पण पूजा चव्हाण ही सळसळत्या रक्ताची उत्साही तरुणी राजकारणातील संधी शोधण्यासाठी सक्रीय झाली होती.

बंजारा समाज हा एकजिनसी. कायम एकत्र रहाणारा. या समाजाला शिक्षणाची आस आहे. एकगठ्ठा मते आपल्याला राजकीय यश मिळवून देतात हे लक्षात येणारे माळी समाजासारखे जे समाज आहेत त्यात बंजारा येतात. पूजाने पंकजाताई ,पूनमताई मुंडे यांचा प्रचार केला होता. केवळ २२ वर्षांची ही मुलगी समाजजीवनात सक्रीय होती. स्वत:ला सिध्द करण्यास पुढे येणाऱ्या मुली कुटुंबात बंडखोरी करून समोर येतात. चाकोरीबध्द आयुष्य पसंत करणारी पारंपारिकता त्यांना रोखू शकत नाही. सध्याच्या छानशौकीच्या जमान्यात मद्य पार्टयांची त्यांना भुरळ पडू शकते. यातून तावून सुलाखून निघणाऱ्या मुलीच पुढे समाजाचे नेतृत्व करू शकतात. अशा तरुणींना दिशा दाखवणे हे समाजधुरीणांचे कर्तव्य. ते घडत असेलही. मात्र अशी एखादी मुलगी मृत्यू  पावते, अन त्या प्रकरणाचा संबंध थेट एका मंत्र्याशी लावला जातो हे लाजीरवाणे आहे.

त्या त्या समाजाला दिशा देणार्या धर्मपीठांनी या प्रकरणांची संवेदनशीलता समजून घ्यावी ही अपेक्षा. ती अनाठायी ठरेल का ? निवडून येण्यासाठी धर्मपीठांची मदत घेणे राजकारणात रुढ झाले आहे. या पीठांनी नेत्यांना किती संरक्षण द्यायचे याचा निर्णय सद्सद्विवेकबुध्दीने घ्यावा. आज राज्याच्या राजकारणात किमान लाखभर महिला सक्रीय होवू पाहत आहेत. त्यांना प्रोत्साहन देणारे वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे. ज्या समाजात महिलेचे लैंगिक शोषण नातलग, माहितगार करतात तेथे प्रत्येक महत्वाच्या संस्थेने सावध वागणे गरजेचे नव्हे काय ? संजय राठोडांना निष्कर्षापूर्वी सुळी 
देण्याचे कारण नसले तरी एखाद्या तरुणीच्या अपमृत्यूशी मंत्र्याचे नाव जोडले जात असेल तर त्याने निर्दोषत्व सिध्द होईपर्यंत पायउतार होणे उत्तम, हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी लक्षात घ्यावे तसेच पोहरादेवीसारख्या धर्मपीठांनीही.

तिला जगू द्या ही भ्रूणहत्या थांबवणारी मोहिम यत्र नार्यस्तु पूजन्ते मानणाऱ्या समाजाची आस असायला हवी. समाजातल्या अर्ध्या लोकसंख्येचे हुंकार अन उसासे ऐकले जातील ही अपेक्षा. हजारो पूजा योग्य मार्गाने जगाव्यात अन जगू शकल्या नाहीत तर त्यांच्या जाण्याची कुणालाही पाठीशी न घालता योग्य चौकशी व्हायला नको ?

तळटीप :  वरील ब्लॉगमधील मते लेखिकेची वैयक्तिक मते आहेत

pooja chavan death case tiche jane tyanche haravane special blog by mrunalini naniwadekar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com