स्वप्नपूर्तीची ‘भक्कम’ कहाणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

avinash rachmale

साधारण १४०० वस्ती असलेल्या लातूर जिल्ह्यातल्या वायगावमध्ये सन १९६५ मध्ये शेती करणाऱ्या आई-वडिलांपोटी त्यांचा जन्म झाला.

स्वप्नपूर्तीची ‘भक्कम’ कहाणी

- प्राची कुलकर्णी kulkarnee.prachee@gmail.com

साधारण १४०० वस्ती असलेल्या लातूर जिल्ह्यातल्या वायगावमध्ये सन १९६५ मध्ये शेती करणाऱ्या आई-वडिलांपोटी त्यांचा जन्म झाला. आई-वडील शेती करणारे, अशिक्षित. घरची परिस्थिती अशी, की शाळेत जायचं तर अनवाणी जावं लागायचं. अशा वातावरणात रचमाले यांचं शिक्षण सुरू झालं. अशिक्षित असले, तरी त्यांच्या पालकांनी एक ध्येय मात्र त्यांच्यासमोर ठेवलं होतं. ते म्हणजे ‘‘शिक्षण घेऊन साहेब हो.’’ गावची शाळा सुटली आणि छोट्या खेड्यातल्या वस्तीवर वाढलेल्या या मुलाला हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी थेट औरंगाबाद गाठावं लागलं. गावातून शहरात आलेला हा मुलगा बावचळून गेला. इतका, की त्यातून सावरायला काही महिने जावे लागले. मात्र, तिथून जी भरारी घेतली ती यशाचं शिखर गाठण्यासाठीच. शहरात येऊन बावचळलेला हा मुलगा आज अमेरिकेतल्या मिलिटरीला विविध देशांत सर्व्हिस देतोय. बराक ओबामा यांच्यासारख्या तत्कालीन अध्यक्षांसोबत मानानं जेवतोय. ही गोष्ट आहे ‘मराठवाडाभूषण’ म्हणून आज ज्यांना ओळखलं जातं त्या अविनाश रचमाले यांची.

गावात वीज नव्हती. कसल्याही सोयी-सुविधा नव्हत्या. अशात रचमाले यांचं शिक्षण झालं. या सगळ्या काळात त्यांना सोबत होती ती शिकण्याच्या वडिलांनी रुजवलेल्या स्वप्नाची आणि दुर्दम्य इच्छाशक्तीची. शालेय शिक्षण संपलं तोपर्यंत रचमाले यांचे मोठे भाऊ डॉक्टर झाले होते. ‘‘घरात डॉक्टर आहेत, आता इंजिनिअर हवा म्हणून मला इंजिनिअरिंग करायला सांगितलं. त्यातही याच काळात माझं जायकवडीला जाणं झालं. त्या प्रकल्पाची भव्यता आणि तशी कामं लक्षात घेऊन सिव्हिल इंजिनिअरिंग करायचा माझा निर्णय पक्का झाला,’’ रचमाले सांगत होते. निर्णय पक्का झाला आणि पाठोपाठ त्यांच्या वडिलांचं स्वप्नही. शिक्षण झाल्यावर त्यांना पीडब्ल्यूडीमध्ये नोकरी मिळाली. मुंबईत जाऊन त्यांनी कामाला सुरुवातसुद्धा केली; पण त्यांना त्या नोकरीपलीकडे असणारं मोठं स्वप्न खुणावत होतं. आजूबाजूला सल्ला देणारे लोक भेटत होते आणि त्यातून रचमाले यांनी परदेशात पुढच्या शिक्षणासाठी जाण्याचा निर्णय घेतला. रचमाले सांगतात : ‘त्यावेळी अर्ज केला, की त्याचं उत्तर मिळणं याची पूर्ण प्रक्रिया होऊन उत्तर येईपर्यंत सात ते आठ महिने जायचे. त्यामुळे प्रवेश मिळणं, त्यासाठी तयारी करणं अवघड होतं.’

वाट पाहता पाहता उत्तर आलं आणि रचमाले यांना मिशिगन डेट्रॉईट इथल्या वेन विद्यापीठात प्रवेश मिळाला. इथं त्यांनी निर्णय घेतला तो एन्‍व्हायर्नमेंटल इंजिनिअरिंग करण्याचा. शिक्षण झालं.. पाठोपाठ नोकरीदेखील करून झाली; पण मनाशी असलेला ध्यास स्वस्थ बसू देईना.

रचमाले सांगतात : ‘मी काम करत असलेल्या कंपनीमध्ये मला प्रामुख्यानं काम होतं ते प्रपोजल तयार करण्याचं. ते नीट शिकून झालं. मग मी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. कंपनीमध्ये राजीनामा द्यायला गेलो, तेव्हा कंपनीच्या मालकांनी मला त्याच कंपनीमध्ये दहा टक्के शेअर देऊ केले; पण मी ते नाकारले आणि स्वतः काही सुरू करायचा निर्णय घेतला.’

यातून लेकशोर इंजिनिअरिंग सर्व्हिसेसची स्थापना झाली. रचमाले सांगतात : ‘त्या काळात पर्यावरण हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा झाला होता. त्यामुळे अनेक कामं होती. कंपनी सुरू केली, तेव्हा मीच सगळी कामं करायचो. म्हणजे मीच ड्रिलिंग मशीन घेऊन जायचो आणि नमुने गोळा करायचो. त्याची तपासणी करून अहवाल द्यायचो. असं करत कंपनीची सुरुवात झाली.’

त्यावेळी अमेरिकेतल्या अल्पसंख्याकांसाठी अमेरिकी सरकारची एक योजना होती. त्यात रचमाले यांनी सहभाग घेतला. त्यातून त्यांना सरकारी कामं मिळाला सुरुवात झाली. आज अनेक देशांमध्ये अमेरिकी मिलिटरीसाठी जे बांधकाम करावं लागतं ते रचमाले यांची कंपनी करते. त्यांच्या कंपनीची आता अमेरिकेत दहापेक्षा जास्त ऑफिसेस आहेत आणि चाळीसपेक्षा जास्त राज्यांत काम सुरू आहे. अफगाणिस्तान, इराकसह अनेक देशांमध्ये युद्धानंतर जे नुकसान झालं, त्या देशांत महत्त्वाच्या सुविधा उभारण्याचं काम करत आहेत.

रचमाले यांच्या कंपनीची उलाढाल साडेतीन हजार कोटींच्या घरात पोचली आहे. अमेरिकी सरकारकडून व्हाइट हाऊसमध्ये बोलावून त्यांचा सत्कार करण्यात आला आहे. तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा जेव्हा डेट्रॉईटमध्ये यायचे, तेव्हा त्यांच्याबरोबरच्या डिनरला रचमाले यांना आवर्जून आमंत्रण असायचं.

या यशाचं गमक रचमाले यांच्याच शब्दात : ‘आमच्यासाठी ग्राहक हा सर्वोच स्थानी आहे. त्यांना सुविधा देणं याला आमचं कायम प्राधान्य राहिलं आहे. त्यांचं समाधान होणं महत्त्वाचं.’

Web Title: Prachee Kulkarnee Writes Avinash Rachmale

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :saptarang
go to top