पेटंटवरच्या प्रभुत्वानं यश... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dr. Sanjay Bhandari

कानात दिसणारही नाही अशा ‘हिअरिंग एड’च्या जाहिराती तुम्ही पाहिल्या असतील. ते हिअरिंग एड ज्यामुळे इतक्या छोट्या आकाराचं होऊ शकलं, तो त्यातला सेन्सर विकसित केला आहे एका भारतीय माणसाने.

पेटंटवरच्या प्रभुत्वानं यश...

- प्राची कुलकर्णी kulkarnee.prachee@gmail.com

कानात दिसणारही नाही अशा ‘हिअरिंग एड’च्या जाहिराती तुम्ही पाहिल्या असतील. ते हिअरिंग एड ज्यामुळे इतक्या छोट्या आकाराचं होऊ शकलं, तो त्यातला सेन्सर विकसित केला आहे एका भारतीय माणसाने. फक्त हा सेन्सरच नाही, तर अशा जवळपास ५१ वेगवेगळ्या संशोधनांची पेटंट घेण्यात त्यांचा वाटा आहे. असा हा मराठी माणूस म्हणजे डॉ. संजय भंडारी.

भंडारी मराठवाड्यातल्या लातूरचे. वडील पीडब्ल्यूडी खात्यात. जन्म लातूरला झाला तरी वडिलांच्या बदल्यांमुळे उदगीर आणि औरंगाबादमध्ये त्यांचं शिक्षण झालं. शाळेचं शिक्षण झाल्यानंतर त्यांनी इंजिनिअरिंग करायचं ठरवलं. त्या वेळी प्रत्येक बोर्डाला विभागाला आठ जणांना प्रवेश मिळायचा. त्यात मराठवाड्याच्या आठ जणांमधून त्यांना संधी मिळाली. ‘सीओईपी’मधून त्यांनी बीई आणि नंतर मास्टर्स पूर्ण केलं. इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये त्यानंतर त्यांनी पीएच.डी.देखील केलं.

भंडारी शाळेपासून ‘पीएच.डी.’पर्यंत कायम टॉपर. दिल्लीत एका मल्टिनॅशनल कंपनीत काम केल्यानंतर ते संशोधनासाठी नेदरलँडला गेले. त्यानंतर त्यांनी अमेरिकेत जायचं ठरवलं. खरंतर अशा टप्प्यावर मोठ्या कंपनीत स्थिर होऊन प्रगती करत रहाणं, असा सर्वसाधारण लोकांचा प्रवास असतो. मात्र, असं असूनही कुठल्याही मोठ्या कंपनीत न रमता त्यांनी स्टार्टअपमध्ये काम करणं पसंत केलं. अशा तीन ते चार स्टार्टअप कंपन्या नावारूपाला आणल्या.

यासंदर्भात डॉ. भंडारी सांगतात, ‘दोन हजार या वर्षात डॉट कॉमचा बूम आला होता. त्या वेळी मी विचार केला की, आपणही असं काही करायला पाहिजे. मी पहिला स्टार्टअप जॉईन केला तो ३० ते ४० लोकांचा होता. त्या वेळी या स्टार्टअपने जे प्रॉडक्ट बाजारात आणलं, ते इंटरनेटचा स्पीड शंभरपटींनी वाढवत होतं. हे प्रॉडक्ट खूप प्रसिद्ध झालं. जपान, कोरियामधलं बरंच मार्केट यामुळे मिळवता आलं. त्यानंतर २००५ मध्ये त्याचा आयपीओ आला. त्यांचा स्वतःवर आणि कंपनीवर इतका विश्‍वास होता की, छोटी कंपनी ५०० मिलियन डॉलरची झाली, त्यामुळे पुढे स्टार्टअप्मध्येच काम करायचं ठरवलं आणि आता स्टार्टअपमध्येच ते मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहेत.’

अर्थात, याचा पाया रचला गेला तो नेदरलॅंडच्या फिलिप्स रिसर्च लॅबमध्ये. फिलिप्स रिसर्च लॅबमध्ये हार्ड ड्राइव्हचा स्पीड पाचपटीने वाढवायचा प्रकल्प सुरू होता, तिथं हे तंत्रज्ञान विकसित केलं. भंडारींच्या शब्दांत - ‘पाचपटीने वेग वाढवणं हे सोपं नसतं. एक दिवस वाटलं की, हे काही शक्य नाही; पण नंतर यावर रात्री जवळपास १२ वाजता काम करत असताना एक संकल्पना सुचली आणि मग नंतर त्याची पेटंटही फाइल झाली. पहिल्या दोन स्टार्ट अपमध्ये दोन नव्या संकल्पना लाँच तर झाल्याच; पण तिसऱ्या स्टार्टअपमध्येही त्यांनी असंच क्रांती घडवणारं संशोधन केलं. इथे आव्हान स्वीकारलं ते जगातील सर्वांत लहान सेन्सर बनवण्याचं. अक्षरशः वाळूच्या कणाइतका हा सेन्सर. यामुळे अगदी मोबाईलपासून हिअरिंग एड तयार करण्यापर्यंत अनेक गोष्टींसाठी त्याचा वापर झाला.’ जवळपास १०० कोटी लोकांपर्यंत वेगवेगळ्या मार्गांनी आज हा सेन्सर पोहोचला असल्याचं भंडारी सांगतात आणि ही कंपनी होती फक्त १० लोकांची.

भंडारींनी आजपर्यंत वेगवेगळ्या संशोधनांसाठी ५१ पेटंट मिळवली आहेत. भंडारी सांगतात, ‘जेवढ्या टेक्नॉलॉजी पेटंट करता, तेवढं चांगलं. विकसित देशांमध्ये या पेटंटची अक्षरशः स्पर्धा असते. एखादं पेटंट मिळण्यासाठी जवळपास २ ते ५ वर्षं लागू शकतात. भारतात आता याची जागृती वाढते आहे; पण जास्त लोकांनी त्याचा वापर करणं गरजेचं आहे.’

भंडारींच्या मते माणसाने तीन प्रकारचे छंद जोपासले पाहिजेत. पहिला, ज्यातून तुम्ही पैसे कमवाल; दुसरा आरोग्यासाठी - ते स्वतः सातत्याने गिर्यारोहण करतात आणि तिसरा छंद हा निर्मितीसाठी असावा असं त्यांचं मत आहे, त्यासाठी ते शास्त्रीय संगीत शिकतात. यासोबतच फिरतीचा छंदही त्यांनी जोपासला आहे. कामानिमित्ताने फिरलेल्या २६ देशांत त्यांनी भरपूर भटकंती केली आहे. भंडारी सांगतात, ‘जेव्हा तुम्ही या दृष्टिकोनातून काम करता तेव्हा तुम्हाला कसलाच ताण येत नाही, कामाचा आनंद मिळतो.’

या सगळ्याबरोबरच संजय भंडारी हे विद्यार्थ्यांना आणि व्यावसायिकांना सतत मार्गदर्शन करतात. अनेकदा लोकांना बोलण्याचं धाडस नसतं, किंवा असलं तरी त्यांना आपली बाजू नीट कशी मांडायची याची माहिती नसते. त्यासाठी ‘पोस्टमास्टर’ या ग्रुपच्या माध्यमातून जगभरात आणि ‘गर्जे मराठी’च्या माध्यमातून खास मराठी लोकांसाठी हे मार्गदर्शन केलं जातं.

भंडारींचा तरुणांसाठी एक खास मंत्र आहे. ते सांगतात, तुमच्या आवडीचं क्षेत्र निवडा आणि त्यातल्या सगळ्यात वरच्या पदावर कसं जाता येईल याचं ध्येय ठेवा. स्पर्धा तर असणारच आहे; पण स्पर्धेच्याऐवजी सहकार्याची खूप गरज आहे, त्याशिवाय पुढे जाता येत नाही, त्यामुळे सहकार्य मिळवणं गरजेचं आहे; आणि त्याबरोबरच समाजासाठी काहीतरी करतोय, त्याला महत्त्व द्या.

Web Title: Prachee Kulkarnee Writes Dr Sanjay Bhandari

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :saptarang