आफ्रिकेतून भारतीयांसाठी लढा

जेव्हा भारतीयांसाठी दक्षिण आफ्रिकेतील वास्तव्य हा जेव्हा कटू अनुभव होता. अशा काळात भारतीयांच्या हक्कांसाठी लढणारा माणूस म्हणजे अमित शिवाजी मोरे.
Amit Shivaji More
Amit Shivaji MoreSakal
Summary

जेव्हा भारतीयांसाठी दक्षिण आफ्रिकेतील वास्तव्य हा जेव्हा कटू अनुभव होता. अशा काळात भारतीयांच्या हक्कांसाठी लढणारा माणूस म्हणजे अमित शिवाजी मोरे.

- प्राची कुलकर्णी kulkarnee.prachee@gmail.com

जेव्हा भारतीयांसाठी दक्षिण आफ्रिकेतील वास्तव्य हा जेव्हा कटू अनुभव होता. अशा काळात भारतीयांच्या हक्कांसाठी लढणारा माणूस म्हणजे अमित शिवाजी मोरे. मोरे मूळचे नाशिकमधले. लढण्याचं बाळकडू त्यांना मिळालं ते घरातूनच. मोरे सांगतात, ‘माझी आई प्रचंड धाडसी. तिला दिल्लीमध्ये रिपब्लिक डे परेडमध्ये हेलिकॉप्टरमधून पॅराशूट जंपिंगची संधी मिळाली. पण तेव्हाची सामाजिक परिस्थिती अशी की, आजोबा म्हणाले, तुझ्याशी लग्न कोण करेल आणि मग तिला थांबावं लागलं. पुढे ती कॉलेजची जीएससुद्धा झाली. वडीलदेखील अभ्यासू. त्यांनी पद्यात्मक ज्ञानेश्वरी आणि रामायण, तसेच चार वेदांचे ब्रह्मविद्या वैदिक भाष्य केले. तसेच, माझे आजोबा आणि गुरू यांच्याकडून मला समाजसेवेचे आणि देशप्रेमाचे बाळकडू मिळाले, त्यामुळे मी घडलो.’

मोरे यांच्या शिक्षणाची सुरुवात नाशिकमध्ये झाली आणि पुढं ते उस्मानाबादला गेले. उस्मानाबादमध्ये असताना सरळ साधं आयुष्य जगण्याची संधी मिळाल्याचं ते आवर्जून नमूद करतात. वडिलांच्या बदलीच्या नोकरीमुळे उस्मानाबाद सोडून पुन्हा नाशिकमध्ये येऊन त्यांचं पुढचं शिक्षण झालं. शालेय शिक्षण संपल्यावर त्यांनी इंजिनिअरिंग करण्याचा निर्णय घेतला. शाखा निवडली ती तेव्हा प्रसिद्ध असलेली मेकॅनिकल इंजिनिअरिंगची.

मोरे सांगतात, ‘महाविद्यालयात गेलो तेव्हा प्राध्यापक मला म्हणायचे की, तू कॉलेजचं नाव काढणार. तेव्हा वाटायचं असं कसं म्हणतायेत; पण आता त्यांचा दृष्टिकोन कळतो.’

शिक्षण संपलं आणि पहिली नोकरी मिळाली ती आजोबांच्याच कंपनीमध्ये. ‘कंपनी आजोबांची असली तरी मला अजिबात स्पेशल ट्रीटमेंट मिळाली नाही. तेव्हा अगदी प्रोसेस डिझाइन तयार करण्यापासून ते मार्केटिंगपर्यंत अनेक गोष्टी केल्या. अशात मी किर्लोस्कर कंपनीसाठी एकदा प्रेझेंटेशन दिलं. हे करताना मला माझा अंदाज आला; पण आईची मात्र इच्छा होती की मी स्वतंत्र काम करून अनुभव घ्यावा. मग मी लार्सन आणि टुब्रोमध्ये नोकरीसाठी अर्ज केला. तिथे मुलाखतीमध्ये मला विचारलं की, इथे का यायचं आहे? मी सांगितलं की, मी इतके दिवस नदीत पोहोत होतो. आता समुद्रामध्ये पोहायचं आहे आणि मोठं व्हायचंय.’

मोरे सांगतात, ‘लार्सन अँड टुब्रोमध्ये नोकरी करायला लागलो तेव्हा अनेक जण परदेशात जात होते. तिथे तेव्हा मानसिकता अशी होती की जे परदेशात जातात ते यशस्वी आणि भारतात रहात असाल तर तुम्ही दगड आहात. यातून नकळत परदेशात जाण्याची इच्छा वाढत गेली.’

मोरे प्रयत्न करत होते आणि त्यात परदेशवारीची संधी चालून आली ती दुबईमधल्या नोकरीमुळे. दुबईमध्ये गेल्यावर काम सुरू होतं आणि अशातच त्यांचा मुलगा आजारी पडला. ‘मला मुलाकडे जाण्याची आवश्यकता होती, त्यामुळे मी सुट्टी मागायला गेलो, तर तिथे मला सांगण्यात आलं की, सुट्टी तर नाहीच; पण माझा पासपोर्टसुद्धा दिला जाणार नाही. ही एक प्रकारे गुलामगिरी झाली. मी आवाज उठवला. भारत सरकारने लक्ष घातलं आणि शेवटी मी आलोच; पण ही कंपनीसुद्धा सरकारने ब्लॅकलिस्ट केली.’ भारतीयांसाठी लढण्याची ही सुरुवात होती. पुढे ते दक्षिण आफ्रिकेत दाखल झाले. सध्या ते ट्रान्सनेट या कंपनीमध्ये टँक स्पेशलिस्ट म्हणून काम करतात. दुबईमध्ये सुरू केलेला लढा आता आणखी पुढच्या टप्प्यावर पोहोचला आहे.

मोरेंच्याच शब्दांत ‘दक्षिण आफ्रिकेला स्वातंत्र्य मिळालं; पण तेव्हा वसाहत केलेले सगळे इथेच राहिले. भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे संबंध फारसे सौहार्दाचे नव्हते, त्यामुळे साहजिकच भारतीयांवर राग होता. भारतीयांविरोधात लेख लिहिले जात होते. अशात मी भारतीय सैनिकांसाठी भारतासाठी पीस प्रेअर म्हणजे शांततेसाठी प्रार्थना सुरू केल्या. साहजिकच मला प्रचंड विरोध झाला. माझ्याविरोधात लेख लिहिले गेले, कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली. मला देश सोडायला सांगण्यात आलं. पर्मनन्ट रेसिडेन्सी रद्द करण्याची मागणी झाली. ट्विट केले गेले. पण या खडतर प्रवासातून परिवर्तनाला सुरुवात झाली.’

मोरेंवर बंधनं लादली गेली आहेत. फक्त त्यांच्यावरच नाही, तर त्यांच्या कुटुंबावरसुद्धा बंधनं आहेत. मोरे म्हणतात, ‘स्वातंत्र्य नाही; पण आपलं काम सत्यासाठी आहे हे मला माहीत आहे. म्हणजे पाकिस्तानी लोकांनी माझ्याविरोधात खूप तक्रारी केल्या. पण हे सगळं होत असतानादेखील मी भारतीय पासपोर्टचा त्याग केलेला नाही.’ आज भारतातलं चित्र पाहून प्रचंड त्रास होत असल्याचं ते सांगतात. त्यांच्या मते, ‘आज सोशल मीडियाच्या जगतात कोणता झेंडा घेऊ हाती हा प्रश्न तरुणांच्या हाती आहे. मुलं स्वप्न बघतात ती अमेरिकेत जायची. त्यांना माझं एकच म्हणणं आहे आफ्रिका हेसुद्धा खूप चांगलं ऑप्शन आहे. स्वप्नं बघा आणि ती भारताचा झेंडा हाती घेऊन बघा.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com