राजा ढालेंसारख्या तत्त्वनिष्ठ योद्‌ध्याचं निघून जाणं वेदनादायी

डॉ. प्रज्ञा दया पवार 
मंगळवार, 16 जुलै 2019

गोरेगावच्या सिद्धार्थनगरमधल्या पत्र्याच्या चाळीत आम्ही राहत असताना राजा ढाले, नामदेव ढसाळ, ज. वि. पवार आणि एकूणच पॅंथरचे सगळे मोहरे तासन्‌तास आमच्या घराबाहेरच्या मोकळ्या व्हरांड्यात बसून घमासान चर्चा करत असत, ते अजूनही माझ्या स्मरणात आहे.

आदरणीय राजाभाऊ ढाले यांच्या निधनामुळे एका क्रांतदर्शी जाणिवेचा आज खऱ्या अर्थाने अंत झाला. दलित पॅंथरचे संस्थापक, लघुअनियतकालिकाच्या चळवळीतले बिनीचे शिलेदार, कट्टर तत्त्वनिष्ठतेचे पाईक, कवी, अनुवादक, चित्रकार, वैचारिक साहित्यापासून ते लहान मुलांसाठी आवर्जून लिहिणारे लेखक, नामांतर चळवळीचे नेते, बौद्ध धम्माचे-बौद्ध वाडमयाचे विचक्षण अभ्यासक असे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू होते. माझ्या पिढीतल्या अनेकांचं बालपण "ढाले-ढसाळ' यांच्या ऐतिहासिक कर्तृत्वाचा करिष्मा पाहून अक्षरशः दिपून गेलं होतं. 

गोरेगावच्या सिद्धार्थनगरमधल्या पत्र्याच्या चाळीत आम्ही राहत असताना राजा ढाले, नामदेव ढसाळ, ज. वि. पवार आणि एकूणच पॅंथरचे सगळे मोहरे तासन्‌तास आमच्या घराबाहेरच्या मोकळ्या व्हरांड्यात बसून घमासान चर्चा करत असत, ते अजूनही माझ्या स्मरणात आहे. एकदा ढालेकाकांना काय वाटलं कुणास ठाऊक? समोरच्या अंगणात गुडघाभर उंचीचं गवत माजलं होतं. बोलता बोलता ते मधूनच उठले आणि तिरीमिरीत तास-दोन तास खपून त्यांनी ते सगळं अंगण साफ करून टाकलं. त्यांच्यात एक प्रकारचं अवलियापण होतं, जे त्यांनी शेवटपर्यंत टिकवून ठेवलं. अर्थात, या अवलियापणात, काहीशा हट्टी, दुराग्रही म्हणता येईल अशा त्यांच्या वागण्यात एक पक्कं लॉजिक मात्र नक्की असायचं. ते अत्यंत तत्त्वनिष्ठ होते आणि ही अ-व्यापारेषु तत्त्वनिष्ठाच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला एक प्रकारची झळाळी प्राप्त करून देत असे.

खाजगी आणि सार्वजनिक अशा कुठल्याही प्रतलावरच्या जगण्यात त्यांनी ही तत्त्वनिष्ठा अखेरपर्यंत कसोशीने सांभाळली होती. सत्तरीच्या दशकात डाव्या विचारविश्वाकडे,चळवळीकडे सरकू लागलेलं दलित पॅंथरचं शीड ढालेंना भावलं नाही आणि तिथूनच त्यांच्या कामाला एक वेगळी दिशा प्राप्त झाली. 

पॅंथरचे संस्थापक नेते ही त्यांची सर्वतोमुखी झालेली ओळख आहे. कारण त्या ऐतिहासिक अशा धगधगत्या सांस्कृतिक-राजकीय पर्वाचे ते म्होरके होते; पण यापलीकडेही त्यांच्या कामाचा पैस अनेक दिशांनी विस्तारत गेलेला दिसतो. "दलित साहित्या'ऐवजी "आंबेडकरी साहित्य' ही संज्ञा आग्रहाने अधोरेखित करत त्यांनी या संज्ञेला आवश्‍यक असणारी वैचारिक रसद सतत पुरवली. आंबेडकरी चळवळीचं सिद्धांतन करणं, कठोर अभ्यासांती त्याला तात्त्विक संदर्भचौकट उपलब्ध करून देणं, बौद्ध धम्माचं काळाच्या परिप्रेक्ष्यात नवं अर्थनिर्णयन करत राहणं ही त्यांच्या विद्वत्तेची काही मासलेवाईक उदाहरणे आहेत. 

साप्ताहिक साधनाच्या स्वातंत्र्य दिनाच्या रौप्यमहोत्सवी विशेषांकात राजा ढाले यांनी "काळा स्वातंत्र्यदिन' हा लेख लिहून एतद्देशीय राज्यकर्त्यांमध्ये असलेल्या शोषक वृत्तीचा खरपूस समाचार घेतला होता. 15 ऑगस्ट 1972 रोजी लिहिलेल्या त्या लेखातलं एक वाक्‍य माझ्या मनावर कोरलं गेलेलं आहे. ते म्हणतात, ""तुम्ही मोर्चा काढला तर दंडुके बसणार. हे सरकार आपलं नाही ! ब्रिटिश गेले पण ब्रिटिशांची प्रवृत्ती राज्यकर्त्यांमध्ये जिवंत आहे. म्हणून आपण स्वतंत्र आहोत हे चूक. स्वतंत्र ते आहेत - जे आपणाला गुलामासारखं वागवतात. मग गुलामीत स्वातंत्र्य कसलं?'' 

46 वर्षे झाली ढालेंच्या या लेखाला आणि बदल असा झालाय की, ब्रिटिशांच्या प्रवृत्तीला आज एकचालकानुवर्ती हुकूमशाही प्रवृत्तीची भयावह जोड मिळालेली आहे. त्यामुळे एकूणच दलित, वंचित, शोषित आणि अल्पसंख्याक वर्गाची परिस्थिती अधिक विदारक झाली आहे. अशा वेळेला वंचितांची बाजू लढवण्याऐवजी स्वतःला आंबेडकरवादी म्हणवणाऱ्यां अनेकांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे स्वतःला हिंदुत्ववादी प्रयोगात सामील करून टाकलं आहे. अशा ऐन मोक्‍याच्या प्रसंगी राजाभाऊंसारख्या तत्त्वनिष्ठ योद्‌ध्याचं कायमचं निघून जाणं ही फार वेदनादायी वस्तुस्थिती आहे. त्यांना अखेरचा "जय भीम' करताना त्यांनी प्रज्वलित केलेला "समष्टीचा दिवा' विझणार नाही, यासाठी सतत कार्यप्रवण राहण्याचा शब्द त्यांना देते. 

माझ्या उत्कट जीवघेण्या धगीवर या दुसऱ्या कवितासंग्रहाचं प्रकाशन त्यांच्या हस्ते झालं होतं. त्या वेळी त्यांनी माझ्या कवितेवर बोलताना एक फार मोठी उपाधी मला दिली होती. ते मला "आधुनिक जनाबाई' म्हणाले होते ! त्यांच्यासारख्या विद्वान आणि आवा गार्द जनरेशनच्या एका महत्त्वाच्या भाष्यकाराने माझ्या कवितेचा केलेला हा सन्मान मला नेहमीच ताळ्यावर ठेवेल हे नक्की ! 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pradnya Daya Pawar Writes about Raja Dhale