अंकोरवाटचा अद्भुत सूर्योदय

सूर्योदयाच्या वेळी अंकोरवाटचं नयनरम्य प्रतिबिंब पटांगणातील तलावात दिसतं.
सूर्योदयाच्या वेळी अंकोरवाटचं नयनरम्य प्रतिबिंब पटांगणातील तलावात दिसतं.

‘सेव्हन फंडामेंटल प्लेजर्स ऑफ ट्रॅव्हल आर अँटिसिपेशन, मूव्हमेंट, ब्रेक फ्रॉम रुटीन, नॉव्हेल्टी, डिस्कव्हरी, इमोशनल कनेक्शन अँड हायटन्ड् ॲप्रिसिएशन ऑफ होम,’ असं अमेरिकेतील ज्येष्ठ पत्रकार व लेखक थॉमस स्विक म्हणतात. थॉमस यांनी ६० पेक्षा अधिक देशांत भ्रमंती केली असून त्यांनी विविध प्रसारमाध्यमांत ‘ट्रॅव्हल एडिटर’ म्हणून काम केलं आहे. थॉमस यांच्या या विधानाचा नेमका अर्थ काय? तर अपेक्षेनुसार काही ना काही घडणं, प्रवास करताना हालचाल असणं, आपल्या नित्यक्रमातून जरा बाजूला होऊन जगणं, नावीन्य, शोध, भावनिक ऋणबंध आणि आपल्या व इतरांच्या घराबद्दलचं कौतुक असणं म्हणजे प्रवासातील सुख. हे वाचायला फार सोपं वाटतं; परंतु आचरणात आणायला काही महिने किंवा वर्षंही जातात. तसंही आपल्याला आपलं जीवन हळूहळूच विकसित करावं लागतं. आपण सगळ्यांनी आपापल्या प्रवासात या सात मूलभूत सुखांचा समावेश होण्यासाठी प्रयत्न केला तर अधिक सुखद अनुभव मिळेल. माझाही तसाच प्रयत्न असतो आणि म्हणून एक स्वानुभव सांगतो...

कंबोडियातलं अंकोरवाट (Angkor Wat) हे जगातील सर्वात मोठं धार्मिक स्मारक पाहण्यासारखं आहे.  ‘युनेस्को’च्या जागतिक वारसायादीत ते पहिल्या काही ठिकाणांपैकी एक आहे. विस्मयजनक असं हे मंदिर आहे. बहुसंख्य पर्यटकांच्या इच्छित यादीत ते असतंच. प्राचीन अशा अंकोरवाटला ‘देवळांचं शहर’ (Temple City) असंच संबोधलं जातं. सीएम रीप (Siem Reap) हे मोठं शहर तिथून जवळच आहे. या मंदिराची भव्यता किती असावी याचा अंदाज बांधण्यापेक्षा तिथं समक्ष गेलेलं कधीही चांगलंच. 

ख्मेर राज्याची पूर्वीची राजधानी याच ठिकाणी होती. बाराव्या शतकात बांधलं गेलेलं अंकोरवाट हे ९७ चौरस किलोमीटर एवढं विस्तीर्ण आहे. मूलत: हिंदुमंदिर म्हणजेच विष्णुमंदिर म्हणून बांधल्या गेलेल्या या मंदिराचं पुढं हळूहळू बौद्ध मंदिरात रूपांतर केलं गेलं. परिणामी, स्थापत्यशैलीचं एक वेगळंच संमिश्रण या मंदिराबाबत पाहायला मिळतं. बरीच मंदिरं, खंदक, राजवाडे, दरवाजे, दगडी कमानी आणि बुरुज इथं पाहायला मिळतात. पायी भरपूर चालण्याची तयारी पाहिजे मात्र! दिवसाच्या कोणत्याही वेळी हे पर्यटनस्थळ पाहण्यास मोकळीक आहे; परंतु  सकाळी लवकर भेट दिली तर ते शांतपणे पाहता येतं व निसर्गाच्या सान्निध्यात मनाची चिंतनशीलताही वाढते.

कंबोडियातील बंडखोरीमुळे आणि गृहयुद्धामुळे अनेक दशकांपर्यंत तिथं प्रवाशांना जाता आलं नाही; परंतु गेल्या तीन-चार दशकांमध्ये तिथं शांतता प्रस्थापित झाल्यामुळे पर्यटक थायलंडबरोबरच कंबोडियालाही भेट देऊ लागले. मीही माझा मित्र डेस्मंड याच्यासमवेत नोव्हेंबर २०१९ मध्ये व्हिएतनाम, कंबोडिया व थायलंड अशी एक महिन्याची ट्रिप केली होती. सीएम रीपमधील कंदल व्हिलेज (Kandal Village) या भागात आम्ही होस्टेलमध्ये चार दिवसांचा मुक्काम केला होता. ता. १८ नोव्हेंबर २०१९ हा दिवस माझ्या कायम स्मरणात राहील. पहाटे चार वाजता उठून आम्ही तयार झालो. टुकटुकवाला (स्थानिक रिक्षाचालक) बरोबर पहाटे साडेचार वाजता आम्हाला घ्यायला आला. आम्ही आग्नेय आशियातील एक अतिशय अद्भुत असा सूर्योदय पाहायला निघालो होतो. अंकोरवाटच्या मुख्य मंदिरापासून एक-दीड किलोमीटर लांब टुकटुकवाल्यानं आम्हाला सोडलं आणि तिथून मंदिराच्या दिशेनं आम्ही चालू लागलो. पहाटे साडेपाच वाजता लोकांच्या झुंडीच्या झुंडी लोटत होत्या. प्रचंड गर्दी होऊ लागली होती. माझ्यासाठी हा अनुभव फारच अफलातून होता. 

सूर्योदय पाहायला हजारो लोक रोज तिथं येतात, त्यामुळे त्याविषयी माझ्या मनात वेगळंच कुतूहल निर्माण झालं होतं. काही वेळात आम्ही मंदिराच्या मोठ्या पटांगणात पोहोचलो. व्यवस्थित बसून सूर्योदय पाहता यावा यासाठी प्रत्येक प्रवासी चांगल्यात चांगली जागा शोधत असतो. तशी मीही शोधली आणि तासाभरासाठी ठाण मांडून बसलो. शांत सकाळी सूर्य त्याच्या गतीनं मंदिरामागून अगदी नाट्यमयरीत्या उगवतो. सूर्योदयाच्या वेळी अंकोरवाटचं नयनरम्य प्रतिबिंब पटांगणातील तलावात दिसतं. इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर मंदिराचं एकदम ‘स्टनिंग सिल्होट’ ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवणं हे केवळ अद्भुत. त्याची मजाच वेगळी. खरं सांगू, मी त्या प्रसंगाचे फार कमी फोटो काढले. कारण, त्या वेळी मी त्या क्षणाचा प्रत्यक्षातला आनंद घेऊ इच्छित होतो. फोटो काढत बसण्यापेक्षा मी तसंच केलं!

अशाच प्रकारे सूर्योदय स्राह स्रांग लेक (Srah Srang Lake) इथं, तर सूर्यास्त प्रे रुप टेम्पल (Pre Rup Temple), बयॉन टेम्पल (Bayon Temple) व नॉम बखेंग (Phnom Bakhenge) इथं अनुभवता येतो, तसंच ता प्रॉम (Ta Prohm), बाफून (Baphuon), टेरेस ऑफ द एलिफंट्स व बंतेय कदेई (Banteay Kdei) ही सर्व मंदिरं पाहण्याजोगी आहेत. आता जवळपास सर्व मंदिरं ही बौद्धमय झालेली दिसतात. अंकोरवाटमधला काही परिसर घनदाट जंगलाचा आहे. अजून एक विशेष बाब म्हणजे आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या (एएसआय) संवर्धनधोरणात (Conservation Strategy) ता प्रॉम (Ta Prohm) या मंदिराचा सन २००४ पासून समावेश केला गेला असून, तिथल्या संवर्धनाचं व जीर्णोद्धाराचं काम हाती घेण्यात आलेलं आहे. एएसआय हे तब्बल साडेतीन हजारहून अधिक स्मारकांचं संवर्धन-संरक्षण करतं. यात २२ जागतिक वारसास्थळं आहेत. कंबोडिया, अफगाणिस्तान, इंडोनेशिया, पाकिस्तान, लाओस, श्रीलंका, इजिप्त, नेपाळ, बहारीन, मालदिव, भूतान, व्हिएतनाम व म्यानमार इथल्या काही स्मारकांना एएसआय मार्गदर्शन करतं, सल्ला देतं व तांत्रिक सहकार्य करतं. यापूर्वी एएसआयनं अंकोरवाट इथं १९८६ ते १९९३ या कालावधीत विलक्षण काम केलं आहे. 

सीएम रापमधील विविध कॅफे, पब स्ट्रीट, आर्ट सेंटर नाईट मार्केट, अंकोर राष्ट्रीय संग्रहालय व युद्धस्मारक, तसंच कंबोडियाची राजधानी नॉम पेन (Phnom Penh) या शहरात रॉयल पॅलेस, वाट नॉम, द किलिंग फील्ड्स, चोइंग एक, स्वातंत्र्य स्मारक, सेंट्रल मार्केट, नॅशनल म्युझियम ऑफ कंबोडिया अशी विविध प्रेक्षणीय स्थळं पाहण्याजोगी आहेत. तब्बल ४३५ किलोमीटरची समुद्रकिनारपट्टी या देशाला आहे. अप्रतिम लॅंडस्केप, सी फूड, सायकल टूर्स, बुटीक हॉटेल्स व बजेट फ्रेंडली ट्रॅव्हलर होस्टेल्स असलेल्या कंबोडियात पर्यटक सहजच आठवडाभर राहू शकतो. 

प्रवासाच्या काही पारंपरिक कल्पना विसरून जाऊन जर तुम्ही फिरलात तर नक्कीच ‘जिंदगी वसूल’ होईल...!

(सदराचे लेखक ‘बजेट ट्रॅव्हलर’ असून ‘डू इट युवरसेल्फ’ पद्धतीचे पर्यटक आहेत.)

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com