स्वप्ननगरी दुबई

प्रज्ञेश मोळक pradnyesh.molak@gmail.com
Sunday, 31 January 2021

जिंदगी वसूल
When the WHY is CLEAR, the HOW is EASY असं अनेकदा म्हटलं जातं. तसं पाहायला गेलं तर किती सोपं वाक्य आहे. हाच फंडा भटकंती/भ्रमंतीसाठीदेखील लागू होतो.

When the WHY is CLEAR, the HOW is EASY असं अनेकदा म्हटलं जातं. तसं पाहायला गेलं तर किती सोपं वाक्य आहे. हाच फंडा भटकंती/भ्रमंतीसाठीदेखील लागू होतो. ‘का’ (Why) फिरायचंय हे जर आपल्या मनात ‘स्पष्ट’ (Clear) असेल तर मग ‘कसं’ (How) फिरायचं हे ‘सोपं’ (Easy) असतं! तसं झालं की आपण फार  टेन्शन न घेता भटकू लागतो. नव्या आव्हानांना सामोरं जाऊन आयुष्य अधिक साधं-सोपं करून जगू लागतो.

‘संयुक्त अरब अमिराती’ या देशात जायचं हे वरील ‘फंड्या’नुसार माझ्या मनात स्पष्ट होतं. मी तिथं दोनदा जाऊन आलो. सात अमिरातींचं शासन सात राजे चालवतात. थोडक्यात काय तर, त्या देशात ‘राजवट’ असल्यामुळे लोकांचे खूप गैरसमज आहेत. राजवट म्हटल्यावर आपल्या मनात जे चित्र उभं राहतं तसं तिथं काहीच नाहीये मात्र. प्रबळ इच्छाशक्ती असणारा देश कोणता, असं जर मला कुणी विचारलं तर माझं हमखास उत्तर असेल : संयुक्त अरब अमिराती - United Arab Emirates (UAE).

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या देशांतल्या सात अमिरातींपैकी एक म्हणजे ‘दुबई’. जुन्याचं जतन व नव्याचं अनुकरण करणारी ही दुबई मनाला अधिक भावते. ‘जे काही जगात भारी-भव्य-मोठं असेल ते आमच्या दुबईमध्ये पाहिजे,’ अशी तिथल्या राज्यकर्त्यांची व नागरिकांची भावना आहे. संयुक्त अरब अमिरातीबद्दल, अर्थात् यूएईबद्दल, मला तर एक वेगळं आकर्षण आहेच; परंतु संपूर्ण जगालासुद्धा या देशानं भुरळ घातली आहे. दुबईव्यतिरिक्त अबू धाबी, शारजाह, अजमान, उम्म अल्-क्वाइन, फुजैराह आणि रस अल्-खैमाह अशा सहा अमिरातीसुद्धा भारीच आहेत अन् दुबईला तोडीस तोड अशी नवनिर्मिती त्याही करत आहेत. सन १९७१ ला संयुक्त अरब अमिरातीनं म्हणजेच यूएईनं स्वातंत्र्य घोषित केलं. कमी वर्षांमध्ये जगात उत्तम स्थान मिळवायचं स्वप्न तिथल्या ‘शेख’ मंडळींनी बघितलं आणि आज यूएई हा सर्वोत्तम देश होताना दिसत आहे. 

सप्तरंगचे आणखी लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा

जगातली सर्वात उंच इमारत ‘बुर्ज खलिफा’, जगातलं अत्युत्तम असं सप्ततारांकित हॉटेल ‘बुर्ज अल् -अरब’, मानवनिर्मित ‘पाम जुमेराह’, तसंच भव्य असा ‘दुबई मॉल व फाउंटन’, सौंदर्यानं नटलेलं ‘मिरॅकल गार्डन’, जुनी-नवी दुबई दाखवणारं ‘दुबई फ्रेम’ अशी एकाहून एक भारी ठिकाणं दुबईत आहेत. ही ठिकाणं डोळ्यांचं पारणं फेडतात. संपूर्ण देशात वाळवंट आहेच; पण त्यातही शारजाह इथली ‘वाळवंट-सफारी’ अफलातून आहे. अबू धाबी इथं ‘ग्रॅंड मॉस्क’ व पंचतारांकित हॉटेल्स व तिथूनच जवळ ‘यास आयलंड’ अशी ठिकाणं आहेत. तिथं ‘फेरारी वर्ल्ड’, ‘वॉर्नर ब्रदर्स वर्ल्ड’ व ‘यास मरीना सर्किट’ ही ॲडव्हेंचर पार्क्स आहेत. यूएईतलं सर्वात उंच शिखर असलेलं ‘जेबेल जैस’, तसंच ‘जझीरात अल्-हमरा’, ‘रस अल-खैमाह राष्ट्रीय संग्रहालय’, ‘शिमल’, ‘अल् -हमरा मॉल’, ‘हजर पर्वत’ अशी ठिकाणं रस अल् -खैमाह इथं आहेत. जगातली सर्वात लांब झिप वायर (zipline) ही ‘जेबेल जैस फ्लाइट’ असून तिथं ‘थ्रिल-साधकां’ना ताशी १५० च्या वेगानं समुद्रसपाटीपासून १६८० मीटर उंचीवरून २.८ किलोमीटर लांब खाली घेऊन जाता येतं!  फुजैराह इथंही ट्रेक्स व स्कूबा डायव्हिंगची सोय आहे. अजमान व उम्म अल्-क्वाइन या दोन अमिराती अजून विकसित होत असून तिथं विविध समुद्रकिनारे आणि संग्रहालयं आहेत. 

आखाती देश म्हटल्यावर तेल आहेच; पण त्यावर ते नक्कीच अवलंबून नाहीत हे लक्षात घेतलं पाहिजे. तिथले वाहतूकनियमही खूप कडक असून त्यातूनही भरपूर महसूल त्यांना मिळतो. पर्यटनातूनही बरीच आर्थिक उलाढाल होत असते. इथं अनेक व्यवसाय आहेत. रोजगार आहेत. साधारणतः १२० हून अधिक देशांतले लोक इथं वास्तव्याला आहेत. भारतीय आणि पाकिस्तानी नागरिक इथं एकत्रपणे मैत्रीपूर्ण रीतीनं राहतात. जगभरातल्या हुशार व उच्चशिक्षित लोकांचा या देशाच्या जडणघडणीत मोठा वाटा आहे. आपल्या भारतातले अंदाजे ३४ लाख लोक यूएईत राहतात. त्यात दक्षिण भारतीयांची संख्या अधिक असून, इथली थोडी कमाई ते भारतात पाठवतात व आपापल्या दक्षिणी राज्यांच्या विकासाला हातभार लावतात.
शाश्वत विकासाचं एक नवं मॉडेल यूएईत आहे. बरेच नेते आश्वासनं देत असतात; परंतु तिथले राजे, म्हणजेच ‘शेख’ मंडळी, दिलेली आश्वासनं पूर्ण करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करतात हे नेहमीच दिसून आलं आहे. विशेषतः तिथल्या नवीन पिढीची, तरुणांची जडणघडण या मुद्द्यावर त्यांचा भर असतो. 

ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी त्यांनी जग फिरलं पाहिजे. व्यापक दृष्टीनं जगलं पाहिजे. जगात काय चाललंय अन् आपण काय करतोय याचा आढावा घेतला पाहिजे. प्रत्येक देश काही ना काही शिकवत असतो. आयुष्यात एकदा का होईना; पण यूएईला आणि विशेषतः दुबईला गेलंच पाहिजे. आपलं आयुष्य नक्कीच बदलेल. विचार करण्याची ऊर्जा मिळेल. आपण व्यवसाय करावा असंही वाटेल आणि त्या पद्धतीनं वाटचाल सुरू करता येईल! 

सध्याचा कोविडकाळ लक्षात घेता भ्रमंतीवर बंधनं जरूर आलेली आहेत. मात्र, या काळातही जर तुम्हाला फिरायला जायचं असेल तर सर्वात जवळ व सुरक्षित असा देश म्हणजे यूएई. तिथं फिरायला एक महिनाही तसा कमीच आहे; पण सात ते दहा दिवसांचीही ट्रिप चांगल्यापैकी होऊ शकते.

स्वर्ग कुणीच बघितलेला नसतो. ‘स्वर्ग’ ही एक कल्पना आहे; परंतु तरीही वाळवंटात ‘स्वर्ग’ कसा असू शकतो याची अनुभूती यूएई इथं गेल्यावर नक्कीच येते. आपल्या महाराष्ट्रातला मराठवाडा व यूएई यांच्यात थोडंफार भौगोलिक साम्य आहे. दोन्हीकडे पाणीटंचाई दिसून येते; परंतु ‘पाणी वाचवा, पाणी जिरवा’ असं यूएईत वाचायला मिळत नाही. विज्ञान-तंत्रज्ञान वापरून त्यांनी तो प्रश्न थेटच मार्गी लावलेला आहे! जे जे जगात सर्वोत्तम करता येईल ते ते तिथं करण्याचा मानस तिथल्या ‘शेख’ मंडळींचा व तिथं वास्तव्याला असलेल्या अन्य नागरिकांचाही असतो. हे कौतुकास्पद आहे.

एक स्वप्ननगरी...प्रबळ इच्छाशक्तीचं सर्वसमावेशक-सर्वांगीण विकासरूप, आर्थिक विकासाचं मॉडेल...अशी अनेक विशेषणं आपण यूएईसंदर्भात वापरू शकतो!
(सदराचे लेखक ‘बजेट ट्रॅव्हलर’ असून ‘डू इट युवरसेल्फ’ पद्धतीचे पर्यटक आहेत.)

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pradnyesh Molak Writes about Dreamland Dubai