esakal | कन्याकुमारीतला सूर्योदय
sakal

बोलून बातमी शोधा

kanyakumari sunrise

जिंदगी वसूल
आपले छंद, आवडी आपल्याला मनःपूर्वक जोपासता आल्या आणि त्यातून आनंद मिळाला तर मग ‘जिंदगी वसूल’ असंच त्याचं सार्थ वर्णन होईल ना!  भ्रमंतीच्या छंदानं झपाटलेल्या तरुणाचे अनुभव दर आठवड्याला या सदरात...

कन्याकुमारीतला सूर्योदय

sakal_logo
By
प्रज्ञेश मोळक pradnyesh.molak@gmail.com

सन २०२० वर्ष संपलं अन् २०२१ सुरू होतंय... गेल्या वर्षात आपण काय केलं? ते वर्ष कसं गेलं? या वर्षात आपले काय संकल्प आहेत? गेल्या वर्षीप्रमाणे अनेक महिने आपल्याला घरीच बसावं लागेल का? अशा अनेक प्रश्नांवर सगळेच लोक विचार करतायत. सन २०२० मध्ये काहीच विशेष घडलेलं नाही असंही बहुसंख्य लोकांचं म्हणणं आहे! मात्र, याव्यतिरिक्त आपलं आयुष्य जगत असताना कितीतरी प्रश्न आपल्याला पडले पाहिजेत. कोरोनाच्या महामारीचे दिवस संपत असताना आता आपण नव्या दिशेनं वाटचाल करणार आहोत की नाही? स्वत:साठी जगणार आहोत की नाही? हाही विचार आपण केला पाहिजे. महामारी, आंदोलनं, नैसर्गिक संकटं इत्यादी गोष्टी होतच राहतील. त्या यापूर्वीही थांबल्या नव्हत्या व पुढंही होत राहतील. जात-पात-धर्मापलीकडे जाऊन माणूस म्हणून जगाकडे नव्या नजरेनं पाहायला सन २०२० नं आपल्याला शिकवलंय... तरी एकविसाव्या शतकात आपण फारच पळतोय का? काही ना काही गाठायचंय यासाठीच कष्ट घेतोय का? अशाही गोष्टींचा विचार करण्याची ही वेळ आहे. धकाधकीच्या आयुष्यात थोडंसं ‘स्लो लाईफ’, म्हणजेच जरा मंद गतीनं, आपण आयुष्य जगलो तर ते अधिक भारी होईल असा विचार आपण का नाही करत?

सप्तरंगमधील आणखी दर्जेदार लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सन २०२१ च्या सुरुवातीला काही प्रश्न उपस्थितीत करू या. आपण कुठल्याही देशाच्या पूर्व समुद्रकिनारपट्टीवरून कधी सूर्योदय पाहिलाय? कधी रात्री उशिरा मध्यरात्री बाईक राईड केलीये? कधी आपल्या म्हाताऱ्या आई-वडिलांना किंवा आजी-आजोबांना विमानप्रवास घडवून आणलाय? शंभर-दीडशे किलोमीटर कधी चाललोय का? कधी ‘सोलो ट्रिप’ केलीये का? उत्तरेकडच्या पर्वतरांगांत बर्फ अनुभवलाय का? अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करून ती उत्तरं कृतीत उतरवली पाहिजेत. काही गोष्टी यशस्वी होतील, तर काही अयशस्वीही होतील. कधी तरी अयशस्वी ठरलेले प्रसंगदेखील साजरे केले पाहिजेत! 

जन्मापासून आपण कायमच शिकत आलोय; पण कधी तरी ‘अनलर्निंग’ व्हायचा प्रयत्न केला तर अधिक मजा येऊ शकते. अगदीच चौकटीत जगण्यापेक्षा थोडंसं स्वत:ला सैल सोडून बघूया ना! स्वत: मधमाशीसारखं जगूया ना! प्रवास करत, अनुभव घेत, छोटे-मोठे प्रसंग जगत आयुष्य अधिक समृद्ध करता येतं. ‘ जर्नीज् मेक यू वाईज’ असं कुणीतरी म्हटलंय आणि या जर्नीत किंवा प्रवासात आपण काही तरी शिकू अन् त्याचबरोबर जे काही इतकी वर्षं शिकलोय त्यातल्या काही गोष्टी विसरू या म्हणजेच अनलर्न करू या. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

असं जगण्याचं शिक्षण जगातल्या कुठल्याच मोठ्या विद्यापीठात पैसे देऊन मिळणार नाही; परंतु हे सारं प्रवासातून मिळवू शकतो. एक असतो तो बाह्य प्रवास - जिथं निसर्ग, प्राणी, हवा, डोंगर, दरी, समुद्र, रस्ते, स्मारकं, मंदिरं अनुभवतो, तर दुसरा असतो अंतर्गत प्रवास - ज्यात स्वत: आपल्या आत डोकावून पाहतो, चिंतन करतो, मनन करतो, स्वत:ला विकसित करतो, स्वत:संदर्भात काही काम करतो.

मानवजात मुळातच भटकी आहे; परंतु आपण कुठल्या ना कुठल्या चौकटीत अडकत गेलो. संत तुकाराम महाराज म्हणतात तसं ‘होय मनासी संवादु। आपुलाची वाद आपणासी।।’ या तत्त्वावर आपण कायम चाललं पाहिजे, तरच आपली स्वत:ची वेळच्या वेळी पानगळ होते व आपण पुन्हा नव्यानं बहरतोही! स्वत:शी असाच संवाद व वाद घालण्यासाठी मी २३ डिसेंबर २०२० रोजी सोलो बाईक राईडला जाण्याचा निर्णय घेतला. वडिलांची मेंदूची आणि हृदयाची अशा दोन मोठ्या शस्त्रक्रिया काही महिन्यांपूर्वीच झाल्या. त्यांना त्यातून पूर्णपणे बाहेर येण्यासाठी किमान सहा महिने ते एक वर्षाचा कालावधी जाऊ शकतो. अशा प्रसंगात मी अनियोजित बाईक राईडवर जाण्याचा निर्णय घेऊन निघालो होतो. मी जाऊ नये असंच काहीसं चित्र आईच्या डोळ्यात मला दिसत होते; परंतु २३ डिसेंबरला मी ९९९९ दिवसांचा झालो होतो. अर्थात, २४ डिसेंबर २०२० ला मी २७ वर्षं, चार महिने व १५ दिवसांचा झालो. थोडक्यात काय तर, पृथ्वीवर मी माझ्या आयुष्याचे दहा हजार दिवस पूर्ण केले. यानिमित्त मला काही ना काही तरी करायचं होतं, ज्याचे अनुभव माझ्या आयुष्यात खोलवर रुजतील व त्या आठवणींमध्ये मी जगेन अशी काहीशी भावना माझ्या मनात होती. 

ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे याच्या ‘चांदण्यात भिजायचं राहून जाऊ नये, म्हणून!’ या पुस्तकातल्या ‘मी ५९ व्या वर्षाऐवजी १९ व्या वर्षी कन्याकुमारीस जायला हवं होतं’ या लेखानं मला प्रभावित केलं होतं. तो लेख वाचून मी प्रेरित व्हायचो; पण कन्याकुमारी गाठली नव्हती. आयुष्याचा १०००० वा दिवस साजरा करण्यासाठी या सोलो बाईक राईडसाठी पुणे ते कन्याकुमारी हा प्रवास निवडला अन् दोनच दिवसांत बेंगळुरूमार्गे ‘Benelli TRK 502X’ या गाडीवर १६०० किलोमीटर अंतर कापून सायंकाळी पाच वाजता पश्चिम किनारपट्टीवर सूर्यास्त पाहायला पोहोचलो. तब्बल दोन तास तिथं बसलो. सूर्य मावळतीला जात असताना एकटक त्याच्याकडे बघत बसलो. आपण भारताच्या शेवटच्या टोकाला बसलोय हा आनंदच वेगळा होता. सायंकाळी सात वाजता एका हॉटेलात (Home Stay) मुक्काम केला व ता. २५ डिसेंबर, नाताळ व माझ्या १०००१ व्या दिवशी पूर्व किनारपट्टीवर पहाटे सहा वाजता जाऊन बसलो अन् सूर्योदय अनुभवला. हा माझ्या आयुष्यातला पूर्व किनारपट्टीवरून पाहिलेला पहिला सूर्योदय होता. हा सोनियाचा दिवस येण्यासाठी २७ वर्षं गेली, याबद्दल मनातल्या मनात स्वत:ला हसत होतो, तर दुसरीकडे हा सुंदर क्षण जगतोय म्हणून स्वत:ची पाठही थोपटत होतो! आपल्या देशातलं हे एकच असं गाव आहे, जिथून पूर्व व पश्चिम किनारपट्टीवरून सूर्योदय व सूर्यास्त अनुभवता येतो व ते गाव म्हणजे कन्याकुमारी. भारतभूमीच्या दक्षिण सीमेवरच्या अखेरच्या बिंदूवर मी उभा होतो आणि अरबी समुद्र, बे ऑफ बंगाल व हिंद महासागर अशा तीन समुद्रांचा रोमांचकारी क्षण मी अनुभवत होतो...माझ्यासाठी आयुष्यातला हा एक मैलाचा दगड होता असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

परतीचा प्रवास तुतीकोरिन-चेन्नई- हैदराबाद असा करून मी सात दिवसांनी पुण्यात दाखल झालो. महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश व तेलंगण अशा पाच राज्यांतून तीन हजार १४४ किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला. दक्षिणेकडची शेतजमीन जवळून पाहता आली. तिथली परंपरा व खाद्यसंस्कृती समजली. स्थानिक लोकांकडून राजकीय व सामाजिक परिस्थितीचा आढावा घेता आला. मात्र, या सगळ्यापेक्षा अधिक महत्त्वाचं म्हणजे, स्वत:शी सात दिवस गप्पा मारता आल्या. अंतर्मनात डोकावता आलं. कधी संवाद झाला, तर कधी वादही झाला!
(सदराचे लेखक ‘बजेट ट्रॅव्हलर’ असून ‘डू इट युवरसेल्फ’ पद्धतीचे पर्यटक आहेत.)

Edited By - Prashant Patil

loading image