esakal | भारतातील साहसी प्रवास...
sakal

बोलून बातमी शोधा

केरळमधील कायकिंग.

जिंदगी वसूल
प्रवासानं माणूस समृद्ध होतो असं आपण नेहमी ऐकतो; परंतु आयुष्यातील किती काळ आपण प्रवास करण्यात घालवतो याचा हिशेब लावला तर तो फारच कमी असतो. You choose the life you want to have असं म्हटलं जातं, म्हणून रोजच्या आयुष्यातून वेळ काढून आपण थोडंफार का होईना फिरलं पाहिजे, प्रवास केला पाहिजे.

भारतातील साहसी प्रवास...

sakal_logo
By
प्रज्ञेश मोळक pradnyesh.molak@gmail.com

प्रवासानं माणूस समृद्ध होतो असं आपण नेहमी ऐकतो; परंतु आयुष्यातील किती काळ आपण प्रवास करण्यात घालवतो याचा हिशेब लावला तर तो फारच कमी असतो. You choose the life you want to have असं म्हटलं जातं, म्हणून रोजच्या आयुष्यातून वेळ काढून आपण थोडंफार का होईना फिरलं पाहिजे, प्रवास केला पाहिजे. युरोपीय देशांतील तरुणाई तर वयाच्या तिशीच्या आत ३०-४० देश फिरून घेते. त्यांच्याकडे पैसे वगैरे जास्त असतात असं काही नाही. मी अनेक बजेट ट्रॅव्हलर पाहिले आहेत व काही जणांना ओळखतोही. त्यांचा हेतू स्पष्ट असतो म्हणून ते खऱ्या अर्थानं जगतात असं म्हणायला हरकत नाही. 

गेल्या १० वर्षांत भारतातही तसं फिरण्याचा, भटकंतीचा ट्रेंड येऊ घातलाय याचा आनंद आहे. तुलनेनं तो कमीच असला तरी तो समाधानकारक आहे. विविध पद्धतींचे प्रवास आपण ठरवून केले पाहिजेत. आज मला साहसी प्रवासाबद्दल सांगायचंय. साहसी प्रवास म्हणजे नक्की काय? जगभरात किती व कुठले साहसी प्रकार आहेत? त्या साहसी क्रिया सुरक्षित असतात का? असे अनेक प्रश्न मनात येऊ शकतात. असे प्रश्न मनात आलेही पाहिजेत, तरच आपण काही ‘हट के साहसी प्रवास’ करण्याचं धाडस करू शकू असं मला वाटतं आणि अशा अनुभवांतून आपला आत्मविश्वासही अधिक वाढेल यात शंका नाही. 
आपल्याला काय करायचंय ते आपण ठरवायचंय हे मी जे आधी म्हणालो ते याच अर्थानं. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

साहसी प्रवास आपल्याला मानसिक आणि शारीरिकरीत्या विकसित करतो. जगात शेकडोहून अधिक साहसी प्रकार आहेत. अमेरिकेतील ‘अ‍ॅडव्हेंचर ट्रॅव्हल ट्रेड असोसिएशन’च्या मते, साहसी प्रवास ही कोणतीही पर्यटनक्रिया असू शकते, जीमध्ये शारीरिक क्रिया घडते, सांस्कृतिक देवाण-घेवाण होते आणि निसर्गाचं सान्निध्यही तीत असू शकतं. आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पाऊल ठेवून आव्हानं स्वीकारण्याचा प्रयत्न केला तर विलक्षण अनुभव येतील. 

साहसी प्रवासात पर्वतारोहण, ट्रेकिंग, बंजी जंपिंग, माउंटन बायकिंग, सायकलिंग, कॅनोइंग, स्कूबा डायव्हिंग, स्काय डायव्हिंग, रोड बायकिंग, राफ्टिंग, कयाकिंग, झिप-लायनिंग, पॅराग्लायडिंग, रॅपलिंग, स्कीइंग, ग्लेशियर क्लायंबिंग, पॅरासेलिंग, सर्फिंग, हायकिंग, एक्सप्लोरिंग, केव्हिंग आणि रॉक क्लायंबिंग यासारख्या अनेक क्रियांचा समावेश होतो. यातील बहुतांश प्रकार आपण भारतात करू शकतो इतका विविधतेनं नटलेला आपला देश आहे. समुद्रापासून ते पर्वतरांगांपर्यंत आपल्या देशात सर्वच गोष्टी आहेत.

सप्तरंगमधील आणखी लेख वाचण्यासाठी क्लिक करा. 

स्कीइंग : हा प्रकार उत्तर भारतातील गुलमर्ग, जम्मू, औली, मनाली, सोलंग व्हॅली इथं अनुभवता येऊ शकतो. स्कीइंगसाठी गुलमर्गला जगातील नववं सर्वोत्कृष्ट स्थान देण्यात आलं आहे, 

सर्फिंग, स्कूबा डायविंग व काईट सर्फिंग : या प्रकारासाठी दक्षिण भारतातील मंगळुरू, कोवलम्, रामेश्वरम्, वरकाला, तुतीकोरीन, तसंच तारकर्ली, गोवा अंदमान-निकोबार बेटे अशा ठिकाणी जाता येऊ शकतं. 

ट्रेकिंग, रॉक-क्लायंबिंग, रॅपलिंग, व्हॅली क्रॉसिंग :  यासाठी आपल्या महाराष्ट्रातील सह्याद्रीरांगा सर्वोत्तम आहेत. याशिवाय नैसर्गिक सौंदर्य असलेल्या हिमालयाच्या पर्वतरांगांमध्येही हे प्रकार करता येऊ शकतात.  

बंजी जंपिंग, माउंटन बायकिंग, रोड बायकिंग, पॅराग्लायडिंग अन् हायकिंग :  हे प्रकार हिमालयाच्या पर्वतरांगा, काराकोरम्, पीर पंजालरांगा, पूर्वांचलरांगा, सातपुडा आणि विंध्यरांगा, अरवलीरांगा, पश्चिमघाट आणि पूर्वघाट अशा भारतातील सात प्रमुख पर्वतरांगांमध्ये करता येऊ शकतात. 

साहसी क्रियांचं प्रशिक्षण सर्व उपकरणांसह सुरक्षितपणे भारतात विविध ठिकाणी होतं. कुठल्याही वयातील व्यक्ती आपापल्या इच्छाशक्तीनुसार साहसी प्रकार करू शकते. मी भारतातील १९ राज्यांत गेलो असून अनेक साहसी प्रकार केले आहेत. आपला देश प्रचंड मोठा आहे आणि येथील भाषा, खाद्यसंस्कृती व राहणीमान हे दर शंभर-दीडशे किलोमीटरवर बदलते. भारताची एकूण किनारपट्टी सात हजार ५१६ किलोमीटरची असून तीमधल्या मुख्य भूप्रदेशाची किनारपट्टी सहा हजार १०० किलोमीटरची आणि बेटांची किनारपट्टी एक हजार १९७ किलोमीटरची आहे. भारतीय किनारपट्टी ही नऊ राज्ये आणि चार केंद्रशासित प्रदेशांतून जाते. गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगाल अशी ती नऊ राज्ये आहेत. केंद्रशासित प्रदेशांत दमण आणि दीव, पुड्डुचेरी, अंदमान आणि निकोबार बेटे आणि लक्षद्वीप बेटे यांचा समावेश आहे.

देशातील प्रमुख पर्वतरांगा आणि एवढी मोठी किनारपट्टी असेल तर साहसी प्रवासासाठी किती जागा किंवा ठिकाणं आहेत आपल्या भारतात ते तुम्हीच ठरवा!  जगाच्या पाठीवर तर साहसी प्रवास करण्याचे  लाखो पर्याय उपलब्ध आहेत. फक्त आपली शोधक अन् भेदक नजर हवी व काहीतरी वेगळं करून जगण्याची जिद्द हवी, तर मग आपण नक्कीच ‘साहसी प्रवासी किंवा साहसी साधक बनू शकू!
(सदराचे लेखक ‘बजेट ट्रॅव्हलर’ असून ‘डू इट युवरसेल्फ’ पद्धतीचे पर्यटक आहेत.)

Edited By - Prashant Patil

loading image