‘आठ हजार मीटर’चं विश्व!

आज मला सर्वात अवघड अशा मोहिमांबद्दल तुम्हाला सांगायचंय. त्या मोहिमा सर्वसामान्य माणसांना सहजासहजी शक्य होणार नाहीत.
Mount Everest
Mount EverestSakal

दरवर्षी मार्च ते नोव्हेंबर हे महिने हिमालयात ट्रेकिंग अथवा गिर्यारोहणमोहीम करण्यासाठी योग्य समजले जातात. मात्र, सन २०२०-२१ मध्ये कोरोनाच्या महामारीमुळे अनेक गिर्यारोहकांना ट्रेकिंगला जाता आलं नाही. तरीही थोड्याफार गिर्यारोहकांनी काही मोहिमा केल्याच. ‘महामारीतून ब्रेक पाहिजे,’ अशी भावना बऱ्याच प्रवाशांची असल्यामुळे हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, लडाख, पाकिस्तान, तिबेट व नेपाळ या ठिकाणी जाण्याची ओढ गिर्यारोहकांना कायम लागलेली असते. गिर्यारोहक आपापल्या कुवतीनुसार ट्रेक्स करतात. महाराष्ट्रात लाखो लोक सह्याद्रीत बरेच गड-किल्ले सर करतात आणि मग तिथूनच त्यांना हिमालयात जायची इच्छा निर्माण होते. गिर्यारोहण सर्वांनाच जमतं असं नाही; परंतु जमूच शकत नाही असंही नाही. प्रयत्न करून व योग्य प्रशिक्षण घेऊन हिमालयातील काही गिर्यारोहणमोहिमा करणं नक्कीच शक्य आहे.

मात्र, आज मला सर्वात अवघड अशा मोहिमांबद्दल तुम्हाला सांगायचंय. त्या मोहिमा सर्वसामान्य माणसांना सहजासहजी शक्य होणार नाहीत. कुठल्या कठीण मोहिमांबद्दल बोलतोय मी? तर जगात ‘आठ हजार मीटर’ची चौदा शिखरं आहेत. त्यांना The Death Zone: Eight Thousanders असंही म्हटलं जातं. त्यापैकी सात शिखरं ही नेपाळमध्ये, पाच पाकिस्तानात आणि दोन तिबेटमध्ये आहेत (ही दोन शिखरं चीनचीही समजली जातात. कुठल्या देशात कुठलं शिखर याविषयी थोडा वाद-विवाद कायम आहे). आणि होय, एव्हरेस्ट म्हणजेच सागरमाथा हे त्यातील सर्वात उंच शिखर!

The wonderful things in life are the things you do, not the things you have असं जगप्रसिद्ध गिर्यारोहक रायनॉल्ड मेसनर (Reinhold Messner) म्हणतात. जीवनात आपल्याकडे कुठल्या गोष्टी आहेत याला महत्त्व नसून, आपण कुठल्या गोष्टी करतो याला महत्त्व आहे, हा या विधानाचा आशय.

असं केल्यानंच जीवनाचं मूल्यमापन होऊ शकतं. इटालियन असलेले मेसनर यांनी सन १९७० ते १९८६ दरम्यान ८००० मीटरहून जास्त उंच असणारी चौदाच्या चौदा शिखरं सर केली आणि हा विक्रम करणारे ते जगातील पहिली व्यक्ती ठरले. एवढंच नव्हे तर, त्यांनी ही सर्व शिखरं ऑक्सिजनच्या बाह्य मदतीशिवाय सर केली हे विशेष. त्यानंतर एदुर्ने पॅसाबान (Edurne Pasaban) ही स्पॅनिश महिला हा विक्रम करणारी पहिली महिला ठरली. तिनं ही चौदा शिखरं सन २००१ ते २०१० मध्ये सर केली. आतापर्यंत ८००० मीटरची ही चौदा शिखरं फक्त ४३ गिर्यारोहकांनी सर केलेली आहेत. जगाची लोकसंख्या ७५० कोटी असून, त्यातील ४३ लोकांनीच ही मोहीम फत्ते केली आहे, म्हणून मी या मोहिमांना ‘साहसी विश्वातील सर्वात अवघड मोहिमा’ असं म्हणतो.

एडमंड हिलरी व तेनसिंग नॉर्गे ऊर्फ शेर्पा तेनसिंग या दोघांनी २९ मे १९५३ रोजी एव्हरेस्ट म्हणजेच सागरमाथा सर केलं आणि ही चढाई करणाऱ्या, त्या जगातील पहिल्या दोन व्यक्ती ठरल्या. एव्हरेस्ट मोहीम शेकडो भारतीयांनी केली आहे ही अभिमानाचीच गोष्ट आहे. भोसरीतील माझे मित्र एव्हरेस्टवीर श्रीहरी तापकीर यांच्याकडून नेहमीच त्यांचे अनुभव ऐकल्यावर या चढाईची उत्तुंगता व थरारकता लक्षात येते, तसंच मागील महिन्यात प्रथमच महाराष्ट्रातील सहा गिर्यारोहकांनी ‘अन्नपूर्णा’वर (Annapurna I - 8091m) यशस्वी चढाई केली. त्यात ही मोहीम करणारी प्रियांका मोहिते ही पहिली भारतीय महिला ठरली. ‘अन्नपूर्णा’ला The deadliest mountain in the world असं म्हटलं जातं. थोडक्यात काय तर, या ८००० मीटरच्या शिखरांवर चढाई करणं हे काही सोपं काम नव्हे!

कुठली आहेत ही ८००० मीटरची शिखरं? तर नेपाळ मधील ८८४८ मीटरचं एव्हरेस्ट (Everest), ८१६७ मीटरचं धौलगिरी (Dhaulagiri), ८५८६ मीटरचं कांचनजुंगा (Kanchenjunga), ८०९१ मीटरचं अन्नपूर्णा (Annapurna I), ८५१६ मीटरचं लोत्से (Lhotse), ८४८५ मीटरचं मकालू (Makalu) व ८१६३ मीटरचं मनासलू (Manaslu) ही ती शिखरं होत. याशिवाय, ८०८० मीटरचं गाशेरब्रुम (Gasherbrum I), ८०३४ मीटरचं गाशेरब्रुम (Gasherbrum II), ८१२५ मीटरचं नंगा पर्बत (Nanga Parbat), ८६११ मीटरचं केटू (K2) व ८०५१ मीटरचं ब्रॉड पीक (Broad Peak) ही पाकिस्तानमधली शिखरं आहेत. याबरोबरच ८२०१ मीटरचं चो ओयू (Cho Oyu) व ८०२७ मीटरचं शिशापांगमा (Shishapangma) ही शिखरं तिबेटमध्ये आहेत. चो ओयू हे शिखर त्यातल्या त्यात चढाईसाठी थोडं सोपं मानलं जातं. प्रत्येक ठिकाणी हवामानाचा अंदाज घेऊनच मोहिमा आखल्या जातात. काही वेळा हवामान योग्य ती साथ देत नाही आणि म्हणून मोहिमा रद्दही कराव्या लागतात; परंतु प्रत्येक चढाई ही काही ना काही शिकवून जाते. गिर्यारोहकाला शारीरिक व मानसिकदृष्ट्या बळकट करते. नेपाळमधील अनेक गिर्यारोहक, जे शेर्पा किंवा पोर्टर म्हणून काम करतात, त्यांच्यासाठीदेखील या चढाया कठीणच असतात. शिक्षण न झाल्यामुळे आणि पोटापाण्यासाठी काही नेपाळी लोकांना हे काम करावं लागतं. अनेक शेर्पा अशा मोहिमा करताना मरण पावले आहेत. खरं तर ८००० मीटरचं कुठलंही शिखर सर करताना जीव धोक्यात असतोच. त्या ठिकाणाची तीव्रता आपल्याला काही व्हिडिओंमधून किंवा सिनेमांमधून कळते.

गिर्यारोहकांचं एक वेगळंच विश्व आहे असं मला नेहमी वाटतं. ते एकमेकांमध्ये प्रेरणा शोधत असतात. गेल्या दोन-तीन दशकांत जगानं ‘एक से बढकर एक’ असे गिर्यारोहक पाहिले. त्यातले काहीजण अजूनही लोकांना प्रेरणा देतात, तर काहीजण दुर्दैवानं मरण पावले आहेत. अशा मोहिमांसाठी खूप खर्चही येतो. लोकवर्गणीतून काही मोहिमा होतातही; परंतु ही शिखरं सर करण्यासाठी काही गुण आवश्यक असतात व ते म्हणजे जिद्द, चिकाटी, समर्पण आणि झपाटलेपण...!

खरं तर हे ‘आठ हजार मीटर’चं विश्व वेगळंच असून गिर्यारोहण हा विषयही खूप मोठा आहे. तो केवळ काहीशे शब्दांत मांडणं कठीण आहे. तरीपण शेवटी, मला अजून दोन गिर्यारोहकांबद्दल तुम्हाला सांगायचंय. दोघं नेपाळी आहेत. एक म्हणजे मिंगमा ग्याबू शेर्पा (Mingma Gyabu Sherpa). याने ही चौदा शिखरं वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षी सर केली आणि ‘जगातील सर्वात तरुण गिर्यारोहक’ या विक्रमाची नोंद त्याच्या नावावर झाली, तर दुसरा म्हणजे निर्मल पुर्जा (Nirmal Purja). याने ही सर्व चौदा शिखरं फक्त ६ महिने ६ दिवसांत म्हणजेच, १८९ दिवसांत, यशस्वीरीत्या सर केली आणि विश्वविक्रम घडवला. कमीत कमी वेळात हा विक्रम करणारा तो पहिला ठरला; किंबहुना तसा तो एकमेवच आहे. Climbing is our passion, adventure is our lifeblood and the Himalayas are our home असं निर्मल पुर्जा अभिमानानं सांगतो. खरंच, जगातील गिर्यारोहकांनी यातील कुठलंही शिखर सर केल्यावर On The Top of the World अशी त्यांची भावना झाल्याशिवाय राहणार नाही.

गेले काही महिने ‘जिंदगी वसूल’ हे सदर तुम्ही वाचत आहात आणि आयुष्य जगण्याच्या नवनवीन कल्पनांवर आपण चर्चा करत आहोत. आपण प्रवासी कुठंही फिरायला मिळालं तरी आनंद मानणारे असतो. थोडा विचार करा की ८००० मीटरच्या चौदा शिखरांपैकी एक जरी शिखर एखाद्या गिर्यारोहकानं सर केलं तर त्या व्यक्तीच्या भावना काय असतील? आता त्यांची ‘जिंदगी वसूल’ म्हणायची की आपली? सहज हा प्रश्न स्वतःला विचारा...उत्तर लगेच सापडेल असं नाही; परंतु या गिर्यारोहकांचं आपण कौतुक तर करू या...त्यांच्या कहाण्या वाचू या... त्यांचे व्हिडिओ पाहू या...आणि त्यांचे अनुभव ऐकू या...हे जरी आपण नीट केलं ना...तरी आपली ‘जिंदगी वसूल’ होईल याची मला खात्री आहे...!

(सदराचे लेखक ‘बजेट ट्रॅव्हलर’ असून ‘डू इट युवरसेल्फ’ पद्धतीचे पर्यटक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com