सेंटिनेलीझ 'हट के' जमात

अंदमान-निकोबार बेटावरची सेंटिनेलीझ जमात.
अंदमान-निकोबार बेटावरची सेंटिनेलीझ जमात.

‘जिंदगी वसूल’ करणं म्हणजे नुसती मजा मारणं नव्हे, तर आपण पहिल्याप्रथम माणूस आहोत हे स्वत:ला बजावत राहून जगाकडे बघण्याचा आपला स्वतंत्र दृष्टिकोन तयार करणं होय. जगभर फिरत असताना संवेदनशील मनानं वागणं, आयुष्याचा समतोल साधणं, इतरांचे प्रश्न समजून घेणं, उदारमतवादी होणं, दुसऱ्याला त्रास होणार नाही हे पाहणं आणि थोडं सैल, तर थोडं शिस्तबद्ध जगणं म्हणजे जिंदगी वसूल करणं! स्वत:च्या जीवनाचे विविध दरवाजे उघडत जीवन चहूअंगांनी अनुभवणं म्हणजे ‘जिंदगी वसूल’ करणं. पृथ्वी, पर्यावरण, डोंगर-नद्या, पशू-प्राणी यांच्या तुलनेत आपण फारच लहान आहोत हे स्वत:ला सांगत राहण्यानं आयुष्य सुखकर होत जातं.

आज मला आपल्या देशाविषयीची एक वेगळीच गोष्ट सांगायची आहे. भारतालगतच्या ‘बे ऑफ बंगाल’ सागरात अंदमान आणि निकोबार ही बेटं आहेत हे सगळ्यांनाच माहीत आहे. 

‘ग्रेट अंदमानीज्’बरोबरच ‘जारावास’, ‘ओंगे’, ‘शॉम्पेन’ आणि ‘निकोबारिस’ या तिथल्या काही जमाती. त्यातलेच ‘सेंटिनेलीझ’ किंवा ‘सेंटिनेल’ हे अंदमान आणि निकोबार या बेटांवरच्या सहा मूळ, तसंच काही विलग जमातींपैकी (आयसोलेटेड) एक होत. त्यांना ‘रिक्लुजिव्ह पीपल’ म्हणजेच इतरांपासून लांब राहणारे लोक असं म्हटलं जातं. उत्तर सेंटिनेल (नॉर्थ सेंटिनेल) बेटावर ही स्वदेशी जमात राहते. ती इतरांपासून स्वतःला कित्येक वर्षं लांब ठेवत आली आहे.

सन १९५६ मध्ये भारत सरकारनं उत्तर सेंटिनेल बेटाला ‘आदिवासी राखीव’ घोषित केलं आणि त्या बेटाभोवतीच्या पाच किलोमीटर परिसरातल्या प्रवासाला मनाई केली. तिथं छायाचित्रं काढायलाही बंदी असून तसा कायदाच आहे. बाहेरच्या लोकांकडून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, अंदमान आणि निकोबार इथल्या अशा विविध जमातींची प्रथम नोंद सन १७७१ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या ‘हायड्रोग्राफिक सर्व्हे’मध्ये आढळते. त्याला ‘फर्स्ट रेकॉर्डेड सायटिंग’ असं म्हटलं गेलं. पुढं १८६७ ला भारतीय व्यापारी-जहाज तिथं गेलं. त्यातले प्रवासी समुद्रकिनाऱ्यावर न्याहारी करत असताना, लाल केसांचे आणि विवस्त्र असलेले काही लोक त्या प्रवाशांच्या दृष्टीस पडले. त्यांच्या हातात लोखंडाचं धनुष्य आणि बाण होते. त्यांच्याशी तेव्हा झालेला हा ‘फर्स्ट रेकॉर्डेड कॉन्टॅक्ट’ होय. हे लोक जारावास जमातीचे होते हे नंतर लक्षात आलं.  

मग सेंटिनेलीझ जमातीशी संपर्क करता यावा यासाठी ब्रिटिश नौदल अधिकारी मॉरिस विडाल पोर्टमन यांनीसन १८८० मध्ये पुढाकार घेऊन काही सहकाऱ्यांसमवेत उत्तर सेंटिनेल बेटाकडे कूच केलं. त्यांना पाहून सेंटिनेलीझ जमातीचे लोक झाडा-झुडपांमध्ये पळून गेले. 

काही दिवसांनी पोर्टमन यांनी जमातीमधला एक पुरुष व स्त्री आणि त्यांची चार मुलं अशा सहा जणांना ताब्यात घेतलं. त्यांना पोर्ट ब्लेअर इथं आणण्यात आलं; परंतु काही दिवसांतच ते जोडपं मरण पावलं. त्या जोडप्याची चारही मुलं आजारी पडली. पोर्टमननं त्या चार मुलांना तातडीनं उत्तर सेंटिनेल बेटावर नेऊन सोडलं. पुढं पोर्टमन यांनी सन १८८३, सन १८८५ व सन १८८७ अशी तीनदा त्या बेटाला भेट दिली.  

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सन १९६७ ते १९९१ या कालावाधीत मानववंशशास्त्रज्ञ टी. एन. पंडित यांनी भारत सरकार, लष्कर व नॅशनल जिओग्राफिक यांच्या सहकार्यानं उत्तर सेंटिनल बेटावर काही मोहिमा केल्या. मैत्रीपूर्ण संवाद साधणं हा हेतू. सेंटिनेलीझ लोकांना काही भेटवस्तूसुद्धा पाठवण्यात आल्या; पण या कशालाच त्या लोकांनी प्रतिसाद दिला नाही व काही वेळा हिंसक चकमकीही झडल्या.  काही वेळा सेंटिनेलीझ जमातीनं स्वागत केल्यासारखं दाखवलं, तर काही वेळा काही चमत्कारिक पोझही दिल्या. बऱ्याचदा भेटवस्तू स्वीकारण्यासाठी ते यायचे, तर काही वेळा धनुष्य-बाण घेऊन हल्लाही करायचे. या सगळ्याचं चित्रीकरणही अनेकदा करण्यात आलं. थोडक्यात काय तर, सेंटिनेलीझ जमातीला संपर्क आवडत नाही, हे पंडित यांना जाणवलं.

सन १९९१ ला मात्र या जमातीशी शांततापूर्ण संपर्क प्रस्थापित करण्यात यश आलं. मानववंशशास्त्रज्ञ मधुमाला चट्टोपाध्याय यांनी एक टीम स्थापन करून हा संपर्क प्रस्थापित केला. नवीन येणाऱ्या माणसांना भेटताना सेंटिनेलीझ जमातीच्या लोकांच्या हातात शस्त्र नाही अशी स्थिती ता. चार जानेवारी १९९१ ला पहिल्यांदाच निर्माण झाली. तरी त्यातल्या एकाच्या हाती धनुष्य-बाण होतंच; परंतु एका महिलेनं तो बाण खालच्या दिशेनं वळवला आणि मग त्या माणसानं धनुष्यही खाली टाकून दिलं. मधुमाला यांनी पहिल्यांदा जवळून त्यांच्याशी संपर्क साधला. पुढं पंडित व चट्टोपाध्याय या दोघांनी एकत्रितपणे ता. २४ फेब्रुवारी १९९१ ला पुन्हा तिथं भेट दिली. सन १९९४ पर्यंत अशा मोहिमा चालल्या. नंतरच्या काळात, हेतू नसल्यास संपर्क टाळण्याचं धोरण भारत सरकारनं स्वीकारलं. मग पुढची नऊ वर्षं सगळं ठप्प झालं. 

सन २००४ च्या सुनामीनंतर एक हेलिकॉप्टर पाहणीसाठी तिथं गेलं असता जमातीतल्या एका पुरुषानं धनुष्य-बाण चालवलं. ता. २७ जानेवारी २००६ ला सुंदरराज व पंडित तिवारी यांची मासेमारीची बोट चुकून तिथं गेली. सेंटिनेलीझ जमातीच्या माणसांनी त्यांच्यावर हल्ला चढवला व कुऱ्हाडीचा वापर करून दोघांचे प्राण घेतले. त्यांचे मृतदेह परत आणता आले नाहीत. त्यानंतर उत्तर सेंटिनेल बेट नोव्हेंबर २०१८ मध्ये पुन्हा चर्चेत आलं. २६ वर्षांचे अमेरिकी जॉन ॲलन चाऊ हे ख्रिश्चन धर्माचा प्रचार-प्रसार करण्यासाठी - मच्छीमारांना लाच देऊन - बेकायदेशीररीत्या तिथं गेले असता सेंटिनेलीझ जमातीच्या लोकांनी त्यांचाही प्राण घेतला. तोही मृतदेह दिसला; पण परत आणता आला नाही. जॉन यांना मदत करणाऱ्या मच्छीमारांना पोलिसांनी अटक केली. 

तर हे सगळं भयंकर आहेच; परंतु जग वगैरे काही अस्तित्वात आहे हे सेंटिनेलीझ जमातीला खरोखरच माहीत नसेल. तिथली लोकसंख्या नेमकी किती आहे ते माहीत नाही; परंतु ५० ते २०० लोक असू शकतात असा एक अंदाज लावला जातो. सन २०२० मध्ये आपण सगळे कोरोनाच्या महामारीमुळे काही महिने विलग होतो; परंतु ही सेंटिनेलीझ जमात काही शतकांपासून ‘विलग जमात’ (आयसोलेटेड ट्राईब) आहे. आपल्या सगळ्यांचं आयुष्य या महामारीमुळे बदललं; परंतु सेंटिनेलीझ जमात किती तरी वर्षांपासून तशीच आहे, याचा विचार केला की मन सुन्न होऊन जातं. त्यांना त्यांचं आयुष्य जसं आहे तसंच जगायचं आहे व तो त्यांचा मूलभूत अधिकार आहे. ते त्यांच्या पद्धतीनं त्यांची ‘जिंदगी वसूल’ करत असतील अशी आपण आशा बाळगू या व त्यांच्या अस्तित्वाच्या लढाईसाठी सदिच्छा देऊ या. खरंच, या जगातल्या सगळ्यात वेगळ्या जमातींपैकी एक असणाऱ्या सेंटिनेलीझ जमातीला सलाम!

(सदराचे लेखक ‘बजेट ट्रॅव्हलर’ असून ‘डू इट युवरसेल्फ’ पद्धतीचे पर्यटक आहेत.)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com