सुबक देखणं सिंगापूर

शेकडो वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वर महाराजांनी ‘ हे विश्वची माझे घर’ असं लिहून ठेवलंय. सर्व संत किती पुढचा विचार करणारे होते हे यावरून दिसते.
singapore
singaporesakal

शेकडो वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वर महाराजांनी ‘ हे विश्वची माझे घर’ असं लिहून ठेवलंय. सर्व संत किती पुढचा विचार करणारे होते हे यावरून दिसते. जगातील अनेक देश आपले शेजारी आहेत. एक काळ होता जेव्हा कुठेही प्रवास करायचा म्हटलं तर काही महिने लागायचे आणि आता जगात कुठेही अवघ्या २४ तासात जाता येतं. पूर्वीसारखं फिरणं अवघड राहिलं नाही. फिरण्यासाठी हवी फक्त इच्छा व ध्येय. शोधत गेलं की दिशा सापडते आणि दिशा सापडली की मग बदल व्हायला सुरुवात होते. फिरणं खूप काही शिकवून जातं. मला जसं समजायला लागलं तेव्हापासून फिरू लागलो. सुदैवाने माझ्या पालकांनी मला काही बंधनं घातली नाहीत. त्यामुळे स्वतंत्रपणे जग पाहू लागलो. बऱ्याच वेळा एकटं म्हणजेच सोलो फिरण्याचा योग आला. नंतर तर ठरवून ‘सोलो प्रवास’ करू लागलो.

सोलो ट्रॅव्हलचा फायदा असा आहे की, तुम्हाला स्थानिक लोकांशी अधिक चांगल्या प्रकारे कनेक्ट होण्याची संधी मिळते. जेव्हा आपण आपल्या लोकांसोबत प्रवास करतो तेव्हा आपण त्यांच्याचसोबत असतो, त्यामुळे अनेकदा स्थानिक लोकांशी आपली ओळखही होत नाही. सोलो ट्रॅव्हल हा अनुभव आपल्याला, विविध प्रकारे नातेसंबंध निर्माण करण्याच्या दृष्टीने आणि स्थानिक लोकांसोबत अधिक वेळ घालवण्याच्या दृष्टीने सखोल देश एक्स्प्लोअर करण्याची संधी प्राप्त करून देतो. त्यामुळे दोस्तहो, आयुष्यात कधी तरी सोलो प्रवास कराच...!

सध्या युरोपात पुन्हा कोरोनाने धुमाकूळ घातलाय. काहीच्या काही संख्येत केसेस वाढत आहेत. काही देशांनी तर लॉकडाऊन लागू केलंय. अशात मात्र आग्नेय आशियातील काही देशांनी प्रवाशांसाठी त्यांची दारं खुली केली आहेत. एवढंच काय तर भारताने देखील एका झटक्यात बहुसंख्य पर्यटकांसाठी परवानगी दिली आहे.

या साऱ्यात सिंगापूर या देशाने तब्बल २० महिन्यानंतर लसीकरण झालेल्या लोकांसाठी परवानगी दिलीये. गेल्या १० दिवसात पन्नास हजारच्या आसपास प्रवासी सिंगापूरमध्ये दाखल झाले आहेत. कित्येक महिन्यांपासून मला या देशाबद्दल तुम्हाला सांगायचे होते. आज योग आलाय... तर जाणून घ्या तो देश आणि तिकडे जाण्याच्या दिशेने पावलं उचला...!

सिंगापूरला मी २०१९ मध्ये गेलो होतो. आपले ५५ रुपये म्हणजे एक सिंगापूर डॉलर. तसा महाग देश पण छोटा असल्यामुळे ५- ६ दिवसात फिरुन होतो आणि खर्चही बजेटमध्ये होतो. बजेट प्रवास करायचा असेल ना... तर काही मुद्दे लक्षातच ठेवा:

  • वेळ आणि ठिकाण या दोन्ही गोष्टींसाठी लवचिक रहा.

  • ओव्हरलँड प्रवास करा. (म्हणजे जवळच्या देशात प्रवास करा. विमानखर्च कमी होईल.)

  • प्रवासासाठी तुमचे संशोधन म्हणजेच रिसर्च करा. साहसी रहा. नवीन काही तरी ट्राय करण्याचा प्रयत्न करा. स्थानिक पातळीवरचे रस्त्यावरचे फूड खा.

  • मोफत टूर घ्या. काही ठिकाणी अशा टूर्स मिळतात. किंवा वाहतुकींच्या लोकल सोयीचा प्रवास करा.

  • तुम्ही प्रवास करत असताना कमवा किंवा किमान बचत करा.

अशा अजून काही गोष्टी लक्षात ठेवून त्या अंमलात आणायच्या. असं करत राहिलात की मग पुढे हळू हळू तुम्हीच काहीतरी जुळवाजुळव कराल यात शंका नाही.

पुणे शहराचे क्षेत्रफळ ५१६ चौरस किलोमीटर आहे तर पिंपरी चिंचवड शहराचे १८१ चौरस किलोमीटर आहे. दोन्ही शहरांचे एकूण क्षेत्रफळ ६९७ चौरस किलोमीटर आहे. सिंगापूर या देशाचे क्षेत्रफळ ६९७ चौरस किलोमीटर आहे. थोडक्यात काय तर देश छोटा आहे. सहज फिरून होतो.

काही प्रवासी सिंगापूरला तिथली कॉर्पोरेट मानसिकता, कठोर कायदे आणि उच्च किंमतींसाठी नाकारतात, परंतु या आग्नेय आशियाई महानगरस्वरुपाच्या देशातले वातावरण खूपच सुंदर आणि आधुनिक आहे. प्रवाशांना तिथल्या अप्रतिम हिरव्यागार जागा, उत्तम खरेदी, अप्रतिम खाद्यपदार्थ आवडते. भारतीय, चिनी आणि मलय संस्कृतीचे मिश्रण तिथे पाहायला मिळते आणि तीच खरी त्या राष्ट्राची ओळख आहे. आता बँकॉक आणि हाँगकाँगशी स्पर्धा करू शकणार्‍या वाढत्या तत्परतेसह, विकसित परिसर आणि जागतिक दर्जाची संग्रहालये व गॅलरीपासून ते ऐतिहासिक मंदिरांपर्यंत, तेथे पाहण्यासारखे बरेच काही आहे. याहून भारी म्हणजे सिंगापूर उत्कृष्टपणे सुव्यवस्थित आणि कुटुंबांसाठी योग्य आहे.

सिंगापूरची सर्वात जास्त शो-स्टॉपिंग हिरवीगार जागा: गार्डन्स बाय द बे, सिंगापूरच्या विलक्षण संग्रहालय आणि गॅलरी दृश्यातील नवीन तारा : नॅशनल गॅलरी सिंगापूर, चायनाटाउन - लिटल इंडिया आणि कॅम्पॉन्ग क्लॅममधील रंगीबेरंगी मंदिरे आणि विस्तृत मशिदी हे सारं बघितलेच पाहिजे. या सर्व ठिकाणी एक सकारात्मक ऊर्जा आहे असं म्हणायला हरकत नाही. कॅफे आणि बुटीकने खचाखच भरलेली, १९३० च्या दशकातीळ पुनरुज्जीवित झालेली तियॉन्ग बहरू (Tiong Bahru) ही जागा अप्रतिम आहे. रॅफल्स (Raffles) हे तेथील एक प्रमुख ठिकाण आहे. तिथे एकदा का मेट्रोने उतरलो मग बाकी सगळं पायी फिरता येतं. त्याच ठिकाणी जवाहरलाल नेहरु यांचा पुतळाही पाहायला मिळतो. चांगी विमानतळ हे जगातील नावाजलेल्या विमानतळांपैकी एक आहे. संपूर्ण दिवस तुम्ही या विमानतळावर पर्यटनासाठी वेळ घालवू शकता. टायगर बिअर फेमस आहेच आणि सोबत डुरियान (Durian) हे फणसासारखे असणारे फळही प्रसिद्ध आहे परंतु त्याचा खूप वास येत असल्यामुळे ‘No Durians Allowed’ असं ठिकठिकाणी पाहायला मिळतं. सिंगापूर हा विदेशी मासळीचा जगातील सर्वांत मोठा निर्यातदार देश आहे.

मरिना बे सँड्स पंचतारांकित हॉटेल, मर्लियन पार्क, सेंटोसा, सिंगापूर बोटॅनिक गार्डन्स, युनिव्हर्सल स्टुडिओ, सिंगापूर फ्लायर, कलाविज्ञान संग्रहालय, नाईट लाईफसाठी क्लार्क क्वे, एस्प्लेनेड, थिएटर्स ऑन द बे, क्लाऊड फॉरेस्ट आणि फ्लॉवर डोम ही सारी ठिकाणं बघितलीच पाहिजेत. सर्वत्र स्वच्छ समुद्रकिनारे व भन्नाट रस्ते आहेत. या रस्त्यांवर 'Formula1'च्या रेसेस होतात. तसेच तेथील 'स्काय लाईन' दिवसा व रात्री खूपच सुंदर दिसते. देश पूर्णपणे 'Planned Country' असल्यामुळे खरं तर या देशाला ''सुबक सिंगापूर'' म्हटलं पाहिजे. तसेच या देशात पाणी इतके स्वच्छ आहे की तुम्ही ‘Tap Water’ म्हणजेच थेट नळाचे पाणी पिऊ शकता. त्याने पैशांची बचतही होते.

संपूर्ण देश मेट्रोने कनेक्टेड असल्यामुळे सुखद आणि निवांत प्रवास होतो. एकटे जर गेलाच तर हॉस्टेलमध्ये राहू शकता. तर मित्रांनो, मुंबई, दिल्ली आणि चेन्नई येथून सिंगापूरची विमानं आहेत. या देशात नक्की प्रवास केला पाहिजे.

त्याचसोबत मलेशिया, थायलंड, कंबोडिया किंवा इंडोनेशिया या देशांनादेखील भेट देऊ शकता. या सर्वच देशात अनेक भारतीय लोक भेटतील, संवाद होईल, शिकायला मिळेल आणि नवा अनुभव मिळेल. कधीही आग्नेय आशियात फिरताना आपलसं वाटतं... त्यामुळे नक्की फिरा... खूप साऱ्या सदिच्छा !

(सदराचे लेखक ‘बजेट ट्रॅव्हलर’ असून ‘डू इट युवरसेल्फ’ पद्धतीचे पर्यटक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com