कोणता झेंडा घेऊ हाती? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raj Thackeray
कोणता झेंडा घेऊ हाती?

कोणता झेंडा घेऊ हाती?

‘आमची कुठेही शाखा नाही!’ या ‘मराठी बाण्या’कडं संपूर्ण दुर्लक्ष करून राज ठाकरे यांनी ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेने’ची स्थापना केली, तेव्हाच ही बाळासाहेब ठाकरे यांनी १९६६ मध्ये स्थापन केलेल्या शिवसेनेची खरीखुरी पहिली ‘शाखा’ आहे, असं चित्र उभं राहिलं होतं. भले, तेव्हा त्यांनी आपल्या पक्षाच्या झेंड्यात भगव्याबरोबरच चक्क हिरव्या आणि निळ्या रंगाचाही समावेश केला असला, तरी पक्षस्थापनेच्या वेळीच त्यांनी मराठी माणसासाठी जो कार्यक्रम जाहीर केला होता, तो म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या स्थापनेच्या वेळी काढलेल्या मागणीपत्राची अस्सल नक्कल होती ! त्यामुळे एका गोष्टीवर मात्र शिक्कामोर्तब झालं होतं आणि ते म्हणजे, ‘मनसे’ हीच शिवसेनेची सर्वार्थाने पहिलीवहिली खरीखुरी ‘शाखा’ होती!

पुढे काळाच्या ओघात पुलाखालून राज यांच्या आवडत्या नाशकातील गोदेचं बरंच पाणी वाहून गेलं आणि अगदी अलीकडे त्यांनी पक्षाचा झेंडा हा संपूर्णपणे भगवा करून टाकला! एवढंच नव्हे, तर त्यावर थेट छत्रपती शिवरायांच्या राजमुद्रेची प्रतिष्ठापनाही केली आणि आता थेट गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर त्यांनी बाळासाहेबांप्रमाणेच हिंदुत्वाची भगवी शालही खांद्यावर घेतली!

हे स्थित्यंतर विस्मयचकित करून सोडणारं जसं आहे, त्याचबरोबर राज यांची राजकीय प्रकृती कशी वारंवार बदलत जात आहे, त्याचंही निदर्शक आहे. शिवाय, महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर नवं नेपथ्य उभं करणारंही आहे.

अर्थात, ही शाल त्यांच्या खांद्यावर नेमकी कुणी घातली, या प्रश्नाचं उत्तरही त्यांच्या महिनाभरातील तीन सभांमधील त्यांची भाषा बघता सर्वांना मिळून गेलं आहे. बाळासाहेबांनी आपल्या खांद्यावर ही भगवी शाल स्वतःहून आणि विचारपूर्वक घेतली होती आणि त्या शालीने त्यांना पुरेपूर यशही दिलं होतं. मात्र, राज यांच्या खांद्यावरील ही भगवी शाल त्यांची आजवरची देशभरातील प्रतिमा आणि त्यांचं रसिक व्यक्तिमत्त्व यांच्याशी पूर्णपणे विसंगत अशीच दिसत आहे. मराठी माणसाच्या आजही लक्षात आहे, ते शरद पवारांची ‘रोखठोक’ मुलाखत घेणारे राज ठाकरे ! मात्र, गुढी पाडव्याच्या सभेत शिवसेना आणि विशेषतः उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करणाऱ्या राज यांनी औरंगाबादेत अचानक पवित्रा बदलला आणि एकदम पवार हेच आपलं लक्ष्य असल्याचं दाखवून दिलं. पवार ‘नास्तिक आहेत की आस्तिक’ असा नवाच वाद त्यांनी उपस्थित केला आणि पवार हे जाती-पातींचं राजकारण करतात, असं सांगत त्यांना फक्त मराठा समाजापुरतंच मर्यादित करण्याची खेळी केली. राज यांच्या अवघ्या महिनाभरातील नवनव्या भूमिकांमुळे राज्यात दोन स्तरांवर तणाव निर्माण होऊ शकतो. एक म्हणजे धार्मिक विद्वेष तर त्यांच्या भाषणांतून दिसत आहेच; शिवाय पवारांवरील या आरोपांमुळे जातीय तणावही वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.

राज यांच्या खांद्यावरची ही ‘भगवी शाल’ कायम सलोख्याने आपला दिनक्रम व्यतीत करू पाहणाऱ्या ‘महाराष्ट्र देशी’ विद्वेषाचं वातावरण करू पाहत आहे, त्यामुळे राज यांच्या या भगवेकरणामागील नेमका उद्देश काय, तो तपासावा लागतो. जवळपास अडीच वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राजकीय खेळीमुळे पूर्णपणे नवं नेपथ्य उभं राहिलं आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ‘महाविकास आघाडी’चं सरकार स्थापन झालं. तेव्हापासून हातातोंडाशी आलेलं राज्य गमवावं लागल्यामुळे देवेंद्र फडणवीस जितके अस्वस्थ आहेत, तितकेच राजही. खरंतर या विधानसभा निवडणुकीच्या सहाच महिने आधी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात त्यांनी ‘लाव रे तो व्हिडिओ’ नावाचा नवाच खेळ सादर करत, भाजप नेते म्हणजे अर्थातच नरेंद्र मोदी आणि फडणवीस यांची होता होईल तेवढी ‘पोलखोल’ करण्याचा जोमाने प्रयत्न केला होता. गावोगावी त्यास प्रतिसादही मोठा मिळत होता. त्यानंतरच्या तीनच वर्षांत त्यांचं हृदयपरिवर्तन पूर्ण झालं असून, आता ते थेट ‘हनुमान चालिसा’ पठण करू लागले आहेत! शिवाय, त्यांनी आपला यानंतरचा कार्यक्रम म्हणून थेट अयोध्येचा दौराही जाहीर केला आहे आणि तिथं जाऊन शक्तिप्रदर्शन करण्याचा डाव त्यांनी टाकला आहे.

कोणी त्यामागचं कारण म्हणून ‘ईडी’ने राज यांना मध्यंतरी धाडलेल्या एका नोटिशीकडे बोट दाखवू शकेलही! मात्र, अवघ्या तीनच वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे देशाचे ‘व्हिलन’ आहेत, असं जाहीरपणे सांगणाऱ्या राज यांच्यापुढचा खरा प्रश्न हा केवळ ‘ईडी’ने धाडलेल्या नोटिशीपुरता मर्यादित नाही. २००९ मध्ये बाळासाहेब समोर असतानाही त्यांना तुलनेने चांगलं यश मिळालं होतं. मात्र, २०१२ पासून प्रत्येक निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा आलेख हा घसरताच राहिला. शिशिर शिंदे यांच्यासारखे अनेक जिवलग सहकारीही त्यांना सोडून गेले आहेत, त्यामुळे आजच्या घडीला राज यांच्यापुढील सर्वांत मोठा प्रश्न हा नवनिर्माण सेनेचं अस्तित्व टिकवून दाखवण्याचा आहे. त्याचबरोबर आपण शिवसेनेची नवी शाखा काढल्यावर शिवसेनेत उभी फूट पडेल आणि आपणच बाळासाहेबांचे खरे वारसदार असल्याचं सिद्ध करू, या (गैर)समजाचा भलामोठा फुगा फुटला, हे वास्तवही आहे. त्यामुळेच त्यांनी महाराष्ट्रात हा नवा डाव टाकला आहे.

अर्थात, तो डावही त्यांना नेहमीसारख्या चातुर्याने खेळता आला नाही, हेही तितकंच खरं आहे. गुढी पाडव्याच्या सभेतच ते स्पष्ट झालं होतं. त्या दिवशीच्या शिवाजी पार्कवरील संध्याकाळच्या सभेआधी सकाळी ‘मनसे’ने थेट ‘शिवसेना भवन’समोर गुढी उभारत आपण कोणाला आव्हान देणार आहोत, ते दाखवून दिलं होतं. मात्र, तिथं भाजपचे मुंबईतील बडे नेते आशिष शेलार जातीने उपस्थित राहिले, तेव्हाच राज यांच्या नव्या ‘खेळा’ची पटकथा कोण लिहीत आहे, त्याची चाहूल लागली होती. भले, शेलार यांनी ती गुढी उभारली जात असताना, ‘आपण राजकारणाचे जोडे काढून इथं आलो आहोत!’ अशी मखलाशी केली खरी. मात्र, नंतरच्या काही तासांतच राज बोलायला उभे राहिले आणि शेलारांनी सकाळी काढलेले ते जोडे घालूनच तर राज सभेला आले नाहीत ना, असा प्रश्न उभा राहिला. राज यांचा हा नवा डाव फसला, तो तेव्हाच!

त्याच सभेत राज यांना ‘हनुमान चालिसा’ची आठवण झाली आणि नव्या महाराष्ट्राच्या ‘ब्लू प्रिंट’ची असोशीने वाट बघणाऱ्या मनसैनिकांबरोबर अनेकांना धक्का बसला. मनसे स्थापन झाली तेव्हा राज यांनी मोठ्या चातुर्याने एक नवं स्वप्न महाराष्ट्राला दाखवलं होतं. त्यात हे ‘हनुमान चालिसा’ प्रकरण कुठंच बसत नव्हतं. मात्र, या नियोजनबद्ध पद्धतीने आयोजित केलेल्या सभांनंतर राज्यभरातील एक समूह हा अचानक ‘भीमरूपी महारूद्रा’च्या ऐवजी उत्तर भारतीयांच्या घराघरांत म्हटली जाणारी ‘हनुमान चालिसा’ वाचू लागला. हे सारं अचंबित करणारंच होतं. मात्र, राज यांना अनपेक्षितपणे मिळालेला हा प्रतिसाद अनेकांच्या पोटात गोळा आणणारा असू शकतो, त्यामुळे शिवसेना धास्तावून गेली आहे, हे तर दिसतंच आहे. मात्र, राज्यात येत्या काही महिन्यांत होऊ घातलेल्या जवळपास डझन - दीड डझन महापालिकांच्या निवडणुकीत राज हे स्वतंत्रपणे उभे राहिले, तर ते ‘नवहिंदुत्वा’च्या या अंगावरील शालीमुळे आपलीही काही मतं खेचून तर घेणार नाहीत ना, असा प्रश्न त्यांना कळसूत्री बाहुल्याप्रमाणे वापरू पाहणाऱ्या भाजपच्या गोटातही चर्चिला जाऊ लागला आहे. मात्र, निवडणूक व्यवस्थापनात मुरब्बी म्हणून ख्यातकीर्त असलेला भाजप तसं होऊ देण्याची शक्यता अगदीच कमी आहे. राज यांची ‘मनसे’ ही निवडणुका जिंकण्याच्या खेळात, भले त्यांच्या सभांना तुडुंब गर्दी होत असली तरीही, अगदीच ‘कच्चा लिंबू’ आहे. मात्र, ‘गेम स्पॉयलर’ म्हणून ‘मनसे’ची कीर्ती दिगंत आहे आणि त्याची अनेक उदाहरणंही देता येतील. त्यामुळे या आगामी महापालिका निवडणुकांत भाजप त्यांच्याशी पडद्याआडून समझोता करून, आता खांद्यावर घेतलेल्या भगव्या शालीमुळे त्यांच्या पुन्हा एकवार प्रेमात पडलेल्या काही शिवसैनिकांची मतं खेचून घेण्याची जबाबदारी सोपवणार, असं चित्र आज तरी दिसत आहे.

मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर लगेचच नागपूर येथे झालेल्या विधिमंडळ अधिवेशनात उद्धव यांनी ‘आम्ही धर्माची राजकारणाशी सांगड घातली, ही आमची मोठीच चूक होती आणि त्याचे आम्हाला बरेच फटकेही बसले,’ अशी जाहीर कबुली दिली होती. त्यामुळे किमान काही प्रमाणात तरी बाळासाहेबांच्या कडवट हिंदुत्वावर भाळलेले शिवसैनिक नाराज असल्याचं दिसत आहे. त्यामुळे ‘कोणता झेंडा घेऊ हाती?’ असा प्रश्न पडलेल्या या नाराजवंतांना आपल्याकडे खेचून घेत, शिवसेनेच्या मतपेढीला होता होईल तेवढं खिंडार पाडण्याची ही खेळी आहे. त्यामागची पटकथा भाजपनेच लिहिलेली आहे, हेही ज्या सुरात अचानक फडणवीस आणि कंपनी एकदम बाबरी आणि तत्सम विषय उकरून काढत आहे, त्यावरून दिसू लागलं आहे.

महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर पुन्हा एकवार झालेला हा ‘हिंदुत्वा’चा प्रवेश मन कमालीचं विषण्ण करून टाकणारा असाच आहे. आज राज्यातील ‘आम आदमी’पुढे रोजी-रोटीपासून, लोड शेडिंगपर्यंत अनेक जीवघेणे प्रश्न ‘आ’ वासून उभे आहेत, त्यांच्यापासून लक्ष अन्यत्र वळवण्याचा हा नियोजनबद्ध डाव आहेच. शिवाय, त्यामुळेच ही खेळी करणाऱ्या नेत्यांना केवळ सत्ताकारणातच रस आहे, सामान्य जनतेपुढील प्रश्नांत नाही, यावरही शिक्कामोर्तब झालं आहे.