न बुजलेले घाव... | Mumbai Terror Attack | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai Terror Attack
न बुजलेले घाव...

न बुजलेले घाव...

sakal_logo
By
प्रकाश अकोलकर akolkar.prakash@gmail.com

दिवाळी उलटून गेलेली आणि मुंबईकरांना कायमच्या उन्हाळ्याच्या काहिलीतून सोडवणारी...हवीहवीशी वाटणारी थंडी पडू लागलेली.

टीव्हीवर क्रिकेटचा एक सामना सुरू असतो...सचिन तेंडुलकरच्या आणि वीरेंद्र सेहवागच्या फटकेबाजीमुळे भारत विजयाच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचलेला. एकंदरीतच खुशीचं वातावरण...बोरीबंदर रेल्वेस्थानकाच्या समोरच्या ऐतिहासिक आझाद मैदानाकडे पाठ करून उभ्या असलेल्या मुंबई प्रेस क्लबमध्येही मग चषक उंचावलेलेच असले तर त्यात नवल ते काय!

वार बुधवार आणि तारीख असते २६/११... वर्ष असतं २००८.

सारं कसं सुशेगात असतं या मुंबापुरीत...

आणि मीही त्याच वातावरणात पहुडलेलो असतानाच, समोरच्या ‘टाइम्स’च्या वास्तूतून एकाचा फोन येतो... ‘घरी निघाला असाल तर समोर ‘व्हीटी’च्या (म्हणजेच आजच्या भाषेत ‘छत्रपती शिवाजीमहाराज टर्मिनस’च्या) दिशेनं जाऊ नका... तिथं काही तरी गोळीबार वगैरे झालाय...

खरं तर त्या फोननंतरही प्रेस क्लबमधल्या वातावरणावर ढिम्म काही परिणाम होत नाही...पण मीच हातात रिमोट घेऊन टीव्हीचं चॅनेल बदलतो तेव्हा एकच गदारोळ होतो... लोकांना भारताचा विजय साजरा करायचा असतो...पण त्या गदारोळातच अनेकांचे फोन सुरू होतात...मुंबईला पुढचे तीन दिवस पडू घातलेल्या वेढ्याची ती सुरुवात असते. टीव्हीची चॅनेल्स धडाधडा बदलली जातात. कोणत्याच चॅनेलच्या हातात सुस्पष्ट असं काहीच नसतं... मनावरचं दडपण वाढत चाललेलं आणि हळूहळू वेगवेगळ्या चॅनेलवरील बातम्यांतून धूसर असं चित्र उभं राहत जातं. आता गोळीबाराचे आवाज अगदीच जवळून येऊ लागलेले...दरम्यान, आम्हा काहींचा प्रेस क्लबमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न बाहेर असलेल्या बंदोबस्तातील पोलिसांनी हाणून पाडलेला. त्यामुळे बाहेर नेमकं काय घडतंय ते समजून-उमजून घेण्याचा एकमेव मार्ग टीव्ही हाच शिल्लक उरलेला...

अखेर एकदाची मध्यरात्र सामोरी येते...इतकी काळोखी मध्यरात्र पहिल्यांदाच बघितलेली. खरं तर प्रेस क्लबच्या गच्चीवर झगझगीत प्रकाश. बाहेरचे दिवेही ढणाढणा पेटलेले. तरीही मनातल्या अंधारानं त्या प्रकाशावरच काळोखी आणलेली. आता टीव्हीच्या बातम्यांतून जे काही समजतंय त्यातून घडलेला प्रकार किती भीषण आणि भयावह होता, त्याची पुरती कल्पना आलेली. तरीही यातून सुटका केव्हा आणि कशी होणार ते कळायला मार्ग नाही...

याचा नेमका शेवट काय? सुरुवात कुलाब्यातल्या ‘ताजमहाल हॉटेल’च्या पिछाडीला असलेल्या ‘लिओपोल्ड’ कॅफेतून झालीय हेही आता लक्षात आलेलं. दरम्यान, हे जे कुणी मुंबईवर हल्ला करू पाहत आहेत त्यांच्याशी मुकाबला करताना मुंबई पोलिस दलाचे करकरे-कामटे-साळसकर असे काही अधिकारी हुतात्मा झाल्याचंही कुठूनसं कानावर आलेलं.

क्लबमधील बहुतेकांच्या सेलफोनच्या बॅटऱ्यांनी जीव टाकलेला आणि काहीही न करता श्रमून गेलेल्या मनांनी साऱ्यांच्याच डोळ्यांवर पेंग आणलेली. बसल्या खुर्चीतच बहुतेकांनी डोळे मिटून घेतलेले...

पहाटे केव्हा तरी जाग येते ती खिशातल्या सेलफोनची घंटा वाजल्यानं. त्या नीरव शांततेत तो आवाज ठणाठणा सर्वांनाच उठवणारा ठरतो आणि सगळेच बाहेर येतात. आता रस्ते निर्मनुष्य झालेले...मिळेल ती लोकल गाडी, मिळेल तिथून पकडून घराकडे प्रयाण...मनावर कमालीची उदासी...नेमकं काय झालंय ते अजूनही खरं तर न कळलेलं.

सकाळी घरी पोहोचल्यावरचं चित्र काहीसं स्पष्ट होतं. मुंबईवर काही दहशतवाद्यांनी केलेला हा हल्ला आहे आणि रात्रीतूनच कसाबला पकडण्यात पोलिसांना यश आलं असलं तरी ‘ताजमहाल’, ‘ओबेरॉय’ ही पंचतारांकित हॉटेलं अजूनही दहशतवाद्यांच्या ताब्यात असल्याचंही समजतं...

हा साराच प्रकार अंगावर शहारे आणणारा होता. मात्र, आपण काहीही करू शकत नाही हेही ध्यानात आलं होतं आणि मग दुपारी पुनश्च एकवार ‘टाइम्स’च्या दिशेनं मार्गक्रमण करताना, दिवसाचे जेमतेम दोन-अडीच तासच झोपणाऱ्या या मुंबईनामक महानगरानं आपले नित्याचे व्यवहार, आदल्या काळरात्री जणू काहीच घडलेलं नाही, अशाच रीतीनं सुरू केलेले...मुंबईत दहशतवाद्यांनी ता. १२ मार्च १९९३ रोजी साखळी बॉम्बस्फोट घडवून आणले होते तेव्हा त्यानंतरच्या २४ तासांतही अगदी असंच घडलेलं. तेव्हा आणि आताही म्हणजे २६/११ च्या या हल्ल्यानंतरही सर्वत्र चर्चा सुरू झाली होती ती याच ‘मुंबई स्पिरिट’ची...मुंबईत काहीही घडलं तरी हा मुंबईकर कसा ठामपणे उभा राहतो...संकटात सापडलेल्यांना हात देतो... धीर सोडत नाही...वगैरे...वगैरे...

अर्थात्, हे सारे पोकळ शब्द आहेत हेही मनातला एक कोपरा जाणवून देत होता आणि त्याच वेळी या महानगराच्या सुरक्षाव्यवस्थेतील त्रुटीही समोर येत होत्या. लोकल ट्रेन्समध्ये, नाक्यानाक्यावरच्या चहाच्या टपऱ्यांवर, तसंच पान-बिडीच्या टपऱ्यांवर चाललेल्या चर्चांमधूनही तेच तेच पुनःपुन्हा बोललं जात होतं. आपल्या गुप्तचर यंत्रणा इतक्या गाफील कशा राहिल्या हा प्रश्न तर जाणवेल इतक्या मोठ्या स्वरात कानावर येत होता...तरी मुंबईकरांनी मनावर दगड ठेवून आपले नित्याचे व्यवहार सुरळीत सुरू केले आहेत, याचं कौतुक मात्र सर्वत्र सुरू होतंच...

बुधवारच्या त्या रात्री दोन-पाच दहशतवाद्यांनी मुंबईच्या प्रमुख संस्थांना/आस्थापनांना घातलेला वेढा मग पुढच्या दोन रात्रीही कायम राहिला आणि अखेरीस शनिवारी सकाळी शेवटचा दहशतवादी मारला गेल्यावर मुंबईकरांनी सोडलेला सुस्कारा आजही ऐकू येतोय...!

मुंबईत दहशतवादानं पहिलं पाऊल नेमकं टाकलं तरी कधी, असा प्रश्न आज या दुर्घटनेला १२-१३ वर्षं लोटल्यावर मनात येणं साहजिकच आहे. अयोध्येत सहा डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद पाडली गेल्यानंतर हे घडलं आणि तिथून सातशे-आठशे मैलांवर असलेल्या मुंबापुरीत हिंसक दंगलींचा वणवा पेटला. १०-१५ दिवसांनी तो थांबला खरा; पण पुढच्याच महिन्यात, म्हणजे जानेवारी १९९३ मध्ये, पुनश्च एकवार दंगे सुरू झाले...हा सूडाचा प्रवास होता. ते दंगेही भयावह आणि शेकडो निरपराध्यांचा बळी घेणारेच होते. अखेर हिंसाचार थांबला; पण सूडाचा वडवानल शांत झाला नव्हता.

त्याचीच परिणती मग १२ मार्च १९९३ रोजी मुंबईतल्या त्या भीषण बॉम्बस्फोटांत झाली...

दहशतवाद्यांनी मुंबईत रोवलेलं ते पहिलं पाऊल होतं...

२६/११ हे त्याच सूडाच्या प्रवासातील आणखी एक पाऊल होतं... मुंबईकरांच्या मनातील ते घाव आजही बुजलेले नाहीत...

loading image
go to top